चेन्नईतल्या आपल्या निवासस्थानी करुणानिधी ऐटीत आपल्या सिंहासनावर बसले होते. पक्षाच्या आमदार-खासदारांची गर्दी झाली होती. करुणानिधींच्या सिंहासनाच्या डावीकडे होते त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र अळगिरी. त्यापलीकडे नातू दयानिधी मारन. उजवीकडच्या बाजूला पहिल्याच खुर्चीत होते त्यांचे दुसरे पुत्र स्टॅलिन. पलीकडे मुलगी कनिमुरी.
सगळ्यांचे चेहरे चिंताक्रांत होते. विषय गंभीर होता. काही झालं तरी तमीळ अस्मितेचा प्रश्न होता! तमिळनाडूच्या जनतेनं टाकलेल्या विश्वासाला पात्र ठरतील असेच प्रतिनिधी दिल्लीत पाठवणं आवश्यक होतं. करुणानिधींनी एकेकाला मत विचारायला सुरवात केली. पण कुणीच काही बोलायला तयार नव्हतं. पक्ष ठरवेल ते धोरण स्वीकारण्याची त्यांची तयारी होती. गेल्या वेळी "नापास' ठरवलेल्या टी. आर. बालू या विद्यार्थ्याला पुन्हा परीक्षेला बसण्याची इच्छा होती, पण दिल्लीतल्या हेडमास्तरांनीच त्याचं नाव नाकारल्यानं त्याचा इलाज चालत नव्हता. त्यानं एकदा चोरून हात वर करण्याचा प्रयत्न केला, पण करुणानिधींनी गॉगलआडच्या डोळ्यांनीच त्याला दटावलं. बालू आपला पुन्हा शहाण्या "बाळू'सारखे...आपलं.. बाळासारखे गप्प बसले.
कुणाचीच इच्छा नाही असं दिसल्यावर करुणानिधींनी पुन्हा एकदा सर्वांना संधी द्यायचं ठरवलं. तरीही कुणी हात वर करायला तयार होईना. ""ठीक आहे. कुणाचीच तयारी नसेल केंद्रात जायची, तर मला पक्षाचा प्रमुख म्हणून काहीतरी भूमिका घ्यावीच लागेल. दयानिधी गेल्या वेळीही सरकारमध्ये होता. तो केवळ माझा नातू म्हणून नव्हे, तर एक नेता म्हणून महत्त्वाचा आहे. त्याला यावेळीही केंद्रात पाठवू.'' करुणानिधी म्हणाले.
सगळ्यांनी टाळ्यांचा गजर केला.
""दूरसंचार क्षेत्रातली नवी क्रांती आमच्या पिढीला काही झेपत नाही. तिथे नव्या दमाचे लोक हवेत. आपण ए. राजाला पाठवू. चालेल?''
सगळ्यांनी पुन्हा गजर केला.
""आता अजून एक कॅबिनेट शिल्लक आहे. आहे का कुणाची इच्छा?'' करुणानिधींनी चौफेर नजर टाकली.
कुणाचाच आवाज आला नाही.
""ठीक आहे. पुन्हा एकदा मलाच हा निर्णय घ्यायला हवा. बाळ, तुला आहे का इच्छा केंद्रात जायची?'' करुणानिधींनी स्टॅलिनला विचारलं.
""नाही बाबा. मी राज्यातल्याच जनतेची सेवा करणार. मला पदबिद नको.''
""बरं. मग बाळ अळगिरी, तू दादा ना? जाशील का तू दिल्लीत?''
""ठीक आहे बाबा. जशी तुमची आज्ञा.'' अळगिरीनं नम्रतेनं होकार भरला.
""बाबा, मी पण जाणार दादाबरोबर!'' पलीकडे बसलेली कनिमुरी एकदम ओरडली.
""थांब. एकेकाला पाठवू आपण. तुला पण पाठवू हां पुढच्या वेळी!'' करुणानिधींनी समजूत काढली.
""बाबा, दादा केंद्रात जाणार असेल, तर तुम्हाला इथे एकटं एकटं होईल. शिवाय तुमची तब्येतही बरी नसते हल्ली. तुम्हाला मदत करायची इच्छा आहे माझी.'' स्टॅलिन करुणानिधींचं उपरणं खेचत म्हणाला.
""असं म्हणतोस? राज्याच्या कारभारात मलाही कुणाची तरी मदत हवीच आहे. मग उपमुख्यमंत्री होतोस का तू?''
""चालेल बाबा!''
""ठीक आहे. ठरलं तर. चला, सगळे निर्णय लोकशाहीनं झाले, हे एक बरं झालं!'' करुणानिधींनी सुटकेचा निःश्वास टाकला आणि सगळे नेते पांगले.
No comments:
Post a Comment