जागोजागी लागलेल्या पोस्टरवरचा दाढीचे खुंट वाढलेला तो चेहरा किशा एकटक पाहत उभा होता. त्याचा सखारामकाका ब-याच दिवसांनी गावात येणार होता. सखारामकाका मोठ्या शहरात जाऊन बरीच वर्षं झाली होती, पण किश्या मात्र गावातल्या शेतीतच रमला होता. अखेर बरीच वाट बघितल्यानंतर एकदाची एसटी आली. गावात दिवसभरात येणारी ही एकच एसटी. किशा काकाच्या दर्शनाकडे डोळे लावून बसला होता. पण एकेक करत सगळे प्रवासी उतरले, तरी काका दिसायला काही तयार नव्हता. काकानं चुकीचा दिवस कळवला, की त्याचीच बस चुकली, असा प्रश्न किश्याच्या मनात उभा राहिला. शेवटी सगळे प्रवासी उतरल्यानंतर ड्रायव्हरनं गाडी वळवायला घेतली, तेव्हा किशाला राहवेना. तो गाडीत चढला आणि अख्खी एस्टी त्यानं धुंडाळून पाहायला सुरुवात केली.
ड्रायव्हरच्या मागच्या आडव्या सीटपर्यंत किश्या आला, तेव्हा एका कोप-यात गलितगात्र अवस्थेत बसलेला एक देह त्याला दिसला. थोडंसं निरखून पाहिल्यावर हाच आपला सखारामकाका, हे ओळखायला त्याला वेळ लागला नाही.
``काका, अरे इथे काय बसून राहिलायंस? उतरला का नाहीस?'' किश्यानं विचारलं, तरी काका एक ना दोन. ढिम्म. काकाचं असं काय झालं, असा विचार करताना किश्याला लक्षात आलं, की काकाला एसटी बाधलेय. मुख्य म्हणजे, आपल्या गावातल्या रस्त्यावरचे खड्डे बाधलेत. मग कसाबसा हात धरून काका बसमधून खाली उतरला. ड्रायव्हर कंडक्टरचा खोळंबा झाल्याबद्दल शिव्या खायला लागल्या, ते वेगळंच.
याच गावात जन्माला आलेल्या, वाढलेल्या आपल्या काकाचं असं का व्हावं, हे किश्याला कळत नव्हतं. मग बैलगाडीतून घराकडे जात असताना किश्यानं काकाला बोलतं केलं.
जाताना वाटेत काकाला त्याच्या बालपणीचे हरी, गजाभाऊ, सोपानकाका वगैरे मित्र भेटले. सगळे डोक्यावरून कसल्यातरी मोठमोठ्या टोपल्या घेऊन निघाले होते.
``काय भाऊ, आज कुठे दौरा?`` सखाकाकानं सहज म्हणून विचारलं, पण तो प्रश्न त्या तिघांना जिव्हारी का लागला, हे काही त्याला कळलं नाही.
``कुठे म्हणजे? बाजाराला! इथून चार मैलावर आहे बाजार. रोज चालत जावं लागतंय एवढ्या टोपल्या डोक्यावर घेऊन, तेव्हा कुठे चार पैसे मिळतात!`` त्यांच्यातल्या एकानं सुनावलं.
``अरे? पण गेल्या दहा वर्षांत काहीच बदललं नाही?`` काकानं निरागसे विचारलं. त्यावर त्या तिघांनीही असा काही राग चेह-यावर आणला, की काकाला पुढचं काही विचारायला सुचलंच नाही. ते तिघंही आपल्या मार्गानं चालते झाले.
बैलगाडीची ही सफर खरंतर शहरात राहिलेल्या काकासाठी आनंददायी असायला हवी होती. शहरात गेल्यावर स्वतःच्या मुलांनाही कृषी पर्यटनात आवर्जून तो बैलगाडीत बसवत आला होता. पण ही सफर त्याला फारशी मानवत नसल्याचं जाणवत होतं. एकतर गावात येतानाच्या रस्त्यात एसटीमध्ये बसलेले दणके आता त्याच्या अंगप्रत्यंगातून बोलके झाले होते. गावातल्या या धुळीनं माखलेल्या रस्त्यावरचे खड्डे त्या जखमांवर मीठ चोळत होते.
``किश्या, अरे पक्का रस्ता कुठे गेला?`` शेवटी त्यानं न राहवून विचारलं.
``कुठला पक्का रस्ता?`` किश्या गोंधळून गेला होता.
``अरे, इथे पक्का रस्ता झाला नाहीये का अजून?``
``नाही!`` आपला काका असा का भंजाळलाय, हे किश्याला कळेनासं झालं होतं.
``म्हणजे? गेल्या दहा वर्षांत काहीच बदललं नाही का?`` काकाच्या या प्रश्नानं तर किश्याला हसावं की रडावं कळेना. काकाचं काहीतरी बिनसलंय, एवढं मात्र त्याच्या लक्षात येत होतं.
वाटेत कावडीनं पाणी नेणारे काही बाप्ये भेटले, डोक्यावरून हंड्यांची चवड घेऊन जाणा-या बायाबापड्या भेटल्या, त्यांनाही काकानं असेच काही प्रश्न विचारले. आपल्याच गावातला हा माणूस आपली चेष्टा का करतोय, असं त्यांना वाटलं आणि काकाचा रागही आला. शेवटी किश्यानं मध्यस्थी करून वेळ मारून नेली. आपल्याच गावात राहिलेल्या काकाला शहरात गेल्यावर नक्की झालंय काय, या शंकेनं किश्याचं मन कुरतडलं जाऊ लागलं होतं.
कसं बसं घर आलं. दमूनभागून आलेल्या काकानं लगेच पंखा लावायची आर्डर सोडली.
``काका, इथे दुपारी चार तास लाइट नसते!``किश्यानं खुलासा केला.
``काय? चार तास? मग तोपर्यंत काय करायचं? हा उकाडा कसा सहन होणार?`` काकाच्या या प्रश्नावर किश्यानं त्याच्याकडचा पुठ्ठा पुढे केला.
``हा घे घरगुती पंखा. आता उकाडा यानंच पळवायचा!``
काकाचा नाइलाज झाला. मग शेताचा फेरफटका झाला. पाण्यावाचून सुकून चाललेली शेती बघून काकाला वाईट वाटलं. काकाच्या इतर प्रश्नांपेक्षाही `गेल्या दहा वर्षांत काहीच बदललं नाही का,` या प्रश्नानं किश्या जास्त हैराण झाला होता.
``काय बदलणार होतं काका? हे दहा वर्षांत सगळं बदलल्याचं काय नाटक काढलंयंस तू?`` किश्यानं शेवटी वैतागून विचारलं.
``अरे, आमच्याकडे टीव्हीवर दर पाच मिनिटांनी ती भारत निर्माणची जाहिरात लागते. त्यात म्हणतात, की दहा वर्षांत खूप काही बदललं म्हणून. गावांची प्रगती झाली, सगली गावं समृद्ध झाली वगैरे दाखवतात त्याच्यात, मला वाटलं आपलंही गाव....!`` काकानं खुलासा केला.
``काका, त्या जाहिरातीत दाखवतात ना, ते तुझं स्वप्नच होतं असं समज. फारसं काही बदललेलं नाहीये, हेच खरं आहे.``
``मग नक्की बदललंय काय?``
``अरे, मंत्री बदलले, त्यांची खाती बदलली, त्यांनी केलेल्या गैरव्यवहारांची नावं बदलली, झालंच तर पक्षाचे नेतेसुद्धा बदलले...! अजून काय बदलायला हवं होतं तुला?``
किश्याच्या या सडेतोड उत्तरानंतर गप्प बसण्याशिवाय काकाला पर्याय नव्हता.
No comments:
Post a Comment