Oct 13, 2008

कुणाची गं तू?

अंगावर फाटक्‍या तुटक्‍या कपड्यांनिशी मुंबई स्वर्गाच्या दारात उभी होती। एस. एम. जोशी, आचार्य अत्रे, वसंत बापट प्रभृतींची भेट तिला घ्यायची होती. चित्रगुप्तानं बऱ्याच रखडंपट्टीनंतर मुंबईला आत प्रवेश दिला. एसेम, अत्रे, बापटांसह संयुक्त महाराष्ट्राच्या सर्व नेत्यांसमोर मुंबई जाऊन उभी ठाकली. सगळ्या नेत्यांना थोडंसं आश्‍चर्य वाटलं, पण त्यांना हे फार अनपेक्षित नव्हतं. कधी ना कधी मुंबई आपल्याकडेच गाऱ्हाणं घेऊन येणार, याची त्यांना खात्री होती.

मुंबईच्या या अनपेक्षित आगमनानं सगळे नेते किंचित चिंतेत पडले। "गेल्या दहा हजार वर्षांत कधी झाली नाही, एवढी दुरवस्था मुंबईची झाली आहे. तिला नरकयातना भोगायला लावणाऱ्यांना संडास साफ करायला लावलं पाहिजे, नरकातही त्यांना जागा दिली जाऊ नये,' असं भाषणच त्यांनी संतप्त अवस्थेत ठोकलं. "जाहला न इतुका अवमान कधी, जाळली का यासाठीच आयुष्यें आम्ही' अशा स्वरूपाची कविता बापटांनी तत्काळ रचून गाऊन दाखवली. एसेम नेहमीप्रमाणे धीरगंभीर होते.परप्रांतीयांनी केलेलं आक्रमण, आपल्याच माणसांनी दलालांच्या हाती सोपवून शहराची केलेली माती, वाढतं प्रदूषण, गजबजाट, अस्वच्छता, गुन्हेगारी याबद्दलच मुंबईला गाऱ्हाणं मांडायचं असावं, अशी या सर्व नेत्यांना खात्री होती. "मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे,' ही घोषणा आपण का दिली आणि त्यातल्या "च'ला किती महत्त्व होतं, याची आठवण अत्र्यांनी पुन्हा एकदा करून दिली. हे करताना यशवंतराव चव्हाणांकडे जाणीवपूर्वक कटाक्ष टाकला. यशवंतराव आपल्या पेटीतून महाराष्ट्राचा मंगल कलश काढून त्याला पॉलिश करण्यात गुंगले होते. त्यांनी अत्र्यांकडे विशेष लक्ष दिलं नाही.

मुंबईचं खरं गाऱ्हाणं ऐकून घ्यायलाच कुणी तयार नव्हतं। खुद्द महाराष्ट्रात जी स्थिती भोगत आहोत, तीच संयुक्त महाराष्ट्राच्या अध्वर्यूंच्या दारी आल्यावरही अनुभवायला मिळावी, याचं तिला विलक्षण वैषम्य वाटलं. ती रडवेली झालेली पाहून सगळ्या नेत्यांना दया आली. आपण समजतो तसं नाही. मुंबईचं दुःख वेगळंच आहे, हे त्यांच्या लक्षात आलं. मग त्यांनी आपापल्या भूमिका आणि मतभेद बाजूला ठेवून मुंबईला बोलण्याची संधी दिली.
"संयुक्त महाराष्ट्राच्या पदरात माझं कन्यादान करणाऱ्या माझ्या आदरणीय पित्यांनो, मी तुमची आयुष्यभर ऋणी राहीन. पण आता सध्याच्या राज्यकर्त्यांनी जो तमाशा मांडलाय, तो तुम्हाला कळला, तर तुमच्याच कामगिरीची तुम्हाला कीव येईल...'' मुंबई मुसमुसत म्हणाली
``काय झालं, काय झालं?'' सगळे चिंताक्रांत झाले
``खुद्द माझ्या पित्याच्या चारित्र्याविषयीच संशय घेतला जात आहे.''
``कोण आहे तो हरामखोर?'' अत्रे गरजले.
``सांगते, सांगते....आधी एका पोलिस अधिकाऱ्यानं माझ्या वडिलांविषयी संशय घेतला। मी कुणाच्याच `बापा'ची नाही, असे ते म्हणाले। आतापर्यंतचे राज्यकर्ते मला कायमच सावत्रपणाची वागणूक देत आले। त्यात या अधिकाऱ्यानं मी अनौरस असल्याचंच सांगून मला कुठेही तोंड दाखवायला जागा ठेवली नाही...'' मुंबई स्फुंदून स्फुंदून रडू लागली.
एसेमनाही गलबलून आलं.
``माझ्यावर कायमच प्रेम करणारे एक आजोबा मला धीर देतील, असं वाटलं होतं. पण त्यांच्याशी भांडण असलेल्या त्यांच्या पुतण्यानं मला आधार दिला. "रस्त्यावर उतरा, म्हणजे मुंबई कुणाच्या बापाची आहे हे कळेल,' असं त्या अधिकाऱ्याला सुनावलं. नंतर आमच्या या आजोबांचा दसरा मेळावा झाला. ते आता थकल्यामुळं त्यांच्या मुलानंच "मुंबई आमच्या "बापा'ची' असं जाहीर करून टाकलं.''
``हे बरं झालं। कुणीतरी न्याय दिला ना?'' बापटांनी सुस्कारा सोडला.''
``ते झालं हो, पण आता मलाच प्रश्‍न पडलाय ना, मी नक्की कुणाची ते!'' मुंबईच्या या प्रश्‍नावर सगळेच निरुत्तर झाले.
---------

Oct 7, 2008

सौजन्याची ऐशी तैशी

खादीच्या कपड्यावर असलेल्या सवलतीचा फायदा घेऊन भरपूर खरेदी करून आपण महात्मा गांधींचं स्मरण दरवर्षी करत असतो. ही झाली सर्वसामान्यांची पद्धत. मोठ्या लोकांचं सगळंच निराळं असतं. आता हेच बघा ना...ज्येष्ठ समाजसुधारक अंबुमणी रामदास (स्वामी) यांनी यंदाच्या गांधी जयंतीचं निमित्त साधून भारतातील समस्त मानवजातीला सिगारेटच्या व्यसनापासून वाचविण्याचा विडा उचलला. (खरं तर "विडा' हेही व्यसनच. पण ते असो!) तसंच आपल्या राजकीय नेत्यांनी सौजन्य सप्ताह पाळायचं ठरवलं.

वाईट बोलू नका, वाईट ऐकू नका आणि वाईट पाहू नका, हा गांधीजींचा संदेश. आपल्या धुरंधर राजकारण्यांनी त्यात थोडं "इम्प्रोवायझेशन' करून "वाईट करू नका आणि केलेलं निस्तरून टाका,' ही नवी शिकवण अंगी बाणवली। जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भावी अध्वर्यू अजितदादा पवार यांनी साताऱ्यात जाऊन कॉंग्रेसच्या एका बड्या मंत्र्यावर आणि अन्य काही नेत्यांवरही टीका केली। दुसऱ्या दिवशी गांधी जयंतीचा संकल्प आठवल्यावर त्याबद्दल खुलासा करून टाकला.

मुलायमसिंह यांनी जुने वैर विसरून सोनिया गांधींची विमानतळावरच धावती (की उडती?) भेट घेतली. अमरसिंहांनी नारायण राणेंची भेट घेतली. ही भेट "बिझनेस'संबंधी होती असं जाहीर झालं असलं, तरी ती राजकीय "धंदा' चालविण्याच्या दृष्टीनेची चाचपणी होती, अशी अफवा आहे।

पुण्यात पत्रकारांच्या अधिवेशनात शरद पवार, गोपीनाथ मुंडे, नारायण राणे एकत्र आले। त्यांचाही कलगीतुरा रंगला, पण सौजन्यपूर्ण वातावरणात। पवारांनी राणेंना पुढील वेळी मुंडेंना सोबत घेऊन जाण्याचा सल्ला देऊन टाकला। मुंडेंनीही राणे, पवारांना कोपरखळ्या मारल्या, पण गोडीगोडीनं....आणि या सौजन्य सप्ताहाचा समारोप झाला तो थाटामाटात, वाजतगाजत आणि कुणीही कधीही अपेक्षा केली नव्हती, अशा घटनेनं. छगन भुजबळ यांनी बाळासाहेब ठाकरेंवरील खटला मागे घेऊन आपली लढाई संपल्याचंही जाहीर करून टाकलं! उद्धव ठाकरेंसोबत त्यांची बैठकही झाली. लखोबा, टी. बाळू, अशा सर्व विशेषणं गोदावरीत विसर्जित झाली.

या सर्व घटनांत अर्थातच कोणाचाही स्वार्थ, राजकीय फायदा नव्हता। आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांशी या घडामोडींचा संबंध जोडणाऱ्याला नतद्रष्टच म्हणावं लागेल. गांधी जयंतीनिमित्तानं पाळलेल्या सौजन्य सप्ताहाच्या यशस्वितेसाठी प्रत्येक नेत्यानं आपापल्या परीनं टाकलेली ती भर होती. प्रत्येकानं यथाशक्ती त्यासाठी मदत केली.मुख्य प्रश्‍न पुढे आहे. गांधी जयंतीनिमित्त या सर्वांनी अहिंसेचा, प्रेमाचा, वसुधैव कुटुंबकम्‌ चा संदेश बिंदेश दिला हे ठीक आहे! पण पुढच्या आठवड्यात रावणदहन आहे आणि त्यानंतर नरक चतुर्दशी! एरव्ही वर्षभर हा मुहूर्त साधणाऱ्या या नेत्यांवरची जबाबदारी आता वाढली आहे

---

Sep 30, 2008

गुहागरात...(कोरडी) सुहागरात...


गेल्याच आठवड्यात भन्नाट योगायोगांविषयी लिहिलं होतं। तसाच योग पुन्हा एकदा जुळून आला। गुहागरला जायचं बऱ्याच वर्षांपासून राहिलं होतं। स्वतः रत्नागिरीचा असूनही मी अद्याप हेदवी, वेळणेश्‍वर पाहिलं नव्हतं। सारखी हुरहूर लागत होती, पण जायचं काही घाटत नव्हतं। एकदा एन्‍रॉनच्या निमित्तानं लेख करण्यासाठी गुहागर शहरात आणि अंजनवेल, वेलदूर भागात गेलो होतो। पण तेवढाच। ते काही फिरणं नव्हतं. ते अचानक, अनपेक्षितपणे परवा जुळून आलं.
"गोड गुपीत', "नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे' या चित्रपटांचा दिग्दर्शक प्रमोद प्रभुलकर हा बऱ्यापैकी मित्र। पुण्यात भेटला, तेव्हा मी आणि श्रीपाद ब्रह्मे यांनी त्याला एखाद्या वेळी शूटिंगला बोलावण्याची गळ घातली होती. एरव्ही शूटिंग रिपोर्टसाठी जाणं म्हणजे फक्त औपचारिकता असते. तासभर थांबायचं आणि बोलून निघायचं. आम्हाला तसं नको होतं. जरा निवांत आणि स्वतंत्र हवं होतं. त्यानं ते लक्षात ठेवलं होतं बहुधा. श्रीपादला फोन करून त्यानं गुहागरला त्याच्या नव्या चित्रपटाच्या शूटिंगला येण्याचं निमंत्रण दिलं. श्रीपादनं मलाही भरीला घातलं. काही कारणांनी माझंही प्रभुलकरशी काही दिवसांपूर्वी बोलणं झालं होतं आणि मलादेखील ही चांगली संधी वाटली.
रविवारी सुटीच्या दिवशी जायचं आणि सोमवारी सकाळी निघून दुपारी ड्युटीला परत यायचं, अशी आमची अटकळ होती। रजा वगैरे घेण्याचा प्रश्‍न नव्हता आणि राहण्याची सोयही तो करणार होता. एकूणात काय, की फक्त बस प्रवासाचं भाडं आम्हाला पदरचं घालायचं होतं. त्यामुळे दोघंही तयार होतो. शेवटी जाण्याचं शुक्रवारी निश्‍चित झालं.जुजबी सामान घेऊन रविवारी सकाळी साडेसातची गाडी पकडली. दुपारी एक दीड पर्यंत पोचायचं, असा आमचा अंदाज. गुहागरला पोचायला सव्वाचार होतील, असं कंडक्‍टरनं सांगितलं, तेव्हा आमचा धीरच खचला. म्हटलं, उद्या दांडी मारावी लागणार बहुधा! मग एकदा तो विचार मनात आला आणि तोच मग पक्का केला
प्रवास उत्तम झाला. एकतर मी एसटीच्या लाल डब्यातून दिवसा बऱ्याच वर्षांनी एवढा मोठा प्रवास करत होतो. पण काही त्रास झाला नाही. वारा छान होता, एसटीही मोकळी होती आणि ऊनही फारसं नव्हतं. कुंभार्ली घाटात एसटीतूनच फोटो काढले, कोयनानगरला जेवलो आणि बरोब्बर सव्वाचारला गुहागरात पोचलो. त्यांनी कळविलेल्या हॉटेलवर पोचलो, तर तिथे कुणालाच काही पत्ता नव्हता. मग पुन्हा फोनाफोनी झाली. शेवटी आम्हाला बॅगा टाकायला आणि तोंडं विसळायला जागा मिळाली. आंघोळ कुणाला करायची होती?आत्ता येऊ मग येऊ करता करता दोन तासांनी, साडेसहाला आम्हाला न्यायला गाडी आली. तिथून चहा पिऊन पालशेत नावाच्या बारा किलोमीटरवरच्या गावात पोचलो. तिथे एका कोकणी चौसुपी घरात शूटिंग चाललं
"सुंदर माझं घर' असं चित्रपटाचं नाव. मधुराणी गोखले, राहुल मेहंदळे हे कलाकार. दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते आदल्या दिवशीच येऊन गेले होते. कोकणात मोठ्या कुटुंबात राहणारी एक मुलगी मुंबईत विभक्त झालेल्या कुटुंबात जाऊन राहते आणि तिथे सर्वांना एकत्र आणते, अशी ही कथा. प्रभुलकरनं आमचं चांगलं स्वागत केलं. गेल्या गेल्या भोपळ्याच्या घारग्यांचा भरपेट नाश्‍ता झाला.नंतर थोडा वेळ गेल्या दोन दिवसांतलं शूटिंग टीव्हीवर पाहिलं आणि मग प्रत्यक्ष शूटिंग. शूटिंगच्या गमतीजमतीही अनुभवायला मिळाल्या. अंगणात एकत्र जेवणाचं दृश्‍य होतं, पण जेवणच तयार नव्हतं। मग चिडाचिडी, आरडाओरडी झाल्यावर जेवणाची तयारी करण्यात आली। तोपर्यंत दिग्दर्शकानं तो शॉटच बदलून टाकला होता।
नायिकेच्या मोठ्या बहिणीच्या मांडीवर देण्यासाठी आणलेलं गावातलं कुणाचं तरी बाळ भोकाड पसरून रडायला लागलं. म्हणून मग बाहुलीचं बाळ तयार करण्यात आलं. ते बिचारं रडलं नाही!रात्री दहापर्यंत शूटिंग चाललं. आम्ही म्हणजे तिथे विशेष पाहुणेच होतो. त्यामुळं बसायला खुर्च्या, पाणी, खाणं, सगळ्याची ददात होती. साडेदहाला जेवलो। मग शूटिंगची मंडळीही पॅक अप करून आली. सगळ्यांशी गप्पा झाल्या. साडेअकरापर्यंत "हॉटेल निसर्ग'वर आलो. येतानाचा अंधारातला प्रवासही छान झाला. वाटेत एक कोल्हा पाहिला.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर निघायचा बेत रद्दच केला होता. ऑफिसला कळवून दांडी टाकली होती. मग सकाळी प्रभुलकरांनी आमच्या दिमतीला एक गाडी दिली. तिच्यातून हेदवीला जाऊन आलो. येताना चालकानं हेदवीच्याच समुद्रकिनाऱ्यावरचा एक भन्नाट स्पॉट दाखवला. आमच्या श्रीपादला तो आधी माहीत असल्यानं जरा पुढे जाऊन व्यवस्थित पाहिला. बामणघळ त्याचं नाव. डोंगराच्या कुशीत दोन खडकांमध्ये चर तयार होऊन त्यातून लाटा आत येतात. जोरात लाट आली, की ती उसळून फेसाळत वर येते आणि अक्षरशः आंघोळ घालते. पाहायला हे दृश्‍य फारच भन्नाट आहे. आम्ही अर्धा तास तिथे काढून मग निघालो.
गुहागरात आल्यावर तिथल्या किनाऱ्यावरही फेरफटका मारला। मग दुपारी पुण्याची गाडी धरली...

Sep 26, 2008

योगायोगाच्या गोष्टी!

"आपल्या चुकांबद्दलची सोपी पळवाट म्हणजे नशीब' अशी व्याख्या कुणी केली असली, तरी नशीबावर आणि योगायोगांवर माझा प्रचंड विश्‍वास आहे. अशा अनेक अनपेक्षित गोष्टी आयुष्यात कधीकधी घडतात, की त्यांना योगायोगाशिवाय दुसरं काही नाव देता येत नाही।
श्रीनिवास देशपांडे नावाचा एक डॉक्‍टर मित्र ऑर्कुट परिवारात समाविष्ट आहे। मला भेटण्याचा प्रस्ताव त्यानं अनेक दिवस-महिन्यांपूर्वी दिला होता. आम्ही वेळ पण ठरवत होतो, पण काही जमत नव्हतं. खरं तर तो राहतो गणेशमळ्यात आणि मी पानमळ्यात. अगदी दहा मिनिटांचं अंतर होतं. पण त्याला वेळ फक्त रविवारी. आणि रविवारी आमच्या सांसारिक जबाबदाऱ्या.एकदा भेटण्याविषयी बोलणंही झालं, पण कुठेतरी माशी शिंकली. शेवटी गणपतीनंतर भेटू, असं मी त्याला सांगून टाकलं. तरीही त्याला पंधरा दिवस उलटून काही निश्‍चित होत नव्हतं. भेटायची इच्छा दोघांनाही होती, पण मुद्दाम वेळ काढण्याचं घाटत नव्हतं.

परवाच्या मंगळवारी मी सहज रजा घेतली होती आणि गाडी सर्व्हिसिंगला टाकायला गेलो होतो. येताना व्यायाम म्हणून चालत घरी निघालो होतो. टिळक रोडवर एका दुकानावर कॅमेऱ्यांची जाहिरात पाहत असताना एक माणूस उगाचच संशयाने माझ्याजवळ घुटमळत असलेला जाणवला. मी त्याच्यावर उचकणार तेवढ्यात तो म्हणाला, ""तुम्ही अभिजित पेंढारकर ना?''मी चमकलो.""मी श्रीनिवास देशपांडे!'' त्यानं ओळख करून दिली.भरदार शरीरयष्टीचा (खरं तर भरगच्च वजनाचा म्हणायला हवं, पण ते बरं दिसत नाही ना!) हा ऑर्कुटवरचा माझा कधीही न पाहिलेला, न भेटलेला मित्र असा रस्त्यात भेटेल आणि मला फक्त फोटोवरून ओळखेल, अशी मुळीच कल्पना नव्हती! मग आम्ही कॉफी वगैरे पिऊन योगायोगानं झालेल्या भेटीचा आनंद साजरा केला।
एकाच आठवड्यात अशीच दुसरी गोष्ट घडली...बायकोच्या मैत्रिणीच्या माध्यमातून गेल्या वर्षी एक एलआयसी पॉलिसी काढली होती. पण ती कधी माझ्यापर्यंत पोचलीच नाही. दरम्यान काही कौटुंबिक कारणांमुळे तिनंही कामातून विश्रांती घेतली होती। पॉलिसी मिळाली नाही, म्हणून मी जाम अस्वस्थ होतो. पुढचे हप्ते भरण्याच्या नोटिसा आल्या, पण पॉलिसीच असल्याने पैसे फुकट जातील, या विचाराने हप्ते भरले नाहीत.त्या मैत्रिणीच्या कनपटीला बसल्यानंतर तिनं पॉलिसीची कुंडली आणली. एलआयसीकडून कधी रवाना झाली, कोणतं पोस्ट ऑफिस, डिस्पॅच क्रमांक वगैरे. पोस्टात चौकशी केली. त्यांना रजिस्टर उकरायला लावलं. काहीही नव्हतं. हाही प्रयत्न फुकट गेला.आगपाखड करून झाल्यानंतर शेवटी स्वतःच हे "मिशन' हाती घ्यायचं ठरवलं. एकतर तिचं एलआयसी कार्यालय होतं गणेशखिंड रस्त्याला. आमच्या घरापासून खूप लांब. तरीही, उन्हातून बोंबलत तिकडे तडमडलो. तिथून फॉर्म बिर्म आणले. पण तेही पडूनच राहिले.मग एक ओळखीचा दुसरा एलआयसी एजंट गाठला. तो सगळं करून देतो म्हणाला. त्यासाठी दोनशे रुपयांचा बॉंड पेपर लागणार होता. त्यासाठी गावात चार-पाच चकरा मारल्या. कुठेच मिळाला नाही. एक दुकान सापडलं, ते दोनदा बंद होतं. नंतर दोनशे रुपयांचा बॉंडच मिळत नाही, असं कळलं. मग त्याला साक्षात्कार झाला, की बॉंड पेपरऐवजी फ्रॅंकिंग पण चालेल. मग फ्रॅंकिंगसाठी प्रयत्न सुरू झाले. दोन-तीनदा कॉसमॉस बॅंकेतली ही सेवा बंद होती. एकदा राजस्थान बॅंकेत संप होता. खेपा फुकट जात होत्या. अखेर हिय्या करून एकदा ती मोहीमदेखील यशस्वी करून दाखवली.
आता उरला होता प्रश्‍न फॉर्म भरण्याचा आणि त्या एजंटकडे ते सगळं गबाळं सुपूर्द करण्याचा। परत त्याची माझी वेळ जमत नव्हती. आता सगळं दिलं की मिळणार डुप्लिकेट पॉलिसी, हे निश्‍चित होतं.
अचानक काल आमच्या डोक्‍यावर राहणारे शेजारी सकाळी सकाळी दारावर आले। मी चहा पीत होतो। बायको काहीतरी त्यांच्याशी बोलत होती। त्यांना फ्लॅट सोडायचा असल्यानं एनओसी साठी आले असतील, असं वाटलं. बाहेर जाऊन पाहतो, तर कुठल्या तरी पॉलिसीची चर्चा सुरू होती.नंतर मला उलगडा झाला, की जी पॉलिसी मिळवण्यासाठी मी आकाशपाताळ एक केलं होतं, ती मूळ पॉलिसी आमच्या डोक्‍यावरच्या त्या शेजाऱ्यांच्या घरी सापडली होती! तीदेखील बिऱ्हाड हलवण्याचा निर्णय त्यांनी घेतल्यानंतर उपसाउपशी सुरू केली, तेव्हा!
खरं तर माझा जळफळाट झाला होता. ज्यासाठी एवढ्या खस्ता खाल्ल्या, एवढ्या चकरा मारल्या, भरपूर वेळ फुकट घालवला, ती पॉलिसी माझ्यापासून अगदी दहा-बारा फुटांवर आरामात पहुडून होती.पैसे, वेळ, श्रम खर्च करून बराच मनस्ताप घेतल्यानंतर हा आनंदाचा क्षण पाहायला मिळाला. त्यांच्या गबाळेपणाबद्दल थयथयाट करण्यापेक्षा मला पॉलिसी मिळाल्याचा आनंद अधिक वाटला!

Sep 12, 2008

माफीनामा!

"अनफर्गेटेबल टूर' संपवून मी परतीच्या प्रवासाला लागलो असताना वाटेत ढीगभर एसएमएस मिळाले। जयानं मुंबईत काहितरी विधान केल्याबद्दल गदारोळ उडाल्याचं कळलं. भावना दुखावल्या गेल्या आहेत, ही माझी त्यावरची पहिली प्रतिक्रिया होती. तसं झालं असेल, तर आम्ही माफी मागतो.महाराष्ट्र ही आमची आई आहे आणि आईचा अपमान करण्याची आमची संस्कृती नाही. आईच्यान!

मराठी आणि महाराष्ट्राने आम्हाला भरपूर काही दिले आहे आणि आम्ही हे उपकार कधीच विसरणार नाही। आम्हीही आमच्या परीने मराठी माणसांवर, मुंबईवर, शिवसेनेवर, मनसेवर, मूळ आणि "नवनिर्माण' झालेल्या ठाकरे परिवारावर प्रेमच केले आहे. कृतघ्नतेची भावना आमच्या मनात कधीच नव्हती.मराठीवर प्रेम नसल्याचा आरोप आमच्यावर सातत्याने होतो. तो चुकीचा आहे. मराठीसाठी आम्ही काय केले नाही? कुठलेही संकट आले, की आम्ही पाया पडतो, ते दादरच्या सिद्धिविनायकाच्याच. मी यूपीचा आहे, म्हणून सारखी काशी-मथुरेकडे धाव घेत नाही.

मध्यंतरी अभिषेकच्या लग्नाच्या वेळी मंगळ "शनी' ठरू नये, म्हणून तिकडच्या काही देवळांत यज्ञयाग केले, पण ते तेवढ्यापुरतेच। म्हणून सिद्धिविनायकावर आमचा विश्वासच नाही, असं कुणी म्हणू शकत नाही. मी, जया, अभिषेक, ऐश्वर्या सगळ्यांनी अनेकदा त्याची पायी वारी केली आहे.मध्यंतरी मी बाराबंकीत जमीन घेतली, तशीच पुणे जिल्ह्यातल्या मावळ खोऱ्यातही घेतली. उत्तर प्रदेशात आमच्या मित्राचं सरकार आहे, म्हणून महाराष्ट्रावर अन्याय होऊ दिला नाही. जयाचं शिक्षण पुण्यात झालं, तसं अभिषेकचं शिक्षण आम्ही मुंबईतच केलं. त्यासाठी आम्ही दोघंही आग्रही होतो. डेहराडूनला त्याला ठेवण्याचा मित्रपरिवाराचा सल्ला आम्ही मानला नाही.मुख्य म्हणजे, आमचे सगळे चित्रपट आधी मुंबईत प्रदर्शित झाले. त्याबाबतही मी कुणाचे काही ऐकले नाही. मुंबई ही आमची कर्मभूमी आहे आणि इथेच चित्रपट प्रदर्शित व्हायला हवेत, याबाबत मी स्वतः आग्रही होतो.

बाळासाहेबांशी मैत्री केली, ते केवळ ते मराठी आहेत म्हणून। त्यामागे काही स्वार्थ नव्हता. मुंबईत राहणाऱ्या, काम करणाऱ्या अनेक मराठी माणसांशी मी प्रसंगानुरूप अनेकदा स्वतः बोललो आहे. माझ्या युनिटमधल्या मराठी माणसांशीही मी संवाद साधत असतो.अभिषेकच्या लग्नाची सर्व खरेदी आम्ही मुंबईतच केली आहे. पॅरिस किंवा ऍमस्टरडॅमहून सूट आणावा, अशी अभिषेकची मागणी होती, पण मी त्याला सविनय नकार दिला. आता, मराठी माणसाच्या दुकानातून खरेदी केली की नाही, हे नेमकं सांगता येणार नाही. मात्र, याबाबत मी अधिक काही विधान करणार नाही. नाहीतर, "मुंबईत मराठी माणसाची दुकानं आहेत तरी कुठे, ' असं मी म्हटल्याचा नवा वाद निर्माण होईल.

आम्ही शांतताप्रिय आणि कायदेप्रिय माणसं आहोत। लाखो रुपयांचा कर बुडवल्याबद्दल, जमिनीच्या मालकीबाबत शेतकरी असल्याचं खोटं प्रमाणपत्र सादर केल्याबद्दल, पैशांच्या घबाडासाठी अनिवासी भारतीय म्हणून नोंदणी केल्याबद्दल, जेव्हा जेव्हा आम्ही कायद्याचं उल्लंघन केल्याच्या घटना घडल्या, तेव्हा सरकारी दट्ट्या आल्यानंतर त्याची प्रामाणिक कबुली देण्याची भूमिका आम्ही घेतली आहे. त्याबद्दल आमच्याविरुद्ध कुणी बोट दाखवू शकत नाही. "एबीसीएल' गाळात गेली, तेव्हा मुलायमसिंहांनी, अमरसिंहांनी आम्हाला मदत केली असेल, पण ती केवळ मैत्रीपोटी. महाराष्ट्रातल्या कुण्या नेत्यानं आम्हाला मदतीचा हात दिला असता, तर आम्ही तो नाकारला असता, असे नव्हे!

ऐश्वर्याच्या नावानं उत्तर प्रदेशात आम्ही शाळा सुरू केल्यावरून गहजब माजला. बच्चन परिवारातल्या कुणाला ना कुणाला सतत चर्चेत ठेवायचं, ही मीडियाची हल्ली गरजच झाल्यासारखी वाटते. आम्ही मात्र त्यामागे वाहवत जाणार नाही. ऐश्वर्याच्या नावाची शाळा यूपीमध्ये काढली, ती काही केवळ तिकडच्या प्रेमापोटी नव्हती. कुणीही आपल्या मातृभूमीसाठी एवढं करतोच ना! आता नातवाच्या नावे गडचिरोलीत महाविद्यालय सुरू करण्याचा आमचा विचार आहे. त्या संधीच्या सध्या प्रतीक्षेत आहे.आणखी एक. ब्लॉगही आता मराठीतून लिहिण्याचा विचार आहे. पण माझ्या लॅपटॉपवर फॉंटचा प्रॉब्लेम आहे. तो दूर झाला, की करेनच सुरुवात! मराठी वाचकांना ब्लॉग वाचण्यास आणि मराठीतून त्यावर कॉमेंट टाकण्यासही माझी अजिबात मनाई नाही. एवढे मराठीद्वेष्टे आम्ही नक्कीच नाही. कुणाला काहीही वाटले, तरी!!

-आपला,
अमिताभ बच्चन.