जगाच्या उठाठेवी करण्याचं आणि मनाला येईल ते (अर्थात, फक्त स्वतःच!) लिहिण्याचं एक खुलं व्यासपीठ!
Sep 18, 2009
पितर्स डे!
मराठी नेटिझन्सच्या आवडत्या "मिसळपाव' साइटवर सक्काळी सक्काळी एका काळ्या कुळकुळीत, प्रसन्न, तुकतुकीत कांतीच्या आणि भक्ष्यावर एकटक नजर लावून बसलेल्या कावळ्याचं चित्र पाहून मन उल्हसित झालं. "मिपा'चे पालक, जनक "तात्या' यांच्या समयसूचकतेला उत्स्फूर्त दाद गेली. या "काका'त मला माझे (किंवा तात्यांचे!) पणजोबा, खापरपणजोबा, खापर-खापर पणजोबा वगैरे दिसू लागले. गेल्याच आठवड्यात शेजाऱ्यांकडे चापलेल्या खीर-पुरीची चव नको नको म्हणताना जिभेवर पुन्हा रेंगाळू लागली.
तसं मला मरणाबद्दल नसलं, तरी मेल्यानंतरच्या क्रियांबद्दल भयंकर आकर्षण! उभ्या आयुष्यात कुणाला मरताना प्रत्यक्ष पाहिलं नाही. अगदी जराजर्जर झालेल्या एखाद्या आप्तालाही! त्या बाबतीत अगदीच "कोषात' निम्मं आयुष्य गेलं म्हणा ना! कुटुंबातलं किंवा जवळच्यांपैकी कुणाच्या मृत्यूचा अनुभव मला वयाच्या सत्ताविशीपर्यंत नव्हता. अगदी लहान असताना पणजी गेली. पण तेव्हा मी जेमतेम सहा-सात वर्षांचा असेन. ती अंधुकशी आठवतेय. "सोनू डॉक्टर' म्हणायची मला. मी डॉक्टर व्हावं, अशी तिची इच्छा होती. का कुणास ठाऊक? मी डॉक्टर होऊन या म्हातारीला औषधं देईपर्यंत जगण्याची तिची इच्छा होती की काय, कुणास ठाऊक! पण सुटली लवकर. तिच्या काय, कुणाच्याच आशीर्वादानं मी डॉक्टर वगैरे झालो नाही. तसा मनसुबा होताच अर्थातच. कारण त्यावेळी बारावीनंतर डॉक्टर किंवा इंजीनिअर हे दोनच व्यवसाय असतात, असा ठाम समज होता. डॉक्टरकीला माझी ऍडमिशन थोडक्यासाठी चुकली. केवळ 39 टक्के कमी पडले. मी डॉक्टर न होऊन शेकडो रुग्णांवर उपकारच केले म्हणायचे!
असो.
तर सांगत काय होतो, की जवळच्या व्यक्तीचा मृत्यू. आजोबा गेले, तेव्हा मी पुण्यात होतो. त्यांना साधी कावीळ झाली होती आणि त्यात ते जातील, असं अजिबात वाटलं नव्हतं. त्यांची तब्येत ठणठणीत होती. ब्याऐंशीव्या वर्षापर्यंत चादरी-पांघरुणं आपटून धुणे, विहिरीतून पाणी काढून झाडांना घालण्यासारखे उद्योग करायचे. त्यांचा उत्साह आम्हालाही लाजवायचा. पण काविळीचं निमित्त झालं आणि यमराजानं डाव साधला. त्यांना बघण्यासाठी रत्नागिरीला जाण्याचा विचार करेपर्यंतच ते गेले. शेवटचं भेटताही आलं नाही. आजीजवळ तेव्हा मी खूप रडलो होतो. आयुष्यात जवळून (न) पाहिलेला जवळच्या व्यक्तीचा पहिला मृत्यू होता तो! आजोबांना शेवटचं पाहताही आलं नाही, याची खूप खंत वाटली त्या वेळी. पण आधी भेटायला येण्याजोगं काही वाटतही नव्हतं. मग आजीनं मला आश्वासन दिलं, "माझं काही कमी-जास्त होतंयसं वाटलं, की नक्की तुला बोलावून घेईन!' त्यानंतर तीन-चार वर्षांनी आजी मुंबईला असताना गेली. सुदैवानं माझं लग्न पाहायला ती होती. आजोबांना माझं लग्न पाहायची फार इच्छा होती. बी. ए. पास वगैरे असलेल्या एखाद्या मुलीची नुसती पत्रिका जरी तिकडे रत्नागिरीला पोचली, की जणू माझं लग्न ठरलंच आहे, अशा थाटात ते नाचायलाच लागायचे. मग मी नकार दिला, की "या मुलीत नकार देण्यासारखं काय आहे,' हेच त्यांना कळायचं नाही. शेवटीशेवटी तर माझ्या नकारांमुळे रागावून त्यांनी माझ्याशी बोलणंच सोडलं होतं!
त्यांच्या दहाव्या दिवसाला पिंडाला कावळा शिवत नव्हता. "मी लवकर लग्न करेन' असं आश्वासन वडिलांनी मला द्यायला लावल्यानंतर कावळा शिवला! बाकी, असल्या प्रकारांवर माझा कधीच विश्वास नव्हता. मी तसं सांगितल्यामुळे किंवा सांगितल्यावर लगेच कावळा शिवला, असं अजिबात नाही. पण घरच्यांच्या समाधानासाठी ते करण्यात काही गैर नव्हतं.
आजी गेली, तेव्हाही मी तिच्याजवळ नव्हतो. पण पुण्याहून मुंबईला जाणं सोईचं होतं. तिचे अंत्यविधी करायला मी पोचू शकलो. पण वडील जिवंत असलेल्या व्यक्तीने असे अंत्यविधी करायचे नसतात, हे नंतर कळलं! गंमत म्हणजे, तिच्या दहाव्याच्या आदल्या दिवशीच इंदूरला एका मित्राचं लग्न होतं. तेही होतं संध्याकाळी आठच्या मुहूर्तावर. मला तिकडे जाणं अत्यावश्यक होतं, कारण पुण्यातून अन्य दोन मित्रही जाणार होते. इंदूरहून मुंबईसाठी शेवटची बस संध्याकाळी सातची होती. मग आदल्या दिवशी इंदूरला पोचलो. त्याचं श्रीमंतपूजन वगैरे विधींना हजेरी लावली आणि लग्न लागण्याआधीच संध्याकाळी तिकडून निघालो. पण हाय रे कर्मा! मुंबईत पोचेपर्यंत अकरा वाजले, तोपर्यंत सगळे विधी झाले होते. एवढा आटापिटा करून काही उपयोग झाला नाही. लग्नविधीही चुकला आणि दशक्रिया विधीही!
लहानपणी दहाव्या-तेराव्याच्या जेवणावळींचंही फार कौतुक वाटायचं. आमच्याकडे ही पद्धत नव्हती, पण शेजारच्या काही घरांमध्ये होती. आमच्या शेजारच्या एका घरात तर सात-आठ वर्षांत पाचेक माणसं गचकली! दर वेळी तेराव्याला आम्हाला जेवणाचं निमंत्रण यायचं. पहिल्या वेळी तर मला जाम गंमत वाटली होती! अगदी पत्रिका छापून नाही, तरी "सगळ्यांनी प्रसादाला या,' असं निमंत्रण ऐकून मला हसावं की रडावं, कळेना झालं होतं. वर निमंत्रण दिलं असलं, तरी जेवायला जायचं नसतं, असंही ज्येष्ठांकडून समजलं. पितृपक्षातल्या जेवणावळी ठीक आहे. पण तेराव्याला जेवायला जाऊन करायचं काय? म्हणजे धड जेवणाचा आनंदही घेता येणार नाही आणि मुकाट रडवेला चेहरा करून पानात पडलेलं गिळावं लागणार!
लहानपणी शाळेतून येताना वाटेत पैसे पडलेले सापडले, म्हणून तीन-चार नाणी उचलून घरी आणली होती, असंही आठवतंय! घरी आल्यावर कळलं, कुणाच्या तरी अंत्ययात्रेत ठरलेल्या पद्धतीनुसार त्या मार्गावर पैसे टाकण्याची पद्धत होती. गोरगरीबांना दान म्हणून! तेच पैसे मी उचलून आणले होते!! कधीकधी चुरमुरे-फुटाणेही फेकलेले दिसायचे. अन्नाची नासाडी करून या लोकांना काय "पुण्य' मिळतं कुणास ठाऊक, असा विचार तेव्हा मनात यायचा!!
असो. कावळ्याला पाहून मन भरून आलं, म्हणून काहीतरी खरडलंय. लिखाणाचा विशेष काही उद्देश नव्हता किंवा दिशाही. लेखातल्या एका परिच्छेदाचा दुसऱ्याशी संबंध असण्याची सुतराम शक्यता नाही! "पितर्स डे' गोड मानून घ्या, झालं!
---
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
"म्हणून काहीतरी खरडलंय. लिखाणाचा विशेष काही उद्देश नव्हता किंवा दिशाही. लेखातल्या एका परिच्छेदाचा दुसऱ्याशी संबंध असण्याची सुतराम शक्यता नाही! "पितर्स डे' गोड मानून घ्या, झालं!"
असंच वाटलं. पण शेवटच्या वाक्याने गोड मानून घेतलं आहे.
Post a Comment