साहित्य संमेलन बडोद्यात होणार हे निश्चित झालं, त्याच वेळी तिथे जायचं ठरवलं होतं. संमेलन म्हणजे उत्सव असतो. तिथे अनेक माणसं भेटतात, पुस्तकं पाहायला मिळतात, साहित्य विश्वात काय चाललंय, ह्याची खबरबात लागते, नव्या ओळखी होतात, साहित्यिक वातावरणात रमता येतं. शिवाय काही सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेता येतो, जो मलातरी मुद्दाम वेळ काढून शक्य होत नाही. यावेळी तर ते बडोदा शहरात होतं, त्यामुळे एक नवीन शहर बघायला मिळण्याचं आकर्षण होतंच.
पंजाबातल्या घुमानला संमेलन झालं, तेव्हा मी, श्रीपाद ब्रह्मे आणि आमचे आमच्यापेक्षाही उत्साही, तरुण सहकारी अरविंद तेलकर असे तिघं तिकडे स्वखर्चानं गेलो होतो. घुमानबरोबरच अमृतसर आणि वाघा सीमेची सहलही झाली होती. यावेळीही तसंच ठरवून, रेल्वेचं रिझर्वेशन करून टाकलं. मात्र राहण्याची सोय झाली नव्हती. शेवटी साहित्य परिषदेच्या स्थानिक शाखेतर्फे तीसुद्धा झाली आणि आम्ही चांगले पाच दिवस काढून बडोद्याला कूच केलं. संमेलन 16 ते 18 फेब्रुवारी असं होतं, पण आम्ही 14 तारखेला रात्री निघून 15ला सकाळीच बडोद्यात पोहोचलो. जातानाचं रिझर्वेशन आयत्यावेळी कन्फर्म झालं, त्यामुळे थोडी धाकधूक होतीच. येतानाचं होण्याची शक्यता जरा कमीच होती. पण त्याचा विचार नंतर करू, असं ठरवून संमेलनाचा आनंद घ्यायचं ठरवलं.
हॉटेलवर सकाळी गेल्यानंतर नियोजनाची थोडी (अपेक्षित) गडबड झाली. ती लवकर निस्तरली आणि आम्हाला आपापल्या खोल्या थोड्या उशिरानं का होईना, पण मिळाल्या. एक दिवस आधीच गेल्यामुळे बडोदा शहर फिरण्यासाठी मोकळा वेळ होता. महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा पॅलेस आणि शेजारीच असलेलं म्युझियम पाहिलं. पॅलेस भव्यदिव्य आणि प्रेक्षणीय होता. राजा रविवर्मा याची मूळ चित्रंही तिथे आणि म्युझियममध्ये पाहता आली. ऐतिहासिक शिल्पं, वस्तूंमध्ये मला फारसा रस नाही, पण एकदा पाहण्यासाठी तो प्रकार आनंददायी होता. त्याआधी आमचे सन्मित्र आशिष चांदोरकर यांच्या सूचनेनुसार बडोद्यातली प्रसिद्ध शेव उसळही खाल्ली. महाडहून आलेल्या एका मराठी माणसाचीच ती गाडी होती, हे समजल्यावर आनंद झाला.
संध्याकाळी ग्रंथदिंडी मला बघता आली नाही, कारण सिरियलयज्ञ पेटवायचा होता. अगदी शेवटी शेवटी त्यात सहभागी झालो. दुसऱ्या दिवशी, म्हणजे संमेलनाच्या पहिल्या दिवशी सकाळपासून संमेलनातच होतो. पहिल्या दिवशीचा उद्घाटनाचा कार्यक्रम अर्धवट पाहिला आणि इतर कार्यक्रमांमध्ये रमलो. दुसऱ्या दिवशी चक्क कविसंमेलनाचा छळही सहन केला. एक दोन परिसंवादही चांगले झाले. आमची चहा नाश्त्यापासूनची सगळी व्यवस्था संमेलनातच होती, त्यामुळे बाहेर कुठे जाण्याचा प्रश्न नव्हता. मधूनच मीडिया सेंटरमध्ये जाऊन किंवा संमेलनस्थळीच बसून लिखाणाचं कामही पूर्ण करत होतो.
मुख्य कार्यक्रमस्थळ म्हणजे मोकळं मैदानच होतं आणि त्याला वरून काही छत वगैरे नव्हतं. त्यामुळे संध्याकाळी पाचपर्यंत तिथे कार्यक्रम घेणं उन्हामुळे शक्यच नव्हतं. संध्याकाळचे कार्यक्रम मात्र त्या हिरवळीवर छान रंगायचे. दुसऱ्या दिवशी रात्री श्रीनिवास खळे रजनीचा कार्यक्रम असाच रंगला. खळेंची सगळी लोकप्रिय गाणी मनसोक्त ऐकता आली.
ग्रंथदिंडीला जोरदार प्रतिसाद होता, तरी तो दिवसभरातल्या कार्यक्रमांना लाभलाय, असं वाटलं नाही. पुस्तकविक्रीलाही तसा थंडच प्रतिसाद मिळाला. संध्याकाळच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना मात्र भरपूर उपस्थिती होती आणि काही निवडक परिसंवादांनाही.
एकूण संमेलनाचे तीन दिवस छान गेले, पण येतानाचं आमचं रेल्वेचं रिझर्वेशन काही कन्फर्म होत नव्हतं. येतानाचा दिवस आम्ही मोकळा ठेवला होता आणि त्या दिवशी अहमदाबादला जाण्याचा विचार होता. पण रेल्वेचं रिझर्वेशन नसल्यामुळे घालमेल सुरू होती. शेवटी रिझर्वेशन रद्द केलं आणि सकाळीच पुण्याला निघायचं ठरवलं. संमेलन संपल्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी नऊला हॉटेल सोडलं आणि बडोदा स्टॅंडवर आलो. बडोद्याचा बस स्टॅंड अतिशय स्वच्छ, सुंदर आणि टापटीप होता. जवळपास विमानतळावर आल्यासारखंच वाटत होतं. तिथून सुरतची बस (एसटी!) मिळाली आणि बाराच्या दरम्यान सुरतला पोहोचलो. बडोद्यात चार दिवस बटाटे आणि बटाटेयुक्त गुजराती गोड आणि तेलकट पदार्थ खाऊन कंटाळा आला होता. सुरतमध्ये भरपेट पंजाबी पदार्थांचा आस्वाद घेतला. पुढे मुंबईला जाण्यासाठी बस एकदम रात्री आहे, असं समजलं. मग रेल्वे स्टेशनवर जरा चौकशी करून तिथल्या स्थानिक हमालांकडून एका ट्रेनच्या तीन सीट्स मिळवल्या आणि मुंबई प्रवास सुखाचा झाला. बोरिवलीला उतरलो, पण तिथून पुण्यात यायला जवळपास सहा तास लागले. अखेर 14 तासांनी आमचा हा बडोदा-पुणे प्रवास संपला आणि आम्ही घरी पोहोचलो.
रत्नागिरीत कॉलेजमध्ये असताना 1991 साली आमच्या गोगटे कॉलेजच्या मैदानावरच साहित्य संमेलन भरलं होतं. त्यावेळी साहित्याची अजिबात आवड नाही, असं समजून तिकडे फिरकलोही नव्हतो. आणि आता खास वेळ काढून, स्वतःच्या खर्चानं आधी घुमान, मग बडोदा अशी परराज्यांतली दोन संमेलनं हुंदडून आलो. एवढ्या वर्षांत एवढी प्रगती काही वाईट नाही. नाही का?
1 comment:
एकंदरीत सम्मेलनाचा आनंद घेतला तर
Post a Comment