लहानपणी कशाची म्हणून क्रेझ नव्हती? मी रत्नागिरीत लहानाचा मोठा झालो. (कोण तो..."तसं वाटत नाही,' म्हणतोय?) लहानपणी पिक्चर पाहण्याची जाम क्रेझ होती. मिळेल तिथे, मिळेल तशा स्थितीत पिक्चर बघायला मी तडफडायचो. सत्यनारायणाच्या पूजेनिमित्त नाक्यानाक्यावर प्रोजेक्टरवर सिनेमे दाखवले जायचे. "pyaar kaa mandir', "आखरी रास्ता', "स्वर्ग से ऊँचा'छाप पिक्चर असायचे. कधी "आराम हराम आहे,' "मुंबईचा फौजदार', असले मराठी एव्हरग्रीन सिनेमेही दाखवले जायचे. मी त्यांवर अक्षरशः जीव ओवाळून टाकायचो.
साधारण दहाची वेळ असायची. रस्त्यावरून शेवटची बस गेली, की पिक्चर सुरू! त्यात ती प्रत्येक तीन-चार रिळांनंतर येणारा व्यत्ययही नको वाटायचा.कधी शेतात, मळ्यांच्या बांधांवर, काचा लावलेल्या गडग्यांवर बसून पिक्चर बघायचे. मध्येच कुठे चिखल, कुठे पाणी, कुठे शेण, कुठे काय न् कुठे काय! सगळं सांभाळून सिनेमासाठी जीव टाकायचा. बऱ्याचदा सिनेमा प्रोजेक्टरच्या विरुद्ध दिशेनं पाहायला लागायचा. त्यामुळं अमिताभनं डाव्या हातानं मारलेला ठोसा उजव्या हातानं मारल्याचं वाटायचं. सगळ्या हिंदी हिरॉइनी (साडीत असल्या, तर) गुजराती वाटायच्या.त्यात एक मजा असायची.
मुळात आमच्या परमपूज्य पिताश्रींनाही सिनेमाची प्रचंड आवड. आम्हाला बाळकडू त्यांच्याकडूनच मिळालेलं. पण कधी ते इच्छुक नसले, तर मला सोबत शोधायला लागायची. शिवाय, कोणतीही सिनेमा पूर्ण बघण्याचा माझा हट्ट. स्वतःच्या पैशांनी मिथूनचे सिनेमेही मी थिएटरमध्ये जाऊन पूर्ण बघितलेले आहेत. कधी सोबत मिळाली नाही, तर मग चिडचीड व्हायची. रात्री घरी येताना सोबत मोठा जथ्था असायचा, पण त्यावर विसंबून राहता यायचं नाही. थिएटरला जाऊन सिनेमा बघण्यावर मात्र घरून कडक बंधनं होती. त्यामुळे दोन-तीन महिन्यांतून एकदाच सिनेमा बघता यायचा. दहावीच्या वर्षात तर मी अख्ख्या वर्षभर एकही सिनेमा पाह्यला नव्हता. केवढी ही तपश्चर्या! एकमेव "भुताचा भाऊ' व्हीडिओवर एका मित्राच्या घरी, गणपतीत पाहिला होता. "थरथराट' न पाहता आल्याबद्दल मी जाम हळहळलो होतो. मोठा झाल्यावर रत्नागिरीतल्य तीनही थिएटरमधले सगळे सिनेमे पाहायचेच, ही माझी महत्त्वाकांक्षा झाली होती.
त्यानंतर "व्हीडिओ कॅसेट'चं फॅड आलं. छोट्या टीव्हीवर व्हीसीआरच्या साह्यानं असे पिक्चर दाखवले जायचे, त्यालाही गर्दी व्हायची. मला आठवतंय, "राम तेरी गंगा मैली'साठी आम्ही एका ठिकाणी असाच जीव घालवला होता. पण लांबून काहीच दिसत नसल्यानं, परत आलो होतो. तो सिनेमा मोठा झाल्यावर ज्या कारणांसाठी पाहिला, ती कारणं त्या वेळी अज्ञात होती.केबल आली, आणि ती सगळीच मजा केली. रोज घरबसल्या कुठलाही सिनेमा पाहता येण्याची सोय झाल्यानं, थंडीवाऱ्यात कुठेतरी बोंबलत जाण्यात कुणालाच स्वारस्य राहिलं नाही. आता सीडी, डीव्हीडीच्या धुमाकुळानं सिनेमा क्षेत्राचा अगदीच "कचरा' करून टाकलाय!त्या काळी नाटक, प्रदर्शनांच्या जाहिराती करणाऱ्या गाड्या फिरायच्या. पोरं दिसली, की या गाड्यांतून दोन-चार पत्रकं फेकली जायची. त्या गाडीच्या किंवा रिक्षाच्या मागे धावत जाऊन ती पत्रकं मिळवण्याची क्रेझ होती. त्यासाठी मग रस्त्यावरच्या इतर गाड्यांचीही कधीकधी पर्वा केली जायची नाही. आता माझी तीन वर्षांची मुलगीही "लेझ' नको, "मॅगी'च हवं, म्हणूनही हट्ट करू शकते.
कैऱ्या, चिंचा यांची मला कधी क्रेझ नव्हती. पण आंब्यांची मात्र होती. शिपोशीला, आमच्या आजोळी गेलो की आंब्यात सचैल स्नान असायचं. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र...फुटेस्तोवर आंबे! एकदा आंब्याच्या झाडावर दगड मारून आंबे पाडताना माझ्या डोक्यातच दगड पडून मोठी खोक पडली होती. ती महिनाभर निस्तारत होतो.पुण्या-मुंबईत फिरण्याचीही क्रेझ फार होती. त्यातल्या त्यात मुंबईत जास्त. पण माझ्या लहानपणी मुंबईत मला फिरवायला कुणालाच वेळ नसायचा. गेट वे ऑफ इंडिया देखील मी अगदी अलीकडे, चार-पाच वर्षांपूर्वीच पाहिलं. असो.
गेल्याच आठवड्यात घरी इंटरनेट घेतलं. ते सुरू व्हायला आठ दिवस गेले. घरचं नेट चालतं कसं, हे पाहण्याचीसुद्धा क्रेझ होती. आता ते व्यवस्थित सुरू झाल्यावर जीव जरा शांत झालाय.
--------
1 comment:
gr8!!!!!!!!!!!
ekhadya goshtichi craze asayala "crazy" asayala lagalach asa nahi he kalatay!!!!!!!!!!!!!
craze hi shewati craze asate
tumachi n aamachi kadhich same nasate!!!!!!!!!!!
Post a Comment