Jan 22, 2018

मी आणि माझा(ही!) शत्रुपक्ष


नमस्कार.
सगळ्यात आधी मी तुम्हाला माझी ओळख करून देतो. माझं नाव आहे, कोटिभास्कर सदाशिव गोडबोले. (हे म्हणजे `चौथी अ` यत्तेतल्या मुलानं बाईंनी लिहून दिलेलं आणि `योग्य जागी` छड्या मारून, घोटवून पाठ करून घेतलेलं भाषण प्रमुख पाहुण्यांसमोर घडाघडा म्हणून दाखवण्यासारखंच झालं, नाही? ``व्यासपीठावरील मान्यवर, माझे आदरणीय शिक्षकवृंद आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो...` असो!)

तर, सांगण्याचा उद्देश काय, की गोडबोले हे आडनाव असलं, तरी आडनावासारखं माणसानं वागायलाच हवं, असं नाही. वाघमारे आडनावाची माणसं घरात झुरळसुद्धा मारू शकत नसतात आणि हगवणे आडनावाच्या माणसांना कधीही पोटाच्या तक्रारी नसतात, तसंच हे. माझ्या आडनावासारखाच नावाचाही थोडासा घोळच आहे. तसं माझं पाळण्यातलं नावसुद्धा भास्कर. आई सांगते, की माझ्या जन्माच्या दिवशी खग्रास सूर्यग्रहण होतं. खरंतर तेव्हापासून त्यांच्या आयुष्याला जे ग्रहण लागलं, ते कायमचंच. पण तेही असो! आता सूर्यग्रहणाच्या दिवशी माझा जन्म होऊनसुद्धा माझं नाव `भास्कर` ठेवायची दुर्बुद्धी त्यांना का झाली, हे तो सूर्यदेवच जाणे! कर्णासारखा माझा जन्म सूर्याच्या आशीर्वादानं (म्हणजे पौराणिक सिरियलमध्ये सिनेमात दाखवतात तसं हातातून निघालेले किरण डायरेक्ट गर्भाशयात पोहोचून तिथे गर्भधारणा होते, तसं!) झालाय की काय, अशी शंका माझ्या मनाला लहानपणीच चाटून गेली होती, पण ती जाहीरपणे विचारली, तर वडिलांचा हात माझा गाल आणि लाथ माझा पार्श्वभाग चाटून जाईल, याची साधार भीती वाटल्यामुळे ती मनातल्या मनातच ठेवली, हे वेगळं सांगायला नको. माझ्या जन्मपत्रिकेत नावाचं आद्याक्षर `` होतं आणि त्यावेळी त्यांना हेच नाव योग्य वाटलं, असं वडील सांगतात. अर्थात, त्यानंतर वडिलांनी आणि जवळच्या सगळ्याच आप्तेष्टांनी भकारातल्या सगळ्या संस्कृत शब्दांचा माझ्यावर कायम मारा करावा, अशी वेळ मीच त्यांच्यावर आणली, ती गोष्ट वेगळी. तर, पाळण्यातलं नाव भास्कर. पण बारशाला जमलेल्या सगळ्याच साळकाया माळकाया पाळण्यात मुंडी घुसवूघुसवू, माझ्या कानात कुर्रर्र करून `भास्करsss भास्करsss` असं किरकिरायला लागल्या, तेव्हा मीच एका क्षणी ओरडून चिमखड्या बोलांत `आता बास कर!` असं म्हणालो आणि तेव्हापासून मला `कोटिभास्कर` असंच टोपणनाव पडलं, अशी आठवण आई सांगते. खरंतर बाळाचं नाव ठेवण्याचा जिचा हक्क असतो, त्या आत्यानं माझ्या कानात पहिल्यांदा कुर्रर्र करून नाव सांगितल्यानंतर प्रथेप्रमाणे तिच्या पाठीत गुद्दा घालायच्या वेळी कुणीतरी एवढ्या जोरात गुद्दा घातला, की आत्या कळवळून खाली कोसळली होती. स्वतः आत्यानंच मला हा किस्सा सांगितला आणि आईनं लग्नापासून तिला खायला लागलेल्या सगळ्या टोमण्यांचा हिशोब एकाचवेळी चुकता केला असणार, याची मला मनात खातरी झाली.

तर सांगण्याचा (पुन्हा) मूळ उद्देश काय, तर माझं टोपणनाव कोटिभास्कर असं झालं, ते तेव्हापासून. खरंतर आज मला जे सांगायचं आहे त्याचा आणि माझं नाव कशावरून पडलं आणि का, याचा काडीचाही संबंध नाही. पण एखाद्या पिंपळवाडी बुद्रुक गावातल्या सार्वजनिक मुतारीच्या उदघाटनाला आलेले प्रमुख पाहुणेसुद्धा त्यांच्या भाषणाची सुरुवात जागतिक तापमानवाढीच्या परिणामांपासून करतात, तेव्हा त्या भाषणाला जसं वजन येतं ना, तसंच हे. गोडबोले आडनावाच्या माणसालासुद्धा कितीतरी शत्रू असू शकतात, हे सांगण्यासाठी एवढा द्राविडी प्राणायाम करावा लागला. आता मूळ मुद्द्यावर येऊया, तो म्हणजे माझा(ही!) शत्रूपक्ष!

आळस हा माणसाचा खरा शत्रू आहे, असा सुविचार आमच्या शाळेच्या दारावर लिहिलेला होता. आमचे मास्तर वर्गावर येऊन त्यांच्या खुर्चीत तास दोन तास ठिय्या देऊन बसायचे आणि रोज स्वतःचं बूडही न हलवता एखाद्या मुलाला फळ्यावर नवा सुविचार लिहायला सांगायचे, तेव्हाच या सुविचाराचा खरा अर्थ कायमचा माझ्या मनात बसला होता. ते सुविचारसुद्धा थोरच असायचे. नेहमी खरे बोलावे, खोटे कधी बोलू नये, `आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असते,` `मित्र परीसासारखे असावेत, म्हणजे आयुष्याचे सोने होते,` `यशामध्ये नशीबाचा भाग एक टक्का आणि परिश्रमाचा भाग 99 टक्के असतो,` `मनाचे दरवाजे कायम खुले ठेवा, ज्ञानाचा प्रकाश कधी कुठून येईल, सांगता येत नाही.` वगैरे वगैरे.

फळ्यावरचे सुविचार रोज बदलत असले, तरी मुख्य दरवाज्यावरचा सुविचार कायम असायचा - `आळस हा माणसाचा शत्रू आहे.` मला तर वाटतंय, की शाळेतले इतर शिक्षकसुद्धा कंटाळा म्हणूनच हा सुविचार बदलत नसावेत. बरं, सद्बुद्धी, परीसारखे मित्र, आळस हा शत्रू वगैरे सगळं घोटवून आयुष्यात फरक काहीच पडला नाही. म्हणजे मुख्याध्यापक किंवा बाहेरचे पर्यवेक्षक शाळेवर तपासणीसाठी आले, की आपल्या वर्गातल्या मुलांना सगळं येतं, असं मास्तर दडपून सांगायचे, तेव्हा ते खोटं बोलतायंत, हे त्यांना स्वतःला माहीत असायचं आणि पाहुण्यांनाही! गेला बाजार काही क्षणांसाठी आपल्याला खरंच सगळं येतं, असं वाटून आमची कॉलर काही काळासाठी ताठ व्हायची. परीसासारखे वाटणारे जे मित्र जवळ केले, ते काळोत्री दगडच निघतील, याची तेव्हा कल्पना नव्हती आणि आली, तेव्हा खूप उशीर झाला होता. `यशामध्ये नशीबाचा वाटा एक टक्के आणि परिश्रमाचा 99 टक्के असतो,` हे परीक्षेत दरवर्षीच लक्षात यायचं. आम्ही ज्या ज्या म्हणून संभाव्य उत्तरांच्या कॉप्या खूप परिश्रम घेऊन, कुठे कुठे लपवून परीक्षेच्या वेळी घेऊन जायचो, त्यातला कुठलाच प्रश्न पेपरमध्ये विचारला न जाणं, हेच आमच्या नशीबी असायचं!
`आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असते,` याचा धडा मात्र शाळेच्या उत्तरार्धात मिळाला. आमचे गणिताचे लाडके कानविंदे सर शाळेत नव्यानेच शिकवायला आलेल्या खानविलकर बाईंबद्दलच्या भावनांच्या हिंदोळ्यावर झुलायला लागले, तेव्हा मुख्याध्यापकांनी त्यांना कर्तव्याची आठवण करून दिली आणि खानविलकर बाईंची वेगळ्या शाळेत बदली केली, तेव्हा कानविंदे आणि खानविलकर बाई दोघांनाही भावनांना आवर घालून कर्तव्यच श्रेष्ठ मानावं लागलं होतं.
थोडक्यात, `सुविचार हाच माणसाचा खरा शत्रू आहे`, हाच सुविचार मनाच्या गाभाऱ्यात कायमचा कोरला गेला. शाळेनंतर काही सुविचारांशी फारसा संबंध आला नाही. कॉलेजमध्ये आणि नंतर पोटासाठीची वणवण करताना कुविचारांचाच प्रभाव जास्त राहिला असावा. त्यांची पुन्हा भेट झाली, ती सोशल मीडियाच्या माध्यमातून. फेसबुक आणि व्हॉटस अप सुरू झाल्यापासून जणू `शहाणे करून सोडावे अवघे विश्व` असा ध्यास घेऊन रोज कुठून कुठून शोधून सुप्रभात, सुदुपार, सुसंध्याकाळ, शुभरात्र अशा संदेशांबरोबर सुविचार पाठवणाऱ्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला. बरं, हे सुविचारकर्ते एवढे भाषातज्ञ असतात, की सगळे विद्यावाचस्पती, भाषाभ्यासक, तर्कतीर्थ वगैरे त्यांच्यासमोर झीटच येऊन पडावेत! `साखरेची गोडी जिभेवर काही सेकंदच राहते, पण स्वभावातील गोडी मात्र मनात कायमचं घर करून जाते.` आता यात `करून`च्या ऐवजी `करुण` लिहिलेलं असतं आणि मग आपला चेहरा करुण होतो.

हे सुविचार तयार करणाऱ्यांनी निसर्गातल्या सगळ्या घटकांना वेठीला धरलेलं असतं. चंद्र, सूर्य, नदी, झरे, डोंगर, दऱ्या, इंद्रधनुष्य, पालवी, कोंब, धुमारे, पशू, पक्षी, गुरंढोरं, सगळेच्या सगळे ह्यांच्याकडे आयुष्यभरासाठी वेठबिगार असल्यासारखे राबत असतात.
`ढगाआड गेलेला सूर्य पुन्हा दिसतो, पण मातीआड गेलेली आई पुन्हा दिसत नाही.`
म्हणजे?
ढगाआड गेलेल्या सूर्याचा आणि आईचा काय संबंध? उद्या म्हणाल, की `कंबरेतून निसटलेली चड्डी पुन्हा घालता येते, पण हातातून निसटलेली वेळ परत मिळत नाही.` ह्या दोन्हीचा काय संबंध?

`प्लंबर कितीही निष्णात असला, तरी तो डोळ्यांतून वाहणारं पाणी रोखू शकत नाही.`
अरे?
याचा काय अर्थ घ्यायचा? म्हणजे प्लंबरनी यापुढे डोळ्यांतलं पाणी थांबवण्याचं तंत्रही शिकून घ्यायला हवं? की ज्यांच्यामुळे आपल्या डोळ्यांत पाणी येतं, त्यांनी प्लंबिंग शिकून घ्यायचं? की डोळ्यांतून पाणीच येऊ नये, म्हणून संशोधकांनी वेगळं शास्त्र शोधून काढायचं?

असे सुविचार थांबवण्याचे प्रयत्न करून करून माझ्याच डोळ्यांत पाणी यायला लागलं आणि ते थांबवण्यासाठी कुणी प्लंबरही मिळेना, तेव्हा मी सोशल मीडियावरूनच रिटायरमेंट घ्यायचं ठरवलं आणि तो एक शत्रू कायमचा लांब गेला.

सुविचारांबरोबरच दुसरी एक गंभीर आजाराची साथ असते, ती म्हणजे HBD आणि RIP ची. शाळेत आणि इतर कुठेही एकमेकांना हाक मारताना बापाच्या नावाचा उद्धार करणारे जवळचे मित्रसुद्धा कुणा ओळखीच्या व्यक्तीच्या जराजर्जर झालेल्या, आता आयुष्यात काही बघायचं बाकी न उरलेल्या एखाद्या पणजी किंवा पणज्याचं निधन झाल्यानंतरही RIP मेसेजचा एवढा महापूर त्या ग्रुपवर आणतात, की खरंच त्यानं यमालासुद्धा पाझर फुटून त्यानं त्या पणज्याचे प्राण परत करावेत! तीच गत एचबीडीची असते. पूर्वीतर मला एचबीडी म्हणजे `घोडा छाप बिडी`, `55 नंबर बिडी`सारखंच काहीतरी वाटायचं. या शॉर्ट फॉर्मचा फुल फॉर्म कळेपर्यंत आमचा फॉर्म निघून गेला होता.
एकानं दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छाच थोडीफार पानंफुलं बदलून आणि एखादा शब्द इकडचा तिकडे करून बाकीचे दोनशे मेंबरही त्याच ग्रुपवर देतात, तेव्हा त्या सत्कारमूर्तीलाही गुदमरून जायला होत असणार. माझ्या एका व्हॉटस अपवर नव्यानेच आलेल्या मित्रानं दुसऱ्या एका मित्राच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी अशीच पानाफुलांची कलाकुसर करून भल्या पहाटे त्याला ग्रुपवर RIP अशा शब्दांत शुभेच्छा दिल्या, तेव्हा ग्रुपवर हलकल्लोळ उडाला. व्यक्तीचा वाढदिवस असेल तेव्हा HBD म्हणायचं आणि लग्नाचा वाढदिवस असेल, तेव्हा RIP म्हणायचं, असं ब्रह्मज्ञान त्याला कुणीतरी दिलं होतं किंवा त्याचं त्यानं सोशल मीडियावरून मिळवलं होतं. RIP कधी म्हणतात, हे त्याला समजेपर्यंत त्याला श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली होती!

माझा दुसरा आणि महत्त्वाचा शत्रू म्हणजे कोडी घालणारे लोक. हे लोक कायम दुसऱ्यांना (म्हणजे बहुतेक वेळा आपल्यालाच!) वेगवेगळी कोडी घालत असतात! ते दिवसाच्या कुठल्याही वेळी, कुठल्याही मोसमात आणि जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात फिरत असतात आणि इकडे आल्यावर अचानक आपल्यासमोर येऊन टपकतात. त्यांनी केलेली नवीन खरेदी त्यांना आपल्याला दाखवायची असते. बरं ती कोरी करकरीत गाडी असो किंवा लेंग्याची नाडी, ते तेवढ्याच उत्साहानं आपल्याला दाखवतात. आपल्याला ती बघण्यात नाडीचाही...म्हणजे, काडीचाही इंटरेस्ट नसतो. पण ती बघण्यातून आपली सुटका होत नाही. बरं, ती उत्साहानं दाखवून झाल्यानंतर त्यांचा पहिला प्रश्न असतो, `कुठून घेतली असेल, ओळख?` आता आपण भीतभीत माहीत असलेल्या जवळपासच्या दुकानांची, ठिकाणांची नावं सांगतो, पण ते हसत, एक पाय हलवत माना उडवत राहतात. `कसा गंडवला!` असे उर्मट भाव त्यांच्या चेहऱ्यावर असतात. बरं, नक्की काय सांगावं, हा खरंतर पेचच असतो. म्हणजे आपण नाक्यावरच्या दुकानातून घेतली, असं म्हणावं, तर तो म्हणतो, ``ह्या! काय राव, इज्जत काढतोस का? पॅरिसवरून आणलेय!`` आता पॅरिसमध्ये आयफेल टॉवरच्या समोर फेरीवाले `दस का तीन`, `दस का तीन` किंवा `रस्ते का माल सस्ते में` असं ओरडून लेंग्याच्या नाड्या कशा विकत असतील, हेच चित्र माझ्या डोळ्यांसमोर येतं. बरं, आपण एखाद्या मोठ्या ठिकाणाहून घेतली असं म्हटलं, तर तो म्हणणार, ``फॉरेनवरून आणलेय, असंच वाटतंय ना? अरे, आपल्या पुढच्या चौकातल्या किराणाच्या दुकानातून घेतली!`` प्रत्यक्षात ती जुन्या बाजारातून घेतलेली असते, ही गोष्ट वेगळीच!

जी पद्धत ती वस्तू कुठून घेतली हे ओळखण्यासाठी, तीच वस्तूची किंमत ओळखण्यासाठी. आता एकवेळ वस्तूची किंवा त्या माणसाची लायकी ओळखून त्यानं ती कुठून घेतली असेल, याचा आपण अंदाज करू शकतो. पण ती किती किमतीला घेतली, हे कसं काय बुवा ओळखणार? बरं, या बाबतीत त्यानं प्रत्यक्ष मोजलेल्या किंमतीपेक्षा आपण जास्त सांगावी, अशी त्याची अपेक्षा असते. मग आपणच त्या वस्तूची साधारण किंमत काय असेल, याचा अंदाज लावून त्याच्यापेक्षा मुद्दाम वाढवून सांगायची. `शंभर..?` असं आपण म्हणायचं. मग तो चकारार्थी उच्चार काढून खुशीत नकार देतो. मग आपण घासाघीस केल्यासारखी किंमत थोडी कमी करायची. `नव्वद?`` मग तो पुन्हा चकारार्थी उच्चार काढून मान उडवणार. आपण आपली कशी फजिती होतेय, असा अभिनय करायचा आणि शेवटची बोली लावायची. म्हणजे तो त्यापेक्षा आपण कशी स्वस्त घेतली, हे सांगून शेखी मिरवणार. आता ह्यात गंमत अशी असते, की तीनवेळा सांगायची ही किंमत त्याच्या मूळ किंमतीच्या खालीही येऊन चालत नाही. नाहीतर त्याचा पोपट व्हायचा. त्याला आपण जिंकल्याची भावना कायम राहील आणि आपणही तोंडघशी पडणार नाही, अशी ही तारेवरची कसरत करत, त्याची अशी कोडी झेलत राहावं लागतं.

स्वतःहून काहीतरी वेगळं करणारे किंवा करून मिरवणारेही माझे एक नंबरचे शत्रू असतात. मुख्य म्हणजे काहीतरी करून त्यांचं भागत नाही. त्यांना ते सेलिब्रेट करायचं असतं. `हॅविंग बटाट्याची भाजी and अळवाचं फदफदं @ अण्णाची खानावळ` हासुद्धा त्यांच्यासाठी अभिमानाने मिरवण्याचा स्टेटस असतो. बरं, अशा पोस्ट करून वर ते आपल्याला त्यात टॅग करत असतात. जेवणाचं सोडा, पण लोक हनीमूनला गेल्यानंतरही `हॅविंग फन ऑन हनीमून विथ डिअर अमूकतमूक and 17 अदर्स` असली काहीतरी भयंकर पोस्ट करून हलकल्लोळ उडवून देतात.
पुण्यात तर सवाई गंधर्व महोत्सव आणि त्यापाठोपाठ आता पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (पिफ) ला जाणे, हा एक असाच असाध्य आणि गंभीर आजार आहे. या आजाराची साथ चटकन पसरते आणि त्यावर उपायही करायला कुणी तयार होत नाही. कधीकधी तर ज्यांनी उपाय करायचा, तेच स्वतः आजार पसरवण्यात पुढाकार घेत असतात. कुंपणानंच शेत खाल्लं तर दाद मागायची कुणाकडे? दरवर्षी हिवाळ्यात होणारा सवाई गंधर्व महोत्सव आणि आता `पिफ` ही तुम्ही सुज्ञ, सुजाण, सुशिक्षित, सुसंस्कृत, सुविद्य पुणेकर असल्याची पोचपावती आहे. पुणेकरांकडे एकवेळ आधार कार्ड नसलं तरी चालेल, पण `सवाई`ची तिकिटं आणि `पिफ`चे पास असणं अनिवार्य असतं. सवाई महोत्सवात कुणीही गाणार असो, त्याची वेळ आणि काळ कुठलाही असो. सीझन पास काढून रोज वेळेच्या आधी तिथं हजर राहणं आणि आपण हजर असल्याचं ओळखीच्यांना आवर्जून दाखवणं, हे केल्याशिवाय पुण्याचं नागरिकत्व मिळत नाही, अशीच या लोकांची समजूत असते. स्टेजवर गायन चालू असो की वादन, मंडपात शांतपणे झोप येईल, असा कोपरा शोधून तीच जागा धरून बसण्याचं कसब काहीजणांना साधलेलं असतं. काही अतिउत्साही प्रेक्षक त्या त्या गायकाची ही शेवटचीच मैफल असल्यागत त्याच्या गाण्याचं रेकॉर्डिंग करून घेत असतात, तेसुद्धा स्पीकरला आपल्या जवळचा मोबाईल चिकटवून. त्या गायकाच्या गाण्यांची सीडी किंवा डीव्हीडी विकत घेणं, हे त्यांच्या प्रतिष्ठेला साजेसं नसावं, किंवा त्याचा बडेजाव करता येत नसावा.
काहीजण तर सवाई गंधर्व महोत्सवाकडे संगीत महोत्सव म्हणून न पाहता खाद्य महोत्सव म्हणूनच बघत असतात. ``आज अमका गायक तमक्या वेळेला गाणार आहे,``यापेक्षाही कुठल्या स्टॉलवर वडा चांगला मिळतो, कुठला पाणीपुरीवाला त्याच्याकडच्या पवित्र लोट्यांतलं गंगाजलच पुरीबरोबरच्या पाण्यासाठी वापरत असतो, कुठल्या डोसेवाल्याकडे काय स्वस्त आहे, याबद्दल त्यांनी प्रगाढ संशोधन केलेलं असतं.
कुणीही गायक कुठल्याही प्रकारचं आणि दर्जाचं गाणं गात असो, ते आपल्याला समजत असो किंवा नसो, आकडी आल्यासारख्या माना डोलावण्याचं काम ते इमाने इतबारे करत असतात. अनेकदा तर ही खरंच दाद आहे, की झोपेमुळे आलेली डुलकी, हे कळायला मार्ग नसतो.
`पिफ`ला जाणाऱ्यांची तर तऱ्हाच वेगळी असते. आपण सिनेमा बघायला नव्हे, तर त्या दिग्दर्शकांना कसं काही कळत नाही, हे सांगायला आलो आहोत, अशा तोऱ्यात येणारे काहीजण असतात. त्यांना सिनेमा समजून घ्यायचा नाही, तर आपल्या जवळच्यांना (त्यांनी न विचारताही!) समजून सांगायचा असतो. दहावीनंतर काही मुलं हुशार मुलांनी सायन्स घेतलं, म्हणून आवड नसतानाही तिकडे जाणारी असतात ना, तसंच इथे `पिफ`च्या काही प्रेक्षकांचंही असतं. आपण कशातही मागे नाही, आपणही आंतरराष्ट्रीय चित्रपटाचे अभ्यासक आहोत, हे दाखवण्यासाठी जाणारे काहीजण असतात.
काहीजण मात्र `कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या`च्या चालीवर कमी पैशांत जास्तीत जास्त सिनेमे बघायला मिळणार, याच अपेक्षेने आलेले असतात. अगदी ऑस्कर विजेत्या चित्रपटांपासून `तू माझी करवली, मी तुला पटवली`पर्यंत त्यांची अफाट रेंज असते. भस्म्या रोग झालेल्या माणसाला जसं समोर दिसेल ते खावंसं वाटतं, तसंच ह्यांना समोर दिसेल तो सिनेमा बघावासा वाटतो. थिएटरमध्ये संपूर्णपणे डोक्यावरून गेलेला सिनेमा कसा ग्रेट होता, हे बाहेर आल्या आल्या समोर दिसेल त्याला सांगण्यातही हे लोक वाकबगार असतात. त्या दिग्दर्शकालाही माहीत नसतील किंवा अभिप्रेत नसतील, असे फ्रेम्सचे अर्थ आणि आशय ह्यांना माहिती असतो.

कधीकधी वाटतं, की आपला सगळ्यात मोठा शत्रूपक्ष म्हणजे आपण स्वतःच आहोत. आपला खरा शत्रू ओळखता न येणं, ही सगळ्यात मोठी कमजोरी मानली जाते. पण मला तर माझे शत्रूपक्ष कोणकोण आहेत, हे पक्कं ओळखता आलं आहे. त्यांची लक्षणं, त्यांच्या तऱ्हा, आपल्यावर हल्ला करण्याच्या पद्धती, त्याचे परिणाम, सगळं सगळं माहीत झालंय. तरीही या शत्रूपक्षाला टाळता येत नाही, त्यांना आयुष्यातून बाजूला काढण्याचा धीर होत नाही. म्हणजे माझा स्वतःचा शत्रू मीच नाही का? पण मग मी विचार करतो, की अशा प्रकारे सात्त्विक त्रास देऊन छळ करणारे हे लोक आसपास आहेत, म्हणून तर आयुष्य जगण्याची उमेद, उत्साह टिकून आहे. या छळातून सुटका करण्याचे रोज नवे मार्ग शोधण्याची जिज्ञासा आणि हुरूप कायम आहे, म्हणून तर आयुष्य पुढे जातंय...मग मी शांत होतो आणि माझ्या या शत्रूपक्षाला कडकडून मिठी मारायला पुन्हा नव्याने सज्ज होतो!

-          अभिजित पेंढारकर.
-          (पूर्वप्रसिद्धी : रविवारची जत्रा दिवाळी अंक, 2017.)

No comments: