Dec 31, 2008

भीमाशंकरचा द्राविडी प्राणायाम!रोज किंवा दर दोन दिवसांनी ब्लॉग लिहायचं ठरवलं, तरी ते साध्य होत नाही। एकतर आपण काही अमिताभ बच्चन नाही, ज्याला शिंक आली, तरी लोकांना कुतुहल वाटेल. त्यातून त्याला रोज घरची भांडी घासणं, कचरा काढणं, ढेकूण झाले तर पेस्ट कंट्रोलवाला शोधून काढून त्याला फोन करणं, मुलीची शी-शू काढणं, असली कामं करावी लागत नाहीत. (स्वतःची शी-शू काढायला सुद्धा माणसं ठेवली असतील त्यानं! असो.) तर नमनाला एवढं घंगाळभर तेल ओतल्यानंतर आता सांगण्याचा उद्देश हा, की या वेळी भीमाशंकरच्या सहलीबद्दल लिहायचा विचार आहे. फार ग्रेट बिट नव्हती सहल, पण जरा दोन दिवस बदल झाला, एवढंच!
रविवारला जोडून सोमवारी सुटी घेतली होती। मनस्वीच्या शाळेला आठ दिवस नाताळची सुटी होती. तिलाही बदल म्हणून हर्षदानं सुटी काढली आणि पाठोपाठ मी. मग कुठेतरी जायचा बेत आखायला घेतला. महाबळेश्‍वर, माथेरान, प्रतापगड, इकडे जाण्यात काही अर्थ नव्हता. रायगड, दापोली वगैरे लांब पडलं असतं. म्हणून भीमाशंकरची निवड केली. "ब्लू मॉर्मोन' या हॉटेलविषयी आधी ऐकलं होतं आणि तिथेही जायची बरेच दिवस इच्छा होती. सगळा योग जुळून आला आणि भीमाशंकरचं हॉटेल आणि बसचं बुकिंगही मिळालं.
रविवारी, 28 तारखेला भल्या पहाटे साडेसहाची गाडी पकडली। भीमाशंकरला पोचेपर्यंत बरीच दमछाक झाली. रस्ता खराब आणि घाट असल्यामुळे लाल डब्यात त्रासही झाला. "प्रवासाचा त्रास होणाऱ्यांचं कठीण असतं...स्वतः खाल्लं तरी त्यांच्या पोटात दुखतं आणि दुसऱ्यांनी खाल्लं, तरी!' या ग्राफिटीची आठवण झाली. अशाच एका वाईट प्रवासात ती सुचली होती. असो. साडेदहाच्या सुमारास भीमाशंकरला पोचलो. पण कालच्यापेक्षा वातावरण जरा बदललं होतं. काल रात्रीपासून मनस्वीला अचानक कोरडा खोकला सुरू झाला होता. रात्री एक वाजेपर्यंत जागी होती. त्यातून सकाळी लवकर उठल्यानं तिचं सगळं तंत्र बिघडलं होतं. आम्ही तिथे औषधांची चौकशी केली, पण काहीच उपलब्ध नव्हती. आम्हीही चुकून काहीच नेली नव्हती. ती तर खोकून खोकून हैराण झाली होती. खरं तर गुप्त भीमाशंकर वगैरेला जाऊन आणि दिवसभर फिरून संध्याकाळी हॉटेलवर जायचा बेत होता, पण तो बदलावा लागला.देऊळ पाहूनच आम्ही माघारी हॉटेलकडे जायला निघालो. सात किलोमीटरवरच्या पालखेवाडी फाट्याला उतरायचं होतं. तिथून दोन किलोमीटर आत हॉटेल आहे. आम्हाला न्यायला त्यांची गाडी येणार होती. आम्ही बाराला निघालो आणि मोबाईलला रेंज नसल्यानं, तिथून कॉइन बॉक्‍सवरून हॉटेलवर गाडी पाठवायला कळवून ठेवलं. गाडीत बसेपर्यंत सगळं ठरल्याप्रमाणे होत होतं. नंतर अचानक सगळंच चक्र फिरलं.
मनस्वीचा खोकला फारच वाढल्यासारखा वाटला आणि औषधंही नसल्यावर दिवस कसा काढायचा, असा विचार केला। मग आम्ही एकदा पुढच्या तळेघर गावात थांबून, औषधं घेऊन पुन्हा हॉटेलवर मागे जाण्याचा विचार केला. पण तिथे डॉक्‍टर मिळाला नाही तर काय, असं वाटलं. मग थेट पुण्यालाच जायचं ठरवलं. तसं तिकीटही काढलं. पालखेवाडीला थांबून जीपवाल्याला निरोप तरी देऊ, असा विचार केला, पण कंडक्‍टरने स्टॉप सांगितलाच नाही. मग झाली पंचाईत! मग पुढे आल्यावर पुन्हा विचार बदलला. सुटी घेतलीच आहे, तर फुकट कशाला घालवायची? एकतर ठरलेला कार्यक्रम कुठल्याही परिस्थितीत बदलायला मला आवडत नाही. मनस्वीलाही नंतर थोडासा आराम पडला. मग पुण्याचं तिकीट फुकट घालवून, घोडेगावलाच उतरलो. तिथे औषधं घेऊन पुन्हा परतीची गाडी पकडून भीमाशंकरच्या दिशेनं आलो. पालखेवाडीला उतरून, गाडीने हॉटेलवर पोचलो. दोन तास थांबायला लावलं, म्हणून हॉटेलवाला वैतागला होता.
ब्लू मॉर्मोन' हे जंगलात, माळरानावर बांधलेलं एक छोटेखानी हॉटेल निवांत राहायला चांगलं आहे. पण अपेक्षा होती, तशी तिथे फार गर्द झाडी वगैरे नव्हती. आमची एका बंगलीत सोय केली होती. व्यवस्था चांगली होती. फ्रेश वगैरे झाल्यावर जेवण केलं. मग संध्याकाळी शेजारचं एक देऊळ, तळं, हेलिपॅड आणि सनसेट पॉइंटला फेरफटका मारला. संध्याकाळी लवकर परतलो. खूप दमलो होतो. खोलीवरच जेवण मागवलं. रात्री कॅंटीनपर्यंत जायचं म्हणजे सुद्धा भीती वाटत होती, एवढ्या लांब होती आमची ती बंगली. एवढ्या निवांतपणासाठी दिवसाला बाराशे रुपये मोजावे लागले, ही गोष्ट वेगळी!फार उत्तम नाही, पण बऱ्यापैकी व्यवस्था झाली राहण्याची. दुसऱ्या दिवशी पुन्ही भीमाशंकरला जाण्याची माझी इच्छा होती. कारण तिथलं प्रसिद्ध "शेकरू' (मोठी खार) आम्हाला दिसलंच नव्हतं. पण या दोघींच्या विरोधापुढे माझी इच्छा तोकडी पडली. साडेदहाला हॉटेलवाल्यांनी आम्हाला एकेक करून बाईकवरून फाट्यापर्यंत सोडलं. तिथं सव्वा तास बसची प्रतीक्षा करावी लागली. संध्याकाळी चारला घरी आलो.
भीमाशंकरला पूर्वीही एकदा गेलो होतो. तेव्हा गुप्त भीमाशंकरलाही जाऊन आलो होतो. प्रसिद्ध "शेकरू' तर देवळाजवळच दिसलं होतं! या वेळी योग नव्हता, एवढं मात्र खरं! पुढच्या वेळी जाऊ, तेव्हा स्वतःची गाडी घेऊनच, असा निश्‍चयही करून टाकला!

No comments: