Aug 28, 2012

एक तरी `वारी` अनुभवावी!

पहिल्यापहिल्याने आपण आयुष्यात जे करतो, ते कायम लक्षात राहतं आणि मनात घरही करून राहत असतं. तो पहिला अनुभव एकदम सुपर असेल, तर मग विचारायलाच नको. ड्यूक्स नोजच्या बाबतीतही माझं असंच झालंय.
मी पहिला ड्यूक्स नोज केला तो झेप संस्थेबरोबर. त्या वेळी मी भाऊ महाराज बोळात Cot Basis  वर राहत होतो. तिथल्या दोन मित्रांना घेऊन ट्रेकला गेलो होतो. त्याआधी बहुधा रोहिडा किल्ला पाहिला होता. ड्यूक्स नोज ही ख-या अर्थानं ट्रेकर्सची पंढरी. फार दमछाक करणारी वाट नाही, धोकादायक रस्ता नाही, तरीही ट्रेकिंगची मजा देणारा असा हा धमाल अनुभव. जाताना वाटेत लागणारा धबधबा, त्यात यथेच्छ धिंगाणा घालण्याची सोय, असा सगळा मस्तीचा मामला. झेप बरोबर पहिल्यांदा गेलो, तेव्हा फक्त निसर्ग आणि ट्रेकिंगशिवाय दुसरा कुठला आनंद घेता आला नव्हता. काही ट्रेकिंग क्लब त्यांच्यासोबत येणा-या ट्रेकर्सना धबधब्यात घेऊन जात नाहीत.
एका ट्रेकमध्ये अजित रानडे या गिरीप्रेमी मित्राची अशीच कुठेतरी द-याखो-यांत ओळख झाली. अजितमुळेच गिरीदर्शन ट्रेकिंग क्लबबरोबर ट्रेकिंग करू लागलो. तेव्हापासून (साधारण 1999) ड्यूक्स नोजची दरवर्षीची वारी ठरूनच गेलेली. जाताना सिंहगड एक्स्प्रेसनं खंडाळ्याला उतरायचं, तिथून ड्यूक्स नोजकडे कूच करायची, वाटेत धबधब्यात मस्ती करायची आणि मग दोन तीन चढणी आणि तेवढेच Rock Patch पार करून ड्यूक्स नोजच्या शिखरावर पोचायचं. येताना डोंगरावरच्या निसरड्या वाटेवरून धावत, घसरत उतरायचं हीसुदधा आणखी एक धमाल.
ड्यूक्स नोजची चटक लागल्यापासून कुणा ना कुणा नव्या माणसाला दरवर्षी सोबत नेलं. ट्रेकिंगची फार आवड नसलेल्या माणसालासुद्धा मनापासून आवडणारं वातावरण असल्यानं पाय दुखण्यापलीकडे त्याची फारशी तक्रार येत नाही. मुख्य म्हणजे पाऊस आणि धुकं अशा वातावरणात ट्रेक केल्यानं फारसं दमायला होत नाही आणि पाण्यावाचून हालही होत नाहीत. त्यामुळे दरवर्षी कुणा ना कुणाला मी नव्यानं ट्रेकर बनवलं. काही मित्र, मैत्रिणी, नंतर पत्नी हर्षदा आणि आता गेल्या वर्षीपासून मुलगी मनस्वीही सोबत येऊ लागली. गेल्या वर्षी अपेक्षा नसताना तिनं खूप छान सहकार्य केलं आणि अजित रानडेच्या Wanderers सारखा अगदी कुटुंबवत्सल ग्रुप मिळाल्यामुळं तिला ते फारसं जडही गेलं नाही.
यंदा अजित परदेशात असल्यामुळं माझी दरवर्षीची ड्यूक्स नोजची वारी चुकणार असं वाटत होतं. गिरीदर्शनच्या ट्रेकच्या वेळी मनापासून जायची इच्छा नव्हती, म्हणून ते राहून गेलं. पण अजितनं ड्यूक्स नोजचा ट्रेक ठरवल्यानंतर मी मनस्वीला सहज म्हटलं आणि तीसुद्धा उड्या मारायला लागली. खरंतर पुढच्या वर्षी पुन्हा ड्यूक्स नोजला जायचं, असं तिनं गेल्या वर्षीच ठरवून टाकलं होतं. पण तो निश्चय अजूनही कायम असल्याचं पाहून मलाच आश्चर्य वाटलं. ट्रेकला जायचं ठरलं, तरी पूर्वतयारीच्या बाबतीत नेहमीची धावपळ कायम होती. आदल्या दिवशी रात्री तिच्यासाठी बूट घेतले. ते सुदैवानं तिच्या मापाचे निघाले. आमच्या अडचणी एवढ्यातच संपणा-या नव्हत्या. स्विमिंग करताना आदल्या दिवशीच तिच्या पायाला काहीतरी लागलं. छोटीशी जखमही झाली होती. ट्रेकच्या दिवशी सकाळी ती थोडीशी कुरकुरत होती. तिची झोपही झाली नव्हती आणि पायही दुखत होता. मग तिला न्यायचा हट्ट नको, असं ठरवलं. ती जाऊन झोपलीसुद्धा. तिच्यासाठी केलेले पराठे, चिरीमिरी खाणं, बूट, कपडे, एवढी तयारी फुकट जायला नको, असं वाटत होतं. तिच्या पायाची जखमही फार मोठी नव्हती. मग हर्षदानं तिला पुन्हा पटवलं. ती पुन्हा उठून ट्रेकसाठी तयार झाली, तेव्हा 5.35 झाले होते. सकाळी 6.10 ची सिंहगड एक्स्प्रेस आम्हाला शिवाजीनगर स्टेशनला गाठायची होती. अक्षरशः दहा मिनिटांत आवरून बाहेर पडलो.
खंडाळ्याला पोचलो, तर जोरदार पाऊस सुरू झाला होता. पुण्यात पावसाची काहीच लक्षणं नसल्यानं रेनकोटही आणायचं लक्षात आलं नव्हतं. मनस्वीला दिवसभर भिजून त्रास झाला असता. मग ट्रेकिंग ग्रुपमधल्या तेजलनं तिचा जर्किन मनस्वीला दिला. त्याचा खूपच फायदा झाला. नेहमीप्रमाणे धबधब्यात धमाल केली, सगळ्या चढणी पार पडल्या. शेवटच्या Rock Patch पाशी मात्र मनस्वी गळाठली. तिला अचानक उंचीची भीती वाटून रडायला यायला लागलं. खरंतर घाबरायला व्हावं, असं या ट्रेकमध्ये काहीच नाही. पण तिच्या मनात काहीतरी वेगळेच विचार सुरू असावेत. गेल्या वर्षी तर तिनं हाच ट्रेक मोठ्या उत्साहात केला होता. यंदा झोप आणि पायाच्या जखमेचं निमित्त झालं होतं. शेवटी कसंबसं तिला तिथून वरपर्यंत नेलं.
येताना मात्र तिला पुन्हा मूड आला होता. एकटीनं सगळा डोंगर उतरली. दोनतीनदा घसरली, परत सावरली. यंदाचा ट्रेक एव्हरेस्ट मोहीम फत्ते करणा-या गिरीप्रेमी संस्थेच्या मदतीसाठी आयोजित करण्यात आला होता. या मोहिमेतले अनुभव आणि आव्हानांबद्दल संस्थेच्या काही गिर्यारोहकांनी उदबोधक आणि थरारक माहिती सांगितली. मनस्वीला नाट्यछटेसाठी फर्माईश होतीच. तिला कधी एकदा ती सादर करतेय, असं झालं होतं. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही तिनं टाळ्या मिळवल्या. त्याबद्दल cHOCOLATES चा गठ्ठाही तिला मिळाला.
ड्यूक्स नोजबरोबरच इतरही अऩेक आनंददायी ट्रेक आहेत. आता त्यांची वाट पाहतोय. पुढच्या ट्रेकमध्ये सादर करायला मनस्वीसाठी आणखी एखादी नाट्यछटा लिहायला हवी!!

Aug 10, 2012

शापित गंधर्व

अनिल परांजपे नावाच्या असामीचं वर्णन एवढ्याच शब्दांत करता येईल.

गंधर्व म्हणण्याएवढा तो देखणा नव्हता, पण व्यवस्थित राहिला तर बरा दिसेल, असं नक्कीच वाटायचं. स्वर्गीय सौंदर्य नसलं, तरी स्वर्गीय बुद्धिमत्ता त्याच्याकडे होती. मी बारावीनंतर पत्रकारितेत (धड)पडलो, तेव्हा अनिल परांजपेच्या नावाची रत्नागिरीत जोरदार हवा होती. रत्नागिरी टाइम्समध्ये तो नोकरी करायचा. तेव्हा फक्त त्याच्या टिंब टिंब स्वरूपातील लिखाणाच्या शैलीवरून आणि आक्रमक, थेट बातम्यांवरून तो माहिती होता. 1993 मध्ये मी दै. सागर साठी रत्नागिरीत काम करू लागलो, तेव्हा पत्रकार परिषदेत कधीतरी त्याची भेट झाली असावी. खोल गेलेले पण भेदक डोळे, डोळ्याला लोकमान्य टिळकांच्या फ्रेमचा जाड भिंगांचा चष्मा, गोरा वर्ण, तपकिरी पडलेले दात. अंगात मळकट आणि बिनइस्त्रीचा बुशशर्ट आणि पॅंट असा त्याचा अवतार असायचा. कुणाच्या तरी गळ्यात पडून त्याच्या स्कूटरवरून तो पत्रकार परिषदेत किंवा एखाद्या घटनास्थळी पोहोचण्याच्या गडबडीत असायचा. तिथे पोहोचल्यावर मात्र पत्रकार परिषद घेणा-याची काही धडगत नसायची. त्यांच्याकडून एखादं चुकीचं विधान झालं, तर अनिल त्यांच्यावर तुटून पडायचा. सागरनंतर मी सकाळच्या रत्नागिरी कार्यालयात काम करायला लागलो. त्यावेळी रोज पोलिस स्टेशनमध्ये फेरी मारावी लागायची. कधीकधी पोलिस अधीक्षकांकडेही आम्ही जायचो. तिथे अनिल परांजपे हमखास भेटायचा. आम्ही ज्या माणसाला भेटायला जायचो, त्यालाच भेटल्यानंतर अनिलने दिलेली बातमी वेगळीच असायची. ही त्याची खासियत मला बुचकळ्यात पाडायची. रत्नागिरीत तेव्हा स्टरलाइट या कापर स्मेल्टिंग प्रकल्पाविरुद्ध जोरदार आंदोलन सुरू होतं. रत्नागिरी टाइम्सने स्टरलाइटच्या विरोधात जोरदार आघाडी उघडली होती. अनिल परांजपे हा मोहराच तेव्हा त्यांना हाताशी मिळाला होता. अनिल परांजपेच्या बायलाइनखाली रोज धडाक्यात अऩेकांच्या प्रकल्पविरोधी मुलाखती, बातम्या छापून यायच्या. जवळपास महिना-दोन महिने रोज त्याचंच नाव आणि आठ कालम हेडिंग, असा नियम ठरून गेला होता. (तसंही रत्नागिरी टाइम्सला आठ कॅलमपेक्षा कमी हेडिंग असू शकतं, हे मान्यच नाही. अपवाद फक्त सणांच्या दिवशी गळ्यापर्यंत असलेल्या जाहिरातींचा.) अनिल परांजपेची प्रत्येक बातमी त्याच्या स्टाइलमध्ये असायची. बहुतेक ठिकाणी टिंब टिंबांचा वापर ही त्याची खासियत.

मला त्या वेळी त्याचं फार अप्रूप वाटायचं. पत्रकार म्हणजे केवढा मोठा माणूस, त्यातून मी पत्रकारिता करणार म्हणजे असाच मोठा माणूस होणार, अशा काहीतरी खुळचट कल्पना डोक्यात होत्या. त्यामुळे मी जसं अनिल परांजपेचं रोज पेपरमध्ये ठळकपणे येणारं नाव वाचून त्याच्याबद्दल आकर्षण बाळगून होतो, तसंच सर्वसामान्य नागरिकांनाही असेल, असं मला वाटायचं. एकदा तो आणि मी रिक्षातून कुठेतरी जात होतो. तो उतरून गेल्यावर मी रिक्षावाल्याला म्हटलं, ``माहितेय का, कोण बसलं होतं रिक्षात ते? ``

तो म्हणाला ``नाही.``

मी म्हणालो, ``अनिल परांजपे होते ते.``

त्यानं चेहरा तेवढाच निर्विकार ठेवत विचारलं, ``कोण अनिल परांजपे?``

मी खाऊ का गिळू नजरेनं त्याच्याकडे पाहिलं. पण त्याला त्याचं सोयरसुतक नव्हतं. रत्नागिरीत रोज ज्याच्या बातम्या चवीचवीनं वाचल्या जातात, तो माणूस तुला माहित नाही का रे अडाण्या, असं माझं झालं होतं.

मी त्याला तोंडावर अहो-जाहोच करायचो, पण त्याला तसं अपेक्षित नव्हतं. पाठीमागे मात्र त्याचा उल्लेख एकेरीच व्हायचा.

रत्नागिरी एक्स्प्रेसमध्ये मी काम करायला लागल्यावर आम्ही सुदैवानं एकत्र आलो. त्यावेळी मी आपलं बरं, आपण बरं या प्रवृत्तीचा होतो. (आतासुद्धा फार बदल झालाय अशातला भाग नाही.) पण हा परांजपे अतिशय हरहुन्नरी आणि तेवढाच सटक, विक्षिप्त. तो तेव्हा रत्नागिरी टाइम्समध्ये भांडून एक्स्प्रेसकडे आला होता. त्याची बातम्यांची कॅपी अगदी पाहण्यासारखी असायची. डाव्या बाजूला दणदणीत समास सोडून आणि वर हेडिंगसाठी अर्धेअधिक पान जागा सोडून तो लिहायला सुरुवात करायचा. जवळपास एकटाकीच लिखाण असायचं. एका पानावर एकच परिच्छेद. शक्यतो एका परिच्छेदातलं वाक्य दुस-या पानावर जायचं नाही. खाडाखोड वगैरे असण्याचा तर संबंधच नाही.

त्याच्या वाचनाबद्दल मला फारशी माहिती नव्हती. पण लिखाण मात्र अफाट होतं. अर्थात, बातम्यांशी संबंधित विषयांच्या पलीकडे तो कधी काही लिहीत नसे. आम्ही त्या पेपरमध्ये असताना वाजपेयींचं तेरा दिवसांचं सरकार गडगडलं होतं. त्यावेळचं वाजपेयींचं भाषण टीव्हीवर एकदा ऐकून परांजपेनं एकटाकी जसंच्या तसं लिहून काढलं होतं. बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाबद्दलही तेच. रत्नागिरीत कधीतरी सठीसहामाशी एखादा खून व्हायचा. त्या घटनेपासून ते केसचा निकाल लागेपर्यंत त्याची चर्चा शहरभर असायची. रत्नागिरी टाइम्समधल्या खुनाच्या वर्णनाच्या, खटल्याच्या सुनावणीच्या रसभरीत बातम्यांचा ही चर्चा सुरू ठेवण्यात सिंहाचा वाटा असायचा. परांजपे ज्या प्रकारे खुनाच्या आणि त्यानंतरच्या तपासाच्या बातम्या इतक्या रसभरीत वर्णन करून लिहायचा, की त्यावरून तो त्या गुन्हेगारांबरोबरच राहत असावा की काय, अशी शंका यायची. अगदी त्यांनी कुठे चहा घेतला, कुठे मिसळ खाल्ली, त्यावेळी काय शेरेबाजी केली, याविषयीचा इत्थंभूत वृत्तांत त्यात असायचा. पेपर त्यामुळे हातोहात खपायचा, हे वेगळं सांगायला नकोच.

त्याचा विक्षिप्तपणा हासुद्धा आमच्या चर्चेचा विषय असायचा. आमच्या पेपरचं आफिस कुवारबावच्या एमआयडीसीमध्ये होतं. रस्त्याच्या पलीकडच्या वसाहतीत एका भाड्याच्या खोलीत तो राहायचा. त्याला व्यसनांचा भरपूर नाद होता. कधीकधी हुक्की आली, ती संध्याकाळी मला स्कूटर काढायला सांगून घरी घेऊन जायचा. तिथे बाटली ठेवलेली असायची. पाच मिनिटांत कच्चीच टकाटक मारायचा आणि लगेच माझ्याबरोबर आफिसला यायला तयार. परत येताना मध्येच कधीतरी खाली गावात जायची त्याला लहर यायची. मग जेके फाइल्सला सोड, मारुती मंदिरला सोड, जयस्तंभावर सोड, असं करत स्टॅंडपर्यंत त्याला लिफ्ट द्यायला लागायची. तिथून परत बोंबलत आठ किलोमीटर स्कूटर ताबडत येताना वैताग यायचा.

ज्यांच्या तोंडावरची माशी उडत नाही, अशा कथित नेत्यांच्या रत्नागिरी टाइम्समधील `स्टरलाइट`विरोधातील आवेशपूर्ण आणि आक्रमक मुलाखती वाचून त्या वेळी स्फुरण चढायचं. पण ही सगळी परांजपेच्या लेखणीची कमाल होती, हे नंतर त्याच्यासोबत काम करताना कळलं. एकदा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेला मी त्याच्यासोबत गेलो होतो. त्या वेळी राजाभाऊ लिमये हे कसलेले कॅंग्रेस नेते अध्यक्ष होते. विरोधक अगदीच लिंबू-टिंबू होते. राजाभाऊ त्यांना सहज गुंडाळून ठेवत. त्या सभेतही असंच झालं. आम्ही संध्याकाळी आफिसात आलो. परांजपेनं बातमी लिहून टाकली. मी ती तेव्हा वाचली नव्हती. सकाळी पेपरमध्य बातमी वाचून मी हादरलोच. विरोधकांनी आक्रमकपणे सभागृह डोक्यावर घेतलं, राजाभाऊंना पळता भुई थोडी केली, असे उल्लेख त्यात होते. त्यामागचं प्रयोजन कळलं नाही, पण पराजंपेच्या बातम्यांमध्ये सगळेच जण `जळजळीत, कडक, निर्वाणीचा इशारा` कसे द्यायचे, याचं रहस्यही कळलं.

आमच्या आफिसच्या जवळपास कुठलंही हॅटेल नव्हतं. रात्री दहानंतर जेवायची बोंब व्हायची. मग आम्ही काम संपल्यावर रात्री माझ्या स्कूटरवरून बोंबलत स्टॅंडपर्यंत जायचो. तिथे मंगला हॅटेलमध्ये परांजपेबरोबर 15 रुपयांची पावभाजी खाल्लेलीही आठवतेय. एकदा रात्री उशिरा काम संपवून आम्ही स्टॅंडकडे निघालो होतो. ट्रिपलसीट होतो. सोबत परांजपेही होता. जयस्तंभाजवळ रात्रीच्या गस्तीवरील एका पोलिसाला आम्हाला पोलिसी खाक्या दाखवायची हुक्की आली. त्यानं लायसन्स दाखवा वगैरे सोपस्कार सुरू केले. परांजपे थेट तिथून कुठलातरी फोन शोधून डायरेक्ट एसपींना फोन करायच्या प्रयत्नाला लागला. त्याचं आणि पोलिसांचं आधीच वाकडं होतं. अनेक प्रकरणांत त्यानं पोलिसांचे वाभाडे काढले होते. आम्ही पोलिसांना आमच्याबद्दल सांगूनही ते बधायला तयार नव्हते. शेवटी माझी स्कूटर असल्यानं मला पोलिस स्टेशनला जावं लागलं. त्यावेळी रिपोर्टिंगसाठी रोजच स्टेशनला जात असल्यानं तिथे अनेक जण ओळखीचे होते. मला त्यांनी लगेच घरी जाऊ दिलं. दुस-या दिवशी सकाळी स्टेशनवर हजेरी लावायलाही सांगितलं. इन्स्पेक्टरना भेटून लगेच मी बाहेर पडलो. पण परांजपेवर पोलिसांना हूट काढायचा होता, असा अंदाज आला.

मी एक्स्प्रेसमध्ये सिनेमाच्या पुरवणीचं काम बघायचो. एका नववर्षाची पुरवणी खूप मेहनत घेऊन केली होती. भरपूर फोटो वापरून लेआऊटवर काम केलं होतं. उपसंपादक म्हणून माझं हे त्या वेळचं सगळ्यात महत्त्वाचं काम. पण कौतुकाऐवजी व्यवस्थापनाच्या एका शुंभानं एवढे फोटो वापरून निगेटिव्ह वाया घालवली म्हणून माझ्याविरुद्ध तक्रारच केली होती. माझं खरं कौतुक केलं ते परांजपेनं. त्यामुळे मला अगदी कृतकृत्य वाटलं.

परांजपे मधूनच गायब व्हायचा. त्याच्यावर भरवसा ठेवून एखादं काम केलं, तर आपण मातीत जाणार हे नक्की. पैसे उधार मागायचीही वाईट खोड त्याला होती. कुणापुढेही हात पसरायचा. बरं, पैसे परत केले नाहीत वगैरे खंत त्याच्या गावीही नव्हती. कधीतरी रस्त्यात नारायण राणेंची गाडी दिसली आणि ते अचानक मुंबईला घेऊन गेले, अशा कहाण्या सांगायचा. त्यात तथ्य होतं, हे नंतर समजलं.

मी रत्नागिरी सोडल्यानंतर मात्र त्याचा आणि माझा काहीच संबंध आला नाही. खरं तर त्याच्या एकदोन वर्षं आधीच तो रत्नागिरीतून गायब झाला होता. बहुधा राणेंच्या आफिसमध्ये असतो, असं ऐकलं होतं. राणे कुठलातरी पेपर काढणार आहेत, अशी चर्चा तेव्हापासून होती. परांजपे त्यात जाईल, असंही सांगितलं जात होतं. पुण्यात आल्यावर इथे `केसरी`मध्ये असतानाही त्याचं काम गाजलं होतं आणि त्यानं काही जणांकडे परतफेड न केली जाणारी उधारी केली होती, असंही कानावर आलं.

माझा रत्नागिरीच्या पत्रकारितेशी संबंध संपला आणि अनिल परांजपेशीही. आज अचानक त्याच्या मृत्यूची बातमी वाचून जुन्या आठवणी दाटून आल्या.

बुद्धिमत्तेला विक्षिप्तपणाचा, गूढतेचा शाप असावा, असं विधिलिखितच आहे काय?


Jul 14, 2012

ललिताचं लळित

"तू ललित का लिहीत नाहीस?'
बारावीत आमच्या एका (साहित्यिक) वर्गमित्रानं मला हा प्रश्‍न केला होता. ललित अशा नावाचा लेखनाचा काही प्रकार असतो, हे तेव्हा मला प्रथम कळलं होतं. तो स्वतः चांगलं ललित लिहितो, असा त्याचा दावा होता. अर्थात, कॉलेजच्या "सहकार' मासिकातही त्याचं लेखन छापून आणेपर्यंत त्याची मजल होती, त्यावरून तो निश्‍चितच मोठा साहित्यिक असावा.
तर सांगण्याचा उद्देश काय, की लिखाण म्हणजे एकतर कथा, कादंबरी, नाटक किंवा कविता, एवढंच मला माहीत होतं. गेला बाजार प्रवासवर्णन. पण रत्नागिरीहून एकतर पुणे किंवा मुंबई एवढाच प्रवास मला माहीत नसल्यामुळे आणि तो प्रवासही बरेचदा रातराणीनं होत असल्यामुळे त्याविषयी लिहिण्यासारखं फार काही नव्हतं. रात्री सात किंवा आठ वाजता बसून पहाटे (जाग आलीच तर) पुणे-मुंबईतला दिव्यांचा झगमगाट पाहत शहरात प्रवेश करायचा, एवढाच काय तो प्रवासातला अनुभव. प्रवासापेक्षाही आकर्षण असायचं ते पुणे, मुंबई बघण्याचं. तेसुद्धा कुणी वडीलधारे किंवा वडीलबंधू फळले तर. नाहीतर आमची मुंबई-पुणे वारी म्हणजे लग्न किंवा मुंजीच्या धबडग्यात वाहून जायची. त्यामुळे या महानगरांतलं राहतं घर ते मंगल कार्यालय यांच्या दरम्यान होईल तेवढंच मुंबई-पुणे दर्शन. बाकी प्रवास केला, तो त्र्यंबकेश्‍वर, पंचवटी, शेगाव असा धार्मिक स्थळांचा. हा प्रवास दिवसा केला असला, तरी बरेचदा गाडी लागण्याच्या (स्वतःला आणि सहप्रवाशांना असलेल्या) भीतीने त्या प्रवासाविषयीही सुखकर असं काही नाही. त्यातून लाल डब्याचा, सुटीच्या "पीक' सीझनमधला तो प्रवास. बसण्याच्या जागेवरून भांडणं, आखडत्या पायांनी सहन केलेला त्रास आणि कंडक्‍टरच्या खंडीभर शिव्या, याशिवाय फार काही हृदयाच्या कुपीत जपून ठेवण्यासारख्या आठवणी असण्याचं कारण नाही.
दुसरा दिवसाचा प्रवास असायचा तो शिपोशी या आमच्या आजोळचा. पण तो जेमतेम दीड तासाचा. त्या प्रवासात मी एकटा असेन, तर बहुतेकदा शेजाऱ्याला "वाकडा फणस' आला की सांगा, असा निरोप देऊन ठेवायला लागायचा. कारण त्या दीड तासातही माझी ब्रह्मानंदी टाळी लागलेली असायची.
सांगायचा मुद्दा काय, की प्रवासवर्णनाच्या वाटेला कधी गेलो नाही. "ललित' म्हणून दुसरं काय लिहायचं, असा प्रश्‍न होताच. आयुष्यात काय, साधी वाटेतही कुणी "ललिता' आडवी आली नाही, त्यामुळे त्या ललिताविषयी लिहिण्याचा प्रश्‍नही निकालात निघाला. "सहकार'मध्ये लिहिण्याचा पहिला प्रसंग आला, (गुदरला!) तेव्हासुद्धा मी माझ्या अभ्यास शाखेशी निष्ठावंत राहून एक विज्ञानकथा लिहिली होती. नुकत्याच वाचलेल्या "बर्म्युडा ट्रॅंगल'मधल्या एका प्रसंगाशी ती कथा अगदी मिळतीजुळती होती, हा निव्वळ योगायोग!
आता मात्र व्यावसायिक लेखक झाल्यानंतर (म्हणजे लेखन हा व्यवसाय म्हणून स्वीकारल्यानंतर) उगाचच ललित लेखनाचा किडा वळवळायला लागला आहे. साध्याच प्रसंगावर छानसं लिहायला जमलं पाहिजे, असं वाटायला लागलंय. जमेल ना मला?

Jun 26, 2012

केल्याने भाषांतर...


नोकरी करतानाच वेगळं काहीतरी करायला हवं, असा विचार डोक्यात आला आणि आपण काहीतरी वेगळं करू शकतो, याचा साक्षात्कार झाला, तेव्हा अर्थातच कामाची शोधाशोध सुरू करण्यापासून तयारी होती. आयुष्यात आपण (स्वतःचं आणि प्राथमिक टप्प्यावर आणखी एका जीवाचं) पोट भरण्यासाठी काय करायचं आहे, याची समज येण्याआधीही जसे खाचखळगे पार करावे लागले, तीच गत याबाबतीतही होती. मग आधी डीटीपीची कामं, जाहिरातींचं copy writing, वगैरे करत शेवटी पुस्तकाच्या भाषांतरावर गाडी येऊऩ ठेपली.

पहिलं पुस्तक मिळालं, ते अमेय प्रकाशनाचं. आधी त्यांच्यासाठी एका पुस्तकाचं एक प्रकरणच करणं अपेक्षित होतं, पण नंतर सगळ्या पुस्तकाचीच जबाबदारी त्यांनी माझ्यावर टाकली. ते पुस्तक सुरू असतानाच मेहता प्रकाशनाचं `सेंड देम टू हेल` हे पुस्तक भाषांतरासाठी मिळालं. अर्थातच दोन्हीकडे मी स्वतःच खटपट केली होती. दोन्ही पुस्तकांचं काम एकाच वेळी सुरू केलं. त्याच दरम्यान ओम पुरी यांच्यावरील पुस्तक मला मेहता प्रकाशनाकडून वाचण्यासाठी मिळालं होतं. त्याचं परीक्षण करून त्यांच्याकडे द्यायचं होतं. अक्षरशः चार दिवसांत ते झपाट्यानं वाचून काढलं. एवढ्या जलद गतीनं वाचलेलं हे पहिलं इंग्रजी पुस्तक. परीक्षण करून दिल्यावर त्याचं भाषांतर करण्याची इच्छाही व्यक्त केली होती. आधीचं नियोजन बदलून हे पुस्तक मला भाषांतरासाठी देणार असल्याचं कळलं, तेव्हा मला प्रचंड आनंद झाला.

पुस्तकाचं काम मिळाल्यानंतर ते पुन्हा एक-दोनदा वाचून काढलं. भाषा अलंकारिक, पण साधी, सोपी होती. विशेष म्हणजे आवडता विषय, आवडता नट आणि आकर्षक घडामोडी, यामुळं या पुस्तकाच्या भाषांतराकडे काम म्हणून बघावंच लागलं नाही. नोकरी सांभाळूनही रोज नियमितपणे त्याची काही पानं भाषांतरित करत होतो. जवळपास वीस-पंचवीस दिवसांत पूर्ण पुस्तकाचा फडशा पाडून टाकला!

नंतर मात्र ब-याच कारणांनी त्याचं प्रकाशन लांबणीवर पडलं. दरम्यानच्या काळात अमेय प्रकाशनासाठी केलेलं `seeds of terror` हे पुस्तकही तयार झालं होतं. अफगाणिस्तानातील अफूचा व्यापार आणि त्यावर चालणारी `तालिबान`ची आर्थिक उलाढाल, हा पुस्तकाचा विषय. लेखिकेनं स्वतः अफगाणिस्तानमधील त्या कुख्यात प्रांतांमध्ये फिरून गोळा केलेला तपशील, त्यावरची माहिती आणि विवेचन, थक्क करणारं होतं. त्या पुस्तकासाठीही मेहनत घ्यावी लागली. इंग्रजी धाटणीचं इंग्रजी आणि त्याचं सोपं मराठीकरण करणं हे एक आव्हान होतं.

माझी तीन पुस्तकं माझ्याकडून भाषांतराचं काम पूर्ण होऊन तयार होती, पण ती बाजारात येण्याचा दिवसच उजाडत होता. अचानक मे महिन्यात मी काश्मीरला फिरायला जाण्याच्या आदल्या दिवशीच अमेय प्रकाशनाकडून फोन आला आणि त्यांनी पुस्तक तयार असल्याचं सांगितलं. माझं नाव मोठ्या पुस्तकाच्या कव्हरवर आलेलं पाहण्याची मोठी उत्सुकता होती. पण ती पूर्ण करण्यासाठी त्या दिवशी तयारीची गडबड सोडून जाणं शक्य नव्हतं. काश्मीरला फिरून आल्यानंतर ते पुस्तक हातात पडलं. समाधान वाटलं. त्यानंतर पंधरा दिवसांतच ओम पुरी यांचं पुस्तकही तयार होऊन हातात मिळालं.

तिसरं अनुवादित पुस्तकही या वर्षाच्या अखेरीस प्रसिद्ध होईल. आता स्वतः लिहिलेल्या पुस्तकाची तयारी सुरू करायची आहे. जमेल ना मला?


May 15, 2012

सावकारी पाश


माझ्या आईची आईची आई मी कधी बघितली नाही. तिची माया मला लाभली नाही. पण पुण्यात आल्यानंतर याच नावाच्या बॅंकेचं भरभरून प्रेम मात्र मिळालं. आज तिच्या ऋणातून कायमचा उतराई झालो. पुन्हा तिच्याकडे न फिरकण्याच्या दृढ निर्धारासह!

रात्र वै-याची असते, तसा आम्ही या बॅंकेच्या कर्जाच्या विळख्यात सापडण्याचा निर्णय घेतला, तो दिवस वै-याचा असावा बहुतेक. त्यावेळी कुठल्याही राष्ट्रीय बॅंकेचं कर्ज घेणं आत्ताच्या एवढं सहजसोपं नव्हतं. त्यामुळे जे सहज आणि फारसा त्रास न घेता मिळेल, ते कर्ज घ्यायचं, असं ठरवून टाकलं होतं. पणजीच्याच मायेनं प्रेम करणारी बॅंक म्हणून आईचीआईची बॅंकेची त्या वेळी ख्याती होती. हापिसात म्हणू नका, घरी म्हणू नका, गोठ्यात म्हणू नका, कुठे सांगाल तिकडे येऊन तुमच्या हातात कर्जाच्या रकमेचा चेक देण्यात ही बॅंक पटाईत होती. आम्ही त्यांच्या आमिषाला भुललो. आम्ही म्हणजे...आदरार्थी बहुवचन नव्हे. तर, आम्ही सगळेच. त्यावेळी हापिसात कामाला असलेले आम्ही बरेच जण. एकतर उमेदीच्या त्या काळात लग्नाच्या बाजारात उतरण्यासाठी स्वतःचं घर असणं आवश्यक होतं. त्या भांडवलावर आम्ही निदान स्थिर नोकरी आणि स्वतःचा फ्लॅट, एवढ्या दोनच निकषांवर स्थळांचा विचार करणा-या मुलींच्या कॅटॅगरीपर्यंत तरी मजल मारू शकत होतो. त्यामुळे कुणीही गॅरेंटर न ठेवता, कुठलीही सरकारी कागदपत्रं गोळा न करता मिळणारं हे कर्ज म्हणजे आमच्यासाठी सुवर्णसंधीच वाटत होती. ती पटकन पटकावली आणि घर ताब्यात घेतलं.

नंतर नंतर ही सुवर्णसंधी आपल्याकडून सोन्याच्या भावाने व्याजवसुली करणार आहे, याची कल्पना यायला लागली आणि अस्वस्थता वाढत गेली. सुरुवातीला फ्लोटिंग रेटचा पर्याय निवडला होता. त्यामुळे मधल्या कर्जदरांच्या घसरणीच्या काळात आमच्या कर्जाचा दर सात टक्क्यांच्या पातळीपर्यंत कमी झाला, तेव्हा हापिसात आणि इतर सर्वच समकर्जबाजारी लोकांसमोर फिरताना मिशीला जरा जास्तच तूप लावून फिरत होतो. पण हा फ्लोटिंगचा फुगा लवकरच फुटला आणि बुडाला. व्याजदर फुगता फुगता अकरा टक्क्यांच्याही वर गेला, तेव्हा फ्लोटिंग आणि फिक्स, दोन्ही गटवारीत लुबाडणुकीच्या दृष्टीने काही फारसा फरक नव्हता, हेही लक्षात आलं.

मध्यंतरी दर कमी होण्यासाठी काही पैसे भरून गटवारी बदलून घेण्याचेही काहीतरी उद्योग केले. त्याने कितपत फरक पडला, कुणास ठाऊक. दर सहा महिन्यांनी व्याजदर बदलल्याचे (अर्थातच वाढल्याचे) पत्र यायचे आणि आणि आमची हताशा आणखी वाढायची. दुस-या बॅंकेत जाऊन कर्ज ट्रान्फर करून घेणे, अमूक ठिकाणी पैसे ठेवले असता किती फायदा झाला असता, इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी अमक्या रकमेचे कर्ज ठेवले पाहिजे वगैरे व्यावहारिक गणितं तर मला आयुष्यात कधी जमली नाहीत. एवढी वर्षं दुचाकी आणि आता चार चाकी वापरूनही गाडी किती अव्हरेज देते, असा प्रश्न कुणी विचारला, तर माझी बोबडी वळते. (लोकांना काहीही शंका असतात. उदा. किती किलोमीटर रनिंग झालं, चॅसी कुठल्या मेकची आहे, अमकी शेड नाही का मिळाली, वगैरे वगैरे. तर ते असो.)

सांगायचा उद्देश काय, की मी आपला इमानेइतबारे दहा वर्षं अडीच लाखांच्या सावकारीचा हप्ता भरत राहिलो. यंदा नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि निदान आपलं थकित कर्ज आपण फेडू शकू, इपपत रक्कम आपल्या हातात येईल, अशी चिन्हे दिसायला लागली, तेव्हा मला हात आभाळाला टेकल्यासारखं वाटू लागलं. बाकी काही जमलं नाही, तरी पहिलं हे कर्ज फेडून टाकायचं. हे निश्चित केलं. गेल्या महिन्यात ती इच्छा सुफळ संपूर्ण झाली. आज बॅंकेकडून सगळी मूळ कागदपत्रंही ताब्यात घेऊन आलो, तेव्हा कुठे मनाला दिलासा मिळाला.
सावकारी पाशातून कायमची मुक्तता झाल्यावर एखाद्या पिचलेल्या शेतक-यालाही असाच आऩंद होत असेल काय??