Feb 5, 2008

लग्नात `पंच' आहे!

आज ६ फेब्रुवारी.
लग्नाचा पाचवा वाढदिवस.
म्हणजे, आयुष्यातल्या वर्षांत `घट' होण्याचा आणि प्रेमात `वाढ' होण्याचा दिवस.
पाच वर्षं हर्षदानं मला सहन केलंय!आणि जगलो वाचलो, तर आणखी ३०-४० वर्षं तरी करेल, अशी आशा आहे.
लग्नानंतर मी खूपच बदललो. आधी ५८ किलो होतो. आत ८४ किलो झालोय.
आधी भोळा, कुणावरही विश्वास टाकणारा होतो. आता रूढ अर्थानं `लबाड' झालोय.

लग्नासाठी तरी किती आटापिटा केला!
किमान चार संस्थांमध्ये नाव-नोंदणी, प्रोफाइल्स पाहण्यात घालवलेले तासंतास, `साथ-साथ'मध्ये सक्रिय सहभाग, २०-२२ मुलींना `पाहण्याचा' भीषण (याहून भीषण शब्द आहे?) अनुभव!काय अन काय!हर्षदाला मी ओळखत होतो, आणि तीही मला.`सकाळ' पतपेढीत कामाला होती ती. तेव्हा पाहिलं होतं. पण तेव्हा तिचा `बायको' म्हणून विचार नव्हता केला. म्हणतात ना, काखेत कळसा नि गावाला वळसा! तेव्हा एके ज्येष्ठ सहकर्‍यांनी तिचं नावही सुचवलं नव्हतं मला. पण गाडं पुढे गेलं नाही.
आपण काही most eligible bachelor नाही, हे लक्षात यायला (अपेक्षेप्रमाणेच) खूप वेळ लागला. त्यामुळे लग्नाच्या बाजारात आधीचे उंची, आवडी-निवडी, स्वभाव, वगैरे आधीचे सगळे निकष थोडे शिथिल झाले.पुन्हा दुसर्‍या एका सहकार्‍यनं हर्षदाचं नाव मला सुचवलं.तेव्हा मीही भेटून तर `बघूया' म्हटलं.तिच्या घरी आम्ही दोघंच भेटलो, आणि चर्चा केली. तिला भेटायला जाताना तिचा चेहराही मला आथवत नव्हता. (पतपेढीत कामानिमित्त दोन-तीनदाच भेटलो आनि एखद-वेळेलाच बोललो होतो. पतपेढीतून कर्ज काधताना त्याचं `प्रकरण' होईल, अशी कल्पना नव्हती.)आपलं जमू शकतं, हे पहिल्याच प्रत्यक्ष आणि निवांत भेटीत जाणवलं मग माझ्या आग्रहाखातर आम्हि एक नाटक पाहिलं, त्याच्यावर चर्चा केली. तिचे विचार आवडले, पटले. मुख्य म्हणजे, ती टिपिकल `पुणेकर' नाही, ही लक्षात आलं. आधुनिक विचारांची अस्ल्याचंही जाणवलं. मला थोडा आणखी वेळ हवा होता, पण तिला निर्णयाची घाई होती. मग पुन्हा आम्ही भेटलो आणि फायनल करून टाकलं.माझ्या मनासारखी जोडीदार अखेर मला मिळाली होती.
संसार यशस्वी झालाय, असं आतापर्यंतच्या अनुभवावरून तरे म्हणता येइल. पुढचं पुढे.

तीन वर्षाचं एक गोड पिल्लूही आहे आता सोबत.मजा येतेय.दुसर्‍या पर्यायाचा विचार सध्या तरी नाही. (हर्षदा हा ब्लॉग वाचणार नाही, अशी आशा आहे.)

बायकोचं खूप कौतुक केलं. पुरे ना आत?

तुम्हालाही अशीच मनासारखी बायको (किंवा गेला बाजार, `बायको तरी') मिळो, ही शुभेच्छा!
--------
बाय द वे,डोहाळजेवणाच्या वेळी केलेलं हे काव्य वाचा.

(थोडक्यात पार्श्वभूमी : हर्षदाला डोहाळजेवणासाठी रत्नागिरीला जायचं होतं. पण बस प्रवासाचा त्रास झाला असता. म्हणून आम्ही पुण्याहून पनवेल पर्यंत बसने, आणि तिथून कोकण रेल्वेने रत्नागिरीला गेलो.येताना कोल्हापूरपर्यंत बस, आणि तिथून रेल्वेने आलो.केवढा द्राविडी प्राणायम!
`तुम्हाला मूल होणं शक्य नाही! तेव्हा अमक्या टेस्ट करा, तमकी औशधं खा,' असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. सहज म्हणून सोनोग्राफी केली असता, ही गोड बातमी कळली. तेव्हा मनस्वी पोटात तीन महिन्यांची होती!)
माझ्या गरोदरपणात
आहे त्रास वारेमाप
अन डोकियाला ताप
अभिजितच्या

माझं गं गरोदरपण
थोडं लांबलं पण
होती सारखी भुणभूण
इतरांची
माझं गं गरोदरपण
कळलं तीन महिन्याअंनी
होता घरच्यांनी
धीर सोडला

माझं गं गरोदरपण
मला तेव्हाच कळलं
सोनोग्राफीत पाहिलं
जेव्हा बाळाला

माझ्या गरोदरपणाने
पाच डॉक्टर पाहिले
आणि खूप ऐकले
सल्ले विकतचे

माझ्या गरोदरपणातआहे
डोहाळजेवण म्हणून
जगप्रदक्षिना करून
आले रत्नगिरीला

माझ्या गरोदरपनात
बाळ सारखं ढुशा देतं
कधे आइस्क्रीम मागतं
कधी वडापाव

माझ्या गरोदरपणाचा
काळ मला सुखावतो
अभिजित पुरवतो
लाड माझे

माझ्य गरोदरपणात
नवरा किती काळजी घेतो
उष्टी-खरकटी काढतो,
घासतो भांडी

माझ्या गरोदरपणात
रोज पौष्टिक आहार
सुटले पोटही फार
अभिजितचे
माझं गं बाळंतपण
पार पडो सुरळीत
बाळ होवो गुटगुटीत
आम्हा दोघांचे

माझ्या बाळंतपणानंतर
बाळ दंगा करेल भारी
पुढच्या वर्शी तयारी
त्याच्य भावंडाची

माझ्या बाळंतपणासाठी
त्रास सारखा वेचीन
खूप मागे पडो `चीन'
भारताच्या!
----------------

3 comments:

Shreya's Shop said...

अभिजित, तुमच्या लग्नाच्या ५ व्या वाढदिवसा निमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.
गंमत म्हणजे आज माझ्या लग्नाचाही वाढदिवस आहे. पण १२ वा. एक तपाचा काळ. असो,
मी एक दैनिक सकाळ ची वाचक आहे. तुमच्या ग्रॅफिट्या अगदी आवडीने वाचते. पटलेल्या डायरीत लिहून ठेवते. पण सगळ्याच छान असतात. हा उपक्रम चालूच ठेवा.

Yogesh said...

Abhijit,
Haardik Shubhechchha!

Anonymous said...

तुम्हालाही अशीच मनासारखी बायको (किंवा गेला बाजार, `बायको तरी') मिळो, ही शुभेच्छा!
>>>

hahaha...dhanyawaad! :-)
tumhalahi lagnachya (ushirane) shubhechha. :-)