बालपण किती रम्य असतं नाही? लहान असताना आमच्यासाठी लांबचा प्रवास म्हणजे रत्नागिरी-मुंबई किंवा रत्नागिरी-पुणे असायचा. दोन्हीकडे आत्या राहायच्या, राहतात. त्यामुळे वर्षातून एकदा, विशेषतः मे महिन्यात किंवा काही सणानिमित्त एक ट्रिप या ठिकाणी असायची. रत्नागिरीत झोपाळ्यावर खेळतानाही आम्ही बसची जमवलेली तिकिटं घेऊन रत्नागिरी-मुंबई एसटी असा खेळ खेळायचो. असो.
मुंबईपेक्षाही पुण्याचा प्रवास जास्त वेळा झाला. पुण्याची साधी गाडी रात्री सात वाजता निघायची. नंतर ही वेळ वाढत नऊपर्यंत गेली. तेव्हा सेमीलक्झरी गाडीत बसणं म्हणजे चैनच होती. त्यातून वडील एसटीत असल्यानं वर्षातून दोन महिने पास मिळायचा. त्यामुळं लाल डब्याला पर्याय नव्हता. साधी गाडी कोल्हापूरमार्गे जायची. कोल्हापूरला थांबल्यानंतर सगळ्यात मोठं आकर्षण असायचं ते तिथला स्टॅंडबाहेर मिळणारा वडापाव खाणं. स्टॅंडच्या गेटबाहेर वडापावच्या भरपूर गाड्या रांगेने उभ्या असत. त्यांच्याकडे गरमागरम तळलेला गलेलठ्ठ वडा मिळे. मी कुठेही पाहिलेल्या वड्याच्या साधारण दीड ते पावणेदोन पट त्याचा आकार असे. त्याच्यासोबत पाव म्हणजे एक घसघशीत मोठा तुकडा असे. ग्रामीण भागात बेकरीत असे जाडजूड पाव तयार केले जातात. साधारण आपल्या शहरी ब्रेडच्या आकाराच्या अडीचपट त्याचा आकार असतो. वडा-पाव म्हणजे पावात घातलेला वडा नव्हे, तर वेगळा वडा आणि पाव, अशी ही कोल्हापुरी तऱ्हा. तरीही झणझणीत चटणी आणि त्यासोबत गरम वडा व पाव, असा बेत म्हणजे तोंडाला पाणीच सुटे. कोल्हापूरला थांबल्यानंतर धावतपळत जाऊन तो वडा घेऊन येणं आणि ओरपणं, हेच प्रवासाचं मुख्य आकर्षण होतं.
कालांतराने मात्र या गाड्या बंद झाल्या. बहुधा गुन्हेगारीमुळे पालिकेनं तिथे कारवाई करून रात्रीचे सगळे स्टॉल बंद करून टाकले. रात्रीच्या प्रवासाची सगळी गंमतच निघून गेली. मी पुण्याला कायमचा राहायला आल्यावर रत्नागिरी-पुणे वाऱ्या बऱ्याचदा सुरू झाल्या, पण आता हे आकर्षणही नव्हतं आणि माझाही प्रवास सेमीलक्झरीने सुरू झाला होता. सेमीलक्झरीचा प्रवासाचा मार्ग वेगळा होता. गाडी कोल्हापूरला न जाता परस्पर कोकरूडमार्गे मलकापूरला पोचते. त्यातून अंतर आणि तिकीटही कमी! पास मिळण्याचाही मुद्दा संपला होता...
कोकरूडच्या मार्गावर जाणारी बस मलकापूर स्टॅंडला काही सेकंदच थांबायची, तीही प्रवाशांच्या लघुशंकांसाठी. नंतर तातडीने वळून पुन्हा ती दोनच मिनिटांत थांबायची. सुरुवातीला झोपेच्या अमलाखाली मला काही कळायचं नाही. पण अधूनमधून जाग असायची, तेव्हा लक्षात आलं, गाडी चहाला थांबते. तेही मलकापूरच्या मुख्य बाजारातील एका अरुंद रस्त्यावर. एक म्हातारबाबानं तिथे आपली छोटीशी गाडी थाटली होती. आगेमागे बऱ्याच एसटी आणि इतरही ट्रक वगैरे गाड्या थांबलेल्या असायच्या. एकतर कऱ्हाड सोडल्यानंतर रत्नागिरीपर्यंत या मार्गावर कोणतंही मोठं शहर, ठिकाण नाही. महामार्गापासूनचा वेगळा रस्ता. त्यामुळं रहदारीही मोजकी. त्यामुळं कुठलं हॉटेल किंवा चहाचं दुकान वगैरे उघडं असण्याची शक्यता नाही. त्यामुळे रात्रीच्या यात्रेकरूंना बहुधा चहाचा एवढा एकमेव पर्याय उपलब्ध असावा. तेव्हापासून आजतागायत मी ही गाडी याच ठिकाणी पाहत आलो आहे.
या म्हातारबाबांकडे मिळतो फक्त चहा आणि वडा. चहा द्यायची पद्धतही खास आहे. गाळण्याच्या ऐवजी असलेला कळकट, मळकट फडका. एका स्टोव्हवर रटरटत असलेलं एक ऍल्युमिनिअमचं पातेलं. त्याला वरून बंद ताटलीचं झाकण. या झाकणाला मध्यभागी एक मोठं छिद्र. त्या छिद्राच्या वर ठेवलेली चहाची किटली. त्या छिद्रातून आलेल्या वाफेनं किटलीतला चहा गरम होणार.
चहाची चव यथातथाच. बहुधा साखर जास्त आणि दूध कमी. तरीही, रात्री तीनच्या दरम्यान प्रवासातला टाइमपास म्हणून आणि थंडी उडवण्यासाठी गरम काहितरी प्यायला मिळण्याचं समाधानच जास्त. ड्रायव्हर-कंडक्टरही तिथे चहाचा आस्वाद घेतात. त्यामुळं प्रवाशांनाही गाडी सुटण्याचं टेन्शन राहत नाही. या टपरीवर थांबल्याशिवाय एसटी पुढे गेल्याचं मी तरी आजपर्यंत पाहिलेलं नाही.
म्हातारबाबांकडे मिळणारा वडा बहुतेक वेळा गारच. त्यातून तो मस्त तेलात माखलेला. व्हाइट कॉलर मध्यमवर्गीयानं चार हात लांबच राहावं, असा. तरीही, वड्यांचं ताट कधी भरलेलं मी पाहिलेलं नाही. बहुतेक वेळा तीन ते चारच वडे त्या ताटात दिसतात. एकतर त्यांना भरपूर खप असावा, किंवा म्हातारबाबा तेवढेच वडे बनवत असावा. मीही एकदोनदा तो वडा चाखल्याचं आठवतंय. (हल्ली हेल्थ-कॉन्शस झाल्यापासून घरचेही वडे-भजी खात नाही, ही गोष्ट अलाहिदा!)
गाडी तिथे सात ते आठ मिनिटंच उभी राहत असल्यानं या म्हाताऱ्याचं नाव, गाव, कूळ विचारण्याची संधी आजपर्यंत मिळालेली नाही. धंद्यावरची त्याची निष्ठा मात्र वाखाणण्यासारखी! जुलै-ऑगस्टच्या मुसळधार पावसातही त्याची गाडी कधी बंद असलेली मला आढळलेली नाही. त्याच्यासोबत मदतीला कुणी मुलगा, घरचं कुणीही कधी पाहिलेलं नाही. गाडी थांबल्यावर प्रवासी गाडीभोवती गोळा झाल्यावर अतिशय अदबीनं चहाचा ग्लास पुढे करण्याची त्याची अदाही विलक्षण.
अगदी गेल्या आठवड्यात रत्नागिरीहून आलो, तेव्हाही म्हाताऱ्याकडचा चहा चाखला. मनस्वी गाडीत एकटीच झोपलेली असताना! ती पडेल की काय ही भीती होती, तशीच जागी झाली तर उठून बाहेर येईल की काय, हीदेखील! तर ते असो. या वेळी म्हातारबाबाच्या एका डोळ्यात फूल पडल्याचंही प्रकर्षानं जाणवलं. लोकांच्या सेवेची त्यांची "दृष्टी' मात्र पूर्वीसारखीच टवटवीत होती!
एकंदरीत, या म्हाताऱ्याची व्यवसायावरची निष्ठा विलक्षण आहे. आमची तेवढी जगण्यावरही नाही!
No comments:
Post a Comment