Oct 27, 2009

घ्या हात धुवून!

जगातल्या समस्त समस्यांची घाऊक चिंता असलेल्या अनेक पाश्‍चात्त्य संघटना आहेत. त्यांना कधी कशाचे उमाळे येतील, याचा नेम नसतो. त्यातून ऊठसूट प्रत्येक गोष्टीचं सेलिब्रेशन करायची सवयच लागली आहे जणू पाश्‍चात्त्यांना. चित्रविचित्र दिवसांचा जन्म होतो, तो त्यातूनच. नुकताच "जागतिक हात धुणे दिवस' साजरा झाला. त्यामागचा उद्देश भव्यदिव्य असला, तरी एक वेगळाच विचार त्यातून मनात डोकावला. या दिवसाचा खरंच उपयोग करून काही समाजोपयोगी, हितकारक करता आलं तर? पाहूया, एक झलक.

1. सरकारी कर्मचारी ः यांच्यासाठी कुठलाही दिवस "हात धुणे दिवस'च असतो. कोणतंच काम नसेल, तर त्याला सरकारी सेवेच्या वाहत्या गंगेत हात धुवून घेणं म्हणतात. हीच गंगा वाहताना कर्मचाऱ्याला फलदायिनी ठरत असले, तर तो आनंद दुप्पट असतो. मग हात धुवून घेण्याचं प्रयोजन आणि उद्दिष्ट वेगळं असतं. आपले वरिष्ठ तेच काम करीत असतील, तर त्यांचं अनुकरण करणं आणि त्यांच्या कामात मदत करणं हे कर्मचाऱ्याचं आद्य कर्तव्य ठरतं. त्याची तंतोतंत अंमलबजावणी या दिवसानिमित्त करावी.

2. इतर कोणतेही कर्मचारी ः साहेबाला किंवा पंचिंग मशीनला फसवून ऑफिसात उशीरा येणं आणि लवकर बाहेर पडणं, ऑफिसला स्वतःचं घरच मानून टाचण्यांपासून ते स्टेशनरीपर्यंत अनेक गोष्टी घरीच नेऊन ठेवणं, अशा कोणत्याही मार्गांनी हात धुण्याचं व्रत अंगीकारणं शक्‍य असतं. आधी आपण आचरणात आणत असलेल्या उपक्रमांमध्ये भरभक्कम वाढ करावी, एवढंच. तसंच पुरुषांसाठी दुपारच्या वेळेत झोपा काढणं, महिलांसाठी स्वेटर विणणं, यांखेरीज गाणी डाऊनलोड, कॉंप्युटरवर चित्रविचित्र वेबसाइट्‌स पाहणं, मनसोक्त वाचन करणं, ब्लॉग-फोटो ब्लॉग चालवणं, मित्रमैत्रिणींशी आपुलकीनं संवाद साधणं, असे अनेक नवनवीन उपक्रम राबविता येतील.

3. वरिष्ठ अधिकारी ः कर्मचाऱ्यांना कार्यालयीन शिस्त पाळण्याचा, कामावर निष्ठा ठेवण्याचा सल्ला देऊन स्वतः मात्र भरपूर गैरफायदे उपटणाऱ्या या प्राण्याला तर या दिनानिमित्त अनेक योजना प्रत्यक्षात आणता येतील. मंदीचं किंवा उत्पन्नघटीचं कारण दाखवून कर्मचाऱ्यावर कपातीची कुऱ्हाड चालवणं, छंद म्हणून हव्या त्या शेऱ्यांसह मेमो देऊन त्यांना खचवणं, ऑफिसच्या यंत्रणेचा भरपूर गैरवापर करून त्याचं खापर कर्मचाऱ्यांच्या अकार्यक्षमतेवर फोडणं, अशी अनेक तंत्र त्यासाठी अवलंबण्याचा विचार करता येईल.

4. चोर, पाकीटमार ः यांच्यासाठी हा सर्वाधिक उपयुक्त दिवस ठरू शकतो. एवढी वर्ष आपल्या व्यवसायाला उदरनिर्वाहाचे साधन म्हणून अधिकृत मान्यता मिळविण्यासाठी ज्यांनी मूक आंदोलन केले, त्यांच्यासाठी हा विजयी दिवसच म्हणायला हवा. त्यांच्या अनेक वर्षांच्या संघर्षाचा उत्सव अधिक परिणामकारकरीत्या साजरा करणं सहज शक्‍य आहें.


5. मारकुटे मास्तर/मास्तरणी : `मारकुटे' हे आडनाव नसून, ती प्रव्रुत्ती आहे. या वर्गातील मास्तर-मास्तरणींसाठी हा सोनियाचा दिनु. विद्यार्थ्यांना धोपटण्याचे आपले राष्ट्रीय कार्य त्यांना ब्राह्ममुहूर्तावरही सुरू करता येइल. नेहमीचे वर्ग असोत, वा जादा. आपल्या उपक्रमात खंड पडू देण्याचं काहीच कारण नाही. छडी, वेताचा फोक, पट्टी, डस्टर, छत्री...कोणतंही आयुध वापरता येइल. ही क्रुत्रीम आयुधं थकली, तर `हात' समर्थ आहेतच! विद्यर्थ्यांना बडवल्याशिवाय त्यांचा भविष्यकाळ उज्ज्वल होत नाही, अशी ठाम धारणा मनात असली, म्हणजे झालं!

6. राजकीय कार्यकर्ते : यांची संधी आता गेली! निवादानुका संपल्या, प्रचारही संपला. पण आमची खात्री आहे, प्रचारकाळात त्यांनी हा दिवस रोज साजरा केला असणार. `साहेब, आज अमक्या वस्तीत जायचंय. द्या पैसे. साहेब, तमके लोक फार कावकाव करताहेत. द्या पैसे. साहेब, ढमक्या ठिकाणी आपण पोचलेलो नाही. नाराजी खूप आहे. द्या पैसे' करून त्यांनी आपल्या इच्छुक `साहेबां'कडून भरपूर माया गोळा केली असणार. आपल्या निष्ठेचा, अविरत सेवेचा मोबदला म्हणून स्वत:कडेच ठेवली असणार, याबद्दल आमच्या मनात तीळमात्र शंका नाही!

7. पुढारी : यांना मात्र केव्हाही, कधीही, कोणत्याही परिस्थितीत साजरा करता येण्याजोगा दिवस! शिक्षण म्हणू नका, पाणी म्हणू नका, बांधकाम म्हणू नका, आरोग्य म्हणू नका. हात धुवून घेण्याची संधी सगळीकडेच! खर्‍या अर्थाने या दिवसावर, उपक्रमावर श्रद्धा आणि निष्ठा आहे, ती याच मंडळींची!
जय लोकशाही!!