जगाच्या उठाठेवी करण्याचं आणि मनाला येईल ते (अर्थात, फक्त स्वतःच!) लिहिण्याचं एक खुलं व्यासपीठ!
Oct 16, 2008
येस `बॉस'!
ही मुलं जरा मोठी होती. कुठल्या कुठल्या भागातून आलेली. काही वांड होती, काही आगाऊ, काही अतिउत्साही, काही खोडकर (नॉटी. ). या शाळेत एक आधुनिक बाईसुद्धा होत्या. त्या पण लंडन-बिंडन कुठल्या कुठल्या स्पर्धेत बक्षीस मिळवलेल्या. मुलं आणि हे "बॉस', यांच्यात समन्वयाचं काम त्या करत होत्या.
या मुलांचं काम काय, तर एकतर त्या महाराजांनी दिलेल्या ऑर्डर पाळायच्या आणि उरलेला वेळ चकाट्या पिटत, एकमेकांची उणीदुणी काढत बसायचं. काही मुलं पार बिघडलेली होती. कुणी विड्या फुंकायचं, कुणी मन मानेल ते करायचं, कुणी शिवराळ भाषा वापरायचं, कुणी अंगावर धावून जायचं...
या सगळ्या गोतावळ्यात एका प्रसिद्ध दिवंगत राजकीय नेत्याचा मुलगाही होता. घरात, परिसरात, कॉलनीत, गल्लीत उच्छाद मांडणाऱ्या आणि नकोशा झालेल्या मुलांना शिक्षा म्हणून होस्टेलला पाठवतात ना, तसंच त्यालाही "तीन महिने कटकट नको' म्हणून या शाळेत पाठवलं होतं. पण झालं भलतंच. त्याच्या खोड्या कमी व्हायच्या ऐवजी इथे येऊन आणखी वाढल्या होत्या. आपल्याबरोबर त्यानं बाकीच्या मुला-मुलींनाही बिघडवायला सुरवात केली होती... त्यांचा हा खेळ बघणारे लोकही त्याच्या या थेरांमुळे हवालदिल झाले होते.
या अनोख्या शाळेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे होतं, की तिथे "बॉस'च्या, अर्थात "महाराजां'च्या ऑर्डर पाळण्याशिवाय दुसरी कोणतीही शिस्त नव्हती. त्यामुळं कुणीही कुणाच्याही बाथरूममध्ये घुसणं, एखाद्याची टवाळी करणं, अंगचटीला जाणं, अंधारात कुणाचा गैरफायदा घेऊ पाहणं, याही कृत्यांना मोकळं रान होतं. किंबहुना, जास्तीत जास्त लोकांनी हा खेळ बघावा, म्हणून त्यासाठी प्रोत्साहनच होतं...
तो खोडकर मुलगा या सगळ्यात आघाडीवर होता. शाळेच्या सगळ्या मोकळ्या वातावरणाचा त्यानं पुरेपूर फायदा घेतला होता. रक्तरंजित पार्श्वभूमी असलेल्या घरातून आलेली मुलगी असो, वा चित्रपटांत बरीवाईट कामं करणारी मुलगी, त्याच्यासाठी दोघीही सारख्याच होत्या. शाळेनंही त्याला प्रोत्साहन दिलं होतं... त्याच्या या खोड्या, कुरापतीच खेळाचं आकर्षण ठरल्या होत्या.
अचानक काय झालं माहित नाही, पण मुलांच्या खोड्या कमी झाल्या. मुलं थोडी सुधारल्यासारखी वाटू लागली. तो खोडकर मुलगा तर जरा अधिकच. शोध घेतल्यावर कळलं, की कुणीतरी वरून दट्ट्या आणला होता. हा खेळ आयोजित करणाऱ्यांनाच झापलं होतं. त्यांच्यावर कारवाईची ताकीद दिली होती. त्यामुळं मुलंही सुतासारखी सरळ आली...
Oct 13, 2008
कुणाची गं तू?
अंगावर फाटक्या तुटक्या कपड्यांनिशी मुंबई स्वर्गाच्या दारात उभी होती। एस. एम. जोशी, आचार्य अत्रे, वसंत बापट प्रभृतींची भेट तिला घ्यायची होती. चित्रगुप्तानं बऱ्याच रखडंपट्टीनंतर मुंबईला आत प्रवेश दिला. एसेम, अत्रे, बापटांसह संयुक्त महाराष्ट्राच्या सर्व नेत्यांसमोर मुंबई जाऊन उभी ठाकली. सगळ्या नेत्यांना थोडंसं आश्चर्य वाटलं, पण त्यांना हे फार अनपेक्षित नव्हतं. कधी ना कधी मुंबई आपल्याकडेच गाऱ्हाणं घेऊन येणार, याची त्यांना खात्री होती.मुंबईच्या या अनपेक्षित आगमनानं सगळे नेते किंचित चिंतेत पडले। "गेल्या दहा हजार वर्षांत कधी झाली नाही, एवढी दुरवस्था मुंबईची झाली आहे. तिला नरकयातना भोगायला लावणाऱ्यांना संडास साफ करायला लावलं पाहिजे, नरकातही त्यांना जागा दिली जाऊ नये,' असं भाषणच त्यांनी संतप्त अवस्थेत ठोकलं. "जाहला न इतुका अवमान कधी, जाळली का यासाठीच आयुष्यें आम्ही' अशा स्वरूपाची कविता बापटांनी तत्काळ रचून गाऊन दाखवली. एसेम नेहमीप्रमाणे धीरगंभीर होते.परप्रांतीयांनी केलेलं आक्रमण, आपल्याच माणसांनी दलालांच्या हाती सोपवून शहराची केलेली माती, वाढतं प्रदूषण, गजबजाट, अस्वच्छता, गुन्हेगारी याबद्दलच मुंबईला गाऱ्हाणं मांडायचं असावं, अशी या सर्व नेत्यांना खात्री होती. "मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे,' ही घोषणा आपण का दिली आणि त्यातल्या "च'ला किती महत्त्व होतं, याची आठवण अत्र्यांनी पुन्हा एकदा करून दिली. हे करताना यशवंतराव चव्हाणांकडे जाणीवपूर्वक कटाक्ष टाकला. यशवंतराव आपल्या पेटीतून महाराष्ट्राचा मंगल कलश काढून त्याला पॉलिश करण्यात गुंगले होते. त्यांनी अत्र्यांकडे विशेष लक्ष दिलं नाही.
मुंबईचं खरं गाऱ्हाणं ऐकून घ्यायलाच कुणी तयार नव्हतं। खुद्द महाराष्ट्रात जी स्थिती भोगत आहोत, तीच संयुक्त महाराष्ट्राच्या अध्वर्यूंच्या दारी आल्यावरही अनुभवायला मिळावी, याचं तिला विलक्षण वैषम्य वाटलं. ती रडवेली झालेली पाहून सगळ्या नेत्यांना दया आली. आपण समजतो तसं नाही. मुंबईचं दुःख वेगळंच आहे, हे त्यांच्या लक्षात आलं. मग त्यांनी आपापल्या भूमिका आणि मतभेद बाजूला ठेवून मुंबईला बोलण्याची संधी दिली.
"संयुक्त महाराष्ट्राच्या पदरात माझं कन्यादान करणाऱ्या माझ्या आदरणीय पित्यांनो, मी तुमची आयुष्यभर ऋणी राहीन. पण आता सध्याच्या राज्यकर्त्यांनी जो तमाशा मांडलाय, तो तुम्हाला कळला, तर तुमच्याच कामगिरीची तुम्हाला कीव येईल...'' मुंबई मुसमुसत म्हणाली
``काय झालं, काय झालं?'' सगळे चिंताक्रांत झाले
``खुद्द माझ्या पित्याच्या चारित्र्याविषयीच संशय घेतला जात आहे.''
``कोण आहे तो हरामखोर?'' अत्रे गरजले.
``सांगते, सांगते....आधी एका पोलिस अधिकाऱ्यानं माझ्या वडिलांविषयी संशय घेतला। मी कुणाच्याच `बापा'ची नाही, असे ते म्हणाले। आतापर्यंतचे राज्यकर्ते मला कायमच सावत्रपणाची वागणूक देत आले। त्यात या अधिकाऱ्यानं मी अनौरस असल्याचंच सांगून मला कुठेही तोंड दाखवायला जागा ठेवली नाही...'' मुंबई स्फुंदून स्फुंदून रडू लागली.
एसेमनाही गलबलून आलं.
``माझ्यावर कायमच प्रेम करणारे एक आजोबा मला धीर देतील, असं वाटलं होतं. पण त्यांच्याशी भांडण असलेल्या त्यांच्या पुतण्यानं मला आधार दिला. "रस्त्यावर उतरा, म्हणजे मुंबई कुणाच्या बापाची आहे हे कळेल,' असं त्या अधिकाऱ्याला सुनावलं. नंतर आमच्या या आजोबांचा दसरा मेळावा झाला. ते आता थकल्यामुळं त्यांच्या मुलानंच "मुंबई आमच्या "बापा'ची' असं जाहीर करून टाकलं.''
``हे बरं झालं। कुणीतरी न्याय दिला ना?'' बापटांनी सुस्कारा सोडला.''
``ते झालं हो, पण आता मलाच प्रश्न पडलाय ना, मी नक्की कुणाची ते!'' मुंबईच्या या प्रश्नावर सगळेच निरुत्तर झाले.
---------
Oct 7, 2008
सौजन्याची ऐशी तैशी
खादीच्या कपड्यावर असलेल्या सवलतीचा फायदा घेऊन भरपूर खरेदी करून आपण महात्मा गांधींचं स्मरण दरवर्षी करत असतो. ही झाली सर्वसामान्यांची पद्धत. मोठ्या लोकांचं सगळंच निराळं असतं. आता हेच बघा ना...ज्येष्ठ समाजसुधारक अंबुमणी रामदास (स्वामी) यांनी यंदाच्या गांधी जयंतीचं निमित्त साधून भारतातील समस्त मानवजातीला सिगारेटच्या व्यसनापासून वाचविण्याचा विडा उचलला. (खरं तर "विडा' हेही व्यसनच. पण ते असो!) तसंच आपल्या राजकीय नेत्यांनी सौजन्य सप्ताह पाळायचं ठरवलं.
वाईट बोलू नका, वाईट ऐकू नका आणि वाईट पाहू नका, हा गांधीजींचा संदेश. आपल्या धुरंधर राजकारण्यांनी त्यात थोडं "इम्प्रोवायझेशन' करून "वाईट करू नका आणि केलेलं निस्तरून टाका,' ही नवी शिकवण अंगी बाणवली। जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भावी अध्वर्यू अजितदादा पवार यांनी साताऱ्यात जाऊन कॉंग्रेसच्या एका बड्या मंत्र्यावर आणि अन्य काही नेत्यांवरही टीका केली। दुसऱ्या दिवशी गांधी जयंतीचा संकल्प आठवल्यावर त्याबद्दल खुलासा करून टाकला.
मुलायमसिंह यांनी जुने वैर विसरून सोनिया गांधींची विमानतळावरच धावती (की उडती?) भेट घेतली. अमरसिंहांनी नारायण राणेंची भेट घेतली. ही भेट "बिझनेस'संबंधी होती असं जाहीर झालं असलं, तरी ती राजकीय "धंदा' चालविण्याच्या दृष्टीनेची चाचपणी होती, अशी अफवा आहे।
पुण्यात पत्रकारांच्या अधिवेशनात शरद पवार, गोपीनाथ मुंडे, नारायण राणे एकत्र आले। त्यांचाही कलगीतुरा रंगला, पण सौजन्यपूर्ण वातावरणात। पवारांनी राणेंना पुढील वेळी मुंडेंना सोबत घेऊन जाण्याचा सल्ला देऊन टाकला। मुंडेंनीही राणे, पवारांना कोपरखळ्या मारल्या, पण गोडीगोडीनं....आणि या सौजन्य सप्ताहाचा समारोप झाला तो थाटामाटात, वाजतगाजत आणि कुणीही कधीही अपेक्षा केली नव्हती, अशा घटनेनं. छगन भुजबळ यांनी बाळासाहेब ठाकरेंवरील खटला मागे घेऊन आपली लढाई संपल्याचंही जाहीर करून टाकलं! उद्धव ठाकरेंसोबत त्यांची बैठकही झाली. लखोबा, टी. बाळू, अशा सर्व विशेषणं गोदावरीत विसर्जित झाली.
या सर्व घटनांत अर्थातच कोणाचाही स्वार्थ, राजकीय फायदा नव्हता। आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांशी या घडामोडींचा संबंध जोडणाऱ्याला नतद्रष्टच म्हणावं लागेल. गांधी जयंतीनिमित्तानं पाळलेल्या सौजन्य सप्ताहाच्या यशस्वितेसाठी प्रत्येक नेत्यानं आपापल्या परीनं टाकलेली ती भर होती. प्रत्येकानं यथाशक्ती त्यासाठी मदत केली.मुख्य प्रश्न पुढे आहे. गांधी जयंतीनिमित्त या सर्वांनी अहिंसेचा, प्रेमाचा, वसुधैव कुटुंबकम् चा संदेश बिंदेश दिला हे ठीक आहे! पण पुढच्या आठवड्यात रावणदहन आहे आणि त्यानंतर नरक चतुर्दशी! एरव्ही वर्षभर हा मुहूर्त साधणाऱ्या या नेत्यांवरची जबाबदारी आता वाढली आहे
---
Sep 30, 2008
गुहागरात...(कोरडी) सुहागरात...

"गोड गुपीत', "नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे' या चित्रपटांचा दिग्दर्शक प्रमोद प्रभुलकर हा बऱ्यापैकी मित्र। पुण्यात भेटला, तेव्हा मी आणि श्रीपाद ब्रह्मे यांनी त्याला एखाद्या वेळी शूटिंगला बोलावण्याची गळ घातली होती. एरव्ही शूटिंग रिपोर्टसाठी जाणं म्हणजे फक्त औपचारिकता असते. तासभर थांबायचं आणि बोलून निघायचं. आम्हाला तसं नको होतं. जरा निवांत आणि स्वतंत्र हवं होतं. त्यानं ते लक्षात ठेवलं होतं बहुधा. श्रीपादला फोन करून त्यानं गुहागरला त्याच्या नव्या चित्रपटाच्या शूटिंगला येण्याचं निमंत्रण दिलं. श्रीपादनं मलाही भरीला घातलं. काही कारणांनी माझंही प्रभुलकरशी काही दिवसांपूर्वी बोलणं झालं होतं आणि मलादेखील ही चांगली संधी वाटली.
रविवारी सुटीच्या दिवशी जायचं आणि सोमवारी सकाळी निघून दुपारी ड्युटीला परत यायचं, अशी आमची अटकळ होती। रजा वगैरे घेण्याचा प्रश्न नव्हता आणि राहण्याची सोयही तो करणार होता. एकूणात काय, की फक्त बस प्रवासाचं भाडं आम्हाला पदरचं घालायचं होतं. त्यामुळे दोघंही तयार होतो. शेवटी जाण्याचं शुक्रवारी निश्चित झालं.जुजबी सामान घेऊन रविवारी सकाळी साडेसातची गाडी पकडली. दुपारी एक दीड पर्यंत पोचायचं, असा आमचा अंदाज. गुहागरला पोचायला सव्वाचार होतील, असं कंडक्टरनं सांगितलं, तेव्हा आमचा धीरच खचला. म्हटलं, उद्या दांडी मारावी लागणार बहुधा! मग एकदा तो विचार मनात आला आणि तोच मग पक्का केला
प्रवास उत्तम झाला. एकतर मी एसटीच्या लाल डब्यातून दिवसा बऱ्याच वर्षांनी एवढा मोठा प्रवास करत होतो. पण काही त्रास झाला नाही. वारा छान होता, एसटीही मोकळी होती आणि ऊनही फारसं नव्हतं. कुंभार्ली घाटात एसटीतूनच फोटो काढले, कोयनानगरला जेवलो आणि बरोब्बर सव्वाचारला गुहागरात पोचलो. त्यांनी कळविलेल्या हॉटेलवर पोचलो, तर तिथे कुणालाच काही पत्ता नव्हता. मग पुन्हा फोनाफोनी झाली. शेवटी आम्हाला बॅगा टाकायला आणि तोंडं विसळायला जागा मिळाली. आंघोळ कुणाला करायची होती?आत्ता येऊ मग येऊ करता करता दोन तासांनी, साडेसहाला आम्हाला न्यायला गाडी आली. तिथून चहा पिऊन पालशेत नावाच्या बारा किलोमीटरवरच्या गावात पोचलो. तिथे एका कोकणी चौसुपी घरात शूटिंग चाललं
"सुंदर माझं घर' असं चित्रपटाचं नाव. मधुराणी गोखले, राहुल मेहंदळे हे कलाकार. दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते आदल्या दिवशीच येऊन गेले होते. कोकणात मोठ्या कुटुंबात राहणारी एक मुलगी मुंबईत विभक्त झालेल्या कुटुंबात जाऊन राहते आणि तिथे सर्वांना एकत्र आणते, अशी ही कथा. प्रभुलकरनं आमचं चांगलं स्वागत केलं. गेल्या गेल्या भोपळ्याच्या घारग्यांचा भरपेट नाश्ता झाला.नंतर थोडा वेळ गेल्या दोन दिवसांतलं शूटिंग टीव्हीवर पाहिलं आणि मग प्रत्यक्ष शूटिंग. शूटिंगच्या गमतीजमतीही अनुभवायला मिळाल्या. अंगणात एकत्र जेवणाचं दृश्य होतं, पण जेवणच तयार नव्हतं। मग चिडाचिडी, आरडाओरडी झाल्यावर जेवणाची तयारी करण्यात आली। तोपर्यंत दिग्दर्शकानं तो शॉटच बदलून टाकला होता।
नायिकेच्या मोठ्या बहिणीच्या मांडीवर देण्यासाठी आणलेलं गावातलं कुणाचं तरी बाळ भोकाड पसरून रडायला लागलं. म्हणून मग बाहुलीचं बाळ तयार करण्यात आलं. ते बिचारं रडलं नाही!रात्री दहापर्यंत शूटिंग चाललं. आम्ही म्हणजे तिथे विशेष पाहुणेच होतो. त्यामुळं बसायला खुर्च्या, पाणी, खाणं, सगळ्याची ददात होती. साडेदहाला जेवलो। मग शूटिंगची मंडळीही पॅक अप करून आली. सगळ्यांशी गप्पा झाल्या. साडेअकरापर्यंत "हॉटेल निसर्ग'वर आलो. येतानाचा अंधारातला प्रवासही छान झाला. वाटेत एक कोल्हा पाहिला.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर निघायचा बेत रद्दच केला होता. ऑफिसला कळवून दांडी टाकली होती. मग सकाळी प्रभुलकरांनी आमच्या दिमतीला एक गाडी दिली. तिच्यातून हेदवीला जाऊन आलो. येताना चालकानं हेदवीच्याच समुद्रकिनाऱ्यावरचा एक भन्नाट स्पॉट दाखवला. आमच्या श्रीपादला तो आधी माहीत असल्यानं जरा पुढे जाऊन व्यवस्थित पाहिला. बामणघळ त्याचं नाव. डोंगराच्या कुशीत दोन खडकांमध्ये चर तयार होऊन त्यातून लाटा आत येतात. जोरात लाट आली, की ती उसळून फेसाळत वर येते आणि अक्षरशः आंघोळ घालते. पाहायला हे दृश्य फारच भन्नाट आहे. आम्ही अर्धा तास तिथे काढून मग निघालो.
गुहागरात आल्यावर तिथल्या किनाऱ्यावरही फेरफटका मारला। मग दुपारी पुण्याची गाडी धरली...