Jul 11, 2008

किस बाबा किस!

----------
बोंबला!
साधारणपणे डझनभर विवाहसंस्थांचे उंबरे झिजवल्यानंतर, चहा-पोह्यांचे पन्नासेक कार्यक्रम यथासांग पार पाडल्यानंतर आणि विवाहेच्छू युवतींच्या मनांच्या सागरांतल्या गर्तांमध्ये गटांगळ्या खाल्ल्यांनंतर आज "हा हंत हंत' म्हणण्याची वेळ आमच्यावर आली आहे. म्हणजे, एवढ्या दिवसांची, आठवड्यांची, वर्षांची मेहनत वायाच गेली म्हणायची! विवाहेच्छू तरुणी या तरुणांचे व्यक्तिमत्त्व, पगार, घरची श्रीमंती, लफड्यांची पार्श्‍वभूमी, वाईट (नसलेल्या) सवयी, घरातल्या अडचणीच्या ठरू शकणाऱ्या गोष्टी (उदा. लग्न न झालेली नणंद, संसारातच पाय अडकलेली सासू वगैरे), घरातलं राहणीमान (वॉशिंग मशीन, फ्लॅट्रॉन टीव्ही, चारचाकी वगैरे), राहण्याचे ठिकाण (शक्‍यतो कोथरूड ः बिबवेवाडी, कॅम्प "चालेल') आदी निकष लावून (सूचना ः निकष प्राधान्यक्रमानुसार असतीलच, असे नाही.) नवऱ्याची निवड करतात, असा आमचा आतापर्यंत समज होता. त्यासाठी कधी नव्हे ते पार्लरमध्ये जाऊन केसांचे सेटिंग, (पुरुष मसाजरकडून) फेस मसाज, डिझायनर कपडे वगैरे अप-टु-डेट राहण्याचा आमचा प्रयत्न चालला होता. पण हाय रे कर्मा! "हेचि फळ काय मम तपाला' असे म्हणण्याची वेळ आमच्यावर अमेरिकेतल्या एका संशोधनाने आणली आहे.
सोबत या संशोधनाचा "महाराष्ट्र टाइम्स'मधील धागा जोडला आहे. या धाग्याने आमच्या भावी संसाराच्या सुखी स्वप्नांना टराटरा फाडले आहे. (अगदी हिमेश रेशमिया स्वरांन फाडतो, तसे!) म्हणजे, विवाहेच्छू तरुणांकडे असलेली "उत्तमरीत्या चुंबन घेण्याची कला' ही तरुणींना सर्वाधिक आकर्षित करते तर?
आम्हाला ही माहिती अगदीच नवी होती. एकतर हल्लीच्या मुली एवढ्या सुधारल्या आहेत, याची आम्हाला सुतराम कल्पना नव्हती. कांद्यापोह्यांच्या कार्यक्रमात मुली अगदी पायाने जमीन उकरत नसल्या, तरी अगदीच नाकाने कांदे सोलत नाहीत, असा आमचा आपला एक समज होता. पण पहिल्याच कार्यक्रमात एका आधुनिक उपवर तरुणीने आम्हाला पोह्यांच्या बशीसह तोंडघशी पाडले! चक्क "एचआयव्ही टेस्ट' केली आहे काय, हे विचारून! नशीब, तिने रिपोर्टची झेरॉक्‍स आणून द्यायला सांगितली नाही!
तेव्हापासूनच मुलींच्या आधुनिकतेचा अंदाज यायला लागला होता. पण हा म्हणजे कहर झाला. उत्तम चुंबनकला, हीच मुलींवर प्रभाव टाकण्याची एकमेव कला आहे, हे तेव्हा कळले असते, तर पहिल्याच मुलीला भेटल्यावर आमचा ऑफिसातला हुद्दा सांगण्याआधी उत्तम चुंबनाचे प्रात्यक्षिकच आम्ही दाखवले असते!
अर्थात, चुंबनातले आम्ही कुणी जाणकार तज्ज्ञ नव्हे. पण वर्षानुवर्षं चुंबनाची जी प्रात्यक्षिकं आम्ही रुपेरी पडद्यावर पाहत आलो आहोत, त्यांचा प्रत्यक्षात उपयोग करण्याची ही नामी संधी होती. बाकी, चुंबनकला अवगत नाही, म्हणून आमची प्रेयसी आम्हाला टाकून दुसऱ्यावर प्रभावित होण्याचा प्रश्‍नच नव्हता. कारण, मुदलात, त्यासाठी आधी कुणी आमच्यावर भाळणं आवश्‍यक होतं! त्यामुळं चुंबनकलेत तरबेज होण्यासाठी चहापोह्यांच्या कार्यक्रमाव्यतिरिक्त दुसरं माध्यम नव्हतं.
"तुमच्या मुलीबरोबर थोडं एकांतात मोकळेपणानं बोलायचं आहे,' असं म्हटलं, तरी अनेक भावी वधुपित्यांची साधारणपणे द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी भीष्माचार्यांची झाली होती, तशी द्विधा मनःस्थिती व्हायची. कुणीकुणी तर दारामागे टपून राहायचे. आता आम्ही काय त्यांच्याच घरात तिचा विनयभंग करणार होतो का? पण छे! विश्‍वास म्हणून नाही.
पण ही बातमी वाचून आमच्यापुढे साक्षात तो ऐतिहासिक प्रसंग उभा राहतो. ""तुमच्या मुलीचं चुंबन घेऊन मला तिला "इम्प्रेस' करायचं आहे,'' असं आम्ही या वधुपित्यांना सुचवत आहोत. मग भर मांडवातून मुलगी पळून गेल्यानंतर आनंदानं नाचणाऱ्या "दिल है के मानता नहीं'मधल्या अनुपम खेरसारखे हे वधुपिते आम्हाला डोक्‍यावर घेऊन नाचताहेत.
""घे, घे. मस्त चुंबन घे. इम्प्रेस कर तिला!'' असं म्हणून प्रोत्साहन देत आहेत. ती मुलगी लाजून चूर होत आहे. आपला चेहरा उंचावून डोळे मिटून आमच्या बाहुपाशात विलीन होण्यासाठी आतुर होत आहे...मग ती आमच्या चुंबनकलेवरून आम्ही तिच्या बाळांचे सुयोग्य जन्मदाते ठरू शकतो का, याची पारख करून निवड करणार आहे....!
...आणि अचानक आमची तंद्री खाडकन भंग होते.
""अहो, बटाटे किसून देणार आहात ना? किस करायचाय ना? उठा! लोळत बसू नका! एकादशी आणि दुप्पट खाशी तुमचीच असते. उठा आता!! नाहीतर किस-बिस काही मिळणार नाही!!'' आमच्या सौभाग्यवतींची मृदु साद कानी पडते आणि जीव पुन्हा घाबराघुबरा होतो...
---------------
- कुमार आशावादी
------------------
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2991389.cms

2 comments:

AB said...

ek number!!

अमित said...

हा हा हा... एकदम सही...

भारीच लिहीलयं राव...

पण आजकाल, मटा चा Times of India होतोय असं नाही वाटंत? [तसे सगळीच मराठी वृत्तपत्रं इंग्रजाळत आहेत, पण तरी मटा फ़ारच आघाडीवर दिसतंय.]