दीडशे कोटींचा "रोबो' पाहताना डोळ्याचं पारणं फिटतंच, पण डोळेही फिरतात. एका शास्त्रज्ञानं यंत्रमानवाच्या स्वरूपात साकारलेली स्वतःचीच प्रतिकृती आणि तिच्या करामती पाहताना अक्षरशः स्तंभित व्हायला होतं. चमकदार कथा, रंजक पटकथा यामुळे "रोबो' प्रेक्षणीय झाला आहे. तरीही चित्रपटाचं बलस्थान असलेलं "तंत्र' शेवटच्या काही प्रसंगांत एवढं अंगावर येतं, की प्रेक्षकाचीच काय, त्या तंत्रज्ञानाचीही दमछाक व्हावी!
चित्रपटाची कथा तीन-तीन रजनीकांतांशी संबंधित आहे. डॉ. वसीकरण हा साधारण (तीस ते पन्नास या कुठल्याही वयोगटातला) रजनीकांत एका अद्भुत यंत्रमानवाच्या संशोधनासाठी दहा वर्षे मेहनत घेतो. शंभर कला, जगातील सर्व भाषा, शंभर हत्तींचं बळ असलेला, त्याच्याच चेहऱ्याचा एक रोबो तयार होतो. हाच दुसरा रजनीकांत. पहिल्या रजनीकांतची प्रेयसी असते "सना'. ती दुसऱ्या रजनीकांतला घरी "खेळायला' घेऊन जाते आणि तो तिला फिल्मी स्टाईलनं वाचवतो. दुसऱ्या रजनीकांतला लष्कराच्या ताब्यात देऊन सीमेवर शत्रूशी लढायला पाठवायचं पहिल्या रजनीकांतच्या मनात असतं, पण त्याचेच वरिष्ठ शास्त्रज्ञ (डॅनी) हे असूयेतून त्यात दोष काढतात. मग दुसऱ्या रजनीकांतच्या शरीरात पहिला रजनीकांत मानवी भावनाही फिट करतो. त्यातून दुसरा रजनीकांत पहिल्याच्याच प्रेयसीच्या प्रेमात पडतो आणि घोळ होतो. मग डॅनी दुसऱ्या रजनीकांतला आपल्या ताब्यात घेऊन, त्याचे "प्रोग्रॅम' बदलून तिसराच रजनीकांत जन्माला घालतो आणि विनाशकारी खेळ सुरू होतो...
दिग्दर्शक शंकरनं "रोबो'ला मध्यवर्ती भूमिकेत ठेवून आणि खऱ्याखुऱ्या रजनीकांतला दुय्यम भूमिका देऊन खेळलेला जुगार यशस्वी झाला आहे. रोबोच्या रूपात रजनीकांतच असल्यानं त्याच्या चाहत्यांच्या अपेक्षा त्याच्याकडून दसपट प्रमाणात पूर्ण होतात. जमिनीला समांतर अवस्थेत रेल्वेच्या डब्यांवरून धावत जाणं, हेलिकॉप्टरची फेकाफेक, डोकं काढून हातात घेणं, असे चमत्कार पाहताना थक्क व्हायला होतं. "रोबो'बरोबरच चित्रपटातही भावना पेरायला दिग्दर्शक विसरलेला नाही. त्यामुळे शेवटी "रोबो'ची आत्महत्या पाहताना डोळ्यांत पाणी येतं.
दीडशे कोटी ज्या कारणासाठी घातलेत, ते तंत्रज्ञान, गाण्यांचं परदेशातील विलोभनीय चित्रीकरण, यातून प्रेक्षकांचेही पैसे वसूल होतात. शेवटच्या प्रसंगातील शेकडो रोबोंचे "सर्कस'छाप विविध खेळ मात्र अंगावर येतात. तेवढा भाग सोडला, तर चित्रपट एकदा पाहण्यासारखा नक्कीच आहे.
पहिल्या रजनीकांतकडून अभिनयाची अपेक्षा त्याचे चाहतेही करत नाही. त्याच्याकडून ज्या करामतींची अपेक्षा असले, त्या दुसरा रजनीकांत आणि तिसरा रजनीकांत इथे पूर्ण करतात. ऐश्वर्या तिला मिळालेल्या मानधनाइतपत सुंदर दिसलेय.
खऱ्या रजनीकांतनं आता अभिनयाचा नाही, निदान वयाचा विचार करण्याची वेळ आलेय. म्हणजे आणखी दहा वर्षांनी तरी तो आपल्याला पडद्यावर गेला बाजार चाळिशीच्या भूमिकांत दिसू शकेल.
जगाच्या उठाठेवी करण्याचं आणि मनाला येईल ते (अर्थात, फक्त स्वतःच!) लिहिण्याचं एक खुलं व्यासपीठ!
Oct 5, 2010
दमते `तंत्र' देवता
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
सर्वांनी इतकी तारीफ केली आहे की सिनेमा पहावा लागणार असं दिसतंय
गलत. रजनीला वय नसतं. चित्रपटाची नायिका रजनीपेक्षा थोराड दिसते. हिंदी चित्रपटांनी स्वप्नातही पाहिली नसतील, अशी दृश्ये एन्दिरन आपल्याला दाखवतो.
Post a Comment