पुन्हा एकदा आमच्या लाडक्या मनस्वीवरचा लेख.
तसं तिला प्रत्येक ठिकाणी घेऊन जावंसं कायमच वाटत असतं, पण दरवेळी ते शक्य होत नाही. काही वेळा नाइलाजानं न्यावं लागतं, तर काही ठिकाणी तिला नेलं नाही, तर चुकचुकायला होतं. गेल्या वर्षी मलेशियाला गेलो होतो, तेव्हा हर्षदा (माझी लग्नाची, अधिकृत बायको) आणि मनस्वी बरोबर असायला हवी होती, असं वाटलं होतं.
तरीही मनस्वीला एकट्यानं मी अनेक ठिकाणी फिरवत असतो. एकदा आम्ही दोघंच कात्रज सर्पोद्यानातही दिवसभर धमाल केली होती.
पिक्चरला मनस्वी आणि मी दोघं जाणं आता काही नवीन राहिलेलं नाही. पहिल्या "चक दे इंडिया', "हनुमान रिटर्न्स'पासून अगदी "जिंकी रं जिंकी', "पटलं तर घ्या', "वादळवारं सुटलं गं'पर्यंत तिनं मला साथ केली आहे. थिएटरची रेंजही अफाट आहे. सिटीप्राईडपासून अलका, प्रभात, "विजय'पर्यंत! (मी स्वतः सिनेमाच्या आवडीपायी अगदी "निशात', "भारत', "अल्पना', "सोनमर्ग' वगैरे थिएटरही पचवू शकतो, ही गोष्ट अलाहिदा! तरीही, "अप्सरा'त पायधूळ झाडायचं राहिलंय अजून!) तर, सांगायचा मुद्दा काय, की आजही तिला घेऊन गेलो होतो, "बाबा लगीन' बघायला. अभिराम भडकमकर लेखक-दिग्दर्शक. पण पिक्चर बोअर होता. आधी मनस्वी इडली खाऊन गेली होती. पिक्चरही बोअर असल्यानं जरा कंटाळली होती.
थिएटरमध्ये चिझलिंग, द्राक्षं वगैरे खुराक झालाच. नंतर इंटरव्हल झाल्यावर मला वाटलं, नेहमीप्रमाणे कंटाळून घरी चला म्हणेल. पण मलाच म्हणते, "बाबा, पुन्हा लागणारेय सिनेमा.' मग इंटरव्हलमध्ये शेंगदाणे घेतले. तिच्या हट्टापायी ""मिरिंडा'ही घेतलं. तेच चुकलं. आधी रसही प्यायला होता, त्यातून वर दाणे खाल्ले होते. "मिरिंडा' बाधलं आणि तिला उलटी झाली. मग आमचा पिक्चर बोंबललाच! फारसा बघण्यासारखाही नव्हता, त्यातून निमित्त मिळालं.
तिला स्वच्छ करून घरी जाण्यासाठी बॅग घ्यायला थिएटरच्या अंधारात पुन्हा घुसलो, तर आमची जागाच सापडेना. अंधारात बॅगही दिसेना. शेवटी कशीबशी सापडली आणि निघालो. रिकाम्या खुर्च्यांच्या मधून जाताना तोल जाऊन जरासा कोसळलो. मनस्वीलाही कुठेतरी चेमटलं. मग तिनंही भोकाड पसरलं. बाहेर पार्किंगमध्ये येऊन पाहतो, तर मनस्वीचा गॉगल पिशवीत नव्हता. मग तो शोधायला पुन्हा अंधारात घुसलो. त्या अवस्थेतही तिची विनोदबुद्धी (!) शाबूत होती. (बापावर गेलेय कार्टी!) मला म्हणते, "सारखं इकडून तिकडे-तिकडून इकडे. इकडून तिकडे-तिकडून इकडे!'
मी हसू दाबलं.
आम्ही प्रयत्न करून, किंवा शेजारच्यांनी मदत करूनही गॉगल सापडला नाही.
"बाबा, मोबाईलनं पकाश पाडा ना!' असा अनाहूत सल्लाही मनुताईंनी दिला.
शेवटी गॉगलचा नाद सोडून आम्ही बाहेर आलो. जाताना डोअरकीपरजवळ निरोप ठेवावा आणि त्यांना गॉगल सापडल्यास पुन्हा येऊन घेऊन जावा, असा विचार होता. म्हणून त्यांना सांगायला गेलो, तर तेच आमच्याबरोबर पुन्हा शोधायला आले.पुन्हा एकदा शोधमोहिमेचा सोपस्कार पार पडला.मग आम्ही "जाऊ दे तो गॉगल' म्हणून बाहेर आलो.
गाडीपाशी आलो आणि पिशवी ठेवायला डिकी उघडली तर काय! गॉगल डिकीत होता...!!
जाताना मीच तो तिथे ठेवला होता...आठवणीनं!
असो.
एवढ्या गदारोळातही मनस्वीला कपडे बदलून पुन्हा पिक्चर बघायला यायचं होतं. पिक्चर कितीही सुमार असला, तरी शेवटपर्यंत बघायचाच, हा तिचा पण होता. (पुन्हा एकदा) बापावर गेलेय कार्टी!
वर मला म्हणते, "बाबा, अहो, त्या काकांना सांगूया ना, गॉगल सापडला म्हणून!'
मी कपाळावर हात मारला.
तेवढ्यात ते डोअरकीपर काका समोर आलेच.
"कुठे सापडला गॉगल?' त्यांनी विचारलं.
प्रामाणिक व्हायचं मी जाणुनबुजून टाळलं. येताना वाटेत सापडल्याचं सांगितलं.
नशीब, आमची निरागस लेक काही बरळली नाही तिथे!
अशी आमची चित्रपटयात्रा घडली. मग घरी येऊन गुमान झोपलो.
पुढच्या वेळी मनस्वीला एकटीला सिनेमाला घेऊन जायचं नाही, असा निश्चय केलाय.
बहुधा, तो मोडेपर्यंत तरी टिकायला हरकत नाही...!
-------------
5 comments:
आवडले! खूप आवडले. साधे आणी सोपे. मी पण माझ्या पिल्लाला घेवून जात असतो इकडे तिकडे... खूप भटकत असतो.
punha ye re mazya magalya...............
अभिजीत मस्त!!
मी पण माझ्या छकुलीला घेऊन खूप फिरत असतो.. पण अजून सिनेमा किंवा नाटक बघायला न्यायचे धाडस नाही केले.. एक तर ती एवढा वेळ शांत बसेल की नाही याची खात्री नाही आणि दुसरं म्हणजे तिची प्रत्येक दृष्य बघून प्रश्न विचारायची सवय.. त्यामुळे हिंदी सिनेमात ती काय विचारेल याचा नेम वाटत नाही..:P
:)
sakaal madhe "baba lagin" cha review pan tumhich lihila aahe na ;-)
Amiable fill someone in on and this post helped me alot in my college assignement. Say thank you you for your information.
Post a Comment