(`मुंबई सकाळ`च्या श्रावण विशेष पुरवणीसाठी लिहिलेला लेख क्र. 1)
...
``सोनाली, अगं हा जोक वाचलास का?`` वत्सलाबाईंनी हाक मारली आणि सोनाली आदर्श सुनेसारखी स्वयंपाकघरातून धावत बाहेर आली.
``कुठला जोक, आई चेहऱ्यावरचे `केतनला कुठून दुर्बुद्धी सुचली आणि सासूबाईंना स्मार्ट फोन घेऊन दिला!` हे भाव लपवत तिनं कुतुहलानं विचारलं.
``अगं, हा नागपंचमीवरचा जोक गं!`` वत्सलाबाईंना हसू आवरत नव्हतं. त्यांनी सांगितलेला जोक ऐकल्यावर सोनालीनं त्यांना हसून टाळी दिली आणि त्याच वेळी बाहेरून आलेल्या केतनने तिच्या या अभिनयाला फक्त नजरेतूनच दाद दिली.
``आई, मला फॉरवर्ड करा ना!`` एक डोळा केतनकडे ठेवून सोनालीनं स्वरात शक्य तेवढा नम्रपणा आणत सांगितलं ``गेल्या वर्षी हाच जोक आला होता आई. तुम्ही यंदा व्हॉटस अप घेतलंत, हा आमचा दोष आहे का?`` हे तोंडावर आलेलं वाक्य तिनं पुन्हा आदर्श सुनेसारखं गिळून टाकलं.
आज घरी आल्यानंतर एकदम एवढं प्रसन्न, हसतंखेळतं वातावरण बघून केतनच्या मनात पाल चुकचुकली होतीच. चहा घेताघेता त्याच्या मनातल्या शंकेवर शिक्कामोर्तब झालं.
``अच्छा, हे कारण आहे होय आजच्या सौजन्य सप्ताहाचं?`` आई बाहेर निघून गेल्याची खातरी झाल्यावर, केतननं सोनालीला टोमणा मारला.
``उगाच काहीतरी शंका काढू नकोस. आमचं काही भांडण वगैरे नाहीये, त्या माहेरी जाणार म्हणून मला आनंद व्हायला!``
``मी कुठे म्हटलं तुमचं भांडण आहे म्हणून? काळाबरोबर बदलायला हवंच. तूसुद्धा आईची सून न राहता मुलगीच झालेयंस. पण आई आता माहेरी जाणार म्हणून एका माणसाला मनातून खराखुरा आनंद झालाय की नाही?`` केतनला तिची खोडी काढायचा मोह आवरला नाही.
``काय हे बोलणं तरी! अशी चेष्टा आवडत नाही बरं आम्हाला. इकडून असेच टोमणे मारले जाणार असतील, तर आम्ही मुळी बोलणारच नाही, ज्जा!`` सोनालीनंही एकदम `जयश्री गडकर` पवित्रा घेतला. केतन एवढ्या फिस्सकन हसला, की त्याचा कप डचमळून चहा अंगावर सांडला.
`` मला आईंचं खरंच कौतुक वाटतं. त्यांना या वयातसुद्धा त्यांना माहेरी जाण्याची ओढ आहे!`` सोनाली मनापासून म्हणाली.
``अगं, श्रावणात जातात ना बायका आपल्या माहेरी!``
``अरे हो, पण लग्नानंतर थोडे दिवस ओढ असते. आईंना अजूनही माहेरी जावंसं वाटतं, याचीच कमाल वाटते मला. अगदी उत्साहानं जातात त्या. गावातल्या माहेरवाशिणींच्या मंगळागौरींमध्येही रस घेतात, नागपंचमीला झाडाला झुले बांधून त्याच्यावर खेळतात, खरंच असं उत्साही असायला हवं माणसानं!``
``ती उत्साही आहेच! बरं, सध्या व्हॉट्स अप काय म्हणतंय?``
``काही विचारू नकोस बाबा. सोसायटीतल्या ज्येष्ठ नागरिक महिला मंडळाच्या ग्रुपवरसुद्धा घेतलंय आईंना. सतत कुठले ना कुठले सुविचार, जोक्स पाठवत असतात मला! आजच श्रावणाचा महिमा का काय पाठवलंय. आणि वर त्या नागपंचमीचा जोक!`` सोनालीनं व्यथा मांडली आणि केतनला पुन्हा हसू आलं.
``माणसानं काळानुसार बदलायला हवं. आईसुद्धा बदलतेय. गंमत वाटते मला!`` केतनच्या बोलण्यातून आईचं कौतुक दिसत होतं. ``बाय द वे, मला वाटतं, तुलासुद्धा ब्रेक हवाय. तू पण श्रावणानिमित्त माहेरी का जात नाहीस चार दिवस?``
``खरंच जाऊ? चालेल तुला?``
``जा गं, इथे मॅनेज करू आम्ही. चारच दिवसांचा तर प्रश्न आहे. आणि तुलाही विश्रांती हवीच ना!`` केतननं अगदी काळजीनं सांगितलं.
``किती काळजी करतोस रे माझी!`` सोनाली डोळ्यांत अश्रू आणून म्हणाली. ``की असं करू?`` तिनं एकदम काहीतरी सुचल्यासारखं विचारलं.
``काय?``
``मी आईला भेटावं, असं वाटतंय ना तुला?``
``अर्थात!``
``मला विश्रांती मिळायला हवेय ना?``
``म्हणजे काय!``
``मग माझ्या आईलाच इकडे बोलावून घेते ना! बोरिवलीलाच तर राहते ती. मी तिच्याकडे गेले काय आणि ती माझ्याकडे आली काय, एकच ना! काळाबरोबर एवढं तरी बदलायला हवंच ना माणसानं?`` सोनालीनं बिनतोड सवाल केला आणि केतनचा चेहरा पाहण्यासारखा झाला.
- अभिजित पेंढारकर.
(क्रमशः)
No comments:
Post a Comment