Oct 17, 2010

"अन्नोन'दशा!


सकाळी बाइकवरून कुठेतरी निघालो होतो आणि राजाराम पुलाजवळील सिग्नलच्या अलीकडेच मोबाईल वाजला. "सायलेंट' करायला विसरलो होतो आणि व्हायब्रेटर सुरू असल्यानं माझं हृदय खिळखिळं होण्याआधी फोन उचलणं आवश्‍यक होतं.
कुठला तरी "अननोन' नंबर होता.
""सर तुम्ही अभिजित पेंढारकरच बोलताय ना?''
""हो, बोला.''
""सर, मी जळगावहून बोलतेय, तुमचा "प्रीमियर'मधला लेख वाचला.''
व्हायब्रेटरवर असलेल्या मोबाईलमुळे दडपलेली माझी छाती आता फुगली होती. सत्काराच्या वेळी हार घालण्यासाठी मान वाकवून ठेवतात, तशी मी लेखनाबद्दलची प्रशंसा ऐकण्यासाठी माझे कान मी मोबाईलच्या अधिकाधिक जवळ आणले. कानात प्राण, प्रेम चोप्रा, अमरीश पुरी, शक्ती कपूर...सगळे आणले!
""सर, तुम्हाला जरा विचित्र वाटेल, पण एक विचारू का?''
आता तर मी तिच्या शब्दांच्या अमृतचांदण्यात चिंब व्हायला आतुर झालो होतो. माझ्या लेखनाची वारेमाप स्तुती होणार, "तुम्हाला कसं काय सुचतं हे सगळं,' असा कौतुकवर्षाव होणार, अशी खात्री होती. त्याच धुंदीत मी असताना तिनं पुढचं वाक्‍य टाकलं -
"सर, सलमान खानचा नंबर आहे का तुमच्याकडे?''
धुंदी खाडकन उतरली होती. कानाखाली एक सणसणीत चपराक बसली होती.
""सलमान खानचा नंबर? तुम्हाला कशाला हवाय? तुम्ही फॅन आहात का त्याच्या?'' मी आवाजात शक्‍य तितकं मार्दव आणून विचारलं.
""हो सर...खूप! मला प्लीज द्या ना त्याचा नंबर. कुठून मिळणार नाही का?''
""अहो ताई, माझ्याकडे नाही त्याचा नंबर. मी पुण्यात असतो. तुम्हाला मुंबईतून मिळवावा लागेल नंबर.''
"सलमान खानच्या कारकिर्दीवर लेख लिहिण्यासाठी त्याला "मॉडेल' म्हणून समोर बसवून त्याची लांबी-रुंदी मोजायची नसते! तसा मी बराक ओबामांनाही लेखातून चार खडे बोल सुनावू शकतो. याचा अर्थ ते अफगाणिस्तान, इस्राईलविषयीची धोरणं आखण्यासाठी ते दर वेळी फोन करून माझा सल्ला घेतात असं नाही!' असंच मला तिला सुनावायचं होतं, पण मनाला आवर घातला. शेवटी युवती-दाक्षिण्य म्हणून काही असतंच ना!
बिचारीचा भ्रमनिरास झाला होता. लेख वाचल्या वाचल्या "युरेका' म्हणून तिनं मला फोन केला असावा. तिच्या लाडक्‍या सलमानचा नाही, निदान त्याच्यावर लेख लिहिणाऱ्याचा नंबर "प्रीमियर'मध्ये छापला होता. सलमान त्याच्याकडे नक्कीच रोज विटी-दांडू खेळायला येत असणार, असा तिचा ठाम समज होता. केवढ्या अपेक्षेनं तिनं मला फोन केला होता! पण तिच्या सगळ्या स्वप्नांचा आणि उत्साहाचा मी चक्काचूर केला.
"अननोन' नंबरची दहशत असते ती अशी. एखाद्या वेळी काही वेगळी संधी असेल म्हणून "अननोन' नंबरचा फोन उचलायला जावं, तर कुण्यातरी प्रतिभावंत वाचकाचा फोन असतो. कुठला तरी लेख कुठल्या तरी पुरवणीसाठी त्यांनी म्हणे टपालानं, कुण्या माणसाच्या हस्ते किंवा पेटीत टाकून पाठविलेला असतो. आपला एवढा एकमेवाद्वितीय अनुभव का छापला नाही, अशी त्यांची विचारणा असते.
कधी कधी तर आपण सकाळी सकाळी प्रेमानं "अननोन' नंबरचा फोन घ्यावा तर असे संवाद होतात...
""हॅलो...'' (आवाजात शक्‍य तितका गोडवा आणून) - मी.
""हलव...कोन बोल्तंय?''
""आपण कोन बोल्ताय?''
""हा...कोन? विलास का?''
""आपण कोण बोलताय? आपण फोन केलाय ना? मग आपणच आधी सांगितलं पाहिजे ना, कोण बोल्ताय ते?''
""हा...मी अण्णा बोल्तोय. विलास आहे का?''
...
कधी कधी तर "रॉंग नंबर' आहे, असं सांगूनही लोकांना पटत नाही. "काय चेष्टा करताय का राव,' म्हणून ते पुन्हा तिथेच फोन करतात. वर त्यांच्या कुणा विलास, संजय, दादू, म्हादू, गणपतला फोन देण्याचा धमकीवजा आदेशही देतात. आता त्यांच्या आग्रहासाठी आणि आपण त्यांचा फोन उचलल्याचं प्रायश्‍चित्त म्हणून त्यांचा विलास, संजय, दादू, म्हादू किंवा गणपत कुठून पैदा करायचा, असा प्रश्‍न मला पडतो.
प्राचीन काळी लॅंडलाइनवर फोन करण्याची पद्धत होती, तेव्हा तर माझ्या नंबरवर कायम दुसऱ्याच कुणाच्या नावासाठी फोन यायचा. बहुधा "बीएसएनएल'नं कुणाचा तरी बंद केलेला नंबर मला दिला होता. त्या भल्या माणसाचे जुने स्नेही मला फोन करून पिडायचे. दहा-बारा वेळा सांगून झालं, तरी त्यांची संपर्कयात्रा काही थांबेना. शेवटी कंटाळून त्यांनी त्यांच्या स्नेह्याचा मोबाईल नंबर मिळविला की काय, कुणास ठाऊक! पण माझे फोन बंद झाले.
हल्ली नाइट ड्युटीच्या वेळी तरी मी दुपारी मोबाईल सायलेंटवरच टाकून घोरत पडतो. कुठल्या नोन-अननोन नंबर्सना नंगानाच घालायचाय, तो घालू द्या! चार वाजता उठेपर्यंत मी त्याकडे ढुंकून बघत नाही. एखाद वेळी उतावीळ झालेल्या कुणाकुणाचे ढीगभर मिस्ड कॉल्स मिळतात. मी मेलो बिलो की काय, अशी शंका त्याला येते. मग मी झोपलो होतो, असं त्याला शांतपणे सांगतो. त्याचा चेहरा मग (मोबाईलवरूनही) पाहण्यासारखा होतो.
र्ल मॅनर्स ही तर भल्याभल्यांना न झेपणारी गोष्ट आहे. माझा मोबाईल अनेकदा "सायलेंट' असतो. म्हणजे मीटिंगसाठी जाण्यापूर्वी काही मिनिटं आधी आणि नंतर, दुपारी झोपलो असताना, रात्री झोपण्यापूर्वी आणि अगदी फोनच्या रिंगची कटकट नको असेल तेव्हाही! मीटिंग ऐन रंगात आलेली असताना अनेक जणांचे मोबाईलवरचे "कोंबडे' आरवतात. काहीतरी गंभीर विषय चाललेला असताना त्यांची "मुन्नी बदनाम' होते किंवा तबला, ढोलताशे वाजू लागतात. मग फोन बंद करण्यासाठी किंवा उत्तर देण्यासाठी त्यांची तारांबळ उडते. बरं, मीटिंगमध्ये असताना चुकून फोन आला, तर लोक कट करून गप्प बसत नाहीत.
"हॅलो, मीटिंगमध्ये आहे.' हे सांगून बहुधा त्यांना फुशारकी मिरवायची असते.
बरं, हळू आवाजात खुसपुसल्यामुळं पलीकडच्याला काही ऐकू येत नाही. तेवढी त्याची पोहोचही नसते. तो पुन्हा काहितरी विचारतो.
हा पुन्हा - "हॅलो, मीटिंगमध्ये आहे. नंतर करतो,' असं सांगतो.
आल्यावर कट न करण्याएवढा आणि फोन "कट' केल्याचा अर्थ न कळण्याएवढा कोण उपटसुंभ पलीकडे असतो, कुणास ठाऊक! यांना तरी "आन्सर' करावाच लागेल, असा कुठल्या राष्ट्राध्यक्षांचा दर वेळी फोन येत असतो, हेही कळत नाही.
थेटरात असताना तर यांना आणखी स्फुरण चढतं. थेटरातल्या गर्दीतही फोन घेऊ नये, सायलेंट ठेवावा, वगैरे गोष्टी यांच्या गावीही नसतात. तिथला संवाद साधारणतः असा ः
""हां...बोल.'' ...जणू काही हा लोडाला टेकून घरात निवांत पडलाय!
"पिच्चर बघतोय...पिच्चर'
यावर पलीकडच्यानं "बरं, ठीक आहे, नंतर करतो,' असं म्हणणं अपेक्षित असतं. प्रत्यक्षात पलीकडचा विचारतो, "कुठला पिच्चर?'
मग हा त्याला "पिच्चर'चं नाव सांगतो. बरं, ते सहज समजण्यासारखं असेल, तर ठीक. नाहीतर त्याला त्यातल्या कलाकारांचीही नावं घेऊन समजावून द्यावं लागतं. (किती त्रास!) पलीकडच्याचं समाधान होत नाही, तोपर्यंत शेजारच्या प्रेक्षकांची सुटका कठीणच.
बरं, फोन "कट' करण्याचा, न उचलण्याचा अर्थही अनेकांना कळत नाही, हे खरंच आहे. एकदा फोन उचलला नाही, तर लोक तो उचलेपर्यंत पुनःपुन्हा करत राहतात.
मला तर अनेक जण एसएमएस-शत्रूच वाटतात.
मध्यंतरी माझ्या फोनवरचे सगळे नंबर उडाले. त्यामुळे सणासुदीला ढिगाने येणारे एसएमएस कुणाचे आहेत, हेही कळत नाही. काही "अननोन' लोक एखादा जोक-बिक पाठवतात, त्यांचेही नाव कळत नाही. "हू इज इट,' असा रिप्लाय पाठवला, तर या बाबांना झेपतच नाही! पुन्हा काहीच उत्तर नाही.
मला रिप्लाय करण्याचीही जाम खुमखुमी असते. त्या माणसाला पुन्हा एसएमएस करण्यासाठी उचकवण्याचा प्रयत्न त्यातून असतो. अनेक ठोंब्यांना तेही कळत नाही. विरामचिन्हांचा आणि त्यांचाही 36चा आकडा असावा, असं वाटतं. कारण दूरदर्शनवरच्या बातम्या सांगितल्यासारखे सपक, सरळसोट एसएमएस करून ते मोकळे होतात.
असो.
विषय जरासा लांबलाच नाही? आपल्या प्रतिक्रिया एसएमएस करून नक्की कळवा हं! "अननोन' नंबर असला, तरी मी नक्की रिप्लाय देईन. (*कंडिशन्स अप्लाय)
...
* दसरा, दिवाळीला एक किंवा दोन रुपये एसएमएस नसलेल्या दिवशी!

7 comments:

Unknown said...

मस्त शिजलय तुमचं अननोन प्रकरण. झाम मजा आली वाचताना. तुमच्या लिहिण्याची पद्धत उत्तम आहे यात काही वाद नाही. नाहीतर सलमान खान चा नंबर कोणी विचारलाच नसता. हे नंबर असे अननोन दिसतात या मागे सेलफोन कंपन्यांचा काही हात असेल असे वाटतं कअ हो तुम्हाला? म्हणजे बघा, माणुस अननोन नंबर च्या एसएमएस ला रिप्लाय करून विचारतोच ना की कोण रे बुवा तू. या मागे सरकारचा हात असला पाहिजे अशी मला शंका येते. सरकार नसलं तर पाकिस्तान जरूर असणार या मागे. का परग्रहवासी? मी बहुदा मझ्या विचारशक्तीची पराकाष्टा करत आहे आणि तुमच्या रागाचं कारण होण्याआधी पट्टा अवळलेला बरा. तुमचा लेख मस्त आहे एवढं काय ते सांगायच> होतं.

BinaryBandya™ said...

फार भारी झालाय लेख ...
भरपूर हसलो ...

sangeeta said...

khare tari tumhi lihilele anubhav dainandin jivnatil ahet, pun tumhala te sadar karayala khup chan jamte, khup sunder lihile ahe, keep it up

विकास वलुन्जकर said...

आभिजित तुमच्या लेखनाला वेगला बाज आणि शैली आहे .वाचायला सुरुवात केली की थाम्बवेसे वाटतच नाही. अन्नोंन दशा आवडले .लिहिते व्हा. छान ..

wandererdrrajchavan said...

Good one ! I always read your "Nasti Uthathev" but today I thought I must compliment you ! Keep up the good work !!

Anonymous said...

compliment cha sms kelay---chhanach zalay ha lekh.

प्रज्ञा said...

छान जमलाय लेख.
लोकं मोबाईल वापरायला शिकलेत पण ‘मोबाईल वापरायचे मॅनर्स’ मात्र काही जणांना शिकवावेसे वाटतात. फोन उचलला नाही, कट केला तर चक्क रागावतात!!