परवाच्या गणपतीच्या पोस्टला दणकून प्रतिसाद मिळाला. बऱ्याच जणांना कोकणातले अनुभव आवडले. आणखी लिहिण्याचा आग्रह झाला, म्हणून पुन्हा कीबोर्ड बडवाबडवी.
(टीप ः वरील विधानाशी या ब्लॉगचे वाचक आणि "कॉमेंट'दार सहमत असतीलच, असे नाही. असो. म्हणजे...."नसो.')
आरत्यांवरून आठवण झाली. आमच्या आजोळी, शिपोशीला (ऐकायला विचित्र वाटलं, तरी असं गाव आहे. शी-पो-शी. ता. लांजा, जि. रत्नागिरी.) कार्तिक नवमी ते पौर्णिमेपर्यंत हरिहरेश्वराचा उत्सव असतो. नुसती धमाल! उत्सव म्हणजे "जत्रा' बित्रा नाही. मोठमोठाले पाळणे, खेळ, स्वतःच्याच भयानक प्रतिमा दाखवणारे आरसे वगैरे नाही. अगदी हरिहरेश्वराच्या छोट्याशा देवळातला छोटासा, लहानगा, "ब्राह्मणी' उत्सव. पण अतिशय वैशिष्ट्यपूर्ण.
किती वर्षांची परंपरा असेल, ठाऊक नाही, पण मी मात्र माझ्या लहानपणापासून अनुभवतोय. लहानपणी तर आम्ही पडीक असायचो शिपोशीत. मे महिन्यात आंबे-फणस-कैऱ्या-चिंचा-करवंदं-बोरं-जांभळं-आवळे खायला. आजीनं केलेलं आंब्याचं रायतं, तक्कू, कोयाडं, आमटी, साटं, सुकंबा, मुरांबा, खारवलेला आंबा, ताज्या फोडांची आणि सुकंबाची लोणची, फणसाची साटं, सांदणं, भाकऱ्या, गऱ्यांची कढी, आठिळांची भाजी आणि फणसाची साकटा भाजी, गऱ्यांची भाजी, मोरावळे, चटण्या, कोशिंबिरी...काय नि काय!शिवाय पोट फुटेस्तोवर आमरस आणि पडीचे-अडीचे-आंबे!असो. आंब्या-फणसांच्या दिवसांविषयी नंतर कधीतरी. सध्या फक्त हरिहरेश्वराच्या उत्सवाबद्दल.
हरिहरेश्वराचं म्हणजे शंकराचं अगदी फार देखणं नाही, पण नीटनेटकं मंदिर आहे शिपोशीत. आमच्या मामाच्या घरापासून एक नदी ओलांडून गेलं, की लगेचच मंदिर. आरत्या सुरू झाल्या, की रात्रीच्या शांततेत घरापर्यंत आवाजाची साद घेता येते. आरत्या हे तर सगळ्यात मोठं आकर्षण. दशावताराची आरती झक्मारेल, अशा एकेक भन्नाट आणि लंब्याचौड्या, उत्तमोत्तम आरत्या घुमायला लागल्या आणि त्यांच्या चालीवर घंटा घणघणायला लागली, की मन कसं डोलायला लागतं. बरं, एकजात सगळ्यांच्या आरत्या तोंडपाठ. आरत्या झाल्या, की भोवत्या.
भोवत्या (प्रदक्षिणा) म्हणजे नुसती धमाल. नवमी ते पौर्णिमा चढत्या क्रमानं भोवत्या. भोवत्या म्हणजे देवळाच्या बाहेरून पटांगणातून भजन गात मोठी प्रदक्षिणा म्हणायची. सगळ्यांच्या मागे पालखी. प्रदक्षिणा संपताना सगळ्यांनी देवळासमोरल्या मोठ्या पटांगणात रिंगण करायचं. मग वेगळाच अभंग घेऊन त्यावर लयबद्ध नृत्य. म्हणजे एक पाय पुढे, एक पाय मागे किंवा बसून, उकिडव्यानी, असलं अतिशय लयबद्ध आणि तालबद्ध नृत्य. मध्ये तालासाठी ढोलकीचा गजर. अभंग संपल्यावर तर नुसतंच ढोलकीवर नाचायचं. सोबतीला झांजांचा झंकार.
"राधे राधे' हा प्रकार म्हणजे ताक घुसळल्यासारखे हात करत दोन पावले पुढे, दोन मागे. आणि "ग्यानबा तुकाराम' तर घाम फोडणारा, भयंकर दमछाक करणारा आणि लयीचा आणि तालबद्धतेचा कस पाहणारा प्रकार. त्यातल्या सात स्टेप्स सगळ्यांच्या साथीनं बरोबर जमवणं, हे महाकठीण काम. मला आतापर्यंत एकदाच जमलंय.
शिपोशीची बहुतांश मंडळी मुंबई-पुण्यात स्थिरावली असली, तरी उत्सवाला हमखास हजेरी लावणार. आपला अभिनिवेश बाजूला ठेवून देवळातली सगळी कामं करणार. उत्सवातली नाटकं ही देखील एक मोठी मेजवानी. संगीत नाटकांचा शौक फार. मधुवंती दांडेकर, मोहन मुंगी, विजय गोखले, अशा मंडळींना आम्ही लहानपणापासून पाहत आलोय. या कलाकारांचा तिथला मुक्काम आणि सहवास याचं भलतंच आकर्षण असायचं.
उत्सवाच्या शेवटच्या रात्री उशिरापर्यंत भोवत्या आणि त्यानंतर पहाटेपर्यंत कीर्तन. मध्यंतरातला चुलीवरचा चहा म्हणजे स्वर्गसुखाचा आनंद. कीर्तनाला आम्ही लहानपणी देवळातल्या कोपऱ्यात निद्रावस्थेत आणि थोडी शिंगं फुटल्यावर बरेचदा बाहेर उनाडक्या करतानाच सापडणार. पण त्यातही एक मजा असायची. मोठ्यांनी दामटून कीर्तनाला बसवायचं आणि आम्ही कारणं काढून तिथून सटकायचं, हा नेमच. शेवटच्या दिवशीच्या महाप्रसादाचीही मोठी रंगत. लांबच्या लांब पंगती आणि आग्रहानं वाढलेलं श्रीखंडाचं किंवा जिलबीचं जेवण! उदबत्त्यांचा सुगंध आणि रांगोळ्यांच्या पायघड्या.
चार वर्षांपूर्वी हरिहरेश्वराचा शंभरावा उत्सव झाला. लग्नानंतर मला तिकडे जायला जमलं नाहीये. यंदा मात्र दिवाळीनंतर जायचा बेत पक्का आहे. सध्या तरी.
--------
5 comments:
kya baat hai..nostalgic vayla hote.
farach sundar !!!! me jari tithe kadhi gelo naslo tari dolya samor 'picture' ubha kelas ! :)bhale-shabbas !
thanks, hrishikesh.
keep commenting on my writing.
do you own any blog?
send me the link...
bye.
abhijit.
छान झालंय सगळं. कोकणातलं वातावारण उभं केलस. एखादं पोस्ट टाकावं म्हणून मीही गावाकडच्या उत्सवांची आठवण काढत बसलो होतो. पण राहू दे...इतक्यात नको.
बाकी हे नोस्टॅल्जिक होत 'लहाणपणी आमचा वाढा होता,' इथपर्यँत येऊ नये म्हणजे झालं!
तुम्ही खूप भाग्यवान की तुम्हाला असे आजोळ लाभले आणि असे बालपण मिळाले. हे सगळे लक्षात ठेवून भन्नाट शैलीत आमच्यापर्यंत पोहचवल्याबद्दल आभार ! पुढच्या लेखाच्या प्रतीक्षेत
सागर गोखले
Post a Comment