May 22, 2009

`गाडी` घसरली, सावरली...

साडेसाती एकदा मागे लागली, की तिचं समाधान होईपर्यंत पिच्छा सोडत नाही। गाडी बिघडण्याची साडेसाती अशीच गेले काही दिवस मागे लागली होती. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षणी पिडल्यानंतरच तिनं पाठ सोडली.
आमची मारुती गाडी चालकासह घेऊन आई-वडील रत्नागिरीहून इथे पुण्याला आले होते. माझी मावशीही सोबत होती. त्यांच्यासाठी म्हणून मी रजा टाकली होती. दुसऱ्या दिवशी रांजणगावला जायचा बेत आखला. साधारण 11 वाजता निघालो. घरापासून निघून पुढच्याच चौकात आलो होतो, तर पोलिसांनी गाडी बाजूला घेण्याचा इशारा केला. मी तर सिग्नल तोडला नव्हता, की झेब्रा क्रॉसिंग तुडवले नव्हते. "अपराध माझा असा काय झाला,' अशा पवित्र्यात मी भांडण्याच्या तयारीत होतो. तेव्हा समजलं, की सीटबेल्ट लावला नसल्यानं मला अडवण्यात आलंय. हे प्रकरण नवीन होतं. पुण्यात बेल्ट अत्यावश्‍यक आहे वगैरे ऐकलं होतं, पण पुण्यात कार चालविण्याची कधी वेळच आली नव्हती. प्रत्यक्षात आज आली आणि प्रथम ग्रासे मक्षिकापात जाहला. निमूटपणे काहीतरी कारणं सांगण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. शेवटी हो-नाही करता करता 50 रुपयांत मांडवली झाली. हुश्‍श करून पुढच्या प्रवासाला लागलो. पण पहिला अपशकुन झाला होता...जाताना प्रचंड रहदारी आणि रांगांमुळे पोचण्यास वेळ लागला. दुपारी जेवण करून निघालो. गाडी सुरू करण्यासाठी आलो, तर किल्लीच फिरेना. शेवटी बऱ्याच प्रयत्नांनंतर ती कशीबशी फिरली. गाडी सुरू झाली. येताना वाटेत दोन-तीनदा गाडी वेगात असताना अचानक बंद पडली. काय भानगड झाली, कळेना. बरेचदा किल्ली फिरवल्यानंतर ती पुन्हा सुरू होत होती. मला संध्याकाळी पाचला ऑफिस गाठायचं होतं. त्यामुळं पुण्यापर्यंत जाऊ आणि उद्या बघू, असं ठरवलं. शेवटी तीन-चारदा बंद पडून कोरेगाव भीमामध्ये पोचल्यानंतर गाडी हटूनच बसली. काही केल्या पुन्हा सुरू होईना. तिथे मेकॅनिक शोधणं भाग होतं. शिवाय, ऑफिसमध्ये माझ्याऐवजी पर्यायी व्यवस्था करण्याची दुहेरी जबाबदारीही सुरू झाली. फोनाफोनी करून काही व्यवस्था होते का, ते पाहिलं.
कोरेगाव भीमामध्ये मेकॅनिक शोधणं जिकिरीचं काम होतं. नशीबानं आमची गाडी बंद पडली, तो मुख्य बाजार होता. तिथेच जवळ एक गॅरेज होतं. तिथे जाऊन मेकॅनिकला गाठलं. त्यानं तपास केल्यावर बॅटरीतलं पाणी पूर्ण संपल्याचं निष्पन्न झालं. बाटलीभर पाणी ओतल्यानंतर भस्सकन वर आलं. मघाशी आम्हीही बॅटरीतलं पाणी तपासलं होतं....पण ते होतं ड्रायव्हर सीटखालचं. ते "वायपर'चं पाणी होतं, हे त्या मेकॅनिकनं सांगितल्यावर समजलं. पाणी पूर्णपणे संपल्यामुळे गाडी गरम झाली होती आणि बंद पडत होती. रबर कीटही जळालं होतं. गाडी लगेच दुरुस्त होणं शक्‍यच नव्हतं. तिथेच सोडून जाण्याशिवाय पर्याय नव्हता. आमच्या तिथल्या एका सहकाऱ्याला साकडं घातलं आणि तेही देवासारखे धावून आले. त्यांच्याच गाडीतून मग आम्ही सगळे पुण्याला अगदी घरापर्यंत आलो.दुसऱ्या दिवशी बसने जाऊन गाडी घेऊन येण्याचा उद्योग करावा लागला. या सगळ्या प्रकरणात सुमारे दीड हजार रुपये खर्च झाले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत गाडी बाहेर काढली नव्हती. संध्याकाळी बाजारात जाण्याची तयारी सुरू होण्याआधी एक छोट्या फेरीसाठी गाडी बाहेर काढली. येताना सोसायटीत आल्यावरच गाडी पुन्हा रुसली. गिअर पडत नव्हते आणि रेझ मात्र खूप होत होती. क्‍लचची गोची झाली होती. गाडी बाजूला लावून रिक्षानं जावं लागलं. त्यापुढच्या दिवशी ते काम करून घेतलं. तूर्त काम झालं होतं, तरी धाकधूक होतीच. रत्नागिरीपर्यंतचा प्रवास करायचा होता. सुदैवानं त्यानंतरच्या प्रवासात गाडीनं काही त्रास दिला नाही.
...पण माझ्या नेहमीच्या बाईकनं ती कसर भरून काढली। तिसऱ्याच दिवशी संध्याकाळी सातच्या एका मराठी चित्रपटाच्या प्रिमिअरला निघालो होतो। सिटीप्राईडच्या थोडेच अलीकडे बाईक अचानक पंक्‍चर झाली. तिथे दुकान शोधून पंक्‍चर काढून घेण्याएवढा वेळ नव्हता. गाडी तशीच रस्त्याच्या कडेला लावली. चित्रपट पाहिला. नंतर नऊ वाजता पंक्‍चरच्या दुकानाची शोधाशोध सुरू झाली. कुणी दुकान सोडून दुसरीकडे गेलेला होता, कुणी बंद करण्याच्या मार्गावर होता, कुणी येण्यास तयार नव्हता. कर्वे रोड फ्लायओव्हरपर्यंत फिरण्याची दगदग केली. काहीच उपयोग झाला नाही.रात्री पत्रकार परिषदेला जायचं होतं. ती आटोपल्यावर गाडी ढकलत घरी न्यावी, असा विचार केला. पण दोन-अडीच किलोमीटरचं अंतर होतं. रात्री अकराला एवढी गाडी ढकलणं म्हणजे दिव्यच होतं. हॉटेलातून मनाचा हिय्या करून निघालो खरा, पण अर्ध्या वाटेतच विचार बदलला. पुन्हा एकदा नशीबावर हवाला ठेवून गाडी उभी केली होती तिथेच रात्रभर सोडून चालत घरी आलो. सकाळी पंक्‍चर काढून घेण्याचं काम फारसं कठीण नव्हतं.दोन्ही गाड्यांनी असा मला मनसोक्त त्रास दिला, तेव्हाच त्यांची मनःशांती झाली.
---
असो। यंदाच्या कोकण दौऱ्यात दोन नवीन ठिकाणांना भेट दिली। जयगडजवळच्या कोळिसरे देवस्थानाला खूप लहानपणी गेलो होतो. यंदाच्या दौऱ्यात ते जमवलं. गाडी घेऊन सर्व जण गेलो होतो. अप्रतिम निसर्गसौंदर्य लाभलेलं हे ठिकाण कुणालाही हरवून टाकणारं आहे. गणपतीपुळ्याच्या रस्त्यावर, पण दहा किलोमीटर अलीकडे हे देवस्थान आहे. साधारणपणे इ.स. 150 वगैरे मध्ये त्याची स्थापना झाल्याचं सांगतात. लक्ष्मी-केशवाची मूर्ती आणि देवळाचं एकूण स्थानच डोळ्याचं पारणं फेडणारं आहे. दोन बाजूंना डोंगर, एकीकडे दरी आणि एकीकडे नदी, अशा या स्थानी मनाला शांतता लाभते. देवळाशेजारीच कायमस्वरूपी झरा हा निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळतो.माझ्या मामेभावाच्या सासुरवाडीला, कळझोंडी या गावालाही भेट दिली. त्यांचं घर सुंदरच होतं. कोकणात एवढं सुंदर घर मी अनेक वर्षांनी अनुभवलं. भरपूर आंबे खाल्ले. फणस मात्र यंदा वाट्याला आला नाही. एकदा बरका फणस आणून हाणला, तेवढाच. मनस्वीसुद्धा मांडी ठोकून गरे खायला बसली होती. काप्यापेक्षा बरक्‍याचंच तिला जास्त आकर्षण होतं. गणपतीपुळ्याला मात्र या वेळी गेलो नाही.आता पावसाळ्यात पुन्हा या भागात जाण्याचा विचार आहे. पाहूया!
----

ही काही प्रकाशचित्रं :
kokan1कोळिसरेचं निसर्गरम्य मंदिर.---------
kokan2मंदिराशेजारी असलेला कायमस्वरूपी झरा.-----kokan3पावसाळ्यात इथे काय धमाल येइल!---kokan5कळझोंडीचं टिपिकल कोकणी घर.--------kokan4देवळाकडे जाणारी वाट--------kokan6रत्नागिरीतला भगवती किल्ला. इथे भगवतीचं मंदिर आहे. नि अथांग पसरलेला समुद्र पण मनमोहक दिसतो. दीपस्तंभही आहे किल्ल्यावर.----kokan7किल्ल्याची भिंत.----kokan8समुद्रावर मनस्वी उंटावरून बागडली.----kokan9नंतर वाळूत मनसोक्त लोळली. ----------kokan12भरपूर भिजलीसुद्धा!----------बाकीचे फोटो पाहा इथे....

May 20, 2009

`उत्तर'क्रिया!

rajनिवडणूक निकालाची धामधूम संपल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून राज ठाकरे त्यांच्या नित्यक्रमाला लागले होते. नाही म्हटलं, तरी प्रचार संपूनही प्रत्यक्ष निकालापर्यंत गडबड कायम होतीच. बेरजा वजाबाक्‍यांची चर्चा सुरू होती, समीकरणं मांडली जात होती. प्रत्यक्ष निकालाच्या दिवशी तर मनसेची दिवाळीच साजरी झाली होती. पहिल्याच निवडणुकीत अनेक उमेदवारांनी लाख-दीड लाख मतांपर्यंत बाजी मारली होती. अधिक जोर लावला असता, तर आणखी काही जागा जिंकलोही असतो, अशी परिस्थिती होती. लोकांच्या अगदी "मनसे' प्रतिसादामुळं सगळेच भारावले होते. राजसाहेबांनाही मतदारांनी दाखविलेल्या प्रचंड अभिमानाबद्दल श्रमांचं सार्थक झाल्यासारखं वाटत होतं.
दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांतही त्यांच्या कर्तृत्वाचं, पक्षाच्या यशाचं गुणगान आलं होतं. ते वाचतानाही राजसाहेब प्रसन्न हसले. आपल्या लाडक्‍या कुत्र्याला त्यांनी गोंजारलं. नेहमीप्रमाणं त्याला सकाळी फिरायलाही नेऊन आणलं. शुभेच्छांचे फोन निकालाच्या सकाळी जे सुरू झाले, ते रात्री बारा-साडेबारापर्यंत सुरू होते. दुसऱ्या दिवशी सकाळीही हा "सिलसिला' संपला नव्हता. अनेकांच्या शुभेच्छा झेलत झेलतच राजसाहेबांनी आन्हिके उरकली. तेवढ्यात कुणा नेत्याचाच फोन आला.
""लक्षात ठेवा. एवढ्या यशानं हुरळून जायचं नाही. बाकीचे नालायक पक्ष लोकांना नको आहेत, हे त्यांनी दाखवून दिलंय. आता विधानसभेला अजिबात गाफील राहू नका. विजय आपलाच आहे!'' त्यांनी करड्या आवाजात सुनावलं. आपण अभिनंदन करायला फोन केला, की नेहमीची दटावणी ऐकायला, असाच प्रश्‍न त्या बिचाऱ्या नेत्याला पडला असावा.
""असो. बोला, तुमचं काय काम होतं ते!'' राजसाहेब म्हणाले.
पलीकडून बोलणाऱ्यानं त्याचं काम सांगितलं.
""सत्कारच ना? मी फार सत्कार-बित्काराच्या फंदात पडणारा माणूस नाही. पण पक्षाची ताकद सिद्ध झालेय. त्यानिमित्तानं मी सत्कार स्वीकारायला तयार आहे. कुठे आहे कार्यक्रम?''
""मुंबईतच आहे साहेब!'' कार्यकर्त्यानं सांगितलं.
""ठीक आहे. येईन मी. पण वेळेत सुरू करा आणि वेळात आटपा. बरीच कामं बाकी आहेत.'' राजसाहेबांनी पुन्हा सुनावलं.
पुढचे काही दिवस शुभेच्छा आणि अभिनंदनं झेलण्यात गेले. इतर पक्षांची संसदीय समितीची बैठक होते, तशी मनसेची लोकसभेतल्या सर्व (पराभूत) उमेदवारांची बैठक झाली. विधानसभेसाठीच्या रणनीतीवर चर्चा झाली.
असेच काही दिवस धामधुमीत गेले आणि प्रत्यक्ष सत्काराचा दिवस उजाडला. सगळी तयारी झाली होती. राजसाहेब मोठ्या प्रसन्न मुद्रेनं सत्काराच्या ठिकाणी गेले. कार्यक्रमाची आखणी भव्य स्वरूपाची होती. मात्र, सुरुवातीपासून संजय निरुपम, गुरूदास कामत आणि अन्य काही नेत्यांची छायाचित्रं बघून ते काहीसे अस्वस्थ झाले. उत्तर भारतीय संघटनांच्या नावांच्या पाट्याही ठिकठिकाणी झळकत होत्या. "मनसेची ताकद पाहून उत्तर भारतीयही वठणीवर आले की नाही! माझ्या सत्कारातही त्यांनी अभिनंदनाच्या पाट्या लावल्या आहेत!!' राजसाहेब मनाशीच म्हणाले.
कार्यक्रमाचं स्वरूप थोडं निराळं होतं. आधी राजसाहेबांचं भाषण आणि नंतर सत्कार, अशी रचना होती. बाकीच्या नेत्यांची भाषणं झाल्यावरच राजसाहेब सभास्थळी आले होते. आल्याआल्या काही मिनिटांतच त्यांचं भाषण सुरू झालं. नेहमीप्रमाणे मनसेची गरज, ताकद, मतदारांनी दाखविलेला विश्‍वास, महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचं कार्य, याविषयी ते बोलले. मग ओघानंच बिहारी आणि उत्तर भारतीय नेत्यांवर आणि लोकांवर त्यांनी आग ओकायला सुरवात केली. व्यासपीठावरचे अन्य लोक काहीसे अस्वस्थ झालेले आढळले. लोकांमध्येही टाळ्या-शिट्ट्या आणि जल्लोषाऐवजी अस्वस्थता दिसत होती. तेवढ्यात कुणीतरी राजसाहेबांचा शर्ट ओढला. "इन' बाहेर आल्यानं ते थोडेसे संतापलेले दिसले.
""साहेब, उत्तर भारतीयांवर आणि बिहारींवर जास्त टीका करू नका. त्यांनीच हा सत्कार आयोजित केलाय! मनसेच्या उमेदवारांना मिळालेल्या प्रचंड मतांमुळेच मुंबईत युतीचे उमेदवार पडले ना, म्हणून!'' तो कार्यकर्ता कुजबुजला.
""काय?'' राजसाहेब उडालेच. मग त्यांची नजर व्यासपीठावरच्या फलकांकडे गेली. "उत्तर भारतीय और बिहारी उम्मीदवारों को लोकसभा पर प्रतिनिधित्व देने में मदद के लिये "मनसे' का धन्यवाद' असे लिहिले होते!!

May 18, 2009

लग्न म्हणजे...

आयुष्याच्या एका टप्प्यावर कुणाची तरी साथ हवीशी वाटते...
निर्णय कसा घ्यायचा, हे मात्र ठरलेलं नसतं.
"अमक्‍याची तमकी लग्नाची आहे...' कुणीतरी सुचवतं. "तमका तुला अगदी शोभून दिसेल हो!' भोचक शेजारीण काकू मध्येच नाक खुपसतात.
प्रत्यक्ष निर्णय आपल्यालाच घ्यायचा असतो. पण तो घ्यायचा कसा, याचा घोळ सुटत नाही...

कुणी वधू-वर केंद्रात जाण्यासाठी सुचवतं.
"ऑनलाइनच जमव हो!' कुणी सांगतं.
प्रत्यक्षात वधू-वर सूचक केंद्राच्या वाऱ्या आणि ऑनलाइन मनजुळवणीचा खेळ काही झेपणारा नसतो.
मग जमवायचं कसं?
अनेकांपुढे प्रश्‍न असतो.
.....
पालकांचं वेगळंच म्हणणं असतं.
"आम्ही बघू तो मुलगा हिला पसंत पडत नाही. कुणाचं नाक पुढे, तर कुणी अगदीच "हॅ..' दिसतो म्हणे!! आणायचा कुठून हिला साजेसा मुलगा?'
"ह्याला नक्की कशी मुलगी हवेय, त्याचाच पत्ता लागत नाही. सुंदर, देखणी मुलगी आणली, तर ती अकलेचा खंदक आहे म्हणतो!'
पालकांच्या चर्चांत डोकावलं, तर हेच सूर आळवलेले ऐकायला मिळतात.
...
पालकांच्या अपेक्षा आणि मुलांच्या निवडीचा मेळ साधता येईल?
याचाच वेध घेण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत...
विवाहेच्छू मुले-मुली आणि पालकांच्या एका अनोख्या मेळाव्यातून...
....
मुला-मुलींचा परस्पर परिचय व्हावा, व्यक्तिमत्त्वं ओळखता यावीत, गप्पा-संवाद व्हावा आणि त्यातून जोडीदार निवडीची संधी मिळावी, या उद्देशानं हा कार्यक्रम आयोजित केला आहे...
कधी? ः 23 मे, 2009, शनिवार. सायं. 5 ते 9.
कुणासाठी ः तूर्त तरी ब्राह्मण समाजासाठी. (पहिल्या टप्प्यात एवढंच!)
स्थळ ः स्वस्तिश्री सभागृह, सरस्वती विद्या मंदिरासमोर, बाजीराव रस्ता, पुणे.
फी? ः अर्थातच आहे! अल्पोपाहारासहित. (अधिक उत्सुकता असलेल्यांना खासगीत सांगितली जाईल.)
यायचा विचार आहे? इथे प्रतिक्रिया टाका. तुमचा नंबरही द्या. नाहीतर मला abhi.pendharkar@gmail.com वर कळवा. जमवूया

May 4, 2009

आपला तो संस्कार, त्यांचा तो उर्मटपणा!

आमची मुलगी सध्या हिंदी शिकतेय. म्हणजे, तसं ती गेली दोन वर्षं शिकतेय! (शिकवायला बापच ..सॉरी...पिताश्री असल्यावर कसं व्हायचं पोरीचं?) पिताश्रींनी तिला इंग्रजी-हिंदी शिकवायचं व्रत घेतल्याला काही वर्षं लोटली. (आधी स्वतः शिका म्हणावं!) आता ती "पाच मिनिट थांबो' अशा दर्जाचं हिंदी बोलतेय. जमलं नाही, तर तोंडाला येईल ते ठोकून देते. (पिताश्रींची परीक्षेतली सवय!) काही महिन्यांपूर्वी असंच तिला कळू नये म्हणून मी आणि बायको एक विषय इंग्रजीतून बोलत होतो. ("तसलं' काहीही बोलत नव्हतो! चहाटळ कुठले! "तसलं' मराठीतून बोलायची बोंब. इंग्रजीतून काय बोलताय?) थोडा वेळ पाहिलं पाहिलं आणि पोरगी वैतागली. "ए..."मराठी'तून बोलू नका!' तिनं फर्मान सोडलं. आम्ही ज्या भाषेतून बोलतोय, ते "मराठी' असल्याचा तिचा समज झाला होता.
असो. सांगायचा विषय वेगळाच होता. सध्या लेकीचा आणि तिच्या पालकांचा (विशेषतः पिताश्रींचा) संघर्ष चालला आहे, तो उलट आणि उर्मट बोलण्यावरून! तिच्या बालसुलभ आणि निरागसता का काय म्हणतात त्या गुणांनी मीच अंतर्मुख होऊन एकूणच उर्मटपणाबद्दल विचारांच्या गर्तेत सापडलो आहे.

उदा क्र. 1.
घरात मी आणि मुलगी. मला संगणकावर काम करायचं आहे आणि तिलाही तेच "खेळणं' हवंय. काही केल्या मला काम करू देत नाहीये. झोप सांगितलं, तरी झोपायला जात नाहीये, पसारा पाडून ठेवला आहे. शेवटी कशावर तरी वैतागून मी तिला "आधी ऊठ आणि पसारा आवर' असा काहीतरी दम देतो. ती ज्या कामात गुंतली आहे, त्यात अजिबात फरक पडू न देता ती माझ्याकडे चक्क दुर्लक्ष करते. (आईवर गेलेय कार्टी!) पुन्हा मी आवाज चढवून तेच वाक्‍य उच्चारतो. आता माझा रुद्रावतार पाहून तरी ही कामाकडे वळेल, अशी अपेक्षा. पण ती थंडपणे ऐकवते - "बाबा, असं ओरडायचं नाही. सरळ सांगायचं - "तुझ्या हातातलं काम झालं, की आवर पसारा. हेच आवडत नाही मला तुमचं!'
मी गार!!
कधीतरी हेच आम्ही तिला ऐकवलेलं असतं. एखाद्या कामात असताना गोष्ट सांगण्यासाठी किंवा खेळण्यासाठी ती हट्टाला पेटल्यावर आम्ही तिला हेच वाक्‍य सुनावलेलं असतं. ते बरोब्बर लक्षात ठेवून त्याची सव्याज परतफेड ती आम्हाला अशा प्रसंगी करते.

उदा क्र. 2.
भातुकली घरभर केल्यानंतर किंवा खेळणी गावभर टाकल्यानंतर ती आवरण्याचं नाव नाहीये. मग तिला आधी समजावून, नंतर दटावून आणि शेवटी दम देऊन पाहिलं जातं. त्यावर ती "तुम्हीच आवरा तो पसारा' असं सरळ सांगून मोकळी होते. मग "तुला देवबाप्पाने हात दिलेत की नाही? मग आपला पसारा आपणच आवरायचा!' असंही कधीकधी तोंडून निघून जातं. आपल्याला हेच पुन्हा ऐकायला लागणार आहे, याची त्या वेळी सुतराम कल्पना नसते.
एखाद्या वेळी, एखादी गोष्ट तिला आणून द्यायला सांगितली, की मग "तुम्हाला देवबाप्पाने हात दिले नाहीयेत का?' हे ऐकावं लागतं. आंबे खाताना एखादी जरी साल तिच्या ताटात टाकली, तरी "तुमची साल आहे ना, तुम्हीच टाका मग डब्यात!' असंही सहन करून घ्यावं लागतं. कारण आधी कधीतरी तिला शिस्त लागावी म्हणून तिला हेच वाक्‍य आम्ही ऐकवलेलं असतं.

उदा क्र. 3.
"असं वागायला वेडी आहेस का?' हे वाक्‍य तर घरोघरच्या पिलावळीसमोरचं "टेंप्लेट' असावं. शहाण्यासारखं वागणं म्हणजे काय, हे समजावताना आपण त्याचा सर्रास उपयोग करतो. हेच वाक्‍य पाहुण्यांसमोर आपल्याबाबत वापरून मुलं आपली "शोभा' करतात.
---
"आपण मुलांना शिकवणं म्हणजे संस्कार. त्यांनी आपल्याला शिकवणं म्हणजे उर्मटपणा' अशी ग्राफिटी काही महिन्यांपूर्वी लिहिली होती. सध्या त्याचाच अनुभव घेतोय!

Apr 22, 2009

आमचा पण `गजनी'

"अण्णू गोगट्या होणे म्हणजे पडणे' हा वाक्‍प्रचार जसा अंतू बर्व्यानं मराठी भाषेला बहाल केला, तसा "कोणतीही गोष्ट उठसूट विसरणे म्हणजे एखाद्याचा "गजनी' होणे' हा वाक्‍प्रचार ए. मुरुगदासने बहाल केलेला म्हणायला हवा. तर, माझा सध्या असा "गजनी' झालाय.एखादी प्रचंड इंटरेस्टची गोष्ट वगळता, बहुतेक सगळं विसरायला होतं. मध्यंतरी "अल्झायमर'चा पण कदा भास झाला होता. पण मी रोज नेमानं (माझ्याच) घरी जातो. त्यात काही विसरायला होत नाही. त्यामुळं ती शक्‍यता मावळली. "गजनी' पाहिल्यावर असं कळलं, आपला पण "गजनी' झाला असावा. (तसंही, "लहानपणी डोक्‍यावर पडला होतास काय,' ही प्रशंसा जागोजागी ऐकावी लागतेच!) या "गजनी'पणाचे किस्से अनेक आहेत. एकदा-दोनदा भेटलेली माणसं, त्यांचे चेहरे, नावं, महत्त्वाचे निरोप, संदेश हे तर हमखास विसरले जातातच. बायकोनं सांगितलेले निरोपही जेव्हा मी विसरतो, केव्हा "माझं लक्षच नव्हतं,' असं उत्तर देतो, तेव्हा मात्र माझी काही खैर नसते. पूर्वी अतिप्रिय आणि तोंडपाठ असलेली चित्रपटांची, संगीतकारांची, कलाकारांची नावंही मी हल्ली धडाधड विसरतो. "अर्रर्र...जिभेवर आहे अगदी नाव!' असं अनेकदा होतं. अंथरुणात लोळत पडलेलं असताना सुचलेली ग्राफिटीही तासाभरानंतर आठवू म्हणता आठवत नाही!त्यामुळं कुठल्या तरी कार्यक्रमात किंवा अनेक वर्षांपूर्वी कुठल्या ट्रेकला किंवा संस्थेत भेटलेली व्यक्ती पुन्हा भेटल्यावर "काय, ओळखलं का?' असं विचारते, तेव्हा माझा चेहरा पाहण्यासारखा होतो. मग काहितरी विषय काढून, इकडच्या तिकडच्या गप्पा मारून त्या माणसाची पार्श्‍वभूमी जाणून घ्यायचा प्रयत्न मी करतो. म्हणजे, ही व्यक्ती रत्नागिरीची, पुण्याची का अन्य कुठल्या ओळखीची आहे, याचा आधी अंदाज घ्यायचा. मग त्यातून "कसं काय चाललंय,' "नवीन काय' वगैरे निरर्थक, पण सूचक प्रश्‍न विचारून साधारणपणे काही सुगावा लागतो का, हे पाहायचं. अगदीच नाही जमलं, तर मग थेट सांगून टाकायचं - "नाही बुवा ओळखलं!' ओळखल्यावरही, नाव माझ्या लक्षात नसतं, ते वेगळंच! विसरभोळेपणाचा किस्सा आजच मुद्दाम सांगण्याजोगं कारणही तसंच घडलं. दुपारी घरी आलो आणि "जेवताना काही पातळ पदार्थ नाही,' म्हणून बायकोचा(मनातल्या मनात) यथेच्छ उद्धार केला. मग ताक दिसल्यावर स्वतःच कढी करायचं ठरवलं. छान फोडणी वगैरे करून, मिरच्या, कढीलिंब, कोथिंबिर वगैरे घालून कढी केली. जरा जास्त गरम करावी म्हणून गॅसची आच वाढवली आणि घात झाला! चोथा आणि पाणी वेगवेगळं झालं. दोघांचा समेट काही होईना. सगळं मिश्रण तसंच्या तसं फेकून द्यायचं जिवावर आलं. निदान कोथिंबिर, कढीलिंब तरी वाचवू, म्हणून तेवढाच अलगद काढून घेतला. नव्यानं फोडणी करून, त्यात तो घातला. पण हे प्रकरण काही जमणार नाही आणि ताक पुन्हा फुकट जाईल, एवढं पूर्वानुभवानं कळलं. इकडे मनस्वीचं "बाबा, तुम्हाला किती वेळीा सांगितलं, कढी करू नका म्हणून! मला आवडत नाही!!' हे टुमणं सुरूच होतं. पुन्हा ते मिश्रण थेट फेकून दिलं आणि पातेलं धुवून तिसऱ्यांदा फोडणी केली. या वेळेला मात्र जरा काळजी घेऊनच गरम केली. बरी झाली. भात वगैरे खाऊन झाला, वामकुक्षीही झाली आणि संध्याकाळी बायको आल्यावर कढीची पाककृती विचारून घेतली. (दुपारीच विचारली असती, तर "इगो' दुखावला गेला असता ना!) "कढीच्या ताकात डाळीचं पीठ मिसळायचं असतं.' (एवढीही अक्कल नाही का तुला?) असं तिनं नम्रपणे सांगितलं. तेलाऐवजी तुपाची फोडणी असते, अशी ज्ञानात नवी भरही घातली. सगळ्यात कहर त्यानंतरचा होता. तिनं कालच करून ठेवलेलं टॉमेटोचं सार शिल्लक होतं. मी ते पाहिलंही होतं आणि भातावर घेण्यासाठी मायक्रोवेव्हमध्ये गरम करायला ठेवलं होतं. थेट भातावर घेऊ, म्हणून तिथे तसंच ठेवलं होतं. आणि त्याच्या शेजारीच उभं राहून, "काहितरी पातळ पदार्थ करायला काय होतं हिला!' अशी निंदानालस्ती करीत कढीचे प्रयोग केले होते!! दुपारी चार वाजता हे लक्षात आल्यावर मी कपाळावर हात मारून घेतला. बायकोकडून उद्धार झाला, तो वेगळाच!!
- हा किस्सा विसरण्याआधी लिहून टाकावा म्हटलं. म्हणूनच ही घाईघाईतली पोस्ट!
आमचा पण `गजनी'