Jan 1, 2008

पीक "प्रेरणा' पेरणाऱ्यांचं...

बॉलिवूडकरांचं चित्रपट काढण्यामागचं "इन्स्पिरेशन' काय असेल, सांगता येत नाही. पूर्वी रामसेंचे "हॉररपट' पाहून प्रेक्षकांना हुडहुडी भरायची. अर्थातच त्यातल्या प्रसंगांच्या परिणामामुळं नव्हे, तर याला हे आणखी किती दिवस असे सिनेमा काढणार, या विचारांनी! जगातल्या समस्त कवट्या, प्रेतं, जंगलं, स्मशानं, हेच रामसेंचं "इन्स्पिरेशन' होतं. कवटीचं तर त्यांना एवढं प्रेम होतं, की चोर-दरोडेखोरांसारखं समस्त रामसे बंधूंच्या कपाळावर कवटीचं चित्र कोरलेलं असेल की काय, असंच वाटायचं.

देशप्रेम हे मनोजकुमारचं "इन्स्पिरेशन' होतं. पण नंतर त्याचा डोस एवढा झाला, की साक्षात भारतमातेलाही कसंसंच व्हायला लागलं असणार. प्रेमाचे पैलू हे काही प्रमाणात राज कपूर आणि यश चोप्रांचं "इन्स्पिरेशन' होतं. प्रेमाच्या या अंगाला नायिकांच्या अंगप्रत्यंगांचा जोड राज कपूरनं दिलं. यश चोप्रांनी तर सगळ्या प्रेमकथांना श्रीमंतीतच लोळवून घोळवून सादर केलं.राखी सावंतला नाही का, "नच बलिये'मधल्या पराभवानंतर अंतरात्म्याच्या आवाजाचं "इन्स्पिरेशन' मिळालं. म्हणूनच आपल्या फसवणुकीविरुद्ध गावभर बोंबलत सुटली ना ती!

आमीर खानला "लगान'च्या वेळी चांगल्या कथेमुळे निर्मितीचं आणि "तारे जमीं पर'च्या वेळी अमोल गुप्तेशी भांडणामुळे दिग्दर्शनाचं "इन्स्पिरेशन' मिळालं.तर असे हे सगळे "इन्स्पिरेशनिस्ट'! आत्ता सगळ्यांची आठवण होण्याचं कारण हे, की नुकताच आलेल्या "रिटर्न ऑफ हनुमान'चं "इन्स्पिरेशन' आधीचा "हनुमान' नाही, तर दिग्दर्शक अनुराग कश्‍यप हे आहे. आपले कुठलेच चित्रपट सात वर्षांच्या आपल्या मुलीला आवडले नाहीत, म्हणून अनुरागनं तिला "इम्प्रेस' करण्यासाठी हा चित्रपट केलाय, म्हणे!

आमची भीती दुसरीच आहे.गौरी खाननं "टाईम'साठी दिलेल्या बोल्ड फोटोवरून सगळ्याच ताऱ्यांच्या बायकांनी, हिमेश रेशमियावरून समस्त उदयोन्मुख गायकांनी, रामगोपाल वर्माच्या "आगी'वरून "शोले'च्या समस्त चाहत्यांनी काही "इन्स्पिरेशन' घेतलं, तर त्यांना आणि आपल्यालाही महागात पडेल!

---

1 comment:

Anonymous said...

Gostei muito desse post e seu blog é muito interessante, vou passar por aqui sempre =) Depois dá uma passada lá no meu site, que é sobre o CresceNet, espero que goste. O endereço dele é http://www.provedorcrescenet.com . Um abraço.