नवीन घड्याळ घ्यायचं बरेच दिवस मनात होतं। पण पुढे ढकलत होतो. आधीचं घड्याळ आजीनं घेऊन दिलेलं, साधारणपणे आठ-नऊ वर्षे जुनं असावं. चारशे-साडेचारशे रुपयांचं. आता "लय भारी' घड्याळ घ्यायचं ठरवलं. हे मात्र स्वतःच्याच हौसेपायी. (हो...दरवेळी बायकोच्या नावानं कशाला बिल फाडायचं?) "टायमेक्स'च्या शो-रूम मध्ये गेलो, तर ती रेंज काही आपल्याला बापजन्मात परवडण्याजोगी नव्हती. मग शेजारीच "टायटन'च्या दुकानात भीत-भीत शिरलो. हजार-बाराशेपर्यंतच्या खरेदीची मानसिक (आणि आर्थिकही) तयारी केली होती. (असल्या भल्यामोठ्या, आलिशान शोरूम किंवा मॉलमध्ये वगैरे (अर्थातच, नुसतं विंडो-शॉपिंग करायला!) गेलं, की मला उगाचच आपल्यावर कुणी वॉच-बिच ठेवून आहे की काय, अशी शंका येते. आपण जणू कुणी चोर-दरोडेखोर असल्यासारखेच ते सेल्समन-वूमन-गर्ल्स आपल्याकडे बघत असतात. मला तर "पुष्पक'मधल्या कमल हासनच्या त्या प्रसंगाचीच आठवण येते. असो.) "सोनाटा'ची घड्याळं काही आकर्षक नव्हती. मग मनाचा हिय्या करून "टायटन'च्या रेंजकडे नजर वळवली. 1400 रुपयांचं एक घड्याळ आवडलं. घ्यायला बायकोनंही भरीला घातलं. म्हटलं हाय काय नि नाय काय! घेऊन टाकलं!
नमनाला एवढं घडाभर तेल ओतण्याचा उद्देश हा, की गेले काही दिवस या घड्याळाचा पट्टा सैल झाला होता। आणि एकदा शंका आली होती, तोच अनर्थ रविवारी रात्री घडला. सोमवारी सकाळी घराबाहेर पडताना शोधू लागलो, तर घड्याळ जागेवर नव्हतं. जागेव्यतिरिक्त अन्य ठिकाणी जिथे असू शकतं, तिथेही नव्हतं. मग मी रात्री साडेदहाला औषधं आणायला बाहेर पडलो होतो, ते आठवलं. रात्री कुठे वाटेत पडलं असेल, तरी सकाळनंतर ते मिळण्याची सुतराम शक्यता नव्हती. बरं, मी संध्याकाळी एकदा आणि रात्री एकदा असं दोनदा बाहेर पडलो होतो. नेमकं कोणत्या वेळी घड्याळ हातात होतं आणि कोणत्या वेळी नव्हतं, काहीच आठवेना.
एकतर मी माझं दोन रुपयांचं पेनसुद्धा हरवलं, तरी अस्वस्थ होतो। अर्थात, त्यापायी मला अन्नपाणी गोड न लागणं बापजन्मात शक्य नाही! परीक्षेत एका ओळीचाही अभ्यास झालेला नसताना, बारावी-एसवायला नापास झालो तेव्हा, घरातून "पळून' गेल्यावर, शेअर मार्केटमध्ये शेण खाल्ल्यावर...सगळ्या प्रसंगांत मला अन्न-पाणी व्यवस्थित गोडबिड लागत होतं. पण माझी झोप मात्र उडते काही हरवल्यानंतर. हल्ली जरा कोडगेपणा वाढला आहे, तरी अस्वस्थता आलीच. वाटेनं उलटं जाऊन शोधण्यातही काही अर्थ नव्हता. शक्यता दोनच होत्या- सोसायटीत पडलं असल्यास वॉचमनला मिळालं असलं तर आणि दुसरी, पण अगदीच धूसर शक्यता म्हणजे त्या मेडिकल दुकानातच ते पडलं असलं आणि दुकानदारालाच मिळालं असलं, तर! वॉचमनला अपेक्षेप्रमाणे पत्ताच नव्हता. मग मेडिकलकडे मोर्चा वळविला. शेवटची आशा म्हणून! अपेक्षा नव्हतीच, त्यामुळे जाताना वाटेत स्वतःवर विनोदही केले. लहानपणी (माझ्या!) आजी गजानन महाराजांची पोथी वाचायची आणि मलाही वाचायला लावायची. त्यासोबत, गजानन महाराज कुण्या भक्ताची बॅगबिग वेगळ्या रूपात जाऊन परत करतात वगैरे (भाकड)कथाही सांगायची. पण मी नास्तिक असल्यामुळं, गजानन महाराजांचा कुणी अवतार माझं घड्याळ घेऊन "याचा मालक कोण आहे,'वगैरे शोधत बसला असेल, अशी सुतराम शक्यता नव्हती!
दुकानात पोचलो आणि चौकशी केल्यावर काय आश्चर्य! त्या सद्गुणाच्या पुतळ्यानं दोन मिनिटांत टेबलावरच ठेवलेलं माझं घड्याळ मला परत केलं। त्यात माझ्या भावना बिवना नव्हे, तर माझे पैसे गुंतलेले होते. त्यामुळे जिव्हाळा जास्त होता. मला तर त्या दुकानमालकाच्या जागी भगवान विष्णूच विश्वरूपदर्शन देताहेत आणि मी नतमस्तक झालो आहे, असं चित्र दिसू लागलं होतं! "चौदाशे रुपयांच्या घड्याळासाठी एक हजार रुपये काढा!' या त्याच्या प्रेमळ टिप्पणीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून, केवळ औपचारिक धन्यवादाचा पुणेरी+कोकणी बाणा दाखवून मी काढता पाय घेतला. पण या मेल्याकडे आता पुढची दोन-तीन आजारपणं ("बाळंतपणं'च्याच चालीवर!) काढण्याचं प्रायश्चित्त घ्यावं लागणार.
असो. "आठवं आश्चर्य' एवढाच एसएमएस ऑफिसमध्ये पोचल्यावर बायकोला केला. आणि तिला तो चक्क कळला!
2 comments:
i like your style of writing - ekdam-ch mast! :)
ghaDyaal parat miLaalyaa baddal congrats!!
It is too goooooood. i like your blog very much.
Post a Comment