लहानपणी सुट्या लागल्यावर आजोळी शिपोशीत राहायला जायचो. तीन मामेभावंडं आणि मी, असा दंगा असायचा. कधी गुरं राखणं, कधी नदीवर आंघोळ, कधी आंब्याच्या बागेत धुडगूस तर कधी पत्त्यांचा डाव, असे उद्योग चालायचे. संध्याकाळी कधीकधी नदीच्या एका बाजूला, थोड्या आडजागी आम्ही वाळूत खेळायला जायचो. उन्हाळ्यात नदी बऱ्यापैकी आटलेलीच असायची, पण ती ओलांडून जावं लागायचं. तो भाग तसा आडोशाचा होता आणि तिथे आसपास फारशी वस्ती नव्हती. तिथे खेळायला आम्ही जरा लवकर जायचो आणि सहा वाजेपर्यंत अंधार पडायच्या आत घराची वाट धरायचो. संध्याकाळच्या वेळी तिथली हलणारी झाडं, त्यांतून घुमणाऱ्या वाऱ्याचा आवाज, त्यांच्या सावल्या, सगळं गूढ वाटायचं. मामा कधीतरी रात्रीच्या वेळी त्याच्या वाडवडिलांनी, काकांनी, गावातल्या कुणीतरी पाहिलेल्या भुतांच्या कहाण्या सांगायचा. तिथल्याच कुठल्यातरी वडाखाली गावातल्या एकाला भुतानं झपाटलं होतं वगैरे कहाण्या ऐकून आम्ही टरकायचो. आम्ही नदीच्या बाजूला जायचो, तिथेच पुढच्या वाटेवर कुठेतरी ती घटना झाली असावी, असं वाटायचं.
मामाचं घर अगदी जुन्या पद्धतीचं होतं. ओटी, पडवी, माजघर, स्वयंपाकघर, परसदार, अंगण वगैरे. आम्ही सगळे माजघरात झोपायचो. बाहेर ओटी, पडवी, अशा दोन खोल्या होत्या. पडवीत आम्ही संध्याकाळी झोपाळ्यावर शुभंकरोति वगैरे म्हणायला बसायचो, पण लाकडी खिडकीच्या गजांतून कुणीतरी डोकावून बघतंय की काय, असे भास सतत होत असायचे. एकदा सात-सव्वासातच्या दरम्यान शुभंकरोति आटोपली, की मग पुन्हा पडवीत फिरकायची आमची शामत नसायची. जो काही धुमाकूळ घालायचा, तो माजघरात.
घरापासून दुसरं जवळचं घर किमान 50-60 फुटांवर होतं. बाहेर किर्रर्र काळोख आणि रातकिड्यांची किरकीर. रात्रीच्या वेळी भीतिदायकच वातावरण असायचं. घरात मिळमिणते दिवे असायचे. त्यांच्या प्रकाशामळे भिंतींच्या, खांबांच्या, घरात रचून ठेवलेल्या पोत्यांच्या ज्या सावल्या पडायच्या, त्यांच्यामुळे त्या गूढ वातावरणात आणखी भर पडायची. रात्री माजघरातून कुणी बाहेरच्या खोलीचं दार बंद आहे की नाही, हे बघायला जायला सांगितलं, तर कुणीही त्या धाडसासाठी तयार नसायचं. कधीकधी आमच्या पैजाही लागायच्या. ओटीवर जायचं, ओटी पार करून दिवा लावायचा, मग पडवीच्या पायऱ्या उतरून जायचं, दार बंद आहे की नाही बघायचं, कडी घालायची आणि ओटीवर येऊन दिवा बंद करायचा, मग अंधारातच ओटी पार करून माजघरात यायचं, एवढं मोठं दिव्य असायचं ते. बाहेरच्या दाराला कडी घातली किंवा तपासली, की तिथून पाठमोरं परत येताना अंगातलं त्राणच गेल्यासारखं व्हायचं. सावकाश चालत यायचं टास्क दिलेलं असलं, तरी तेवढी हिंमतच नसायची. एकदा कडी घातली, की सुसाट पळत येऊन माजघर गाठायचं, हीच सर्वसाधारण रीत होती. एक क्षण थांबलो, तरी मागून एखादा हात येऊन आपली बकोट धरेल, असंच वाटायचं. दिव्यामुळे पडणाऱ्या स्वतःच्या सावलीचीही भीती वाटायची.
हळूहळू मोठे झालो आणि ही भीती कमी झाली आणि आजोळी जाणंही.
कधीकधी वाटतं, की बालपणी तेवढीच एक भीती होती, ते बरं तरी होतं. आता वेगवेगळ्या सावल्या रोजच भीती घालत असतात. त्यांच्यापासून कसं वाचणार?
No comments:
Post a Comment