Jan 22, 2008

गोष्ट `मनस्वी`च्या मनस्वितेची!


बरेच दिवस लिहीन, लिहीन म्हणत होतो, पण मुहूर्तच सापडेना.
आज प्रकर्षानं लिहावंसं वाटतंय.आमच्या कार्टीबद्दल!
अर्थात, आमची लाडकी मनस्वी. एकुलती एक मुलगी. आम्ही तिला लाडानं "कार्टी' म्हणतो. आम्ही म्हणजे, अर्थातच मी!

आपल्या मुलाचं कौतुक प्रत्येकालाच करावंसं वाटतं. त्यामुळं आमची पोरगी काही जगावेगळं करतेय, असं नाही, पण ते जगावेगळंच आहे, असा एक पिता म्हणून माझा ठाम विश्‍वास आणि दावा आहे. त्यामुळं तुम्हाला ते फारच पर्सनल किंवा आगाऊपणाचं वाटत असेल, तर सोडून द्या बापडं!ही कार्टी हल्ली फारच शेफारलेय. तीन वर्षांची झाल्यामुळं तिला जास्तच शिंग फुटल्येत. त्यातून शाळेत काय काय शिकून येते आणि घरी आमची शाळा घेत असते. कधीकधी पोरं मोठ्यांचं ऐकून मोठ्यांसारखं बोलायला जातात आणि त्यातून आपल्याला हसू आवरेनासं होतं. काल तिला पाळणाघरात सोडायला निघालो होतो. मला ऑफिसला जायची घाई होती आणि कोणत्याही परिस्थितीत तिला तिकडे राहण्यासाठी पटवणं भाग होतं. तर मलाच म्हणते कशी, "बाबा, तुम्ही का..............ही काळजी करू नका. मी राहीन काकूंकडे. तुम्ही जा ऑफिसला.'

मी चाटच पडलो.
तीन वर्षांच्या चिमुरडीला एवढी अक्कल? कुठून तरी ऐकायचं आणि फेकायचं आयशी-बापसाच्या तोंडावर!परवा मला म्हणते, "बाबा, तुम्ही आईचे कोण आहे? (पुणेरी ना! "तुम्ही कोण आहे' हीच भाषा. "तुम्ही कोण आहात' नाही!) नवरा ना?'

मी पुन्हा फ्लॅट.

आज हा किस्सा माझ्या मेव्हणीला सांगितला, तर पुढे तुळशीपत्र जोडलं, "आणि आई तुमची कोण? "नवरी' ना?'घरी रिकामी असली, की सगळे खेळ काढून आणि तिची पुस्तकं, फळं, चित्रं मांडून आमचीच परीक्षा घेत असते. मग आम्ही तिच्या शाळेतले कणाद, यश, अथर्व, स्वराली, रमा वगैरे कुणीतरी असतो आणि ती आमची दीप्ती किंवा प्राची टीचर!मग एकेक वस्तू रुमालात लपवायची आणि आम्हाला ओळखायला सांगायची. आता ती लपवताना तिनं बघितलेली असते. पण आम्ही कशी ओळखणार? मग अंदाजे काहितरी ठोकून द्यायचं. ते चुकलं, तर पटत नाही. पण यदाकदाचित बरोबर आलं, तर आम्हाला शंभरपैकी शंभर मार्क!सध्या आमच्या दोघांच्याही नोकऱ्यामुळे तिचे थोडेसे हाल होताहेत. म्हणजे, तीन तास शाळेव्यतिरिक्त दोन तास पाळणाघरात राहावं लागतं. दुपारी कार्टी झोपत नाही तिथे आणि मग रात्री सात-साडेसातलाच झोपून जाते. पण एकूण मजेत आहे. ती आणि तिच्यामुळे आम्हीही!
--------

7 comments:

swapna said...

hey gr8 yaar!!!!!!!!!
swatachya mulanbaddal pratyekala abhiman ha asatoch pan fakt tuzyasarakha shabdat sagalyana wakta karata yet nahi awadhach.
karan tu hadacha lekhak aahes!!!!!!!!
BORN TO WRITE!!!!!!!!!!!!

संवादिनी said...

छान. खरंच आहे. आपल्या मुलाबद्धल असावंच कौतूक.

संवादिनी said...
This comment has been removed by the author.
संवादिनी said...

छान. खरंच आहे. आपल्या मुलाबद्धल असावंच कौतूक.

Jaswandi said...

mast!!

Anonymous said...

kharachh chhan vatale vachun---ani Manasvi baddal tumhala MANASVI ABHIMAN ahe ( to pratyek palakala asatoch) he pan chhan----!
--pan karti peksha better shabda shodha ki jara.....

यशोधरा said...

kasalii cute chimuradee aahe re tujhee!! bhalatich cute!! :)
'karti' haach premacha shabda aathavalaa naa?? :D shobhatos bara kaa kokanaatalaa :D