शनिवारी ऑफिसातून कधी नव्हे ते लवकर घरी आलो होतो. मनस्वीला देवी दाखवायला नेण्याचं कबूल केलं होतं. रात्री नऊला घरातून बाहेर पडलो. ती थोडीशी झोपाळली होती, पण देवी बघायला जाण्याचं सोडवत नव्हतं.
सर्वांत आधी बंगाली दुर्गा पाहण्यासाठी कॉंग्रेस भवन गाठलं. तुफान गर्दी होती, पण देवी पाहता आली. माझ्यासमोर डझनभर तरुण-तरुणी, प्रौढ-प्रौढा हातातले मोबाईल सरसावून देवीची छबी आणि शूटिंग टिपण्यात गुंतले होते. फ्रेम ऍडजस्ट करून देवीचा चेहरा बरोबर मध्यभागी कसा येईल, याचे प्रयत्न सुरू होते. मला हसावं की रडावं कळेना. गणपतीतही हेच दृृश्य सगळीकडे पाहायला मिळतं. लोक उठसूट कसलेही फोटो मोबाईलमध्ये घेऊन काय साध्य करतात? बरं, देवीची भक्ती, श्रद्धा समजू शकतो. पण यांच्या वॉलपेपरवर, स्क्रीनसेव्हरवर किंवा इतर वेळी कायम पाहण्यात हा फोटो येणार नसतो. फोटो डाऊनलोड करून ते डेस्कटॉप, लॅपटॉपवर टाकणार नसतात. गेला बाजार तो फोटो फेसबुक किंवा ऑर्कुटचं कोंदण पटकावू शकतो. पण तेवढ्यासाठी एवढा आटापिटा कशाला?
बंगाली दुर्गेचं उदाहरण एकवेळ समजू शकतो. ती एरव्ही पुण्यात कुठे पाहायला मिळणार नाही. पण गणपतींच्या मूर्तींचं काय? दगडूशेठ गणपतीचा देखावा आणि रथ दरवर्षी इथूनतिथून सारखाच असतो. त्याला नावं वेगवेगळी असतात, एवढंच. बरं, आपण मोबाईलवर काढतो त्यापेक्षा अत्युच्च गुणवत्तेचा फोटो कुठूनही उपलब्ध होऊ शकतो. मग उपडीतापडी पडून, लोकांना धक्काबुक्की करून, मोबाईलचा आणि आपला जीव धोक्यात घालून फोटो काढण्यासाठी धडपडायलाच हवं का?
काही लोक याला श्रद्धा असं नाव देतील.
कबूल.
श्रद्धा कुठेतरी असायलाच हवी. काहींची ती देवावर असते. याच श्रद्धेचा प्रत्यय त्यानंतर सारसबागेसमोरच्या महालक्ष्मी मंदिराजवळ गेलो, तेव्हा आला. रात्रीच्या साडेदहा वाजता भाविकांचा मोठा जथ्था महालक्ष्मीच्या दर्शनासाठी भक्तिभावानं रांगेत उभा होता. साधारण तास-दीड तास तरी त्यांना तसंच ताटकळावं लागेल, असं चित्र होतं. तरीही लोक एकेका पायावर नाचत, हातात तबकं, फुलं, पोरं सांभाळत त्या रांगेत तिष्ठत होते.
मंदिराच्या समोर रस्त्यावर उभं राहूनही देवीचं दर्शन झालं. "आत येऊन माझी खणानारळानं ओटी भरली नाहीस, तर तुझा नरकासुर करून टाकीन,' असं काही देवी माझ्या कानात पुटपुटल्याचं मला तरी ऐकू आलं नाही.
तिरुपतीच्या रांगेत म्हणे तासन् तास उभं राहावं लागतं. सिद्धिविनायकाच्या मंदिरात बच्चन कुटुंबीय अनवाणी चालत गेल्याचे फोटो छापून येतात. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी तिष्ठणाऱ्या भाविकांना "थंडगार' करण्याची सोय केल्याचं कौतुक होतं, एकवीरेला 50 लाखांचा मुखवटा चढवल्याच्या हेडलाइन होतात....
देवांच्या चरणी लीन होण्यासाठी एवढे उतावीळ झालेले हे भाविक इतर वेळी कितपत पुण्याचं (पुण्याचं म्हणजे उच्चारानुसार "पुण्ण्याचं'. "पुणे शहराचं नव्हे!) काम करतात हो? एकदा देवाच्या पाया पडलं की बाहेर आपण चोऱ्यामाऱ्या, लांड्यालबाड्या, पापं करायला मोकळे का? बाहेर दडपून पैसे खाणारे देवळात जाऊन स्वतःच्या तोंडावर थपडा कशाला मारून घेतात? बाहेर पुन्हा लोकांना थपडा मारता याव्यात म्हणून?
झ्या मनात ते वाईट विचार असतात, ते देवळात गेल्यावरही येऊ शकतात. म्हणून तिथे गेल्यावर भाविकतेचं, सात्विकतेचं नाटक मी करत नाही. आपण अजिबात वाईट काम करत नाही, असा माझा बिल्कुल दावा नाही. किंवा देवळात गेल्यानं आपली सर्व पापं धुवून निघाली, असंही मला कधी वाटत नाही. माझ्या चुका, उणिवा, कमतरता आणि अकार्यक्षमतेचं खापर मी कधी देवावर फोडत नाही.
एवढ्या निर्गुण-निराकार देवाला एखाद्यानं नमस्कार केला नाही, गंध-फूल वाहिलं नाही, दक्षिणेची लाच दिली नाही, तर एवढं कोपायचं कारण काय? तो राग-लोभ-मोह-माया यांच्या पलीकडं गेलाय ना? मग त्याची पूजा केली की तो चांगला माणूस आणि नाही केली तर वाईट, हा कुठला न्याय? हा भक्तिरूपी अत्याचार आता "ई-मेल'मधूनही फोफावलाय. कुठल्या तरी देवाचा फोटो पुढे 15 जणांना पाठवला नाही, तर म्हणे तुमच्यावर कोप होईल. होऊ द्या काय व्हायचाय तो कोप. तुमचा देव जर चराचरांत भरून राहिलाय, तर एवढा प्रसिद्धिलोलुप कसा हो?
असो. सध्या एवढंच. उर्वरित भाग पुढच्या वेळी.
कुठल्या देवाला झोडपण्याचा उद्देश नाही. नाहीतर देवाचे स्वयंघोषित "पीआरओ' अंगावर यायचे!
4 comments:
agadi barobar aahe...ganapatichya visarjan miravanukit kiti tari muliwar sherebaji hote.."karyakarte" daru pitat...aapalya maghe ganapatichi murti aahe he mahit asun pan
देवाला या सार्याची गरज नाही
तो भावाचा भुकेला...पण आपल्यालाच चुकल्या सारखे वाटते म्हणून ही उठाठेव
देव कुठे नाही हे शोधतोय !
देवाचे स्वयंघोषित "पीआरओ'...हा हा हा ......
Post a Comment