Jun 18, 2010

पेन `डाइव्ह'!

अवघ्या चार वर्षांपूर्वी घरी कॉंप्युटर घेतला, तोपर्यंत मला सीडी हा प्रकारही माहित नव्हता. एखादा लेख घरी टाइप करून आणायचा, तरी कोणती पद्धत वापरायची, हे नंतर समजलं. सीडी अवघ्या आठ ते दहा रुपयांना मिळते, हे त्यानंतर कळलं. (तोपर्यंत मला फक्त "फ्लॉपी' माहित होती.) मग सीडी विकत घेतल्या, त्यावर मजकूर "राइट' कसा करायचा, हे जाणून घेतलं. पहिल्यांदा सीडी "राइट' करायला घेतली, तेव्हा "बर्न' करायची सोडून बाकी सगळे प्रयत्न करून पाहिले होते. "बर्न'चं बटणच न दाबल्यानं सीडीवर मजकूर येतच नव्हता आणि तो का येत नाही, हे गूढ मला उकलत नव्हतं.
तर सांगायचा मुद्दा काय, की तंत्रज्ञानाच्या बाबतीत एवढ्या अडाणी असलेला मी कधी पेन ड्राइव्ह वगैरे वापरेन, असं कुणी सांगितलं असतं तर मलाच पटलं नसतं. सीडीनंतर पेन ड्राइव्हही घेतला. पहिल्यांदा 500 एमबीचा पेन ड्राइव्ह घ्यायलाही खूप महागात पडला होता. नंतर त्याच किमतीत चार जीबीचा पेन ड्राइव्ह मिळाला. पण नुकताच तो माझ्या विसरभोळेपणामुळं शहीद झाला. कुठेतरी विसरलो आणि नंतर मिळालाच नाही.
विसरभोळेपणाचा मोठा फटका बसल्यामुळं दुसऱ्या दिवसापासूनच मी सावध झालो होतो. परवा एकदा ऑफिसात काम करताना पेन ड्राइव्ह खिशात नसल्याचा अचानक साक्षात्कार झाला. पंधरा दिवसांपूर्वीच एक चांगला पेन ड्राइव्ह गमावला होता आणि नवा घेण्याचा भुर्दंडही सोसावा लागला होता. त्यामुळे या वेळी मी खूपच जागरूक होतो. (म्हणजे, निदान मला तसं वाटत होतं!) मग तिसऱ्या मजल्यावर जिथे तो विसरला असावा असं वाटलं, तिथे जाण्याचा प्रयत्न केला. तिथला विभाग बंद झाला होता. मग अंधारात धडपडत जाऊन, कुलपं उघडून पेन ड्राइव्ह शोधला. जिथे तो असायला हवा होता, तिथे नव्हताच. निरनिराळ्या शंका मनात आल्या. त्यातली एक शंका मात्र अधिक दाट होती आणि तीच खरी असण्याची शक्‍यता जास्त वाटत होती...
वरती पेन ड्राइव्हचं काम झाल्यावर मी खाली येऊन माझ्याच मशीनला तो लावल्याचं अंधुकसं आठवलं आणि तो कदाचित तिथेच असावा, असा किंचित संशय आला. तिथे काही बोलणं म्हणजे सोबत आलेल्या सहकाऱ्यासमोर स्वतःचीच अब्रू काढून घेण्यासारखं होतं. ते टाळलं. (लग्न केल्याचा फायदा!) खाली येऊन पाहिलं, तर खरंच पेन ड्राइव्ह माझ्याच मशीनला होता. मी तिथे बसूनच त्याचा शोध सुरू केला होता, स्वतःच्या मशीनला तो आहे की नाही, हे न पाहता!
आपण आता निदान पेन ड्राइव्हबाबत तरी खूपच दक्ष आणि सावध झाल्याची जाणीव मनात निर्माण झाली. स्वतःचा अभिमानही वाटला. (हे प्रसंगही दुर्मिळच!) पण तो खोटा ठरण्यासाठी फार वेळ लागला नाही....
परवाच रात्री घरी गेलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच लक्षात आलं, पेन ड्राइव्ह पुन्हा गायब आहे. मी तो पुन्हा विसरणार नाही, याबाबत असलेली खात्री उद्‌ध्वस्त झाली होती. पण पेन ड्राइव्ह मशीनलाच लावून ठेवलेल्या अवस्थेत असणार, याची खात्री होती. तसा तो होताही. ऑफिसात फोन करून कळवलं आणि मला दुपारी माझी अमानत परत मिळाली.
पहिला महागातला, पण कमी क्षमतेचा पेन ड्राइव्ह कधीच हरवण्याचा प्रसंग आलानाही. त्याच्यावरचं टोपणही अगदी तळहाताच्या फोडासारखं मी जपलंय.
दुसरा चार जीबीचा पेन ड्राइव्ह माझ्या गबाळेपणामुळे हरवला.
तिसरा एकदा हरवल्याची अफवा माझी मीच पसरवली आणि दुसऱ्यांदा हरवता हरवता वाचला....एकूणच, त्यानं अनेकदा माझ्या ताब्यातून "डाइव्ह' मारायचा प्रयत्न केलाय!
आता त्याला दीर्घ आयुरारोग्य चिंतण्यासाठी कुठल्या देवाला नवस बोलावा, याचा विचार करतोय!
 

2 comments:

विजयसिंह होलम said...

बाजारात सेलफोनसाठी मिळते तशी पातळ लेस मिळते. ती बांधून ठेवायची. गळ्यात अडकविता येते किंवा बेल्टला बांधता येते. पहा प्रयोग करू. (स्वानुभव).

First day first show said...

तू या ड्राइव्हला pain ड्राइव्ह असं नाव द्यायलाही हरकत नाही.