May 20, 2009

`उत्तर'क्रिया!

rajनिवडणूक निकालाची धामधूम संपल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून राज ठाकरे त्यांच्या नित्यक्रमाला लागले होते. नाही म्हटलं, तरी प्रचार संपूनही प्रत्यक्ष निकालापर्यंत गडबड कायम होतीच. बेरजा वजाबाक्‍यांची चर्चा सुरू होती, समीकरणं मांडली जात होती. प्रत्यक्ष निकालाच्या दिवशी तर मनसेची दिवाळीच साजरी झाली होती. पहिल्याच निवडणुकीत अनेक उमेदवारांनी लाख-दीड लाख मतांपर्यंत बाजी मारली होती. अधिक जोर लावला असता, तर आणखी काही जागा जिंकलोही असतो, अशी परिस्थिती होती. लोकांच्या अगदी "मनसे' प्रतिसादामुळं सगळेच भारावले होते. राजसाहेबांनाही मतदारांनी दाखविलेल्या प्रचंड अभिमानाबद्दल श्रमांचं सार्थक झाल्यासारखं वाटत होतं.
दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांतही त्यांच्या कर्तृत्वाचं, पक्षाच्या यशाचं गुणगान आलं होतं. ते वाचतानाही राजसाहेब प्रसन्न हसले. आपल्या लाडक्‍या कुत्र्याला त्यांनी गोंजारलं. नेहमीप्रमाणं त्याला सकाळी फिरायलाही नेऊन आणलं. शुभेच्छांचे फोन निकालाच्या सकाळी जे सुरू झाले, ते रात्री बारा-साडेबारापर्यंत सुरू होते. दुसऱ्या दिवशी सकाळीही हा "सिलसिला' संपला नव्हता. अनेकांच्या शुभेच्छा झेलत झेलतच राजसाहेबांनी आन्हिके उरकली. तेवढ्यात कुणा नेत्याचाच फोन आला.
""लक्षात ठेवा. एवढ्या यशानं हुरळून जायचं नाही. बाकीचे नालायक पक्ष लोकांना नको आहेत, हे त्यांनी दाखवून दिलंय. आता विधानसभेला अजिबात गाफील राहू नका. विजय आपलाच आहे!'' त्यांनी करड्या आवाजात सुनावलं. आपण अभिनंदन करायला फोन केला, की नेहमीची दटावणी ऐकायला, असाच प्रश्‍न त्या बिचाऱ्या नेत्याला पडला असावा.
""असो. बोला, तुमचं काय काम होतं ते!'' राजसाहेब म्हणाले.
पलीकडून बोलणाऱ्यानं त्याचं काम सांगितलं.
""सत्कारच ना? मी फार सत्कार-बित्काराच्या फंदात पडणारा माणूस नाही. पण पक्षाची ताकद सिद्ध झालेय. त्यानिमित्तानं मी सत्कार स्वीकारायला तयार आहे. कुठे आहे कार्यक्रम?''
""मुंबईतच आहे साहेब!'' कार्यकर्त्यानं सांगितलं.
""ठीक आहे. येईन मी. पण वेळेत सुरू करा आणि वेळात आटपा. बरीच कामं बाकी आहेत.'' राजसाहेबांनी पुन्हा सुनावलं.
पुढचे काही दिवस शुभेच्छा आणि अभिनंदनं झेलण्यात गेले. इतर पक्षांची संसदीय समितीची बैठक होते, तशी मनसेची लोकसभेतल्या सर्व (पराभूत) उमेदवारांची बैठक झाली. विधानसभेसाठीच्या रणनीतीवर चर्चा झाली.
असेच काही दिवस धामधुमीत गेले आणि प्रत्यक्ष सत्काराचा दिवस उजाडला. सगळी तयारी झाली होती. राजसाहेब मोठ्या प्रसन्न मुद्रेनं सत्काराच्या ठिकाणी गेले. कार्यक्रमाची आखणी भव्य स्वरूपाची होती. मात्र, सुरुवातीपासून संजय निरुपम, गुरूदास कामत आणि अन्य काही नेत्यांची छायाचित्रं बघून ते काहीसे अस्वस्थ झाले. उत्तर भारतीय संघटनांच्या नावांच्या पाट्याही ठिकठिकाणी झळकत होत्या. "मनसेची ताकद पाहून उत्तर भारतीयही वठणीवर आले की नाही! माझ्या सत्कारातही त्यांनी अभिनंदनाच्या पाट्या लावल्या आहेत!!' राजसाहेब मनाशीच म्हणाले.
कार्यक्रमाचं स्वरूप थोडं निराळं होतं. आधी राजसाहेबांचं भाषण आणि नंतर सत्कार, अशी रचना होती. बाकीच्या नेत्यांची भाषणं झाल्यावरच राजसाहेब सभास्थळी आले होते. आल्याआल्या काही मिनिटांतच त्यांचं भाषण सुरू झालं. नेहमीप्रमाणे मनसेची गरज, ताकद, मतदारांनी दाखविलेला विश्‍वास, महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचं कार्य, याविषयी ते बोलले. मग ओघानंच बिहारी आणि उत्तर भारतीय नेत्यांवर आणि लोकांवर त्यांनी आग ओकायला सुरवात केली. व्यासपीठावरचे अन्य लोक काहीसे अस्वस्थ झालेले आढळले. लोकांमध्येही टाळ्या-शिट्ट्या आणि जल्लोषाऐवजी अस्वस्थता दिसत होती. तेवढ्यात कुणीतरी राजसाहेबांचा शर्ट ओढला. "इन' बाहेर आल्यानं ते थोडेसे संतापलेले दिसले.
""साहेब, उत्तर भारतीयांवर आणि बिहारींवर जास्त टीका करू नका. त्यांनीच हा सत्कार आयोजित केलाय! मनसेच्या उमेदवारांना मिळालेल्या प्रचंड मतांमुळेच मुंबईत युतीचे उमेदवार पडले ना, म्हणून!'' तो कार्यकर्ता कुजबुजला.
""काय?'' राजसाहेब उडालेच. मग त्यांची नजर व्यासपीठावरच्या फलकांकडे गेली. "उत्तर भारतीय और बिहारी उम्मीदवारों को लोकसभा पर प्रतिनिधित्व देने में मदद के लिये "मनसे' का धन्यवाद' असे लिहिले होते!!

No comments: