`वर्षा' बंगल्यावर मोठी लगबग सुरू होती. सगळ्या बंगल्याची रंगरंगोटी करण्यात आली होती. उत्साह ओसंडून वाहत होता. घरात चार वर्षांनी पाळणा हलला होता. बारशाचा कार्यक्रम अगदी झोकात, थाटामाटात होणार होता. सगळे नातेवाईक, पाव्हणेरावळे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले आप्तजन जमले होते. दिल्लीच्या विशेष पाहुण्यांना खास आमंत्रण होते. सगळे जण गटागटाने उभे होते. पहिला मान आपल्यालाच मिळावा, असा प्रत्येकाचा हट्ट होता.
बंगल्याचे सध्याचे मालक आले. आता ते घर सोडून जाणार होते. त्यामुळे पाळण्याला पहिला झोका देण्याचा मान त्यांचा होता. त्यांनी तो पार पाडला आणि ते बाजूला झाले. खरं तर ते आत निघून जातील, असं सगळ्यांना वाटत होतं, पण ते एका गटाच्या मागे जाऊन उभे राहिले. मग नाव ठेवण्यासाठी प्रत्येक गटाची कुरघोडी सुरू झाली.
दिल्लीहून आलेले दोघे विशेष पाहुणे प्रत्येक गटातल्या सदस्यांपाशी जाऊन काय नाव ठेवावं, याची चर्चा करत होते. कुणाकुणाला बाजूला घेऊन काही गुफ्तगूही चालू होतं. बंगल्याच्या कोपऱ्यात उभा असलेला एक सगळ्यात मोठा गट आणि दाराच्या उंबरठ्यावरच असलेला एक नेता अस्वस्थपणे येरझारा घालत होते. पुढे झालेल्या गर्दीमुळे त्यांना आत यायला मिळत नव्हतं. पाळण्यातल्या बाळाला नाव ठेवण्याची संधी आपल्यालाच मिळावी, यासाठी त्यांची धडपड दिसत होती. त्यांच्यातलेच काही जण बाहेर उभे असल्यानं बंगल्याबाहेरचा सगळा परिसर दुथडी भरून वाहत होता.
कुणी बाळाला सोन्याची अंगठी करून आणली होती, कुणी वाळा आणला होता, कुणी कानातलं, तर कुणी गळ्यातली चेन. आपलाच दागिना कसा भारी आहे, यावरून मग चर्चा आणि वादविवाद झडत होते. "पेट्या' आणि "खोके' भरभरून भेटवस्तूही काहींच्या हातात दिसत होत्या. दिल्लीतल्या पाहुण्यांना मोठा मान होता. त्यांनी सांगितल्याशिवाय बाळाचं नाव ठरणार नव्हतं. हे पाहुणेही असे बेरकी होते, की प्रत्येकाजवळ जाऊन सारख्याच आपुलकीनं आणि आस्थेनं चौकशी करत होते. दुसरा काय बोलला, याविषयी तिसऱ्याला ताकास तूर लागू देत नव्हते.
अखेर सगळ्यांशी चर्चा झाली. बाळाचं नाव ठरल्यात जमा होतं. कोणत्या गटाला हा मान मिळणार, हेही जाहीर होणार होतं. पण उंबरठ्यावर असलेल्या त्या सगळ्यात मोठ्या गटानं दिल्लीच्या पाहुण्यांना दम भरला. छोट्या गटाला नाव जाहीर करू देणार नाही, असा इशारा दिला. दिल्लीकर पाहुणेही जरासे चरकले. मग त्यांनी "मॅडम'शी संपर्क साधला. काय बोलणं झालं, कुणालाच कळलं नाही. पण दिल्लीकर अचानक तरातरा निघून गेले आणि बाळाचा नामकरण विधी त्या दिवसापुरता स्थगित झाला.
दुसऱ्या दिवशी पुन्हा बंगला सजला. सगळे जण पहिल्यापेक्षा जास्त उत्साहानं त्या ठिकाणी जमले. सगळ्यांनी बाहेर फटाके, जल्लोषाची तयारी केली. पाहुण्यांनी दिल्लीतूनच नाव जाहीर केलं - अशोक! आनंदाला पारावार राहिला नाही. अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला, आलिंगनं, हस्तांदोलनांची आवर्तनं घडली. उंबरठ्यावर असलेल्या त्या एका गटाच्या प्रमुखानं तातडीनं सगळ्यांना जमा करून आपल्याला संधी न दिल्याबद्दल सगळ्यांचे वाभाडे काढले. आपल्याविरुद्ध कारस्थान रचल्याचा आरोपही केला. त्याच्याकडे फारसं कुणी लक्ष दिलं नाही.
...बंगल्यात आनंदोत्सव सुरू असताना बाहेर कसला तरी प्रकाश चमकल्याचं कुणाला तरी जाणवलं. "फटाक्यांचा किंवा विद्युत रोषणाईचा असेल, त्याकडे विशेष लक्ष देऊ नका,' असं बंगल्यातल्या सगळ्या गटांच्या प्रमुखांनी सांगितलं. पण हा प्रकाश म्हणजे बंगल्याच्या शेजारीच जळत, धुमसत असलेल्या भल्यामोठ्या परिसरातल्या आगीचा आहे, हे एका उपस्थितानं आपल्या प्रमुखांच्या लक्षात आणून दिलं. काही विघातक प्रवृत्तीच्या लोकांनी तो परिसरच उद्ध्वस्त करून टाकला, त्याला आठ दिवसही झाले नव्हते. अजून त्याची धग जाणवत होती.
काही ज्येष्ठांनी घटनेचं गांभीर्य ओळखलं. "ए, बाहेरचं लायटिंग बंद करून टाका रे!' त्यांनी आदेश दिला. स्वयंसेवकांनी तातडीनं त्याची अंमलबजावणी केली. आणि मग पुन्हा अभिनंदनाचे वर्षाव, हास्यांचे फवारे आणि आलिंगनांचा उत्सव सुरू झाला...!
No comments:
Post a Comment