Jul 7, 2009

एक धुकाळ सहल!

tahini 5th july 09 063

ताम्हिणीत जाण्यात "रिस्क' होती.
दरवर्षीप्रमाणे दणकून पाऊस, दरडीबिरडी कोसळण्याची भीती म्हणून नव्हे. तर अजिबात पाऊस नसल्याच्या बातम्या होत्या म्हणून!
जूनपासून पावसाची वाट पाहूनपाहून थकलो होतो. गाडीतून दोन ट्रिपा केल्या, दोन्ही कोरड्या! जेजुरी आणि कार्ला इथे घामानं पुरेवाट झाली होती. ताम्हिणीत पाच जुलैला जायचं हे तर ठरलं होतं, पण धाकधूक होतीच. ताम्हिणीत जायचं म्हणजे मस्त पाऊस, धुकं, धबधबे, असं समीकरण गेली आठ-दहा वर्षं डोक्‍यात पक्कं बसलं होतं. पहिल्यांदा तिथे गेल्यापासून गेल्या वर्षीचा अपवाद वगळता दरवर्षीची एक फेरी कधीच चुकली नव्हती. रोज पावसाच्या बातम्यांवर आणि आभाळाकडे लक्ष ठेवून होतो. आज पाऊस येईल, उद्या येईल, असं गेले दोन आठवडे वाटत होतं. रोज निराशाच पदरी येत होती. ताम्हिणीचा "व्हेन्यू' बदलायला लागतो की काय, अशी परिस्थिती होती. आदल्या दिवसापर्यंत "अपडेट्‌स' घेणं सुरू होतं.
अखेर गेल्या आठवड्यात पुण्यात हलका पाऊस झाला आणि जरा जीवात जीव आला. तरीही जिल्ह्यात फार दमदार पाऊस झाल्याची वार्ता नव्हती. ऑफिसातल्या एका सहकाऱ्यानंही तिथं जाण्याविषयी नकारघंटाच लावली होती. शेवटी गुरुवारी त्याच भागात राहणारा एक सहकारी निदान तिकडे प्रसन्न वातावरण असल्याची सुवार्ता घेऊन आला. हा खरंच थोडा दिलासा होता. तरीही, मी सोडून कुटुंबीयांपैकी बहुतेक जणांचा तिकडे जाण्याबाबत आग्रह कमीच होता. निघण्याच्या आदल्या दिवशी एका मित्रानं खबर आणली, की थोडे-थोडे धबधबे आहेत. जरा आणखी उमेद आली.
पाच जुलैला सकाळी दहा जणं मिळून दोन गाड्यांतून ताम्हिणीकडे कूच केले. साधारणपणे चांदणी चौक ओलांडला, की ताम्हिणीच्या वातावरणाचा वास यायला लागतो. या वेळी पिरंगुट ओलांडले, तरी फारसे काही वातावरण नव्हते. पौडमध्ये मिसळ खाल्ली, तेव्हाही "पाऊस नाही' या चर्चेनं जरा धडधड वाढली. "सगळ्यांना घेऊन आलोय खरं, पण धबधबे मिळाले नाहीत तर आपली काही खैर नाही,' या विचारानं जीव खालीवर होत होता. वाटेत एके ठिकाणी हवा भरायला थांबलो, तर तिथेच आमचा नेहमी थांबण्याचा फेवरेट स्पॉट होता. जरा पुढे जाऊन बघितलं, तर धबधबा! डोळ्यांवर विश्‍वासच बसत नव्हता! ज्याच्या शोधात पुण्याहून 80 किलोमीटरवर बोंबलत आलो होतो, तो साक्षात पुढ्यात हात जोडून उभा होता!
आम्ही तिथे फोटोबिटो काढले, पण भिजलो मात्र नाही. कारण भिजायला घाटमाथ्यावर भरपूर धबधब्यांच्या सान्निध्यात जायचं होतं! मग वाटेत थांबतथांबत निघालो होतो. एका पठारावर आलो, तर रस्ता धुक्‍यात बुडून गेलेला. समोरची गाडीही दिसत नव्हती. दोन्ही बाजूला पाणी आहे आणि आपण बंधाऱ्यावरून निघालो आहोत, असंच भासत होतं. शेवटी गाडी धांबवली आणि मस्त धुक्‍यात बुडून गेलो. धुकं जसं आलं त्याच वेगानं नाहीसंही झालं. चला, ताम्हिणीचा आटापिटा अर्धाअधिक सत्कारणी लागला होता!
घाटमाथ्यावर गेलो, पण धबधब्यांची रांग काही दिसत नव्हती. एखाददुसरा ओघळ दिसत होता. वाटेत एक-दोन धबधबे लागले, पण तिथे थांबावंसं वाटलं नाही. शेवटी धबधब्यांच्या शोधात घाटउतारापर्यंत गेलो. शेवटी तिथून परत फिरलो. परतीच्या वाटेवर जो धबधबा लागला, त्यात मस्त भिजलो. फार मोठा नव्हता, पण आनंद घेण्याएवढ्या धारा होत्या.
दरवर्षीपेक्षा जरा लवकरच यंदा ताम्हिणीत गेलो होतो. पावसाची स्थिती नव्हती, तरी निराशा झाली नाही. उलट, सहल फलदायी झाल्याचाच अनुभव आला!


tahini 5th july 09 077

tahini 5th july 09 096
अभ्यंगस्नान!

tahini 5th july 09 047
अधिक्रुत पत्नीबरोबरचा अधिक्रुत फोटो!

tahini 5th july 09 108

tahini 5th july 09 071

Jun 19, 2009

काही अनुभव..पावसाळलेले!


पावसाची बरेच दिवस वाट पाहिली, शेवटी कंटाळून सकाळी पावसाच्या अनुपस्थितीतच कांद्याची "खेकडा' भजी (खेकड्याच्या पायांसारखी दिसणारी. खेकड्याचे पाय घातलेली नव्हे!) करून खाल्ली. वर बायकोला एकही न ठेवल्यानं, संध्याकाळी तिच्या शिव्याही खाल्ल्या! दुपारी पावसाचा मस्त शिडकावा झाला आणि अनेक दिवसांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला. क्षणार्धात अनेक पावसाळलेल्या सहली डोळ्यांसमोरून तरळून गेल्या.

कॉलेजात होतो, तेव्हा आमचा "नेचर क्‍लब' नावाचा अभ्यासाच्या नावाखाली भटकंती करण्याचा (उनाडक्‍या म्हणा हवं तर!) क्‍लब होता. विशेषतः पावसाळ्यात या भटकंतीला बहर यायचा! एकदा पावसजवळ असंच "एक्‍सकर्शन'ला गेलो होतो. सकाळी कुठली तरी झाडं-पानं बघायची, त्यांचा अभ्यास वगैरे करायचा आणि दुपारी एकत्र जेवण, गाण्यांच्या भेंड्या, विविध गुणदर्शन वगैरे. संध्याकाळपर्यंत घरी परत, असा कार्यक्रम असायचा. दुपारची जेवणं वगैरे उरकली होती. नरडीही साफ करून घेतली होती. पावसच्या जवळच्या माळरानावर आम्ही होतो आणि तुफान पाऊस आला. कोकणातलाच पाऊस तो! त्यातून मोकळं माळरान आणि जुलैचा महिना! कुणाचीच त्याला अडवायची शामत नव्हती, आणि तोंड द्यायचीही! पावसाच्या तडाख्यात आम्ही मस्तपैकी सापडलो होतो. मोठ्या हरभऱ्याच्या आकाराचे ते टपोरे थेंब टणाटणा तोंडावर-अंगावर आपटत होते. छत्री-बित्रीनं तग धरण्याचा प्रश्‍नच नव्हता. वाराही सोसाट्याचा होता. कसेबसे त्या तडाख्यातून वाचून रस्त्यापर्यंत आलो. पाऊस थांबायची लक्षणं नव्हती. बऱ्याच वेळानं तो कमी झाला. एसटी गाड्या वेळेवर येण्याची चिन्हं नव्हतीच. आमची परतीची गाडी रत्नागिरीहून सुटलीच नसल्याचं समजलं. मग पर्यायी व्यवस्था बघणं आवश्‍यक होतं. शेवटी एक टेम्पो ठरवला. वाळूची वाहतूक करणारा टेम्पो होता तो. हौद्यातल्या काही फळ्या निसटल्या होत्या, काही मोडलेल्या होत्या. अख्खा माणूस मधून रस्त्यावर पडेल, अशी परिस्थिती होती. नशीब, वरती हूड (ताडपत्रीचं छप्पर) तरी होतं. सगळी मेंढरं टेम्पोत चढली. टेम्पोवालाही त्या घाटरस्त्यातून पावसाच्या तुफान माऱ्यातही "फॉर्म्युला वन'मध्ये भाग घेतल्यासारखाच टेम्पो चालवत होता. त्यामुळं आम्ही कधी उजव्या बाजूच्या, तर कधी डाव्या बाजूच्या मित्र-मैत्रिणींच्या भेटीला जात होतो. टेम्पोच्या हौद्याच्या कठड्यांना धरून जी मुलं उभ
ी होती, त्यांच्या हाताच्या आधारानं मध्यभागी मुलं-मुली उभ्या होत्या. हात जरा जरी सुटला, तरी रस्सीखेचीत दोरी सुटल्यावर जसे सगळे एकमेकांच्या अंगावर कोसळतात, तशी अवस्था होत होती. मध्येच कुणाचा पाय खाली जायचा, कुणी खांबावर आपटायचं! वर पावसाची मजा घ्यायला गाण्यांचा धिंगाणाही होताच.

आणखी एक पावसाळी अनुभव होता ढाक-भैरीचा. आमच्या क्‍लबबरोबर 31 डिसेंबरच्या रात्री आम्ही कामशेतजवळच्या ढाक-भैरीच्या ट्रेकला गेलो होतो. कामशेतवरून टेम्पोतून जायला आधीच धमाल आली होती. रात्री एका मित्राच्या टेंटमध्ये मस्त गाणी म्हणत बसलो होतो. बाकीचं पब्लिक देवळात जागा शोधून गुडूप झालं होतं. मी आणि आणखी दोन मित्रांची किशोरकुमारची गाणी रंगात आली होती. त्याच वेळी पाऊस आला. तिसरा जो होता, तो पावसासाठी आडोशाचं कारण दाखवून पळाला. मग आम्ही दोघंच राहिलो. बाहेर भरपूर पाऊस, तंबूतही खालून पाणी यायला लागलेलं, अशा स्थितीत आम्ही किशोरकुमारच्या दर्दभऱ्या गाण्यांच्या मैफलीत दंगून गेलो होतो. पहाटे तीन-चारला झोपलो असू. तेही देवळाच्या कातळामुळे थंडगार पडलेल्या गाभाऱ्यात, उंदरांच्या सहवासात!
पहिल्यांदा केलेला तोरणा ट्रेकही पावसाच्या उपस्थितीत असाच धम्माल झाला होता. जाताना धबधब्यात मनसोक्त भिजलो होतो आणि येताना एका बंधाऱ्याच्या अडवलेल्या पाण्यात! ड्यूक्‍स नोजच्या धबधब्याला तर पर्याय नाही!!
धबधब्याखाली मनसोक्त भिजायचं राहिलं तसं गेल्या वर्षी. ताम्हिणी घाटात एकदाही गेलो नाही. एकदा फक्त पौड रस्त्यालाच "लवासा सिटी'जवळ गेलो होतो. पण कारमधून गेलो होतो. त्यामुळं भिजलो नाही. शिवथरघळीलाही गेलो, तिथेही येताना भिजू म्हटलं आणि राहून गेलं. यंदा बरेच प्लॅन्स आहेत, पण अजून पावसाचा पत्ता नाहीये!
rain

Jun 14, 2009

चला जेजुरीला जाऊ...

jejuri1
नव्या अल्टोची पहिली अधिकृत ट्रिप तशी शिरगाव-प्रतिशिर्डीला झाली होती. पण ती पूर्ण वेळेची ट्रिप नव्हती. म्हणून गेल्या रविवारी जेजुरीला जायचं ठरवलं. जेजुरी हे काही फार आकर्षणाचं केंद्र नव्हतं, पण घरच्याही काही जणांना पाहायचं होतं, म्हणून तिकडे जाण्याचा बेत पक्का झाला.

सकाळी आठला निघायचा बेत पक्का करून साडेनऊपर्यंत निघालो. गाडीची प्रवासी क्षमता पूर्ण झाली होती. आमची लाडकी कन्या पुढची सीट अडवून बसली होती. जाताना सिंहगड रस्त्यानेच निघालो आणि देहूरोड-कात्रज बायपासवर गाडी घेतली. माझं रस्त्यांचं ज्ञान अगाध! गाडीच्या आणि ड्रायव्हिंगच्या नादात मस्त नवा बोगदा वगैरे पार करून खेड शिवापूरच्या जवळ आलो, तेव्हा कळलं, आपल्याला कात्रजमधून कोंढव्याला जायचं होतं!

पुन्हा कात्रजचा घाट उतरून जावंसं वाटेना. बराच पुढेही आलो होतो. म्हणून पुढे थांबून चौकशी केली. खेडशिवापूर दर्ग्यापासून थेट सासवडला जाण्याचा एक खुश्‍कीचा मार्ग असल्याचं कळलं. मग त्या दर्ग्याची दोन-तीन ठिकाणी चौकशी केली. कुणी एक किलोमीटर सांगितलं, कुणी चार किलोमीटर! शेवटी अपेक्षित तेच घडलं. तो दर्गा आणि त्याजवळची कमान की काय ती...ओलांडून आम्ही पुढे गेलो. तिथून पुन्हा वळता येईना. मग शेवटी नारायणपूरमार्गेच सासवडला जाण्याचा निर्णय घेतला. फुक्कटचा 45 रुपयांचा टोल भरावा लागला!

सासवडमार्गे जेजुरीला पोचायला साडेअकरा वाजले. जेजुरीत गाड्यांचा आणि गर्दीचा भयंकर राडा होता. रस्त्यात लोकांचा महापूर होता. त्यातून मार्ग काढत गाडी हाकावी लागत होती. पार्किंगची खासगी जागा पण दिव्यच होती. मी लग्नाआधी जेजुरीला गेलो होतो, तेव्हा मागे बऱ्याच अंतरावर चालत जाऊन कडेपठारापर्यंतही जाऊन आलो होतो. या वेळी उन्हामुळे आणि उशीर झाल्याने तो बेत रद्द करावा लागला.

jejuri2
जेजुरी मंदिरात दर्शनासाठी भलीमोठी रांग होती. त्यातून आमच्याजवळ तीन-तीन पोरांची लटांबरं होती. मग दर्शन न घेता, थोडा वेळ टेकून काढता पाय घेतला. येताना वाटेत पहिले एक-दोन ढाबे टाळून तिसरं हॉटेल पकडलं. तेही दिव्यच होतं. रोटी आणि काहीबाही भाजी अशी "मेजवानी' झाली. येताना मात्र कुठेही न चुकता, दिवेघाटमार्गे पुण्यात चारपर्यंत आलो.

jejuri3
ट्रिप तशी बरी झाली, पण फार "छान' नाही. अल्टो बरीच लांबवर पहिल्यांदाच चालवली, तो एक आनंददायी अनुभव होता. पण पाचवा गिअर टाकायला काही फारसं झेपलं नाही. बहुधा, पाचवा समजून मी तिसराच गिअर टाकत होतो! पुढच्या वेळी नव्यानं प्रयत्न करायला हवा. एसीदेखील चटकन काम करत नव्हता. पहिल्या सर्व्हिसिंगपर्यंत थांबून नंतर निर्णय घ्यायला हवा!
पुढची ट्रिप कुठे करावी, याचा सध्या विचार करतोय!

Jun 8, 2009

महिलाराज!

कामातून जरा निवांत वेळ काढून शरद यादव आज सकाळीच पाटण्यात फेरफटका मारायला निघाले होते. नितीशकुमार मुख्यमंत्री झाल्यापासून यादव तसे जरा अलिप्तच वागत होते. कुणी त्याला पक्षांतर्गत मतभेद म्हटलं, कुणी मत्सराचं नाव दिलं, तर कुणी "नेतृत्वाला पूर्ण स्वातंत्र्य देण्याचा मोठेपणा' असं नाव दिलं. काहीही असो, पूर्वीच्या जनता दलाच्या काळात शरद यादव या नावाला जे वजन होतं, ते आता राहिलं नव्हतं, हे मात्र खरं.
यादवांना आज जरा लोकांची मनं जाणून घ्यायची होती. "लालूराज' संपल्याच्या खुणा पाहायच्या होत्या. नव्या सुशासनाचा सुनियोजित कारभार स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवायचा होता. लोकसभेच्या प्रचाराच्या धामधुमीत त्याकडे लक्ष द्यायला जमलं नव्हतं. त्यातून त्यांच्याच पक्षातल्या फर्नांडिसांनी बंडाचं निशाण रोवून पक्षाच्या नाकीनऊ आणलं होतं. त्यांना निवृत्तीच्या वाटेला लावण्याची मोठी जबाबदारी यादवांनी पार पाडली होती. त्यामुळं त्यांना आता हायसं वाटत होतं.
बाजारपेठेतून चक्कर मारता मारता त्यांच्या असं लक्षात आलं, की काही वर्षांपूर्वीचं दहशतीचं सावट कुठच्या कुठं पळून गेलंय. नियमित व्यवहार सुरू आहेत. मुलं एकमेकांचा हात धरून शाळेत एकटी निघाली आहेत. आवश्‍यक तिथं पोलिसांचा पहारा आहे.
"चला, संयुक्त जनता दलाच्या राज्यात तरी गुन्हेगारी संपली, हे एक बरं झालं!' यादवांनी समाधानाचा सुस्कारा टाकला. पण जसजसे ते पुढे जाऊ लागले, तसतसं त्यांना वातावरण काहीसं वेगळं जाणवू लागलं. दुकानात सगळीकडे बायकाच वस्तू विक्री करीत होत्या. किराणा मालाच्या दुकानापासून मॉलपर्यंत आणि पार्लरपासून हार्डवेअरपर्यंत, सगळीकडे बायकाच बायका! सायकल आणि स्टोव्ह रिपेअरिंगसाठीही बायकाच होत्या!
काहीतरी गडबड आहे की काय, याची शहानिशा करायला यादव पोलिस ठाण्यात गेले, तर तिकडेही सगळ्या बायकाच! अस्वस्थ होऊन यादव बाहेर आले. बिहार बदललाय, अशी चर्चा त्यांनी ऐकली होती; पण सगळीकडे बायकांचं राज्य असण्याइतपत परिस्थिती आहे, याची त्यांना सुतराम कल्पना नव्हती. तरतरत ते तसेच घराकडे निघाले. सोबतच्या कार्यकर्त्यांची मागून पळताना दमछाक झाली.
काही निष्ठावंत लगेच घरी दाखल झाले. यादव घामाघूम होऊन घरी पोचले. सकाळच्या फेरफटक्‍याचा प्रसन्न मूड कुठच्या कुठं पळून गेला होता. आता काय बोलावं नि करावं, कुणालाच सुचत नव्हतं. कुणी त्यांना थंड पाणी दिलं, कुणी कोल्ड्रिंक आणून दिलं. कुणी सरबताचा पेला पुढे केला. कुणी फॅनचा स्पीड वाढवला. यादवांचं कशातच लक्ष नव्हतं.
""मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसात फोन लावा!'' यादव कडाडले.
लगेच फोन लावण्यासाठी कार्यकर्त्यांची धडपड सुरू झाली. पण प्रयत्न करूनही फोन लागेना, तसे यादव आणखी अस्वस्थ झाले. शेवटी बऱ्याच प्रयत्नांनंतर फोन लागला.
""मी शरद यादवांकडून बोलतोय. साहेबांना सीएमशी बोलायचंय!'' कार्यकर्त्यानं प्रस्तावना केली.
सीएमनी फोन घेतला. यादवांनी त्या कार्यकर्त्याकडून रिसीव्हर जवळपास ओढूनच घेतला.
""बोला!'' पलीकडून कुण्या महिलेचा आवाज आला.
""सीएम आहेत का? मला त्यांच्याशीच बोलायचंय.'' यादव गुश्‍श्‍यात म्हणाले.
""मी सीएमच बोलतेय.'' पलीकडून आवाज आला.
""अहो, काय चेष्टा करताय? तुम्ही नितीशकुमारांना फोन देता का?''
""नितीशजी आता सीएम नाहीत. त्यांनी मला सीएम केलंय. मी त्यांची पत्नी!'' फोनवरून खुलासा झाला.
यादवांच्या हातून रिसीव्हर गळूनच पडला. म्हणजे? नितीशकुमारांनी पण लालूंच्याच पावलावर पाऊल ठेवून बायकोला वारसदार केलं की काय? पक्षातल्या इतर नेत्यांना काही किंमतच नाही? या महिला एवढ्या डोईजड कशा झाल्या? महिला आरक्षण विधेयकामुळे?
""नाही नाही! मी हे होऊ देणार नाही! महिला आरक्षण विधेयक संसदेत मंजूर झालं, तर मी सभागृहात विष प्राशन करेन!'' यादव गरजले.
त्याच क्षणी त्यांची तंद्री भंगली. आपण घरी नाही, तर संसदेत आहोत, हे त्यांच्या लक्षात आलं. "मघाचं सगळं स्वप्न होतं तर!' ते मनाशी म्हणाले. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती...

May 31, 2009

स्टॅलिनशाही!

चेन्नईतल्या आपल्या निवासस्थानी करुणानिधी ऐटीत आपल्या सिंहासनावर बसले होते. पक्षाच्या आमदार-खासदारांची गर्दी झाली होती. करुणानिधींच्या सिंहासनाच्या डावीकडे होते त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र अळगिरी. त्यापलीकडे नातू दयानिधी मारन. उजवीकडच्या बाजूला पहिल्याच खुर्चीत होते त्यांचे दुसरे पुत्र स्टॅलिन. पलीकडे मुलगी कनिमुरी.
सगळ्यांचे चेहरे चिंताक्रांत होते. विषय गंभीर होता. काही झालं तरी तमीळ अस्मितेचा प्रश्‍न होता! तमिळनाडूच्या जनतेनं टाकलेल्या विश्‍वासाला पात्र ठरतील असेच प्रतिनिधी दिल्लीत पाठवणं आवश्‍यक होतं. करुणानिधींनी एकेकाला मत विचारायला सुरवात केली. पण कुणीच काही बोलायला तयार नव्हतं. पक्ष ठरवेल ते धोरण स्वीकारण्याची त्यांची तयारी होती. गेल्या वेळी "नापास' ठरवलेल्या टी. आर. बालू या विद्यार्थ्याला पुन्हा परीक्षेला बसण्याची इच्छा होती, पण दिल्लीतल्या हेडमास्तरांनीच त्याचं नाव नाकारल्यानं त्याचा इलाज चालत नव्हता. त्यानं एकदा चोरून हात वर करण्याचा प्रयत्न केला, पण करुणानिधींनी गॉगलआडच्या डोळ्यांनीच त्याला दटावलं. बालू आपला पुन्हा शहाण्या "बाळू'सारखे...आपलं.. बाळासारखे गप्प बसले.

कुणाचीच इच्छा नाही असं दिसल्यावर करुणानिधींनी पुन्हा एकदा सर्वांना संधी द्यायचं ठरवलं. तरीही कुणी हात वर करायला तयार होईना. ""ठीक आहे. कुणाचीच तयारी नसेल केंद्रात जायची, तर मला पक्षाचा प्रमुख म्हणून काहीतरी भूमिका घ्यावीच लागेल. दयानिधी गेल्या वेळीही सरकारमध्ये होता. तो केवळ माझा नातू म्हणून नव्हे, तर एक नेता म्हणून महत्त्वाचा आहे. त्याला यावेळीही केंद्रात पाठवू.'' करुणानिधी म्हणाले.
सगळ्यांनी टाळ्यांचा गजर केला.

""दूरसंचार क्षेत्रातली नवी क्रांती आमच्या पिढीला काही झेपत नाही. तिथे नव्या दमाचे लोक हवेत. आपण ए. राजाला पाठवू. चालेल?''
सगळ्यांनी पुन्हा गजर केला.

""आता अजून एक कॅबिनेट शिल्लक आहे. आहे का कुणाची इच्छा?'' करुणानिधींनी चौफेर नजर टाकली.
कुणाचाच आवाज आला नाही.

""ठीक आहे. पुन्हा एकदा मलाच हा निर्णय घ्यायला हवा. बाळ, तुला आहे का इच्छा केंद्रात जायची?'' करुणानिधींनी स्टॅलिनला विचारलं.
""नाही बाबा. मी राज्यातल्याच जनतेची सेवा करणार. मला पदबिद नको.''
""बरं. मग बाळ अळगिरी, तू दादा ना? जाशील का तू दिल्लीत?''
""ठीक आहे बाबा. जशी तुमची आज्ञा.'' अळगिरीनं नम्रतेनं होकार भरला.
""बाबा, मी पण जाणार दादाबरोबर!'' पलीकडे बसलेली कनिमुरी एकदम ओरडली.
""थांब. एकेकाला पाठवू आपण. तुला पण पाठवू हां पुढच्या वेळी!'' करुणानिधींनी समजूत काढली.
""बाबा, दादा केंद्रात जाणार असेल, तर तुम्हाला इथे एकटं एकटं होईल. शिवाय तुमची तब्येतही बरी नसते हल्ली. तुम्हाला मदत करायची इच्छा आहे माझी.'' स्टॅलिन करुणानिधींचं उपरणं खेचत म्हणाला.
""असं म्हणतोस? राज्याच्या कारभारात मलाही कुणाची तरी मदत हवीच आहे. मग उपमुख्यमंत्री होतोस का तू?''
""चालेल बाबा!''
""ठीक आहे. ठरलं तर. चला, सगळे निर्णय लोकशाहीनं झाले, हे एक बरं झालं!'' करुणानिधींनी सुटकेचा निःश्‍वास टाकला आणि सगळे नेते पांगले.