या नावाचं एक झकास नाटक आहे.मला त्याविषयी बोलायचं नाहीये. मी माझ्या खर्याखुर्या छातीत दुखण्याविषयी सांगणार आहे.
गेल्या आठवड्यात एके दिवशी भल्या पहाटे सात वाजता उठलो, तो छातीतलं दुखणं घेऊनच. (म्हणजे, तसं, कॉलेजात, कोवळ्या वयात झालेल्या आणि ह्रुदयाला कायमच्या झालेल्या अनेक भळभळत्या (आणि भलभलत्या) जखमा रोजच त्रास देत असतात, पण तो विषय वेगळा. ते प्लटोनिक दु:ख म्हणा हवं तर!) खरंच माझ्या छातीत दुखत होतं. उभं राहिल्यावर कळ मारत होती, आणि झोपल्यावर तर ती सहन होत नव्हती. (बायको सोडून) तसा कुणाच्या बापाला न घाबरणारा मी जरासा टरकलोच. म्हटलं आधीच या ८४ किलोच्या अवजड देहाचा भार थोडासा हलका करा, म्हणून काही डॉक्तरांनी आणि नतद्रष्ट मित्रांनी दिलेला सल्ला! त्यात हे निमित्त! संपल आता आपलं ऐशोरामी आयुःय! अभिजितराव, उद्यापासून ५ वाजता उठून प्राणायाम-योगासनं वगैरे सुरू करायला लागणार!
त्यातून बायको हा प्राणी आधी स्वतह घाबरण्यासाठी आणि नंतर दुसर्याला घाबरवण्यासाठीच असतो ना!``काही सिरियस तर नसेल ना? आजच डॉक्तरांकडे जाऊन ये.'' आमच्या आदरणीय आणि परमप्रिय अर्धांगिनीचा अर्धांग वायू होईल, असा सल्ला. (म्हणजे ही विम्याच्या पैशांचा हिशेब करायला मोकळी!)मग सकाळीच डॉक्टरांच्या दवाखान्याचे उंबरे झिजवणं आलं! त्यांनी तपासून `अगदी किरकोळ मस्क्युलर पेन आहे' वगैरे सांगितलंच, पण वर आपला एक सुरक्षिततेचा उपाय म्हणून ई.सी.जी. करून घ्या, अशी मेखही मारून ठेवली.
झालं! पुन्हा टेन्शन! काय होईल नि काय नाहीए!शेवटी एका नरससमोर अर्धनग्न होउन (शर्ट काढून...ते कंपल्सरी असतं! इच्छा-अनिच्छेचा सवाल नाही!) छातीला कसल्या-कसल्या त्युबा चिकटवून आणि घाणेरडं, चिकट, बुळबुळीत रोगण लावून ई.सी.जी. करून घेतला.दोण दिवसांनी रिपोर्ट आणला. सगळं काही नॉर्मल होतलं, असं डॉक्टरांकडे जाऊनच कळलं.
निघताना डॉक्टर म्हणाले, `या रिपोर्टची झेरॉक्स काढून ठेवा. म्हणजे, नंतर कधी पुन्हा ई.सी.जी काढाल, तेव्हा तो याच्याशी ताडून पाहता येइल.
मी `तथास्तु' म्हटलं, आणि बाहेर पडलो!
1 comment:
Post a Comment