निवडणुकांचा मोसम आहे. सगळीकडे प्रचाराचा हलकल्लोळ माजला आहे. राजकीय पक्षांमध्येही तेवढाच हलकल्लोळ आहे, पण तो उमेदवारांपेक्षाही जास्त नाराजांचा, बंडखोर आणि असंतुष्टांचा. हे नाराज, बंडखोर आपली पोळी कशी भाजून घेता येईल, याच्या शोधात असले, तरी निवडणुकांनी इतरही अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी खाजगी स्वरूपात काही निविदाही काढण्यात आल्या आहेत. त्यांची ही झलकः
कामाचे स्वरूपः खिंडारे बुजविणे.
पात्रताः मोठमोठी खिंडारे बुजवण्यातील तज्ज्ञ असणे अपेक्षित.
तपशीलः निवडणुकांच्या हंगामात, निदान मतदान होईपर्यंत तरी पक्षाला खिंडार पडू नये, यासाठी पक्षाची तटबंदी आणखी अभेद्य करणे. अगदीच काही कारणांनी छोटेसे भोक पडल्यास त्याचे भगदाड होऊ न देण्यासाठी योग्य ती डागडुजी करणे. अगदीच भगदाड पडल्यास, त्याचे खिंडार होऊ नये, यासाठी सर्वतोपरी मेहनत घेणे. अगदीच खिंडार पडल्यास त्याची तातडीने डागडुजी करून तटबंदी पुन्हा अभेद्य करणे. (यात पक्षाला आधीच पडलेले खिंडार बुजवून देण्याच्या कामाचाही समावेश असेल.)
ता.क - आपल्या पक्षातील खिंडार बुजवून दुस-या पक्षांच्या तटबंद्यांना खिंडारे पाडण्याची क्षमता असलेल्या कुशल कामगारांना विशेष प्राधान्य.
कामाचे स्वरूपः मानसोपचार, नैराश्यनिवारण.
पात्रताः नैराश्यग्रस्तांना नव्या आशा, नवी स्वप्ने दाखविण्याची क्षमता.
तपशीलः पक्षातील वरिष्ठ पातळीवरच्या नाराजांची नाराजी कुठल्याही माध्यमातून दूर करणे, ही प्रमुख जबाबदारी असेल. त्यासाठी दबावतंत्राचा, धाकधपटशाचा वापर करण्याऐवजी त्यांना बाबापुता करून, त्यांनाच पक्षात किती महत्त्व आहे, याची जाणीव करून देण्यावर भर असावा. त्यांच्यामुळे पक्ष चालू शकत नाही आणि निवडणुकीत पक्षाला जे प्रचंड यश मिळणार आहे, त्यात त्यांचा कसा सिंहाचा वाटा आहे, हे पटवून द्यावे लागेल. पूर्वीच्या काळात त्यांनी किती महान कार्य केले आहे, याची पुन्हा उजळणी करून, त्यांनी पार पाडलेल्या जबाबदा-यांच्या आठवणीने त्यांच्या मनाला गुदगुल्या होतील, अशी व्यवस्था करावी लागेल. अशा नेत्यांनी आता पक्षातले ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून काम पाहावे आणि नव्या पिढीला छोटीछोटी कामे करण्याची संधी द्यावी, हाच त्यांना मुख्य जबाबदारीत न घेण्याचा (किंबहुना डावलण्याचा!) हेतू आहे, हे त्यांना पटवावे लागेल. भावी काळात पक्षाला जे महान कार्य करायचे आहे, त्यासाठी त्यांचे आशीर्वाद किती मोलाचे आहेत, हेही सांगावे लागेल.
ता. क. - वरिष्ठ नेत्यांना हिप्नोटाइज करून जुन्याच काळात गुंतवून ठेवण्याची क्षमता असलेल्यांना विशेष प्राधान्य.
कामाचे स्वरूपः उत्तम मासेमारी करणे.
पात्रताः समोरच्या व्यक्तीचे वजन आणि लायकीनुसार गळ बनविण्यात तरबेज असणे अपेक्षित.
तपशीलः दुस-या पक्षातल्या ज्या माशांना वेळेवर खायला मिळत नाही, ज्यांना चांगल्या पाण्यात पोहायला मिळत नाही, ज्यांना आणखी वेगळे आणि सुग्रास अन्न हवे आहे, अशांना हेरून आपल्या पक्षाच्या पाण्यात आणणे. त्यासाठी उत्तम गळ आणि गळाला लागणारे खाद्य यांची व्यवस्था पक्षातर्फे केली जाईल. एकदा गळाला लागलेला मासा पुन्हा पूर्वीच्याच जलाशयात जाणार नाही, याची हमी द्यावी लागेल. मोठ्या माशांसाठी मोठे आणि विशेष प्रकारचे गळ तयार करण्यासाठीही स्वतंत्रपणे अनुदानाची व्यवस्था होईल. काठाकाठाने पोहणा-या माशांनाही त्यांची योग्यता (लायकी!) ओळखून आपल्या जलाशयात ओढण्यासारखी कामेही करावी लागतील.
ता.क. गळाची ताकद नसतानाही न पेलवणा-या वजनाचे मासे आपल्या जलाशयात आणण्याची ताकद असलेल्यांना विशेष प्राधान्य.
त्याबरोबरचः
- भूलथापातज्ज्ञः मतदारांना वेगवेगळ्या भूलथापा देऊन आपल्याकडे खेचून आणण्यात तरबेज.
- दमदाटीतज्ज्ञः कार्यकर्त्यांना आणि मतदारांना दमदाटीने आपल्या मर्जीप्रमाणे वागायला लावण्यात निष्णात.
- गर्दीचे घाऊक कंत्राटदारः सभा, मेळावे, शिबिरं, प्रचारफे-या, यांसाठी कार्यकर्त्यांची गर्दी जमवून देणारे कुशल कंत्राटदार. वेगवेगळ्या वयोगटाच्या आणि वेगवेगळ्या स्तरावरच्या बुद्धिमत्तेचे लोक गर्दीमध्ये जमवणे अपेक्षित.
- धर्मशास्त्र पंडितः दुस-या पक्षातून आपल्या पक्षात आलेल्या नेत्यांना योग्य मंत्रोच्चारांनी शुद्ध करून घेणे अपेक्षित.
- कात्रणकिंगः वेगवेगळ्या नेत्यांनी केलेल्या वेगवेगळ्या वक्तव्यांच्या बातम्यांची कात्रणे आणि व्हिडिओ क्लिप्स रोज तारीखवेळेसकट आणून देणे अपेक्षित.
इच्छुकांनी त्वरित संपर्क साधावा. मानधनाची अपेक्षा नसलेल्यांना विशेष प्राधान्य!
No comments:
Post a Comment