जगाच्या उठाठेवी करण्याचं आणि मनाला येईल ते (अर्थात, फक्त स्वतःच!) लिहिण्याचं एक खुलं व्यासपीठ!
Jan 18, 2010
जमला मेळा नेटीझनांचा
मिसळपाव, मनोगत वगैरे साइटींवर वावरताना, इंटरनेटच्या दुनियेची सफर करताना एवढी ज्ञानी, जाणती, अनुभवी, व्यासंगी मंडळी कुठेतरी एकत्र आली पाहिजेत, असा विचार अनेकदा मनात येऊन गेला. काही छोटी मोठी संमेलनंही झाली, पण मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली नव्हती. कधी कामामुळे, तर कधी अंतरामुळे. दोन आठवड्यांपूर्वी ब्लॉगर्सच्या संमेलनाचं निमंत्रण आलं, तेव्हा आनंदच झाला. आपण ज्यांचे वाचक आहोत आणि जे आपले वाचक आहेत, त्या सगळ्यांची भेट होणार, ही आनंदाचीच बातमी होती. मी लगेच होकार कळवून टाकला.17 जानेवारीला पु. ल. देशपांडे उद्यानात आणि रविवारी संध्याकाळी चारच्या वेळेत हा मेळावा होता. सगळं जमण्यासारखं होतं. अडचण एकच होती. साथ-साथ विवाह अभ्यास मंडळाचंही नेमकं त्याच दिवशी स्नेहसंमेलन होतं. माझ्या दृष्टीनं त्याला जास्त महत्त्व होतं. त्यामुळे तिकडे जायचं की इकडे, असा पेच पडला. शेवटी चारला पु.ल.देशपांडे उद्यानात डोकावून जायचं आणि रागरंग बघून थोड्या वेळानं कटायचं, असं ठरवलं.बरोब्बर चारला उद्यानापाशी पोचलो. भारतीय प्रमाणवेळेनुसार साडेचार-पावणेपाचपर्यंत माणसं येतील, अशीच अपेक्षा होती. पण माझ्या आधीच बरीचशी मंडळी येऊन पोचली होती. सगळ्यांशी ओळख झाली. मेळाव्याचं आयोजन करणारी मंडळी बरीच उत्साही होती. कुठून कुठून ब्लॉगर्स शोधून त्यांनी हा गोतावळा जमवला होता. वेगवेगळ्या क्षेत्रातले, वेगवेगळ्या वयोगटाचे, ठिकाणचे लोक होतो. काही अमेरिकेत अनेक वर्ष राहिलेले, काही ज्योतिषातले, तर काही अवकाशसंशोधनात काम करणारे. काही संगणकतज्ज्ञ. काही जण नुसतेच विद्यार्थी किंवा वाचक म्हणून आले होते. एकूण साठेक (सुसंवादी) पात्रांचा तो अनोखा मेळा झाला होता.नावनोंदणीत पाऊणेक तास गेला. नंतर संयोजकांनी मेळाव्याचा उद्देश आणि पुढचा कार्यक्रम सांगितला. मुळात, ब्लॉगच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधणाऱ्यांचा एक गट तयार करणं आणि त्यातून सर्वांना उपयुक्त असे काही कार्यक्रम घेणं, हा हेतू होता. सगळ्यांनाच हा विचार पटला. उपक्रम चांगला होता. त्यासाठी फेसबुक किंवा तत्सम ठिकाणी एक कम्युनिटी किंवा ग्रुप तयार करणं आणि त्याद्वारे सर्वांच्या एकत्रितपणे संपर्कात राहणं, हा पुढचा टप्पा होता.प्रसन्न जोशी, नितीन ब्रह्मे, सम्राट फडणीस आदी माध्यम-मित्रही आले होते. त्यांचाही मेळाव्याच्या आयोजनात आणि स्वरूप ठरविण्यात बराच हातभार होता. मी स्वतः ब्लॉग लिहिण्यापलीकडे ब्लॉगविश्वात काहीच करत नव्हतो. अगदी इतरांचे ब्लॉग वाचणंही! ट्विटर वगैरे माध्यमांमधलीही तज्ज्ञ मंडळी भेटली. राजे शिवाजी नावाची साइट चालविणारे, स्वतःची ई-मॅगेझिन वितरित करणारे, असे अनेक उद्योग व उपक्रम करणारी मंडळी भेटल्याने आनंद झाला. त्यांच्याशी झालेल्या ओळखीचा मला व त्यांनाही पुढील काळात फायदा होऊ शकेल.मी दोनेक तास या मेळाव्याला होतो. साथ-साथ कडे पळायचं असल्याने नंतरच्या अनौपचारिक गप्पांत सहभागी होऊ शकलो नाही. एकूण मेळाव्याला जाण्याचा उद्देश साध्य झाला. जेवढा वेळ ठरविला होता, त्याहून जास्त थांबावंसं वाटलं, याहून अधिक काय हवं?
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
अभिजित, तू आलास. आम्हांला आनंद झाला. खूप खूप आभार. असेच येत राहा. आणि ही नसती उठाठेव सारखी सारखी करत राहा. आम्ही वाचत राहूच.
अवांतर: दुसऱ्या मेळाव्यासाठी शुभेच्छा. तिकडचा ठराव पण आम्हांला कळवा ;-)
Post a Comment