Jun 13, 2010

भुलेश्वरानं पाडलेली भूल...

 
 

फिरायची

आवड आधीपासून होती, पण गाडी घेतल्यानंतर तिला एक अधिष्ठान प्राप्त झालं. गाडीचा निदान रविवारी तरी वापर करायला हवा, या कारणाखाली किंवा -याच दिवसांत कुठे गेलो नाही, मस्त हवा पडलेय, छानपैकी वातावरणात फिरायला जावंसं वाटतं, या सबबींखाली भटकंती अनेकदा सुरू झाली. महिन्यातून साधारण एकदा किंवा दोनदा तरी पुण्याबाहेर उधळलंच पाहिजे, हा दंडक झाला.

जेजुरी

, शिरगाव, नीळकंठेश्वर, सिंहगड, कार्ला, अशी ठिकाणं पालथी घालून झाली. रामदरा सारख्या काही नवीन ठिकाणी भटकंती करता आली. यवतजवळच्या भुलेश्वरचं नाव बरेच दिवस ऐकत होतो. एक दिवसाच्या सहलीसाठी चांगलं ठिकाण, अशी ख्याती ऐकली होती. बरेचदा भटकंतीतल्या मित्रांना विचारल्यावर त्यांनी हे नाव सुचवलं होतं. पण आणखी ेक देऊळ यापलीकडे त्याविषयी फार आकर्षण वाटलं नव्हतं. त्यामुळं एक-दोनदा भुलेश्वर निश्चित करूनही मागे पडलं होतं. कालच्या रविवारी तसा कुठे जाण्याचा बेत नव्हता, पण दिवसभर मोकळा असल्यानं आणि पावसाळी हवा पाहून मनानं उचल खाल्ली. मग बरेच दिवस हातातून निसटलेलं हे भुलेश्वरच पालथं घालायचं ठरवलं.

सकाळी

मनस्वीचा क्लास, रविवारची कामं आटोपून निघेपर्यंत एक वाजला. वाटेत हाॅटेलवाल्यांनी अगत्यानं केलेला पाहुणचार झोडून प्रत्यक्ष भुलेश्वरला पोचेपर्यंत साडेतीन वाजले. पुण्याहून यवत साधारणपणे 45 किमी आहे आणि यवत गावाच्या आधीच भुलेश्वरचा फाटा फुटतो. तिथून आत घाटरस्त्यानं सुमारे सात ते आठ किमीवर भुलेश्वर आहे.

जातानाचा

रस्ता भन्नाट होता. पाऊस फारसा नव्हता आणि रस्त्याचं कामही सुरू होतं, तरी जाताना मजा आली. घाटांतल्या वळणावळणांवरून निसर्गाचं रूप टिपत आम्ही डोंगरावर पोचलो. भुलेश्वरच्या मंदिरापर्यंत गाडी जात असली, तरी शेवटचा रस्ता फारच खराब आणि तीव्र चढणीचा आहे. मंदिर पाहिल्यानंतर होता नव्हता तो थकवा पळून गेला.

मला

गावातली, भोंदू भाविकांच्या गर्दीनं घुसमटलेली मंदिरं आवडत नाहीत. त्यापेक्षा गावकुसाबाहेरची, शांत ठिकाणची किंवा डोंगरावरची अशी मंदिरं फार आवडतात. तिथे भेट दिल्यावर खरंच काहितरी पाहिल्याचा, नीरव शांततेचा आनंद घेता येतो. मार्लेश्वर, भीमाशंकरचा परिसर, घोरावडेश्वर, ही अशीच काही आवडीची ठिकाणं. आता त्यात भुलेश्वरची भर पडायला हरकत नाही. शंकराची सगळी मंदिरं याच प्रकारात बसतात आणि ती पाहायला फार उत्सुकता वाटते.

हे

मंदिर बाराव्या शतकात बांधलं असल्याची माहिती मिळाली. अप्रतिम कोरीव काम आणि दगडी बांधकामानं मन मोहून टाकलं. मंदिरात मिणमिणते दिवे होते आणि आत फार अंधार होता. त्यातून धडपडत, ठेचकाळत चढून जायला मजा आली. भलामोठा नंदी, दगडांमधली शिल्पकला आणि प्रत्यक्ष देऊळ पाहण्यासारखं आहे. कुटुंबासह दिवसभराच्या सहलीसाठी अगदी मस्त ठिकाण. इथे पाण्याची सोय मात्र चांगली नाही. ते स्वतःच घेऊन जायला हवं.
तास
-दोन तास तिथे रेंगाळल्यावर परतीच्या वाटेला लागलो. येताना थेऊर किंवा रामदरा येथे जाऊन येण्याचा बेत होता, पण संध्याकाळचे सहा वाजले होते. तिकडे गेलो असतो तर आणखी उशीर झाला असता. घरातली ढीगभर संसारोपयोगी कामं खुणावत होती. मनस्वीचा गणवेश, बूट वगैरे खरेदी करायची होती. त्यामुळं अन्य कुठेही जाता थेट पुण्याकडे गाडी हाकली.
 

(आणखी छायाचित्रे पाहण्यासाठी इथे भेट द्या.

2 comments:

Pankaj - भटकंती Unlimited said...

भुलेश्वर माझेही फोटोग्राफीसाठी आवडते ठिकाण आहे. तिथल्या प्रत्येक शिल्पाचे प्रत्येक अँगलने फोटो आहे माझ्याकडे. अक्षरश: वेडा आहे मी भुलेश्वराचा. मी लिहिलेल्या काही भुलेश्वराच्या पोस्ट्सः

http://www.pankajz.com/2009/04/bhuleshwar-hidden-treasure.html

http://www.marathimandali.com/?p=30

Pankaj - भटकंती Unlimited said...

फोटो लिंक चालत नाहीये :-(
"403 FORBIDDEN" अशी एरर आली.