Sep 2, 2018

केल्याने भाषांतर

रत्नागिरीत पत्रकारितेला सुरुवात केली, तेव्हा तिथल्या `रत्नागिरी एक्स्प्रेस` या स्थानिक दैनिकात अनिल जोशी या सहकाऱ्याकडे भाषांतराची जबाबदारी असायची. टेलिप्रिंटर अखंड खडखडत असायचा आणि त्याच्यावरच्या इंग्रजीतल्या कॉपीज टराटरा फाडून तो ते भेंडोळं समोर घेऊन बसायचा. एकट्यानं बहुतेकसं भाषांतर बडवायचा. ते पहिल्यांदा बघितलं, तेव्हा खूप भारी वाटलं होतं.

 

तिथे भाषांतर करण्याची फार वेळ आली नव्हती. `सागर` आणि `सकाळ`मध्ये तर मी बातमीदारीच करत होतो. भाषांतराशी संबंध येण्याचा प्रश्न नव्हता.

 

पुण्यात आल्यानंतर आधी `लोकसत्ता`त बातमीदारी करून `केसरी`मध्ये नोकरीला लागलो, तेव्हा बातम्यांच्या भाषांतराशी थेट आणि जवळचा संबंध आला. अभय कुलकर्णी, अमित गोळवलकर, विनायक ढेरे हे सिनिअर तेव्हा बातम्या भाषांतरित करायला द्यायचे. प्रत्येक बातमीचं शब्दन् शब्द भाषांतर झालंच पाहिजे, असा सुरुवातीला माझा समज होता. तीन-चार पानांच्या इंग्रजी बातमीची सुरेंद्र पाटसकरसारखे सहकारी एखाद-दुसऱ्या परिच्छेदात वासलात लावायचे, तेव्हा आश्चर्य वाटायचं. नंतर मीसुद्धा भाषांतराचं (आणि कापाकापीचं) तंत्र शिकू लागलो आणि त्यात मजा वाटायला लागली. दडपण कमी झालं.

 

पीटीआय, यूएनआयच्या बातम्यांमधल्या विशिष्ट शब्दांची परिभाषाही समजली. Wee hours, Charred to death, slammed, thrashed, alleged, sacked, to get a shot in arms, whip, अशा शब्दांची गंमत कळायला लागली. पीटीआयच्या विशिष्ट बातम्यांमध्ये विशिष्ट शब्द असायचेच.

 

Air Strikes चं `वैमानिकांचा संप` अशा झालेल्या चुकीच्या भाषांतरांची उदाहरणं ऐकली, वाचली होती, तरी काम करताना भरपूर चुकाही घडायच्या. रत्नागिरीत असताना आंतरराष्ट्रीय घडामोडी वाचायची कधी सवय नव्हती. बातमीमध्ये Shanghai has said, Islamabad has said अशी वाक्यं असली, की गोंधळ व्हायचा. म्हणजे `चीनने/पाकिस्तानने म्हटले आहे,` हा अर्थ हळूहळू समजायला लागला.

Sanctions on Iraq म्हणजे इराकवर बंधनं किंवा परवानगी नव्हे, तर `निर्बंध` असे विशिष्ट वर्तमानपत्रीय पारिभाषिक शब्दही समजायला लागले.

 

संपादक अरविंद गोखले दर मंगळवारी मीटिंग घ्यायचे आणि अंकातील चुका सांगायचे. चूक कुणाची आहे, ते त्या त्या व्यक्तीनं आपणहून समजून घ्यायचं, अशी पद्धत होती. चूक केलेल्या व्यक्तीचा उल्लेख किंवा जाहीर पंचनामा व्हायचा नाही. एकदा मी `Pentagon said`चं `पेंटॅगॉन` या नियतकालिकात असे म्हटले आहे की,` असं भाषांतर करून ठेवलं होतं. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाला Pentagon म्हणतात, हे तेव्हा समजलं.

 

`सकाळ`मध्ये आल्यानंतर तर बहुतांश काम भाषांतराचंच असायचं. अशोक रानडे, विजय साळुंके यांच्यासारखे कसलेले पत्रकार आमच्या बातम्या तपासायचे. साळुंके तर आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक. ते मुद्दाम आंतरराष्ट्रीय बातम्या भाषांतरित करायला द्यायचे आणि त्या त्या विषयांचा अभ्यास करावा लागायचा.

 

`सकाळ`मध्ये नेमके आणि योग्य मराठी शब्द वापरण्याबद्दल त्यांचा अतिशय आग्रह असायचा. Line of control (LOC)ला तेव्हा `सकाळ`मध्ये `प्रत्यक्ष ताबारेषा` असा शब्द त्यांनी रूढ केला होता. नियंत्रण आणि `ताबा` यात म्हटलं तर फरक आहेच. नेमकेपणा राखला जायचा, तो असा.

 

`सकाळ`चे माजी संपादक एस. के. कुलकर्णी अधूनमधून शिकवायला यायचे. ते म्हणजे तर शब्द, भाषा, ग्रामीण महाराष्ट्र, यांचे गाढे अभ्यासक. इंग्रजीत feared dead हा वाक्प्रचार वापरतात. त्याचं मराठी शब्दशः भाषांतर `ते मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे,` असं केलं जातं, त्याला त्यांचा आक्षेप असायचा. आपल्याला भीती कशाला वाटेल? `मृत्युमुखी पडल्याची शक्यता` असू शकते, असं ते म्हणायचे.

 

Milestone म्हणजे `मैलाचा दगड` नाही, `महत्त्वाचा टप्पा` हेसुद्धा तिथेच शिकता आलं.

कधीकधी मंगळवारच्या मीटिंगमध्ये ज्येष्ठ पत्रकार गोपाळराव पटवर्धन यायचे. तेसुद्धा इंग्रजीचे मोठे अभ्यासक. एकदा मी ब्यूटी क्वीन स्पर्धेच्या बातमीत blonde हे नाव समजून `ब्लॉंड अमूक तमूक` असं भाषांतर केलं होतं. त्यांनी त्याबद्दल मीटिंगमध्ये सांगितल्यानंतर मला चूक लक्षात आली.

 

 

नंतर भाषांतराची गोडीच लागली. इंटरनेट आल्यानंतर हे काम आणखी रंजक झालं. मूळ पीटीआयची बातमी वाचायची, यूएनआयच्या बातमीशी ती ताडून बघायची, मग इंटरनेटवर त्याचे आणखी तपशील शोधायचे, इतर वेबसाइट्सच्या बातम्या बघायच्या आणि हे सगळं वाचून एकत्रित दीडशे किंवा दोनशे शब्दांची बातमी करायची, त्यात एखादी चौकट तयार करायची, याची मजा वाटायला लागली. एखाद्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य किंवा कोर्टाचा निकाल अशा बातम्यांचं भाषांतर जास्त इंटरेस्टिंग असायचं. त्यात शब्दांचे अर्थ, छुपे अर्थ शोधता यायचे, त्या व्यक्तीची समज, तिची प्रतिमा, यांचा आधार घेऊन भाषांतर करावं लागायचं. शशी थरूर यांचं इंग्रजी, लालूप्रसाद यादव किंवा उत्तरेतल्या काही नेत्यांचं हिंदी, त्यातले वाक्प्रचार समजून घेऊन नेमकं भाषांतर करण्याची फार हौस असायची. आर्थिक बातम्यांच्या मात्र मी फारसा फंदात पडत नसे.

 

आशियाई देशांना सुनामीचा फटका बसला, तेव्हा पहिले दोन दिवस नुकसान, मृत्यूच्या आकड्यांच्या बातम्या दिल्यानंतर बातम्यांमध्ये तोच तोचपणा येऊ लागला होता. रोज मुख्य बातमी तर करायला हवी, पण आकडेवारीशिवाय वेगळं काही नाही, अशी परिस्थिती होती. चौथ्या दिवशी तेव्हाचे संपादक अनंत दीक्षित यांनी सांगितलं, त्याच विषयाची काहीतरी वेगळी बातमी शोधून काढा आणि ती पहिल्या पानावरची मुख्य बातमी (मेन फीचर) करा. आमची शोधाशोध सुरू झाली. प्रदीप कुलकर्णी आणि मी, असे दोघे सहकारी रात्रपाळीला होतो. एका बातमीत एक-दोन ओळींमध्ये काही नागरिक आता आपल्या जुन्या घरांमध्ये परतू लागले असून, पुरातून वाचलेलं सामान गोळा करण्याचा प्रयत्न करतायंत, असा काहीतरी उल्लेख होता. मला मुख्य बातमी मिळाली होती.

 

मग त्या दोन-तीन ओळींवरून, तिथल्या परिस्थितीची कल्पना करून सुमारे तीनशे साडेतीनशे शब्दांची, तिथल्या परिस्थितीचं वर्णन करणारी, भावनिक बातमी लिहिली. कुणी घर सावरण्याचा प्रयत्न केला असेल, कुणी आपल्या हरवलेल्या मुलांचा शोध घेतला असेल, कुणी आपले दागदागिने शोधत असेल, अशी सगळी कल्पना करून बातमी लिहिली होती. दुसऱ्या दिवशी तिची खूप प्रशंसा झाली. भाषांतराच्या काळातला तो सगळ्यात गोड आणि आनंददायी अनुभव.


No comments: