``मॅडम, आमच्या मुलासाठी आम्ही इथे आलो होतो.`` वीणाताईंच्या चेहऱ्यावर काळजीचे ढग दाटून आले होते.
``बोला ना, अगदी मोकळेपणानं बोला.`` डॉक्टर अंजली त्यांना धीर देत म्हणाल्या. तरीही कुठून सुरुवात करावी, हे वीणाताईंना समजत नव्हतं. काही क्षण असेच शांततेत गेले. फारच गंभीर विषय दिसतोय, हे डॉक्टर अंजली मॅडमच्या लक्षात आलं.
``हे बघा, डॉक्टरपासून काही लपवायचं नसतं. त्यातून मी मानसोपचारतज्ज्ञ आहे. तुमच्या मुलाची जी काही समस्या आहे, ती राहू नये, असं वाटतंय ना तुम्हाला? त्यानं नॉर्मल आयुष्य जगायला हवंय ना? मग मोकळेपणानं बोला. तुम्ही सांगितल्याशिवाय मला कसं समजणार?``
डॉक्टरांची ही मात्रा लागू पडली असावी. अशा केसेस कशा हॅंडल करायच्या, पालकांना किंवा रुग्णांना कसं बोलतं करायचं, हे त्यांना एवढ्या वर्षांच्या अनुभवातून सहज समजत होतं. वीणाताई थोड्या अस्वस्थ झालेल्या जाणवल्या. त्यांनी बोलण्यासाठी जुळवाजुळव केली, पण त्यांचे शब्द घशातच अडकत होते. काय बोलावं, कसं बोलावं याचीच पंचाईत होत होती. शेवटी डॉ. अंजली यांनी श्री. विलासरावांशी बोलायचं ठरवलं.
``तुम्ही वडील आहात ना त्याचे? तुम्ही सांगा. हे बघा, काही काळजी करायचं कारण नाही, इथल्या गोष्टी कुठे बाहेर जाणार नाहीत. बोला.``
वीणाताईंनी विलासरावांकडे अपेक्षेनं पाहिलं.
``किती वर्षांचा आहे तुमचा मुलगा?``
``सोळा. म्हणून तर काळजी वाटतेय.`` वीणाताई म्हणाल्या.
``काय होतंय नक्की? त्याचं कुठलं वागणं खटकलं तुम्हाला?``
आता वीणाताईंना राहवलं नाही. त्यांनी सगळंच सांगायचं ठरवलं. गेले काही दिवस मुलाचं वागणं त्यांना फारच खटकत होतं. तसं पहिल्यापासून तो कधी वेडंवाकडं वागलेला नव्हता. आईवडिलांचा आज्ञाधारक असा आदर्श मुलगा होता तो. पण वयात आल्यापासून गेली दोन तीन वर्षं त्याचं वागणं हळूहळू बदलत गेलं होतं. वीणाताईंना ते आधी लक्षात आलं नव्हतं, पण आलं, तेव्हा त्यातलं गांभीर्य त्यांच्या अगदीच अंगावर आलं. शशांक मुलींकडे वाईट नजरेने बघतो, असं वीणाताईंना जाणवलं होतं. तो पोर्न व्हिडिओ बघतानाही एकदा सापडला होता. आजूबाजूच्या काही मुलींनीही त्याच्या रोखून बघण्याबद्दल वीणाताईंकडे तक्रार केली होती, म्हणून त्यांना जास्त काळजी वाटायला लागली होती. विलासरावांना त्यांनी सांगून पाहिलं, पण त्यांनी सुरुवातीला टाळाटाळ केली. शेवटी वीणाताईंना कुणीतरी मानसोपचारतज्ज्ञांकडे जाण्याचा सल्ला दिला, तेव्हा त्या डॉक्टर अंजली यांची रीतसर अपॉइंटमेंट घेऊन त्यांच्याकडे आल्या. पहिल्या वेळेला मुलाला घेऊन येऊ नका, असं डॉक्टरांनीच सांगितलं होतं. निदान समस्या समजून घेऊ, काय करता येतं ते बघू, नंतर गरज लागल्यास तुमच्या मुलाशी मी बोलेन, असंही त्या म्हणाल्या होत्या.
डॉक्टर अंजली यांनी वीणाताईंचं सगळं ऐकून घेतलं. वीणाताई अगदी मनापासून बोलत होत्या. मुलाबद्दलचं प्रेम आणि आता त्याच्या वागण्याची वाटणारी काळजी ठायीठायी जाणवत होती.
``काळजीचं कारण नाहीये. या वयात असं घडणं नॉर्मल आहे,`` असं डॉक्टर म्हणाल्या, तेव्हा मात्र वीणाताईंच्या चेहऱ्यावर आणखी चिंता पसरली.
``अहो खरंच नॉर्मल आहे हे. मोठ्या माणसांनी असं वागणं, हे गंभीर आहे!`` विलासरावांकडे बघत डॉक्टर अंजली म्हणाल्या.
``पण डॉक्टर..`` वीणाताई अजूनही गोंधळलेल्या वाटत होत्या.
त्यांचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच डॉक्टर अंजली म्हणाल्या, ``शशांक अजून लहान आहे, कोवळं वय आहे त्याचं. या वयातच मुलींबद्दल आकर्षण वाढीला लागतं. मी त्याच्याशी बोलेन. काळजी करू नका, इथे नाही बोलणार. माझ्या एखाद्या सेमिनारला किंवा कार्यक्रमाला त्याला घेऊन या, तिथे त्याच्याशी सहज ओळख काढून गप्पा मारेन. तुम्ही इथे आला होतात, हे सांगणार नाही. सुधारेल तो. त्याला जे वाटतंय ते नॉर्मल आहे, फक्त या भावना नक्की कशा कंट्रोल करायच्या, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चांगल्या गोष्टींमध्ये मन कसं रमवायचं, हे मी त्याला सांगेन. तो नॉर्मलच आहे आणि त्याचा हा सगळा प्रॉब्लेम लवकरच दूर होईल.`` असं डॉक्टर अंजली यांनी अगदी मायेनं सांगितलं, तेव्हा मात्र वीणाताई थोड्या रिलॅक्स झाल्या. डॉक्टरांविषयी त्यांनी आधी जे ऐकलं होतं, त्याचाच प्रत्यय त्यांना येत होता. आपल्या मुलाची समस्या वाटते तेवढी गंभीर नाही आणि तो लवकरच रुळावर येईल, हे डॉक्टरांकडून ऐकणं त्यांच्यासाठी खूपच आशादायी होतं.
``थॅंक्यू डॉक्टर. तुमचे आभार कसे मानू, तेच मला कळत नाहीये.`` वीणाताईंचा कंठ दाटून आला होता.
``तुम्ही कधी भेटाल त्याला?``
``पुढच्या महिन्यात. तोपर्यंत त्याच्याशी तुमच्या पातळीवर काय बोलायचं, कसं वागायचं, त्याबद्दल एक पुस्तक देते तुम्हाला. ते वाचून घ्या आणि तसं वागा. पुढच्या आठवड्यात मला रिपोर्ट कळवा.``
``थॅंक्यू डॉक्टर. मी नक्की वाचेन आणि तसं वागेन.`` वीणाताईंनी वचन दिलं.
``मला फक्त तुमच्याशी थोडं बोलायचंय!`` डॉक्टर अंजली म्हणाल्या आणि वीणाताईंच्या काळजात पुन्हा धस्स झालं. त्यांनी विलासरावांकडे बघून इशारा केला आणि विलासराव केबिनच्या बाहेर जाऊन बसले.
``काय झालं डॉक्टर? आणखी काही सांगायचं होतं का? शशांकबद्दल काही...```
``नाही, त्याच्याबद्दल नाही.``
``त्याला पुढच्यावेळी घेऊन येऊ का? मी कसंतरी कन्व्हिन्स करेन त्याला. येईल तो, तुम्ही म्हणत असाल तर.``
``अहो नाही. शशांकला घेऊन येण्याची काहीच गरज नाही!``
``नक्की? हवंतर घेऊन येते त्याला! त्याची नजर....`` वीणाताई अस्वस्थ झाल्या होत्या.
``त्याला आणायची गरज नाहीये! `` डॉक्टर अंजली प्रत्येक अक्षरावर भर देत मोठ्याने बोलल्या, तशा वीणाताई गप्पच झाल्या.
डॉक्टर पुढे काय बोलतात, यासाठी त्यांनी कानांत प्राण आणले होते.
``फक्त एक करा.``
``काय?``
``तुमच्या मिस्टरना पुन्हा इथे घेऊन येऊ नका!``
- अभिजित पेंढारकर.
No comments:
Post a Comment