Jul 6, 2018

खरा चित्रपटप्रेमी



...तरीही विक्रमादित्यानं आपला हट्ट सोडला नाही. तो पुन्हा स्मशानापाशी गेला. स्मशानाजवळच्या त्या झाडावरचं प्रेत त्यानं खांद्यावर घेतलं आणि तो राजवाड्याच्या दिशेने चालू लागला.

प्रेतात लपलेला वेताळ जागा होऊन त्याला म्हणाला, ``हे राजन, तुझ्या चिकाटीला दाद दिलीच पाहिजे. रोजच्या रोज नित्यनेमाने फेसबुकवर पोस्टी पाडणाऱ्यांपेक्षा तुझी चिकाटी अफाट आहे. चल, तुला याच चिकाटीवरून एक गोष्ट सांगतो. फार फार वर्षांपूर्वी... सॉरी. फार फार वर्षांपूर्वीची कशाला, आत्ता कालपरवाची गोष्ट सांगतो. मुंबई नामक एका मायानगरीत संजय दत्त नावाचा एक कलाकार कम पार्ट टाइम देशद्रोही कम पार्ट टाइम गुन्हेगार राहत होता. राजकुमार हिरानी नावाच्या पार्ट टाइम दिग्दर्शक कम पार्ट टाइम मित्रानं त्याच्या आयुष्यावर एक चित्रपट तयार केला – `संजू`. संजय दत्तची पार्ट टाइम कारकिर्द आणि पार्ट टाइम वैयक्तिक आयुष्य त्यात दाखवण्यात आलं होतं. सोशल मीडियावर या सिनेमाची भरपूर चर्चा झाली. कुणी व्हिडिओ केले, कुणी ऑडिओ केले, परिसंवाद झडले, पार्ट्या रंगल्या, प्राइम टाइममध्ये महाचर्चा घडल्या. कुणी प्रेक्षकांना मूर्ख म्हटलं, कुणी प्रेक्षकांना या देशद्रोह्याचे सिनेमे बघू नका, असं कळकळून आवाहन केलं. कुणी सिनेमा बघा, पण त्याचे गुन्हेही लोकांना सांगा, असं भावनिक आवाहन केलं.

सोशल मीडिया लोकांच्या हातात आल्यापासून समीक्षकांच्या जेवढ्या पिढ्या जन्माला आल्या नसतील, तेवढ्या या एका आठवड्यात जन्माला आल्या. शेवटी सोशल मीडियावर एक स्पर्धाच जाहीर करण्यात आली. खरा चित्रपटप्रेमी कोण, अशी स्पर्धा. स्पर्धेसाठी वेगवेगळ्या कॅटेगरी ठेवण्यात आल्या होत्या. पहिली, `संजू` सिनेमा पाहून लगेच फेसबुकवर परीक्षण लिहिलेले. या कॅटेगरीत एन्ट्रीजचा महापूर होता. दुसरी कॅटेगरी होती, `संजू` सिनेमा बघूनही परीक्षण न लिहिणारे. हा विभाग ओस पडला होता. तिसऱ्या कॅटेगरीत काही कारणांनी `संजू` बघण्याची संधी न मिळालेल्यांचा समावेश होता. चौथी कॅटेगरी मात्र एक तत्त्व म्हणून `संजू` न बघणारे आणि दुसऱ्यांनीही बघू नये, असं आवाहन करणाऱ्यांची होती. या कॅटेगरीत एऩ्ट्रीजचा एवढा पाऊस पडला, की जाहीर केल्या केल्या ही कॅटेगरी ओव्हरफ्लो झाल्यामुळे प्रवेश बंद करावे लागले. बाकी चोरून डाऊनलोड करून बघणारे, मित्रांकडून पेन ड्राइव्हमध्ये कॉपी करून घेणाऱ्यांचेही विभाग होते, पण त्यात विशेष काही नसल्यामुळे त्यांची दखल घेण्याची गरज नव्हती.

एवढी गोष्ट सांगून वेताळ म्हणाला, ``तर, तर हे अतिबुद्धिमान, सर्वशक्तिमान राजन, आता तू सांग, यापैकी नक्की कुठल्या चित्रपटप्रेमींची कॅटेगरी श्रेष्ठ ठरली असेल? आणि कुणाला बक्षीस मिळालं असेल? तुला या प्रश्नाचं उत्तर माहीत असतानाही तू बोलला नाहीस, तर तुला `रेस-3` आणि `बागी-2`ची डीव्हीडी घरी आणून दिली जाईल आणि ते दोन्ही चित्रपट सलग बघण्याची सक्ती केली जाईल. तुझ्या डोक्याची शंभर काय, हजार शकलं आपोआपच होतील. सांग!``

विक्रमादित्य हसला.
क्षणाचाही विलंब न लावता तो म्हणाला, ``उत्तर सोपं आहे वेताळा. `संजू` बघणाऱ्या किंवा न बघणाऱ्या कुणालाही हे बक्षीस मिळालं नाही.``
वेताळाला आश्चर्य वाटलं.

``खरा चित्रपटप्रेमी तोच, ज्यानं `संजू`चा मोह टाळून सेट मॅक्सवर `सूर्यवंशम` बघितला!

हे उत्तर ऐकल्यावर वेताळाच्याच डोक्याची शंभर शकलं झाली आणि तो ती गोळा करत सैरावैरा धावू लागला.



No comments: