Mar 31, 2009

पद्मश्री'चा सन्मान...कित्ती छान!

अक्षयकुमारला "पद्मश्री' सन्मान झाला, तेव्हा कोण टीका झाली होती! पुरस्काराला काही किंमतच उरली नाही, कुणालाही देतात, वशिलेबाजीचा जमाना आहे, वगैरे वगैरे! 31 मार्चला हा पुरस्कार प्रदानही झाला. अक्षयनं त्याच्या आदल्याच दिवशी आपल्याला मिळालेला सन्मान किती योग्य होता, हे सिद्ध करून दाखवलं.
मुंबईच्या लॅक्‍मे फॅशन वीकमध्ये अक्षय रॅम्पवर चालला. लेविस जीन्स (आणि वर टी-शर्ट) घालून. दोन वर्षांपूर्वी याच फॅशन महोत्सवात कुणा मॉडेलचं (अनवधानानं) वस्त्रहरण झाल्यानं कोण गदारोळ उठला होता! अक्षयला दोन वर्षांत काही चर्चा झाली नसल्याचं वैषम्य वाटलं असावं. त्यानं स्वतःच आपलं वस्त्रहरण करून घेतलं, तेही चारचौघात! आणि स्वतःच्या अधिकृत धर्मपत्नीच्याच हातून!
"दम भर जो उधर मूँह फेरे ओ चंदा...मैं तुमसे प्यार कर लूँगी' म्हणणारी लाजाळू नायिका काळाच्या पडद्याआड गेली. आता जमाना आहे "जरा जरा टच मी किस मी होल्ड मी' वगैरे म्हणून नायकाला थेट आव्हान देणाऱ्या मदमस्त फटाकड्यांचा! "टल्ली हो गई' म्हणून भर मैफलीत धिंगाणा घालणाऱ्या बिनधास्त युवतींचा. बॉलिवूडच्या एका हॉट जोडीनं या बदलत्या जमान्याचं प्रात्यक्षिक 30 मार्चच्या संध्याकाळी दाखवून सर्वांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं.
झालं असं, की मुंबईच्या फॅशन वीक मध्ये लेविस जीन्सची जाहिरात करण्यासाठी रॅम्पवर आलेल्या अक्षयकुमारला समोर धर्मपत्नी ट्‌विंकल बसलेली पाहून एक "खट्याळ' प्रकार सुचला. तो रॅम्पवरून खाली उतरला आणि थेट तिच्यासमोर उभा राहिला. शर्ट वर करून त्यानं तिला (आपल्या!) पॅंटचं बटण काढायला सांगितलं. कशी का होइना, भारतीय नारीच ती! बावरली हो बिच्चारी! पती झाला म्हणून काय झालं, त्याच्या पॅंटचं बटण काढायचं? चारचौघांदेखत?
ती लाजली. हा हुरळला. मग यानंच लाडंलाडं तिचा हात आपल्या पॅंटजवळ घेतला आणि तिला बटण काढायला लावलं. शेजारीपाजारी बसलेल्यांनी अगदी कौतुकभरल्या नजरेनं हा "सोहळा' पाहिला. मग तो तसाच रॅम्पवर चढला आणि पडद्याआड गेला.
कित्ती छान नै? परंपरेच्या, लाजाळूपणाच्या, तथाकथित संस्कृतिबंधनांच्या जाळ्यात अडकून पडलेल्या भारतीय नारीला या सगळ्यातून मुक्त करणाऱ्या अक्षयच्या या धाडसी कृतीबद्दल "पद्मश्री' नव्हे, "भारतरत्न' मिळायला हवं, असं नाही वाटत तुम्हाला?

Mar 28, 2009

पातेलीभर खिरीची गोष्ट!

गेल्या आठवड्यात एके दिवशी कधी नव्हे तो संध्याकाळी घरी होतो. काम करूनही कंटाळा आला होता. थोडंसं (कथित) पाककौशल्य दाखविण्याची खुमखुमी आली. शिवाय, मुलीच्या आवडीचा पदार्थ करून तिची मर्जी संपादन करण्याची संधीही होतीच. म्हणून मुदपाकखान्याकडे वळलो.
काय करावं, काही ठरलं नव्हतं. नेहमीचं पोहे-उप्पीठ-भजी प्रकरणांनी कन्येला जिंकणं म्हणजे दीपिका पदुकोनला आपल्या पगाराची स्लिप दाखवून लग्नाची मागणी घालण्यासारखंच होतं! त्यामुळं वेगळा बेत आखला. कधीकाळी आजी रव्याची खीर करायची. तेव्हा मीही शिकलो होतो. बऱ्याच वर्षांत तिच्याकडे (म्हणजे, खिरीकडे) ढुंकून पाहिलं नव्हतं. म्हटलं, करून बघूया आज! मस्त बेत होईल!
(बचकाभर) रवा घेतला आणि खरपूस भाजून काढण्याच्या उद्योगाला लागलो. पण तो भाजता भाजत नव्हता. काही वेळाने मलाच कंटाळा आल्यावर, तो पुरेसा भाजला आहे, असा (गैर)समज करून घेऊन त्यात पाणी ओतलं. मग पुन्हा (त्याला आणि मला! ) कंटाळा येईपर्यंत शिजू दिलं. रवा थोडासा जास्त झाला होता. कारण भरपूर पाणी पीत होता. जवळपास तीनदा पाणी घालूनही खिरीसदृश काही तयार होण्याचं नाव नव्हतं. शेवटी कंटाळून साखर घातली. तीही किती घालायची, काही अंदाज नव्हता. अनेक वर्षांचं पाककौशल्य पणाला लावून अंदाजे कितीतरी घातली. आता खीर तयार झाली, अशी पक्की खात्री झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं....
अरे, खीर तर दुधाची करतात!
म्हणजे रवा शिजण्यापुरतं पाणी घालून नंतर त्यात दूध मिसळायचं असतं.
बोंबला! आता आली का पंचाईत? मी आधीच पाणी एवढं घालून ठेवलं होतं, की पातेलंभर खीर तयार झाली होती. मग ते पातेलं बदलून मोठं पातेलं घेतलं आणि त्यात खीर ओतून वर दूध घातलं.
एवढ्या अथक प्रयत्नांनंतर जे काही "द्रावण' तयार झालं होतं, ते मुलीनं(च) घरी आल्यावर (बहुधा, प्रचंड भूक व वडिलांवरील अपार विश्वासापोटी) थोडंसं चाखलं. दुसऱ्या दिवसापासून काही तिनं त्या अगम्य पदार्थाचं नावही काढलं नाही. चार दिवस फ्रीज नावाच्या "व्हेंटिलेटर'मध्ये ठेवल्यानंतर ती बिचारी खीर बेटी अल्ला को प्यारी हो गई!

या अनुभवातून एवढंच शिकायला मिळालं, की...
1. जवळपास पंधरा-एक वर्षं आपल्याला स्वयंपाक येतो, असं ऊर बडवून आपण सांगत आहोत, त्याला काही अर्थ नाही. जुन्या चुकांतून आपण काहीच शिकलेलो नाही.
2. अनेक वर्षं लक्षात ठेवून, किंवा तारतम्य बाळगून काही नव्या पदार्थाचा प्रयोग करावा, हे आपलं वय राहिलं नाही.
3. सहधर्मचारिणीनं केलेल्या (कशाही) स्वयंपाकाला कुठल्याही प्रकारे नावे ठेवण्याचा आपल्याला अधिकार राहिलेला नाही!


मूळ प्रेरणा : कथा कढईभर शिऱ्याची!

Mar 11, 2009

समज-गैरसमज

"लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा' असं म्हटलं जातं. (म्हणजे काय, कुणास ठाऊक!) लहानपण हा आयुष्यातला सगळ्यात मोलाचा, महत्त्वाचा टप्पा असतो, एवढंच त्यातून घेण्यासारखं. अर्थात, हे कळतं लहानपण सरल्यावर आणि जास्त अक्कल आल्यावरच. लहानपणात मात्र आपणच हुशार, असं वाटत असतं. त्या वयात मनात काही संकल्पना, व्याख्या, तत्त्वं घट्ट बसलेली असतात. मोठ्ठं झाल्यानंतरही त्या प्रतिमांचं, संकल्पनांचं भूत मानगुटीवरून उतरायला बराच वेळ द्यावा लागतो.माझ्याही लहानपणी अशा अनेक कल्पना, गृहीतकं मनात घट्ट बसली होती. आपल्याकडे लहान मुलाला कुठल्याही गोष्टीविषयी असलेलं नैसर्गिक कुतूहल, उत्सुकता याविषयी समजावून सांगण्याऐवजी आणखी काहीतरी गूढ, अकल्पित सांगण्याची प्रथा आहे. किंवा आमच्या पिढीच्या लहानपणात तरी होती. साधी-सोपी आणि मुलांना समजू शकेल अशी गोष्टही निष्कारण अवघड करून सांगायची आणि त्या मुलाच्या मनाचा गोंधळ वाढवून ठेवायचा. मुंजीत दंडात बेडकी भरण्याचा बागुलबुवा हा यातला आदीम प्रकार. मुंजीच्या वेळी त्या लहानग्याचं वय असतं जेमतेम आठ ते दहा वर्षं. मुंजीतल्या या "अघोरी' प्रथेविषयी त्याच्या मनात भयगंडच निर्माण होईल, याची पुरेपूर खात्री मामे, काके, आई-वडील या गैरसमजाची भलावण करून सांगण्यातून करायचे. मलाही या बेडकी प्रकाराने मुंज होईपर्यंत धडकी भरली होती. शेवटी मुंजीचा दिवस संपता संपता, असलं काही नसतं, हे कळलं होतं. पण दंडात "बेडकी' येणं, म्हणजे शरीर वाढीला लागण्याचं लक्षण, शरीरात बदल घडण्याचं, तारुण्याकडे वाटचाल करण्याचं लक्षण, हे सरळ-साधं सत्य कुणी सांगण्याची तसदी घेतली नाही.
काही गैरसमज असे वडीलधाऱ्यांच्या सांगण्यातून होतात, तर काही नकळत मनात रुजत असतात. त्याविषयी कुतूहलानं अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न न केल्यानं, किंवा कुणी स्वतःहून न सांगितल्यानं ते मनात पक्के होत जातात. लहानपणी महाभारतातल्या गोष्टी ऐकताना "चक्रव्यूह' प्रकरणाचं मला भारी आकर्षण आणि गूढ वाटायचं. अभिमन्यू चक्रव्यूहात अडकला, म्हणजे काय, तेच जाम कळायचं नाही! सैन्याची गोलाकार रचना, म्हणजे एखाद्या गुहेसारखी किंवा गणपतीत देखावे तयार करतात, तशी कुठेतरी अज्ञात ठिकाणी अशी सैनिकांची गोलाकार (गुरुत्वाकर्षणाच्या नियमांना धुडकावून!) रचना केली असावी की काय, अशीच शंका यायची मला. मीही ती निरसन करून घेण्याचा प्रयत्न बरीच वर्षं केला नव्हता. साध्या जमिनीवर सैन्याला विशिष्ट रीतीनं उभी करण्याची रचना म्हणजे चक्रव्यूह, हे (मोठेपणी) समजल्यावर "एवढीही अक्कल नव्हती आपल्याला,' असं वाटून गेलं.
राजकीय तत्त्वं आणि समजाबद्दलची तर बातच वेगळी! कॉलेजात असेपर्यंतही बाळासाहेब ठाकरे, वाजपेयी म्हणजे आपली दैवतं होती. आणि कॉंग्रेसचे तमाम पुढारी म्हणजे जवळपास राक्षस वाटायचे. ठाकरे-पवार हे मित्र आहेत आणि एकमेकांना भेटतात-बिटतात असं सांगणाऱ्या एका मित्राविषयी त्या क्षणी "तूच का तो ब्रूटस' असंच वाटलं होतं. कारण मनताल्या कोणत्याही संकल्पना, गृहीतकं यापेक्षा वेगळं काही या समाजात असू शकतं, हे लहानपणी कुणी कधी मनावर बिंबवलंच नव्हतं. एकाच विषयाला अनेक पैलू असतात, व्यक्तिमत्त्वाला अनेक रंग असू शकतात, हे समजण्याची पात्रताच नव्हती.
आता माझ्या चार वर्षांच्या लेकीलाही मी अतिउत्साहानं पोस्ट ऑफिस म्हणजे काय, तिथलं काम कसं चालतं, झाडं कशी वाढतात वगैरे गोष्टी शिकवायला जातो (आणि ती मला फाट्यावर मारून खेळायला निघून जाते,) तेव्हा मला माझ्या लहानपणाच्या या आठवणी कुठेतरी मनात असतात. आपल्या मुलीनं आपल्याइतकं तरी बावळट राहू नये, अशी माफक अपेक्षा असते.
तुमच्याही असतील ना अशाच काही आठवणी? जुन्या काळची, जुनाट गृहीतकं, भोळ्या कल्पना? सांगाल??

Mar 9, 2009

आम्ही चालवू हा पुढे वारसा...

बरेच दिवस अस्वस्थ होतो.
इस्राईलनं केलेल्या हल्ल्यात नाहक बळी पडलेल्या शेकडो पलेस्टिनींबद्दलची ही अस्वस्थता होती का?
इथिओपियामधल्या दुष्काळग्रस्तांना खायला अन्न नसताना इथे लोक फुकटच्या मेजवानीतदेखील अन्नाची नासाडी करत असल्याबद्दलची होती का?
शेकडो अधाशी, उतावळे उपवर तरुण गुढग्याला बाशिंग बांधून तयार असताना करीना कपूरनं सैफ सारख्या द्वितीय वराशी सूत जमवावं, याबद्दलची ही आर्त वेदना होती का?
की आपल्या लेखनाला कुत्रंही विचारत नाही, त्याची व्यथा??
छ्या!

ही अस्वस्थता, वेदना, वैषम्य होती आपली पोरगी काही आपल्या पावलावर पाऊल ठेवून चालत नाही, त्याचं!
एकदा हात मोडणं, एकदा उजव्या बोटावर कोयती, एकदा डाव्या बोटावर ब्लेडचा स्वयंआघात, एकदा विळीवर, एकदा बांधावर पडून अजूनही जपलेल्या `पाय' आणि `ढोपर'खुणा, यापैकी काहीच आपल्या मुलीनं अनुभवलेलं नाही, याचं कोणत्याही सह्रुदय पित्याला राहून राहून वैषम्य वाटणारच, ना!(माझ्या पायावरची विळीच्या जखमेची खूण दाखवली, तेव्हा काय खूश झाली होती पोरगी!)
नाही म्हणायला, मनस्वीनं एकदा `तुम्हाला बंद करते' म्हणून स्वत:लाच बाथरूममध्ये कोंडून घेण्याचा स्व्यंगोल केला, तेवढा एकच काय तो पराक्रम!
बाकी नाकात पेन्सिल अडकवणं म्हणून नाही, बोटं दारात साकटून घेणं नाही, गेला बाजार एखादी मौल्यवान वस्तू फोडणं/हरवणं नाही...!
पार वैताग आला होता!!
पण काल पोरीनं बापाचं नाव राखलं. ऊर अभिमानानं भरून यावा, अशी कामगिरी केली.
घरी आलेल्या पाहुण्यांना सोडायला सोसायटीच्या गेटपर्यंत गेलो होतो. परत येताना पोरगी उधळली. एकतर साध्या चप्पल घालायला सांगत असताना हट्टानं हील्सच्या चप्पल घातल्या होत्या. त्यातून खड्यात पाय अडखळला नि तोंडावर पडली. किरकोळ माती लागलेय, असं वाटत होतं. घरी आल्यावर खरी परिस्थिती कळली. डाव्या डोळ्याच्या वर-खाली मार लागला होता. चंगलीच सालटी निघाली होती नि रक्तही आलं होतं. पण जखम खोल बिल नव्हती.
रात्री कैलास जीवन लावून झोपवलं. सकाळी उठल्यावर जखमेनं आपलं खरं रूप दाखवल्याचं समजलं. डोळा मस्त सुजून टोमॅटोसारखा झाला होता. उघडताही येत नव्हता. डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागली. औशधांई दोन-चार दिवसांत सूज उतरेल, असा अंदाज आहे.
बघूया!!

Feb 18, 2009

`राजा' माणूस!

काही माणसांचं वैशिष्ट्यच असं असतं, की ती थेट काळजात घुसतात। सर्वार्थानं ती परिपूर्ण असतात, किंवा आदर्श असतात असं मुळीच नाही. पण त्यांच्यातला एखादाच गुण एवढा जोरकस असतो, की रूढ अर्थानं असलेले इतर दुर्गुण त्यापुढे झक् मारतात!

राजा रेवाळे हा आमचा असाच एक कॉलेजमधला मित्र। अकरावीत प्रवेश घेतल्यापासून सगळं जगच बदललं होतं. एकतर शाळेतली शिस्त, नियमित अभ्यास, घरच्यांचा धाक, कायमचं लक्ष, या सगळ्यातून स्वातंत्र्याचा अनुभव घेत होतो. परिणाम व्हायचा तोच झाला. शाळेत दहावीपर्यंत कधी स्वाध्यायात सुद्धा नापास झालेल्या मला अकरावीतल्या पहिल्याच चाचणी परीक्षेत पंचवीसपैकी एक, दोन असे गुण मिळायला लागले. अकरावी कशीबशी काढली आणि बारावीत चक्क नापास झालो. पुन्हा बारावी परीक्षा द्यायची ठरवली, तीपण सगळे विषय घेऊन. मी मेडिकलला वगैरे जाणार, अशी आशा घरच्यांना आणि मला तेव्हाही होती! म्हणूनच "ग्रुप'मध्ये चांगली टक्केवारी मिळवण्यासाठी सगळे विषय घेऊन पुन्हा बसण्याची खुमखुमी होती.

वाईटातून काही चांगलं होत असतं म्हणतात। राजा रेवाळेचा आणि माझा परिचय याच वर्षी झाला. आधी केवळ चेहरा ओळखीचा होता, पण थेट संबंध आला नव्हता. तोही असाच बारावीत पहिल्या वर्षी गटांगळी खाऊन माझ्या जोडीला पुन्हा सर्व विषय घेऊन बारावीला बसला होता. मग आम्ही दीडशहाण्या रिपीटर्सची टीमच जमली! सगळे विषय आम्हाला आधीच कळलेत, आता फक्त उरलेय ती उजळणी, असाच आमचा पवित्रा असायचा. त्यामुळं वर्गात पुन्हा तेच विषय "समजून' घेण्याची आम्हाला काहीच गरज नव्हती! मग कुठे कॉलेजच्या गेटबाहेर उभं राहून पोरींची टवाळी कर, कधी ग्राऊंडवर टाइमपास कर, असे उद्योग चालायचे.

पुलंच्या "रावसाहेब'मध्ये सगळ्यात जास्त दंगा रावसाहेबांचा असे, तसाच दंगा आमच्या ग्रुपमध्ये "राजा' करायचा। त्याची विनोदबुद्धी आणि हजरजबाबीपणा अफाट होता. विनोदाला फार काही दर्जाबिर्जा होता, असं नव्हे. पण कॉलेजातल्या टिंगलटवाळ्यांमध्ये तो अव्वल होता. वर्गात कधीमधी चुकून बसलोच, तर सर काहीतरी शिकवत असताना राजाच्या एखाद्या कॉमेंटवरून जी खुसपूस व्हायची, ती सरांच्या नजरेतून न सुटणारी असायची. मग एकेकाला वर्गाच्या बाहेर तरी जावं लागायचं, किंवा ओरडा खायला लागायचा. बरं, एवढं करून हा नामानिराळाच राहायचा.

राजाला उगाच डिवचणं आणि त्याच्याकडून शब्दांचा यथेच्छ मार खाणं, हे भाग्याचं लक्षण होतं। काही जण मात्र नकळत त्याच्या शेपटीवर पाय द्यायचे आणि मग आठ दिवस त्यांना तोंड दाखवायला जागा उरायची नाही. त्याच्या व्यक्तिमत्त्वाविषयी ऐकून असलेल्या एका नवख्या पोरानं असंच एकदा राजाला डिवचलं.... "काय राजा, लग्न केलंस म्हणे! 'एखाद्यानं काहीतरी थातूरमातूर उत्तर दिलं असतं.

राजा लगेचच म्हणाला। "म्हंजे काय? तुला माहित नाही? पोरगं पण झालं! घरी ये, "खरवस' खायला! 'आता, एखाद्याला हा विनोद अश्लील, दर्जाहीन वगैरे वाटू शकेल. पण त्यावेळी आम्ही गडबडा लोळलो होतो.मुलींशी बोलण्याची त्या काळात चोरी होती. कॉलेजात असलो, तरी आमचे मुला-मुलींचे ग्रुप वगैरे नव्हते. ग्रुप म्हणजे एकतर मुलांचा, किंवा मुलींचा. वेगवेगळा. एखादा मुलगा गॅलरीत मुलीशी बोलताना दिसला, की त्या प्रक्रियेला आमच्या शब्दकोषात "गूळ पाडणे' असं नाव होतं. मग एखादा मुलगा जास्तच चिकटलेला दिसला, की आम्ही त्याच्या समोरच्या गॅलरीत किंवा काही अंतर राखून जवळ उभे राहून पाठीवरून गुळाची पोती भरून नेल्याची ऍक्शन करायचो. तो तिच्याशी गुलुगुलू करून परत आला, की राजा त्याला हळूच म्हणायचा. "जपून रे! डायबेटिस होईल! ' नवखा असला, तर त्या बिचाऱ्याला काहीच कळायचं नाही.

"नेचर क्लब'च्या नावाखाली आम्ही भटकंतीला जायचो, तेव्हा गणपतीपुळ्याच्या एका ट्रेकदरम्यान तो नदी पार करताना खोल पाण्यात जाऊन बुडायला लागला होता। दोघातिघांनी हात दिल्यावर सावरला. तेव्हाची त्याची अवस्थाही पाहण्यासारखी होती. नंतर स्वतःवरच विनोद वगैरे करून त्यानं त्या घटनेचंही बरंच भांडवल केलं.कॉलेजच्या गॅदरिंगलाही हवालदाराचं सोंग आणून त्यानं धुमाकूळ घातला होता. मी त्या वेळी "बाई' झालो होतो आणि राजाच्या जोडीनं हास्याचे फवारे उडविण्याचा अल्पसा प्रयत्न केला होता.

नंतर टी। वाय. पर्यंत आम्ही एकत्र होतो, पण आमचे विषय वेगवेगळे होते. कधीतरी ट्रेकला एकत्र भेटायचो किंवा कॉलेजच्या मधल्या सुटीतही. तेवढ्यापुरती मजा यायची. पण बारावीएवढी धमाल नंतर कधी केली नाही.कॉलेजातली मैत्री वर्ष संपता संपता कशी संपते, ते कधीच कळत नाही. मीदेखील रत्नागिरीतून शिक्षणासाठी (? ) पुण्यात आलो आणि राजाशी काहीच संपर्क राहिला नाही. आता तर तो काय करतो, याचाही मला पत्ता नाही. रत्नागिरीत गेल्यावर शोधून काढणं अवघड नाही, हे जेवढं खरं, तेवढंच जुन्या गोड आठवणींना आता वरकरणीच्या औपचारिक गाठीभेटींची पुटं चढवलेली पाहवत नाहीत, हेही!