Aug 9, 2011

रमलेल्या बाबाची कहाणी!

ड्यूक्‍स नोज म्हणजे आम्हा ट्रेकर्सची पंढरीची वारी असते. गेली दहा-बारा वर्षं तरी ही वारी कधी चुकवलेली नाही. पुण्यात आल्यानंतर ट्रेकिंग सुरू केल्यावर पहिले काही ट्रेक केले, त्यातला एक ड्यूक्‍स नोज होता. तेव्हा "झेप'बरोबर केला होता. नंतर एकदा युवाशक्ती आणि नंतर नियमितपणे "गिरीदर्शन'बरोबर जाऊ लागलो. यंदा "वॉंडरर्स'बरोबर जाण्याचा योग पहिल्यांदाच आला होता....म्हणजे जुळवून आणला होता!
ड्यूक्‍स नोज म्हणजे वेड आहे वेड! जाताना-येताना प्रवासाचा फारसा त्रास नाही, फार लांबही नाही...जाताना एक छान धबधबा. त्यात दोन तास धिंगाणा, वाटेत तीन-चार खुमखुमी जिरवणारे रॉक पॅच. अगदी नव्यानेच आलेल्यालाही पार करता येण्याजोगे. आणि ड्यूक्‍स नोजच्या नाकावर पोचल्यानंतर स्वर्गीय सुखाचा आनंद...!!
मनस्वीला ट्रेकला घेऊन जाण्याचा बेत ती दोन वर्षांपासून आखत होतो. एकदा ती आजारी पडली म्हणून राहिलं, कधी अन्य काही कारणांनी राहिलं. यंदा मात्र तिला घेऊन जाण्याची भीष्मप्रतिज्ञाच केली होती. तरीही "गिरीदर्शन'सोबत जाण्याचा योग चुकला. म्हणून मग अजित रानडे या जुन्या (म्हणजे आधीपासूनच्या. "जुन्या झालेल्या' नव्हे!) मित्राच्या "वॉंडरर्स' ग्रुपबरोबर जाण्यासाठी गळ टाकून ठेवला होता. योगायोगानं त्याचा ट्रेक 7 ऑगस्टला होता आणि मलाही त्या वेळी जमणार होतं.
मनस्वीची मानसिक आणि शारिरिक तयारी करण्याच्या आधी मला स्वतः तयारी करणं आवश्‍यक होतं. कारण या 84 किलोच्या देहाला जिने चढण्या-उतरण्याखेरीज फारशी तोशीस गेल्या काही दिवसांत पडलेली नव्हती. म्हणून किमान आठवडाभर आधी तरी रोज पर्वतीला जाण्याचा संकल्प केला. त्यानुसार आदल्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी - सोमवारी निमिषला कडेवर घेऊन पर्वती साजरी केली. तरीही ड्यूक्‍स नोज झेपेल की नाही, हा अंदाज येत नव्हता. अर्थात, तरीही खुमखुमी काही कमी होणार नव्हती!
रोज जाण्याचा संकल्प असला, तरी पर्वती पुन्हा काही शक्‍य झाली नाही. मग एकदम रविवारी सकाळी ड्यूक्‍स नोजला जाऊन धडकण्याचा निर्धार करून टाकला. मनस्वी कितपत साथ देईल, चालण्याबाबत किती नाटकं करेल, काहीच अंदाज येत नव्हता. कारण आत्तापर्यंत तिला कधी सिंहगडावरही घेऊन गेलो नव्हतो. त्यामुळे मनात जरा धाकधूक होती. सालाबादप्रमाणे शुक्रवार आणि शनिवारी रात्री माझी झोप झाली नव्हतीच. शनिवारी रात्री दोनला झोपून रविवारी सकाळी पाचला उठलो. मनस्वी लवकर तयार झाली. ट्रेकला जाण्यासाठी तिचं आधी बरंच बौद्धिक घेतलं होतं, तरीही ती आयत्या वेळी दगा देईल, अशी धाकधूक मनात होती. तसं झालंही!
पाय दुखत असल्याचं टुमणं तिनं सुरू केलं. मग हर्षदाही गळाठली. माझ्याही पोटात गोळा आला. म्हटलं तिकडे गेल्यावर या पोरीनं अचानक भोकाड पसरलं, तर काय करायचं? वाटेतून अर्ध्यावर एकट्यानं परतावं लागलं असतं. त्यात अवघड काही नव्हतं, पण सगळा मूड गेला असता. पण काय झालं कुणास ठाऊक, मनस्वी पुन्हा तयार झाली. "तू स्वतःच्या मर्जीनं येते आहेस. माझ्यासाठी नव्हे,' असं मी तिला बजावूनही टाकलं.
सिंहगड एक्‍स्प्रेस पकडून खंडाळ्याचा रस्ता धरला. मनस्वी अगदी उत्साही आणि मजेत होती. गाडीत गर्दी असली, तरी अनेक मांड्या उबवून ती खुशीत होती. तिच्यासाठी हर्षदानं आवडत्या खाऊचा भरपूर खुराक दिला होता. खंडाळ्यात उतरल्यापासून मनस्वीने त्याच्यावर जो ताव मारायला सुरुवात केली, तो शेवटपर्यंत सुरू होता. त्यामुळेच तिला कुरकुरीला फारसा वाव मिळत नव्हता.
एवढ्या अनोळखी ग्रुपमध्ये ती कंटाळेल, सारखी मला चिकटेल, किरकिरेल, अशी भीती मनात होती. पण मुलं ऐनवेळी आईबापाला उताणी पाडण्यात एक्‍सपर्ट असतात, हेच खरं! मनस्वीनं खंडाळ्यापासून जे कुणाकुणाचा हात धरला, ते मला एकदम धबधब्याच्या जवळच भेटली. मी आवरून जाईपर्यंत ती धबधब्याच्या पाण्यात डुंबायलाही लागली होती. नेहमीप्रमाणे आम्ही धबधब्यात भरपूर धुमाकूळ घातला. मजा आली. मनस्वी धबधब्याचं पाणी मात्र थेट अंगावर घ्यायला तयार नव्हती. मग मनसोक्त उधळल्यानंतर तिचे कपडे बदलले आणि ड्यूक्‍स नोजच्या सुळक्‍याकडे रवाना झालो. वाटेतल्या कुठल्याही अवघड वाटांवर, चिंचोळ्या रस्त्यांवर, चढणीवरसुद्धा तिनं हूं की चूं केलं नाही. एकदा फक्त दमले म्हणून मला कडेवर घ्यायला लावलं. तेव्हा पुढे त्रास देते की काय, या विचारानं पोटात गोळा आला होता, पण ती पुन्हा उधळली. नंतरचा ट्रेकही तिनं व्यवस्थित केला. डोंगराच्या माथ्यावर गेल्याचं तिला आकर्षण होतं. तिथे फ्रेंडशिप डे निमित्त फुगेही तिला सोडायला मिळाले, त्यामुळे स्वारी खूष!
येताना खाली उतरल्यानंतर आमचा जरा वेळ करणुकीचा कार्यक्रम आणि टाइमपास चालला होता. मनस्वीने तिथे स्वतःहूनच नाट्यछटा सादर केली आणि भरपूर हशा व कौतुक मिळवलं. मी लिहिलेली ही नाट्यछटा तिला सादर करताना मी स्वतः पहिल्यांदाच पाहत होतो. तिनं दिवाकर नाट्यछटा स्पर्धेत नाट्यछटा सादर केली, तेव्हाही मी तिच्यासोबत नव्हतो. आज या निमित्तानं योग आला.
परतीच्या वाटेवर माझे पाय दुखत होते, पण ही बया उड्या मारत चालत होती. शेवटी मलाच तिची दया आली आणि अधून मधून तिला उचलून घेतलं. कुणीकुणी खांद्यावरही बसवलं. एकूण तिचा ट्रेक मजेत, आनंदात पार पडला. चक्क दुसऱ्या दिवशी सकाळी सहाला उठून बया शाळेतही वेळेवर पोहोचली!
परतताना मला म्हणाली, ""बाबा, पुढचा ट्रेक कधी आहे?''
...एका उत्साही बापाचा ऊर भरून यायला अजून काय लागतं?
...

2 comments:

prajkta said...

mastach.....

AJIT RANADE said...

Abhya , aaj khoop divasani tuza blog vachatoy ani aata follow suddha karayala lagloy