साहित्य ः प्रचंड उत्साह, चवीपुरता चटपटीतपणा, शोभेपुरता रंगेलपणा आणि बचकाभर ऊर्जा.
कृती ः प्रथम प्रचंड उत्साह शरीर आणि मनभर घुसळून घ्यावा. अंगात सर्वत्र भिनवून घ्यावा. वाटल्यास आपल्या पूर्वानुभवाचाही त्यासाठी वापर करावा. मग त्यात चवीपुरता चटपटीतपणा चांगला मिसळून घ्यावा. बचकाभर ऊर्जा या मिश्रणात बाद्कन ओतून चांगली ढवळून घ्यावी. अंगात मुरलेले हे मिश्रण सगळीकडे नाचून आणि वेडेवाकडे अंगविक्षेप करून चांगले खळबळून घ्यावे. स्वतःमध्ये घडत असलेल्या या नव्या प्रक्रियेची माहिती गावाला ओरडून सांगावी. त्याने या पदार्थाची चव आणखी वाढते. मग शोभेपुरता (म्हणजे सजावटीपुरता. "शोभा' होण्यापुरता नव्हे!) रंगेलपणा वर लावून ही पाककृती सजवावी.
केवळ हे मिश्रण उत्तमरीत्या तयार होऊन उपयोग नाही. मुख्य टप्पा आहे तो यापुढचा. या उत्साहाचं भरीत कसं करायचं, याचा. तर, हा सगळा जमवून आणलेला मामला (स्वतःच्या) निष्णात बायकोच्या हाती सुपूर्द करावा. मग या उत्साहाचं भरीत कसं होतं, हे डोळे भरून बघत बसावं. बायकोच असायला पाहिजे असं नाही, पण हल्लीच्या आण्विक कुटुंबांच्या (पक्षी ः न्यूक्लिअर फॅमिली) युगात स्वतःचं, हक्काचं (आणि भरवशाचं!) दुसरं कोण असणार जवळ? तशी दुसरी व्यवस्था असेल, तर हरकत नाही!
टीप ः ही पाककृती घडण्यापेक्षा बिघडण्यातच जास्त मजा आहे. त्यामुळं ती बिघडल्याचं फार वाईट वाटून घेऊ नये! ती त्याचसाठी होती, असं समजावं आणि पुन्हा नव्या जोमानं कामाला लागावं!!
No comments:
Post a Comment