Jan 8, 2009

माझा बाप, डोक्याला ताप!


आमच्या बापाला अखेर आमची आवड कळली म्हणायची!च्यायला! गेले एक-दीड वर्षं नुसता छळवाद मांडला होता मेल्यानं! याची हौस नि मला निष्कारण सजा!! आताशा कुठे रुळावर आलाय.
कशाबद्दल बोलतेय, कळलं नाही का? अर्थात आमचा बाप नि त्याचं पिक्चरचं वेड! कळायला लागल्यापासून याव्यतिरिक्त कुठलंही काम निष्ठेनं केलं नसेल त्यानं. पिक्चर म्हणजे जीव की प्राण! कुठल्याही मळ्यात असो वा एखाद्या मित्राच्या खुराड्यात...पंचरंगी महालात असो वा शेणा-मुताच्या वासात...पिक्चर बघणं सोडलं नाही. अगदी शिरीष कणेकर चावले होते म्हणा ना! अर्थात, अजूनही सोडत नाही, पण माझ्या जन्मापासून आणि मला सांभाळण्याची जबाबदारी उरावर पडल्यापासून जरासा आटोक्यात आला बिचारा. लगामच बसला म्हणा ना, आमच्या उधळलेल्या घोड्याला! मला कळायला लागल्यापासून मग मलाच सिनेमाला घेऊन जायला लागला.
मी थेटरात जाऊन पाहिलेला पहिला सिनेमा `जबरदस्त.' म्हणजे, तसं नाव होतं सिनेमाचं . सिनेमा जबरदस्त नव्हता. आई-बाबा दोघंही बरोबर होते. बर्‍यापैकी गप्प राहिले होते मी. मी आणि बाबा, दोघांनी एकत्र पाहिलेला पहिला सिनेमा म्हणजे माझ्या आवडत्या शाहरुख खानचा `चक दे इंडिया'. बरा होता. स्टोरी बिरी कळायचं माझं वय नव्हतं. अवघी अडीच वर्षांची असेन मी तेव्हा. पण आमच्या परमपूज्य पिताश्रींची हौस! राहवेना त्यांना. मग मी सुद्धा ३ तास गप्प बसण्यासाठी आइस्क्रीम नि आणखी काय काय च्याऊ माऊ पदरात पाडून घेतलं.
मग बाप सोकावलाच आमचा! मी राहतेय म्हटल्यावर मला घेऊन कुठेही, कधीही सिनेमाला जायला लागला. अर्थात, त्याचाही नाइलाजच होता म्हणा! परीक्षण हे त्याचं कामच ना! मग अलका, लक्ष्मीनारायण, विजय, प्रभात, नीलायम, सिटीप्राईड, कुठे कुठे दौरे केले आम्ही. तसे, फक्त माझ्या आवडीसाठी फारच कमी सिनेमे बघितले आम्ही. अगदी रिटर्न ऑफ हनुमान, वगैरे. एक नाटकही दाखवलं त्यानं मला. पण मला काहीच झेपेना. गलगले निघाले, चल गंमत करू, पटलं तर घ्या, कसले कसले सिनेमे दाखवले आमच्या जन्मदात्यानं मला! एक तर भीषणच होता! सुखी संसाराची सूत्रे का काय तरी! बापही वैतागला होता या छळाला. मग माझी काय अवस्था झाली असेल बघा!
`रिटर्न ऑफ हनुमान' फार हिंसक होता. मला तोही नाही आवडला. शिवाय मला कधी नव्हे ते कोल्ड्रिंक पाजायची दुर्बुद्धी झाली आणि उलटीच झाली मला. सगळा फियास्को! मग आलो घरी. दे धक्का, उलाढाल मध्येही फार रमले नाही. `उलाढाल'च्या वेळी सिद्धार्थ जाधवला भेटले आणि मकरंद अनासपुरेला पाहिलं, तेवढाच आनंद! नाही म्हणायला `सही रे सही'च्या वेळी बापानं भरत जाधवशीही भेट घालून दिली आणि एकदा सुबोध भावेच्या घरी त्याच्याशीही!! आता शाहरूखला भेटवण्याची गळ घातलेय मी त्याला!
परवा तर गम्मतच झाली. शाहरुख खानचा पिक्चर बघायचा, मकरंद अनासपुरेचा की हत्ती नि अक्षयकुमारचा, असं बाबानं विचारलं. त्याला पक्की खात्री होती, मी शाहरुख खानचं नाव घेइन. कारण त्यालाही तोच (रब ने बना दी जोडी) बघायचा होता. पण मी त्याचा पोपट केला. हत्तीच्या पिक्चरची (जंबो) निवड करून त्याला पार उलटाच पाडला! मग नाइलाजानं त्यानं `जंबो'ला नेलं. मजा आली, पण त्यातलं युद्ध आणि जंबोची नि त्याच्या आईची ताटातूट नाही आवडली मला. रडलेच मी! नक्की कसा पिक्चर आवडतो हिला?' अशा प्रश्नांचं जंजाळ पाहिलं मी बाबाच्या चेहर्‍यावर.
माझी आवड नक्की आहे तरी कशी, यावर बाबाची पीएचडी सुरू होती. वाढदिवसापासून मला खोकला झाला. सध्या त्याचा यशस्वी तिसरा आठवडा सुरू आहे. (बाबाचा आवडता पिक्चरही एवढे आठवडे टिकत नाही!) माझ्या परमप्रिय आईनंच मग माझं नाचणं, पळणं बंद करून देण्यासाठी कुठला तरी माकडाचा पिक्चर लावून देण्याचं फर्मान सोडलं. बापाला काय्...गुनान ऐकण्यावाचून पर्याय नव्हता. लावला बिचार्‍यानं! मला तो प्रचंडच आवडला. एकदा, दोनदा, तीनदा, सात-आठ वेळा बघून झाला आत्तापर्यंत. एवढा आवडला, की आता सीडी लपवून ठेवायचा विचार करतायंत आई-बाबा!
तर, त्या महान सिनेमाचं नाव म्हणे `डंस्टन चेक्स इन'! असो. नावात काय आहे? तरीही, पहिल्यांदा बघून झाल्यावर `बाबा, मला नाही आवडला पिक्चर. यात सगळीकडे नाहीये माकड!' अशी लटकी तक्रार केलीच मी. पण मनातून आवडला होता. अजूनही आवडतोय. आता तरी बाप वेगवेगळे प्रयोग करून माझा छळ मांडणार नाही, अशी आशा!
- मनस्वी (आपला) अभिजित.

3 comments:

Monsieur K said...

absolutely hilarious!!
ekdam jabri lihila aahe - i am wondering what will your daughter say when she grows up and reads this! :))

Anonymous said...

it was very creative and cute..

...just didnt like the repeated use of the word BAAP(like in मग बाप सोकावलाच आमचा etc.)and words like"param poojya pitashree"..
...my personal opinion...leave it or delete it..

अभिजित पेंढारकर said...

अनामिका,
गंमत म्हणून लिहिलंय ते. खटकलं असेलही कदाचित. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!