Feb 14, 2010

दहशत आमच्याही दारात!

शनिवार 13 फेब्रुवारीचा दिवस. नेहमीप्रमाणे सगळे व्यवहार सुरू होते. संध्याकाळचीच ड्युटी होती. मीटिंग वगैरे आटोपून बातम्या सोडण्याची नेहमीची कामे सुरू केली होती. तेवढ्यात आमच्याच सहकाऱ्याचा एसएमएस आला. कोरेगाव पार्कमध्ये स्फोट होऊन चार ठार झाल्याचा. जर्मन बेकरीत सिलिंडरचा स्फोट, एवढंच कळलं होतं. त्यानुसार पुढचं नियोजन ठरणार होतं. आठच्या व्हीडिओ कॉन्फरन्समध्ये जाईपर्यंतही सिलिंडर स्फोट, एवढंच त्याचं वर्णन होतं.कॉन्फरन्स सुरू असतानाच स्टोरी डेव्हलप होऊ लागली होती. चाराचा आकडा सहावर केला. त्यानंतर आठवर गेला. मुख्य म्हणजे स्फोट सिलिंडरचा नव्हे, बॉंबचा असल्याचीही कुणकुण लागली. नंतर ती बऱ्याच सोर्समधून पक्कीही झाली. बातमी काही मिनिटांत कसं गंभीर रूप धारण करते, याचं ते मूर्तिमंत उदाहरण होतं. आधी केवळ पुण्यापुरतं मेन फीचर अशा स्वरूपात विचार करताना एकाएकी या घटनेनं अक्राळविक्राळ रूप घेतलं होतं. तातडीने इतर तयारी सुरू झाली. बॉंबस्फोट हे निश्‍चित कळल्यानंतर पुढची पानांची रचना, आधीच्या पानांची फिरवाफिरव, कामाचं नियोजन, इतर तयारीनं वेग घेतला. सुटीवर असलेली माणसं कामाला आली. नकाशे, इतर माहिती जमवणं सुरू झालं. आर्काइव्ह खणण्यात आलं. फोटोंची जमवाजमव झाली. इतर आवृत्त्यांचे, नागरिकांचे फोन खणखणू लागले. रात्री उशीर होणार, हेही नक्की झालं.बॉंबस्फोटाची वार्ता साडेआठला कळली, तरी तशी प्रत्यक्ष घोषणा व्हायला अकरा वाजले. दरम्यानच्या काळात पुण्याची बातमीदार मंडळीही कामाला लागली होती. प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहून यावं, असं मनात येत होतं, पण ऑफिसातली धावपळ बघता ते शक्‍य नव्हतं. मग ऑफिसमधली लढाई व्यवस्थित खेळण्याचा निर्णय घेतला.दहशतवाद आधी पुण्याच्या उंबरठ्यावर होता, आता तो दिवाणखान्यात शिरला असल्याची खात्री पटविणारी ती घटना होती. जर्मन बेकरी या कोरेगाव पार्कमधल्या एका खान-पान सेवा देणाऱ्या ठिकाणी स्फोट झाला होता. 15 दिवसांपूर्वीच आम्ही ऑफिसातले सहकारी हा नवा भाग पाहण्याच्या उद्देशाने गाडीतून फिरलो होतो. तेव्हा याच ठिकाणाहून गेलो होतो. एरव्ही तिथे आमचा फारसा संबंध येत नसला, तरी आपल्या शहरात बॉंबस्फोटासारखी भीषण घटना घडल्याची जाणीव अस्वस्थ करणारी होती.आधी देशातले निरनिराळ्या ठिकाणचे बॉंबस्फोट, मुंबईतला दहशतवादी हल्लाही पाहताना, वाचताना त्याची धग एवढी जाणवली नव्हती. कालच्या बॉंबस्फोटात आपलं जवळचं, ओळखीचं कुणीही असू शकेल, याचीही जाणीव झाली. तरी हा हल्ला पुण्याच्या वेशीवरच्या भागात, उच्चभ्रू आणि विशेषतः अमराठी-अभारतीय वस्तीशी संबंधित ठिकाणी झालेला हल्ला होता. तरीही, त्याची तीव्रता तेवढीच होती. पुण्याचा मध्यवर्ती भागही - कदाचित आपली रोजची उठण्याबसण्याची ठिकाणंही दहशतवाद्यांच्या रडारवर असू शकतील, हेही तितकंच खरं!

3 comments:

Anonymous said...

besst.. eskal che covrage changale ahe.

Pankaj - भटकंती Unlimited said...

खरंय... एक छोटी बातमी कसे अक्राळविक्राळ रुन धारण करते याचेच एक उदाहरण. एका बातमीचा प्रवास अनुभवला सगळा. इ-सकाळ अपडेट्स पाहत होतो कंटिन्युअस. सम्राट फडणीसही ऑनलाईन होता. साईट ट्राफिक मॅनेज करत. आमचा टीव्हीपेक्षा सकाळ वरच जास्त विश्वास.

भानस said...

दहशतीला ’सीमा” राहिलेली नाही. सकाळचे कवरेज चांगले होते.