Dec 15, 2010

अताशा असे हे...

ए खादा मोठा दरोडा घालण्यापूर्वी दरोडेखोर कुलदैवताला जाऊन साकडं घालतात, तसं मी आज करणार आहे. मला कुठे दरोडा घालायला नसला, तरी चार-दोन खडे बोल सुनावायचे आहेत. कदाचित तो माझा अवास्तव संताप असेल किंवा आततायीपणादेखील. पण मला जाणवलंय, ते मांडायचं नक्की आहे. त्यामुळं आधी जरा दोन चांगल्या गोष्टी लिहिणं आवश्‍यक आहे.
माझ्या ब्लॉगला आता 70 फॉलोअर्स मिळालेत. निदान त्यापैकी निम्म्यांना तरी मी काय लिहितो, याविषयी उत्सुकता असल्यानंच ते माझे अनुयायी झाले असावेत, असा दावा करायला हरकत नाही. काहींना ओझरता दृष्टिक्षेप टाकायचा असेल, आणि सोय म्हणून ते फॉलोअर झाले असतील. काही जण केवळ ब्लॉगने पुरविलेल्या सोयीचा एक भाग म्हणून औपचारिकता पूर्ण करण्यासाठी झाले असतील, तर काही चुकून!...या सगळ्यांनाच माझे मनापासून धन्यवाद. ब्लॉगवर मी जे काही (बाही) लिहितो, ते एवढे दिवस सहन करणाऱ्या 35 व्हिजिटर्सनाही माझा सलाम! माझ्या लिखाणात त्यांना वाचण्यासारखं किंवा निदान माझ्या ब्लॉगला भेट देण्यासारखं काहितरी वाटलं, ही भावनाच मला आनंद देते.
माझ्या विविधांगी (भरकटलेल्या?) लेखनावर प्रतिक्रिया देणाऱ्या सर्वांनाही धन्यवाद. ते दर वेळी नेमाने पोस्ट वाचून त्यांचेही अनुभव शेअर करतात, मतेही मांडतात.
मला थोडीशी तक्रार करायचेय ती ही, की एखाद्या चांगल्या लेखावर भरभरून प्रतिक्रिया देणारे माझे हे चाहते, वाचक, हितचिंतक, गुणग्राहक, स्तुतिपाठक वगैरे वगैरे मी अनेक दिवसांत ब्लॉग अपडेट केलाच नाही, तर काहीच कसे म्हणत नाहीत? हल्ली मी काही ना काही कारणांनी बिझी आहे. ब्लॉग अपडेट करायला, नवे अनुभव लिहायला वेळ नाही. मला नेहमी उत्सुकता असते, की ब्लॉगला भेट देणारे, नेहमी वाचणारे मला विचारतील, बाबा रे, काही लिहिलं का नाहीस बऱ्याच दिवसांत? कुठेतरी ई-मेलवर, फेकबुकात तसा उल्लेख करतील. पण तसं काहीच घडत नाही.
ब्लॉग लोक वाचतात, तो त्यांना आवडतोही. त्यांच्या प्रतिक्रियांतून ते जाणवतं. मग लोकांना नवी पोस्ट टाकली नाही तर काही मिस केल्याचं का वाटत नाही? की तसं वाटूनही ते उल्लेख करायचं विसरतात? की अन्य बरंच काही चांगलं वाचायला उपलब्ध असल्यानं माझ्या ब्लॉगची उणीव वगैरे जाणवत नाही?
हा विषय फक्त ब्लॉगपुरताच मर्यादित नाही. मैत्रीबाबतही हीच परिस्थिती मला हल्ली त्रास देते. कितीतरी मित्रांशी महिनोन्‌ महिने भेट होत नाही. कधीतरी कामानिमित्त बोलणं होतं, पण पुन्हा आपण आपापल्या कामांत गुंतून जातो. कुणा मित्रानं "अरे बरेच दिवसांत भेटला नाहीस, खूप उणीव जाणवतेय तुझी. भेट की एकदा!' असं म्हटल्याचंही फारसं घडत नाही.
मी ही तक्रार करताना मी स्वतःदेखील हल्ली काही दिवस खूप बिझी आहे आणि मित्रांना स्वतःहून भेटण्याचा, कुणाचं नवीन काही वाचून त्यावर प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न केलेला नाही, हेही खरंच. त्यामुळं या तक्रारीचा बराचसा दोष माझ्याकडेही जातोच. म्हणून तर सुरुवातीला म्हटलं, की तक्रारीपेक्षाही केवळ भावना मांडण्याचा हा प्रयत्न होता.
असो. तुम्हाला काय वाटतं यावर? अगदी मनमोकळ्या प्रतिक्रिया द्या. चुकीचं वाटलं तर कान उपटा. होऊन जाऊ द्या!
 

6 comments:

हेरंब said...

माफ करा.. कदाचित उद्धटपणा/आगाऊपणाही वाटेल पण तुम्ही "अगदी मनमोकळ्या प्रतिक्रिया द्या. चुकीचं वाटलं तर कान उपटा. होऊन जाऊ द्या!" असं लिहलं आहेत म्हणून लिहितोय. त्या ७० मध्ये मी आहेच. सुरुवातीला तुमच्या बर्‍याच लेखांवर मी प्रतिसाद दिले आहेत. काही काही आवडते लेख बझही केलेले आहेत (उदा. तुमचा मुन्नीवरचा भन्नाट लेख).. परंतु प्रतिक्रियेला उत्तर म्हणून तुमच्याकडून कधीच 'धन्यवाद' अशी उलट प्रतिक्रिया मिळाली नाही. वाचक जेव्हा लेख वाचून, वेळ काढून आवर्जून प्रतिक्रिया देतात तेव्हा ब्लॉगरकडून निदान एका ओळीची 'धन्यवाद' अशी प्रतिक्रिया आली तरी वाचकांना बरं वाटतं. पण असं जर होत नसेल तर आपली प्रतिक्रिया ब्लॉगर वाचतो की नाही, वाचली तरी ती सिरीयसली घेतो की नाही असं वाटतं आणि त्यामुळे प्रतिक्रिया देणं (किंवा पुढचा लेख कधी हे प्रतिक्रियेतून विचारणं) वगैरे करण्याचा वाचकांचा उत्साह आपोआपच उणावतो. अर्थात हे माझं वैयक्तिक मत.. पटलं नाही तर सोडून द्या हे ओघाने आलंच :)

Anonymous said...

धन्यवाद !

अभिजित पेंढारकर said...

अगदी कबूल.
बरं झालं हेरंबा, तू कान उपटलेस.
आता पुन्हा नाही अशी चूक करणार. नक्की प्रतिक्रिया देईन. ही काय, दिलीच आहे की नाही?
प्रॉब्लेम हा आहे, की आपल्याच ब्लॉगपोस्टवर आपणच प्रतिक्रिया देऊन नुसती प्रतिक्रियांची संख्या वाढवायला मला आवडत नाही.
माझी दुसरी एक बोंब म्हणजे त्या माणसापर्यंत थेट प्रतिक्रिया कशी पोचवायची, याचं तांत्रिक ज्ञान मला नाही. प्रतिक्रिया देणाऱ्याच्या नावावरून क्‍लिक करून त्याच्या ब्लॉगवर गेलं, तरी तिथे त्याचा ई-मेल सहजी सापडत नाही. मग काय करायचं, असा प्रश्‍न पडतो. कधीकधी त्याच्या कुठल्यातरी पोस्टवरच माझ्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद देण्याचे उपद्‌व्यापही मी करतो. म्हणून तर तुमचा ई-मेलही प्रतिक्रियेसोबत टाका, असं आवाहन मी माझ्या ब्लॉगच्या वरच्या हेडरमध्ये केलंय. पण ते लोकांना सोयीचं वाटत नसावं.
असो. आता मात्र दक्षता घेईन. सुरुवात झालीच आहे म्हणा!

निळकंठ said...

परंतु प्रतिक्रियेला उत्तर म्हणून तुमच्याकडून कधीच 'धन्यवाद' अशी उलट प्रतिक्रिया मिळाली नाहीहेरंब चे मत पूर्ण मान्य आहे .आणि मी सुद्धा हेच लिहिले असते.
जाऊ देत लिवा मग काहीतरी;होऊनच जाऊदेत !!!

veerendra said...

hoy hoy .. heramb che mat yogya ahe .. pan amhi tumche lekh agadi manapasun wachat asto .. tumhi lihit raha ya pudhe hi ..

Anonymous said...

are mitra, life far fast zaley ithe punyat..khare tar itki traffic aste ki, 30 chya pudhe gadi jat nahi-kinwa neta yet nahi..pan sagle adakalet...tech routine, tech office, tech sahkari, mahinyacha pagar, double engine asun, 1 pagar home-loan EMI madhye ghalwayacha...mahinyatun 1-2-3 wela hotel madhye jane..hach kaay to change...pan tu changle lihile ahes..
Mukund Potdar