Nov 10, 2008

मनात(च) पूजीन रायगडा!

भव्य हिमालय तुमचा अमुचा
केवळ माझा सह्यकडा
गौरीशंकर उभ्या जगाचे,
मनात पूजीन रायगडा!
वसंत बापटांची ही कविता ऐकण्याच्या आधीच रायगडाच्या प्रेमात पडलो होतो। रायगडावर पहिल्यांदा कधी गेलो, ते आठवत नाही। (वय झालं आता!) पण शाळेच्या सहलीतून गेलो नव्हतो, हे नक्की. दोनदा गेलोय, एवढं आठवतं. त्यालाही आता आठ-नऊ वर्षं झाली. लग्नाआधी तिरसटल्यासारखा एकटाच फिरायचो, तेव्हाची ही गोष्ट। "सकाळ'मध्ये रुजू होण्याआधी 30 मे 1999 साली शिवरायांचा आशीर्वाद घ्यायला गेलो होतो, ते मात्र स्पष्ट आठवतंय!
तर सांगण्याची गोष्ट ही, की रायगडावर जायचं बरेच वर्षं मनात होतं. सहधर्मचारिणीलाही भरीस घातलं आणि एसटीच्या "रायगड दर्शन' बसची दोन तिकिटं बुक केली. मग त्यांनाही स्फुरण चढलं. मला भरीस घालून त्यांनी त्यांच्या प.प्पू. माता-पित्यांचीही दोन तिकीटं काढायला मला भाग पाडलं. मग आणखी एक मेव्हणी वाढली. सगळी बस जोशी-पेंढारकर परिवारानंच भरते की काय, असं वाटायला लागलं. "प्रासंगिक करार' असं या बसला नाव द्यावं, असा एक क्षूद्र विनोदही करून पाहिला. बायकोनं नेहमीप्रमाणे त्याकडे दुर्लक्ष केलं.नेहमीप्रमाणे ट्रेकला जाण्याआधीच्या सूचना मी करण्याचं या वेळी धाडस केलं नाही. कारण एकतर हा ट्रेक नव्हता. बसनं पायथ्यापर्यंत जाऊन रोप-वे नं वर जायचं होतं. गडावर चालण्याचेच काय ते कष्ट होते. त्यातून "मला अक्कल शिकवायची गरज नाहीये,' असे भाव चेहऱ्यावर पाहण्याची स्वतःहून इच्छा नव्हती. "काय घालायचा तो गोंधळ घाल,' असं म्हणून बायकोला कपड्यांपासून ते खाद्यपदार्थांच्या निवडीपर्यंतचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं.आम्ही खासगी केंद्रातून बुकिंग केलं होतं. त्याआधी दहा वेळा बसची सुटण्याची, पोचण्याची, परतण्याची वेळ विचारून घेतली होती. खाण्यापिण्याची सोय, रोप-वे चा खर्च, आदी चौकश्‍याही केल्या होत्या. याच बसनं रायगड दर्शन करून आलेल्या एका मित्राची जाहीर व प्रकट मुलाखतही घेतली होती. त्यामुळं चूक होण्याचा प्रश्‍नच नव्हता!एकुलत्या एक कन्येला शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या गोष्टीबिष्टी सांगून आणि रायगडाचं शक्‍य तेवढं भव्यदिव्य चित्र तिच्या मनात उभं करून सकाळी लवकर उठण्यासाठी तिला पटवलं होतं।
सगळं चंबूगबाळं सांभाळत धापा टाकत पावणेसातलाच स्वारगेटलो पोचलो. सकाळी सातची "रायगड दर्शन' बस अजून यायची होती. आमच्यासाठी बहुधा फुलांच्या माळा, लायटिंग वगैरे करून सजवत असतील, अशी समजूत करून घेतली. सात वाजायला आले तरी बस दिसेना, तशी कंट्रोलरकडे जाऊन चौकशी केली. त्यानं तोंडातला तोबरा थुंकायलाच दहा मिनिटं घेतली. रायगड बसची चौकशी केल्यावर जणू "पॅरिसच्या विमानाला पास चालतो काय,' असं विचारल्यासारखी तुच्छतेनं आमच्याकडे नजर फिरवली. मग हातानंच "नाही' अशी खूण केली. काय समजायचा तो अर्थ घ्या!
बऱ्याच संवादानंतर कळलं, की आमचं पाचच जणांचं बुकिंग झालं आहे. गाडीत ड्रायव्हर-कंडक्‍टरशिवाय दुसरं कुणीच नाही. त्यामुळं गाडी रद्द!बोंबला! मग आमची वरात त्याच्या मागून डेपो व्यवस्थापकांकडे. त्यांनी थेट तिकीट पैसे परताव्याचे अर्जच आमच्या हाती दिले. मग ते प्रामाणिकपणे भरून देऊन पैसे परत घेतले. नशीब, सगळेच्या सगळे पैसे मिळाले।
"तरी मी तुला म्हणत नव्हते, काल फोन करून एकदा विचारून घे म्हणून!'' बायकोनं चारचौघांत अब्रू काढलीच!
जिथे तिथे हाडामासाचा जिवंत असलेल्या कंट्रोलरला या बसची खबर नाही, तिथे काल रात्री ड्युटीवर असलेल्या माणसाला कशी असेल, असा फालतू प्रश्‍न विचारण्याचं धाडस मी केलं नाही. मग रायगडाच्या ऐवजी सिंहगडावर चर्चा सुरू झाली. मग अलिबाग, आळंदी, सज्जनगड, वगैरे ठिकाणं सुचवून झाली. कशावरच एकमत होईना। रायगडला गाडी बदलून जाण्याची माझी इच्छा आणि तयारी होती, पण एका दिवसात परत येणं शक्‍य नव्हतं. त्या रात्री मुक्काम करावा लागला असता. ते बाकीच्यांना शक्‍य नव्हतं।
मग मी गोंदवल्याचं नाव सुचवलं. एकतर मला नवीन ठिकाणं बघायला आवडतात आणि ते जवळही होतं. दुसऱ्या स्टॅंडवर गेलो, तर गोंदवल्याची गाडी आमची वाटच बघत उभी होती. मग तिच्यात घुसून गोंदवल्यात पोचलो. देवाधर्माशी माझं काही देणंघेणं नसलं, तरी देवळं पाहायला मला आवडतात. पण ती शांत, रम्य ठिकाणची. बजबजपुरी नसलेली. अष्टविनायकांपैकी काही आवडतात. कोकणातली शंकराची देवळं तर बेस्टच. तर ते असो।
गोंदवले मात्र भकास होतं. नुसतं एक मंदिर आणि आश्रम. शेजारी ना नदी, ना डोंगर, ना हिरवाई. माण-फलटण परिसरातलं ते एक वैराण गाव. अजिबात आवडलं नाही. पण दिवसभराची एक सहल झाली, एवढंच. दिवस अगदीच फुकट गेला नाही म्हणायचं।
वसंत बापटांनी जसं मनात रायगडाचं पूजन केलं, तसं आम्हालाही नाइलाजानं "मनातल्या मनात'च करावं लागलं! असो. आता पुन्हा रायगडावर मुक्कामाला जाण्याचा संकल्प आहे. आतापर्यंत नेहमी चढूनच गेलोय. रोप-वे देखील पाहणं राहिलंय. बघू, कधी जमतंय ते!
----
(मित्रहो, माझा ब्लॉग तुम्ही वाचता, प्रतिक्रिया देता, याबद्दल तुमच्या सहनशक्तीचं कौतुक करावं, तेवढं थोडंच। पण मला तुमच्याशी संपर्क साधायचा असेल, , तर त्यासाठी तुमचा ई-मेल ही सोबत लिहीत जा. ई-संपर्काबाबत थोडा अज्ञानी आहे; समजून घ्या! )

4 comments:

veerendra said...

agadi surekhach lihila ahe .. oghawtya bhashet .. phakt khalil parichched samajala nahi ..

sobat email det nahi .. pan maze blog jarur chalun paha !

कोहम said...

nakki rahun ya raigadavar. sakali sakali jevha gadamathyakhali dhag distat ani dhaganadun surya ugavato, tya drushyasathitari rahach. MTDC chi soy khup chaan aahe gadavar.

Deepak said...

अभि...
... मी आपल्या ग्राफिटीचा चाहता आहेच, मात्र आपल्या या लेखामुळे - आपल्यासारखाच एक भटका मिळाल्याचा आनंद मोठा आहे... गड-किल्ले, मंदिरे आणि ऐतिहासिक वास्तु हे माझे भटकंतीचे अल्टीमेट डेस्टिनेशन्स..!

चार वर्षापुर्वी आम्ही चार रायगडला मित्र गेलो होतो... मात्र त्यावेळी आम्हीं महामंडळाची बस न वापरता - आमच्यापैकीच एकाची कार वापरली होती..! मस्त ट्रेक झाला होता... आजही त्या आठवणी ताज्या आहेत..!

रायगडाबद्दल या चार ओळीच फार आहेतः

भव्य हिमालय तुमचा अमुचा
केवळ माझा सह्यकडा
गौरीशंकर उभ्या जगाचे,
मनात पूजीन रायगडा!

रायगडाचा ट्रेक यावेळी नाही झाला म्हणुन काय झाले ... ..काही दिवसांनी होईलच.. तसा फॅमिली प्लॅन असेल तर - प्रतापगड छान आहे... बघा जमले तर..!

हां ... आता ई-मेलचं म्हणाल तर - तो माझ्या ब्लौगवर आहेच...!

ता.क: आपण आपला जो ई-मेल दिला आहे तो बदलुन लिहा, म्हणजे abhi[.]pendharkar[@]gmail.com असा लिहा... किंवा आपल्या ई-मेलची छोटीशी इमेज करा आणि ती वापरा... कारण त्यामुळे तुम्हाला येणारे स्पॅम मेल थोडया तरी प्रमाणात कमी होतील. ... असो.

मन पाखरू पाखरू... said...

Apratim lekh aahe. vachatana drushya dolyasamor aale. Pan blogvaril pratyek lekhat aaplya 'trasik' bayakocha kiti chan shabdat ullekh karata ho tumhi. Pratyekalach jamat nahi te.