Oct 27, 2009

घ्या हात धुवून!

जगातल्या समस्त समस्यांची घाऊक चिंता असलेल्या अनेक पाश्‍चात्त्य संघटना आहेत. त्यांना कधी कशाचे उमाळे येतील, याचा नेम नसतो. त्यातून ऊठसूट प्रत्येक गोष्टीचं सेलिब्रेशन करायची सवयच लागली आहे जणू पाश्‍चात्त्यांना. चित्रविचित्र दिवसांचा जन्म होतो, तो त्यातूनच. नुकताच "जागतिक हात धुणे दिवस' साजरा झाला. त्यामागचा उद्देश भव्यदिव्य असला, तरी एक वेगळाच विचार त्यातून मनात डोकावला. या दिवसाचा खरंच उपयोग करून काही समाजोपयोगी, हितकारक करता आलं तर? पाहूया, एक झलक.

1. सरकारी कर्मचारी ः यांच्यासाठी कुठलाही दिवस "हात धुणे दिवस'च असतो. कोणतंच काम नसेल, तर त्याला सरकारी सेवेच्या वाहत्या गंगेत हात धुवून घेणं म्हणतात. हीच गंगा वाहताना कर्मचाऱ्याला फलदायिनी ठरत असले, तर तो आनंद दुप्पट असतो. मग हात धुवून घेण्याचं प्रयोजन आणि उद्दिष्ट वेगळं असतं. आपले वरिष्ठ तेच काम करीत असतील, तर त्यांचं अनुकरण करणं आणि त्यांच्या कामात मदत करणं हे कर्मचाऱ्याचं आद्य कर्तव्य ठरतं. त्याची तंतोतंत अंमलबजावणी या दिवसानिमित्त करावी.

2. इतर कोणतेही कर्मचारी ः साहेबाला किंवा पंचिंग मशीनला फसवून ऑफिसात उशीरा येणं आणि लवकर बाहेर पडणं, ऑफिसला स्वतःचं घरच मानून टाचण्यांपासून ते स्टेशनरीपर्यंत अनेक गोष्टी घरीच नेऊन ठेवणं, अशा कोणत्याही मार्गांनी हात धुण्याचं व्रत अंगीकारणं शक्‍य असतं. आधी आपण आचरणात आणत असलेल्या उपक्रमांमध्ये भरभक्कम वाढ करावी, एवढंच. तसंच पुरुषांसाठी दुपारच्या वेळेत झोपा काढणं, महिलांसाठी स्वेटर विणणं, यांखेरीज गाणी डाऊनलोड, कॉंप्युटरवर चित्रविचित्र वेबसाइट्‌स पाहणं, मनसोक्त वाचन करणं, ब्लॉग-फोटो ब्लॉग चालवणं, मित्रमैत्रिणींशी आपुलकीनं संवाद साधणं, असे अनेक नवनवीन उपक्रम राबविता येतील.

3. वरिष्ठ अधिकारी ः कर्मचाऱ्यांना कार्यालयीन शिस्त पाळण्याचा, कामावर निष्ठा ठेवण्याचा सल्ला देऊन स्वतः मात्र भरपूर गैरफायदे उपटणाऱ्या या प्राण्याला तर या दिनानिमित्त अनेक योजना प्रत्यक्षात आणता येतील. मंदीचं किंवा उत्पन्नघटीचं कारण दाखवून कर्मचाऱ्यावर कपातीची कुऱ्हाड चालवणं, छंद म्हणून हव्या त्या शेऱ्यांसह मेमो देऊन त्यांना खचवणं, ऑफिसच्या यंत्रणेचा भरपूर गैरवापर करून त्याचं खापर कर्मचाऱ्यांच्या अकार्यक्षमतेवर फोडणं, अशी अनेक तंत्र त्यासाठी अवलंबण्याचा विचार करता येईल.

4. चोर, पाकीटमार ः यांच्यासाठी हा सर्वाधिक उपयुक्त दिवस ठरू शकतो. एवढी वर्ष आपल्या व्यवसायाला उदरनिर्वाहाचे साधन म्हणून अधिकृत मान्यता मिळविण्यासाठी ज्यांनी मूक आंदोलन केले, त्यांच्यासाठी हा विजयी दिवसच म्हणायला हवा. त्यांच्या अनेक वर्षांच्या संघर्षाचा उत्सव अधिक परिणामकारकरीत्या साजरा करणं सहज शक्‍य आहें.


5. मारकुटे मास्तर/मास्तरणी : `मारकुटे' हे आडनाव नसून, ती प्रव्रुत्ती आहे. या वर्गातील मास्तर-मास्तरणींसाठी हा सोनियाचा दिनु. विद्यार्थ्यांना धोपटण्याचे आपले राष्ट्रीय कार्य त्यांना ब्राह्ममुहूर्तावरही सुरू करता येइल. नेहमीचे वर्ग असोत, वा जादा. आपल्या उपक्रमात खंड पडू देण्याचं काहीच कारण नाही. छडी, वेताचा फोक, पट्टी, डस्टर, छत्री...कोणतंही आयुध वापरता येइल. ही क्रुत्रीम आयुधं थकली, तर `हात' समर्थ आहेतच! विद्यर्थ्यांना बडवल्याशिवाय त्यांचा भविष्यकाळ उज्ज्वल होत नाही, अशी ठाम धारणा मनात असली, म्हणजे झालं!

6. राजकीय कार्यकर्ते : यांची संधी आता गेली! निवादानुका संपल्या, प्रचारही संपला. पण आमची खात्री आहे, प्रचारकाळात त्यांनी हा दिवस रोज साजरा केला असणार. `साहेब, आज अमक्या वस्तीत जायचंय. द्या पैसे. साहेब, तमके लोक फार कावकाव करताहेत. द्या पैसे. साहेब, ढमक्या ठिकाणी आपण पोचलेलो नाही. नाराजी खूप आहे. द्या पैसे' करून त्यांनी आपल्या इच्छुक `साहेबां'कडून भरपूर माया गोळा केली असणार. आपल्या निष्ठेचा, अविरत सेवेचा मोबदला म्हणून स्वत:कडेच ठेवली असणार, याबद्दल आमच्या मनात तीळमात्र शंका नाही!

7. पुढारी : यांना मात्र केव्हाही, कधीही, कोणत्याही परिस्थितीत साजरा करता येण्याजोगा दिवस! शिक्षण म्हणू नका, पाणी म्हणू नका, बांधकाम म्हणू नका, आरोग्य म्हणू नका. हात धुवून घेण्याची संधी सगळीकडेच! खर्‍या अर्थाने या दिवसावर, उपक्रमावर श्रद्धा आणि निष्ठा आहे, ती याच मंडळींची!
जय लोकशाही!!

Oct 20, 2009

निकालाआधीची दिवाळी!

सामान्यांची, सर्वसामान्यांची, अतिसामान्यांची आणि असामान्यांची दिवाळी असते, तशीच राजकीय नेत्यांनाही दिवाळी असतेच की! त्यांच्या घरीही गोडधोड पदार्थ होतात, वेगवेगळे फराळाचे प्रकार केले जातात, आप्तेष्ट-नातेवाइकांना निमंत्रणं धाडली जातात, अगदी आनंदाचा महोत्सव असतो म्हणा ना! हां. इतरांपेक्षा राजकारण्यांची दिवाळी वेगळी म्हणायची ती या अर्थानं, की दिवाळीच्या आगचे-मागचे वातावरण कसे आहे, यावर बरंच काही अवलंबून असतं. सध्याचे त्यांचे ग्रहमान, पक्षश्रेष्ठींची मर्जी, सध्या असलेली जबाबदारी, येऊ घातलेली संकटं, विरोधकांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध, या सगळ्यावर त्यांच्या दिवाळीचा "मूड' ठरत असतो. अशा या वैशिष्ट्यपूर्ण दिवाळीत त्यांचे फटाकेही एकदम जगावेगळे असणारच की नाही? पाहूया, त्यांची एक झलक..

1) आपटीबार ः हा फटाका दलित चळवळीचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते रामदास आठवले यांच्यासाठी. रिपब्लिकन ऐक्‍याची त्यांनी दिलेली ही एकशेत्रेसष्टावी हाळी. या वेळी ऐक्‍य होणारच, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघच मानली जात होती; पण ज्या खडूनं ही रेख मारायला आठवले निघाले होते, त्या खडूच्या निर्मितीतच काहीतरी भ्रष्टाचार झाला असावा. कारण ही रेघच मुळात पुसट आखली गेली. त्यामुळं ती पुसण्यासाठी इतरांना फारसे कष्ट करावे लागले नाहीत. शिवाय, तो काळा दगडदेखील आठवले ज्यांना सध्या जाहीर विरोध करताहेत, त्यांनीच पुरवलेला होता, अशीही कुजबुज ऐकू येऊ लागली.
असो. तर या फटाक्‍याचं वैशिष्ट्य असं, की बाहेरून वाटतो हा मोठा शक्तिशाली फटाका. पाहताक्षणी कुणाच्या डोळ्यात भरावा आणि कुणालाही आकर्षण वाटावं असा. अनेक वाती आणि अनेक प्रकारचे दारूगोळे एकत्र येऊन बनलेला; पण तो पेटवायच्या आधीच एकेक वाती निखळत जातात. काही आधीच फुसक्‍या होत्या, हे नंतर लक्षात येतं. ठासून भरलेल्या दारूगोळ्यातही फारसा दम नाही, हे फटाका पेटवल्यानंतरच लक्षात येतं. मोठ्या आवाजाचं चित्र फटाक्‍याच्या अंगावर असलं, तरी प्रत्यक्षात फुसका आवाज करून हा फटाका विझून जातो.

2) ट्रेन ः "ट्रेन' किंवा दोरीवरून एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सुर्रर्रर्रऽऽऽऽ करत जाणारा हा फटाका खास बंडखोर आणि अपक्षांसाठी. तो सुरू कुठे होणार, हे आपल्याला माहीत असतं, पण संपणार कुठे, हे कुणीच आधी सांगू शकत नाही. एका टोकावरून जो वात पेटवून देईल, त्याच्याच बाजूला तो फटाका परत येईल, याची अजिबात खात्री नसते. कदाचित तो दुसऱ्या टोकाला जाऊन पुन्हा पहिल्या टोकाला येऊ शकतो, किंवा आल्याची हूल देऊन तिकडेच थांबूही शकतो. कधीकधी तर वात शिल्लक असताना आणि आत दारूही भरपूर असताना तो दोरीच्या मध्यभागीच एकाएकी विझूनही जाऊ शकतो. तर एखाद प्रसंगी वात पेटवणाऱ्याच्याच अंगावर उडी मारून त्याला भाजण्याची गंभीर धोकाही असतो!

3) अग्निबाण (रॉकेट) ः हा फटाका खास राज ठाकरेंसाठी. या फटाक्‍याचं वैशिष्ट्यं असं, की त्याला जशी दिशा द्याल, त्या प्रमाणात तो विध्वंस घडवतो. कधी या गोटात खळबळ उडवेल, तर कधी त्या गोटात. काही सांगता येत नाही! बाटलीत जरी हा बाण लावला, तरी तो सरळ जाईलच, याचा नेम नसतो. सुईईईऽऽऽऽ असा त्याचा शिट्टीसारखा आवाज आणि जोरदार अग्निवर्षाव पाहून कुणालाही त्याविषयी आकर्षण वाटतंच. तो फार मोठा स्फोट वगैरे घडवत नाही. तरीही, प्रतिस्पर्ध्याच्या गोटात अस्वस्थता आणि चिंता निर्माण करण्याएवढा परिणाम नक्कीच साधतो. बाटली वाकडी करून लावली, तर तो कुणाच्याही खिडकीतून एखाद्याच्या घरात अग्निकांड घडवू शकतो, तर कधी कुणाला बेसावध गाठून त्याला नामोहरम करू शकतो. लावणाऱ्याला मात्र या अग्निबाणाचा काही अपाय झाल्याचा अनुभव आत्तापर्यंत तरी नाही!

4) लवंगी ः अतिशय आकर्षक वेष्टनात आणि दणदणीत आवाजाच्या स्टीकरसह बनवलेली ही लवंगी फटाक्‍यांची माळ आपले सर्वांचे लाडके नेते कोकणसम्राट नारायण राणेंसाठी! ही माळ अतिशय बेरकी, हुशार. आपली नक्की ताकद किती आहे, याचा अंदाज कुणाला येऊ द्यायची नाही. त्यामुळे सुरवातीला तिच्यावरचे स्टीकर पाहून आणि तिच्या वेष्टनाचा आकार पाहूनच भलेभले दचकतात; पण प्रत्यक्षात तसं घाबरण्याचं कारण नाही बरं! कारण आधी दणदणीत आवाज केला, तरी नंतर ही माळ फुसकी निघू शकते. कधी कधी तर वेष्टन बदलून अगदी सस्त्यातही खपवलेली गेलेली पाहिलेय म्हणे अनेकांनी तिला!

5) फुलबाजे ः मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत असलेले समस्त नेते उदा. पतंगराव कदम, रोहिदास पाटील, अजित पवार, जयंत पाटील, पृथ्वीराज चव्हाण आदींसाठीचं हे विशेष उत्पादन. फारसं धोकादायक नाही, तरीही छान तडतडणारं आणि भरपूर प्रकाश व आनंद देणारं. फटाके उडविल्याचंही समाधान आणि कुणाला नुकसान न केल्याचंही. यानं दुसऱ्या कुणाला त्रास होण्याची शक्‍यताच नाही. उलट, कधीकधी याच फुलबाज्यानं दुसऱ्या मोठ्या फटाक्‍यांची वात लावून देऊन त्यांना उडण्यासाठी आणि भरपूर आवाज करण्यासाठी देखील मदत करता येते. अशी मदत झाली तरी ठीक, नाही झाली, तरी उत्तम! फुलबाजे उडविण्यातली गंमत काही कमी होत नाही. आहे की नाही खरी गमतीदार वस्तू?

यंदाच्या दिवाळीत या फटाक्‍यांच्या खरेदीला भरपूर गर्दी झाल्याची चर्चा आहे; पण ग्यानबाची मेख खरी पुढेच आहे बरं का! हे फटाके यंदा ज्या रंगाचे, ज्या रूपाचे आणि गुणधर्माचे आहेत, तसेच पुढील वर्षी राहतील, अशी खात्री नाही बरं का! तेव्हा यंदा असे दिसताहेत म्हणून खरेदी करून पुढल्या वर्षासाठी राखून ठेवाल, तर नक्की पस्तावाल, एवढं लक्षात ठेवा!!

Oct 2, 2009

अनुशेष!

`Many good wishes on Independence Day. ...Ignore, if married' अशा आशयाच्या एसएमएसनं 15 ऑगस्टला सकाळी सकाळी खूप हसू आलं होतं. त्यातला खोचक विनोद वगळला, तरी मूळ परिस्थिती पटण्याजोगीच होती.
रत्नागिरीत राहत होतो, तेव्हा तिथे तीन थिएटर होती. (आता वाढली नाहीत, उलट एक कमी झालंय!) आम्हाला अधिकृतपणे एखादाच चित्रपट, तोही तीन महिन्यांतून वगैरे...बघण्याची परवानगी होती. मग कुठे मळ्यात, कुठे सत्यनारायणाच्या सार्वजनिक पूजेला, कुठे मित्राकडे व्हीडिओवर ही तहान भागवावी लागायची. तेव्हाच ठरवून टाकलं होतं - "मोठा झाल्यावर तिन्हीच्या तिन्ही थेटरांतले सिनेमा बघेन, तरच नावाचा अभिजित,' असा संकल्प त्याच वेळी करून टाकला. हा संकल्प पूर्ण करण्याची संधी मिळण्याच्या आधीच पुण्याला आलो. पुण्यात पहिलं काम कुठलं केलं असेल, तर ते वेगवेगळी थिएटर शोधून काढणं. तोपर्यंत फक्त "प्रभात'च माहित होतं. अगदी मध्यवस्तीत, भाऊ महाराज बोळात आम्हाला आश्रय मिळाल्यानं फावल्या वेळेत थिएटर शोधून काढण्याची मोहीम आवडीची आणि आनंददायी होती. मग श्रीकृष्ण, श्रीनाथ, अपोलो, भारत, सोनमर्ग, लक्ष्मीनारायण, अलका, विजय, अशी सगळी आसपासची थिएटरं शोधून तिथे वाऱ्या सुरू झाल्या. अगदी स्टेशनपलीकडचं "निशात', "वेस्ट एन्ड'ही पालथं घालून झालं. "व्हिक्‍टरी' तेवढं एक ताब्यातून सुटलंय!
सांगायचा मुद्दा हा, की तेव्हा भरपूर वेळ होता आणि घालवायचा कुठे, हा प्रश्‍न होता. त्यामुळे भरपूर चित्रपट पाहण्याचा छंद आणि संकल्पही पूर्ण करण्याची संधी मिळाली. अगदी मिथून चक्रवर्तीपासून बो डेरेकपर्यंत सर्व चित्रपटांची तथेच्छ मेजवानी झडली. बाल्कनीत बसणे वगैरे आग्रह नसल्यामुळे सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री दहापर्यंतचा कुठल्याही थिएटरातला, कुठल्याही वर्गाचा आणि कुठलाही शो आपल्याला वर्ज्य नव्हता. अर्थातच, बरेचचे हुकलेले, रत्नागिरीत पाहायला न मिळालेले सिनेमे पाहून झाले.
आता मात्र ही चंगळ झेपेनाशी झाली आहे. तेच तर दुःखाचं कारण आहे. दुपारनंतर ऑफिस आणि सकाळच्या वेळेत घरच्या, मुलीच्या जबाबदाऱ्या, या चक्रात स्वतःच्या आवडीचा वेळेत पाहायला मिळणं, ही सध्या चैनीची गोष्ट झाली आहे. त्यातून हल्ली सकाळी सहाला उठून "जिम'ला जाण्याचं व्रत घेतलंय. त्यामुळं रात्री उशीरापर्यंत जागणंही झेपत नाही. काही दिवसांपूर्वी रात्री झोप लागत नव्हती, म्हणून उठून इंटरनेटवर "सिंहासन' पाहिला. घरात बरेच दिवस "जाने तू या जाने ना' आणि "रॉक ऑन' पडून होते. तेही अर्धवट पाहिले. रात्री तीन वाजले, म्हणून झोपलो. पण पुढचा अर्धा भाग पाहायचा राहिलाय, तो अजून नाही जमला. वेन्सडे, हजारों ख्वाइशें ऐसी, दस विदानियॉं, हनीमून ट्रॅव्हल्स प्रा. लि, क्विक गन मुरुगन, दशावतारम, कित्ती कित्ती सिनेमे पाहायचेत. मराठीत तर ही यादी आणखी मोठी आहे. त्यातले प्रमुख म्हणाल तर...गोष्ट छोटी डोंगराएवढी, रीटा, जोगवा, इत्यादी इत्यादी.
थिएटरच्या अंधारात एकदा स्वतःला झोकून दिलं, की पूर्ण चित्रपट तरी पाहून होतो. अगदी मिथुनच्या वाईटात वाईट सिनेमालाही मी उठून बाहेर गेलोय, असं कधी झालं नाही. किंबहुना, मला थिएटरमधून बाहेर काढू शकणारा सिनेमा अजून जन्माला यायचाय, असं म्हणायला हरकत नाही! तूर्त मात्र बाहेर येण्यापेक्षा हल्ली थिएटरमध्ये जाणंच कमी झालंय. शुक्रवारी परीक्षणासाठी सिनेमा पाहायला लागतो, तेवढाच एक दिलासा म्हणायचा! आजच "हसतील त्याचे दात दिसतील' पाहिला. "अपोलो'ला! कुठेही, कसाही, कुठलाही सिनेमा पाहण्याची आपली उमेद अजून कायम आहे, याची खात्री पटली!

Sep 29, 2009

"बाल'हट्ट

""बाबा, मला जादूचे प्रयोग बघायचेत.''
आमची "लाडली लक्ष्मी' हट्ट धरून बसली होती.
मध्यंतरी टीव्हीवर "छोटा चेतन,', "भूतनाथ'वगैरे पाहिल्यापासून तिची ही इच्छा अधिकच चिघळली होती. त्यामुळे गणपतीच्या आधीपासून अशा संधीच्या शोधात होतो. गणपतीत-नवरात्रात बरेच ठिकाणी जादूच्या प्रयोगांची जाहिरात होती, पण वेळ जमण्यासारखी नव्हती. अशा सार्वजनिक प्रयोगांना जाण्याबद्दल वावडं नव्हतं, पण तिथली सोय आणि व्यवस्था यांविषयी शंका होत्याच. एवढं करून गर्दीतून प्रयोग नीट दिसला नाही, तर सगळंच मुसळ केरात, असं वाटलं होतं. त्यातच अचानक गेल्या गुरुवारी "सकाळ'मध्येच जादूगार संजय रघुवीर यांच्या प्रयोगांची जाहिरात वाचली. प्रयोग रविवारी सकाळी भरत नाट्य मंदिरात होता. सर्वच बाबतीत सोयीचा होता आणि तिकीटदरही परवडण्याच्या घरातले होते. तातडीनं शुक्रवारी बुकिंग करून टाकलं. तरीही, सातवी रांग मिळाली म्हणून जरा नाराजी होतीच!
रविवारी फारशी काही कामंधामं नव्हती, त्यामुळे वेळेत नाट्यगृहात पोचलो. प्रयोगही बऱ्यापैकी वेळेत सुरू झाला. रत्नागिरीत असताना रघुवीर, जादूगार भैरव यांचे प्रयोग पाहिले होते. त्यावेळी ते फारच भव्यदिव्य वाटले होते. माणसाचे दोन तुकडे करणं, तलवारी खुपसणं, पेटीतला जादूगार गायब होऊन प्रेक्षकांतून बाहेर येण्यासारखे प्रयोगांनी विलक्षण गारूड केलं होतं. अगदी तसंच नाही, पण तत्सम काही पाहायला मिळेल, अशा समजात मी होतो. मनस्वी पहिल्यांदाच जादूचे प्रयोग पाहत असल्यानं, तिच्या विशेष काही अपेक्षा नव्हत्या बहुधा. बऱ्याचदा पालकच मुलांच्या इच्छाआकांक्षांविषयी चुकीचे ग्रह करून घेतात, हे या वेळी प्रकर्षानं जाणवलं.
सुरुवातीला हातचलाखीचे आणि नंतर काहीसे अवघड आणि मोठ्या स्वरूपाचे प्रयोग झाले. मला आणि हर्षदालाही कुठल्याच प्रयोगात काही गम्य वाटलं नाही. लाकडी बॉक्‍समधून ठोकळा गायब करणं, पत्ते मोठे करणं, झोपलेला माणूस तरंगवणं, अशा स्वरूपाचे प्रयोग अगदीच साधे आणि कालबाह्य वाटले.
लहानपणी गणेशोत्सवात, अन्यत्रही असे प्रयोग पाहून अनेकदा भारावलो होतो. किंबहुना, चार वर्षापूर्वी गोव्यात फिल्म फेस्टिव्हलला गेलो, तेव्हाही गर्दीत हातचलाखीचे खेळ करणाऱ्या एका कलाकाराच्या कलेनं खूप प्रभावित झालो होतो. हे प्रयोग मात्र अगदीच सामान्य दर्जाचे वाटले. जादूगाराची हातचलाखी, बोलण्याची आणि प्रेक्षकांशी संवादाची पद्धतही अगदीच सामान्य होती. अगदी रिकाम्या पिशवीतून पेट्या किंवा काही वस्तू काढण्याच्या प्रयोगांबद्दल मात्र थोडंसं अप्रूप वाटलं.
सादरीकरणाच्या बाबतीतलं बुद्धिदारिद्य्रही अगदीच त्रासदायक होतं. गबाळे कपडे घातलेले दोन सहायक आणि त्यांच्याहून जरा कमी गबाळे कपडे घातलेला जादूगार पाहायला पैसे देऊन थिएटरात कशाला यायचं, असाच प्रश्‍न निदान मला तरी पडला. "हे सगळं खोटं आहे,' हे माहीत असूनही निदान जादूगाराच्या हातचलाखीला दाद देण्याची संधी तरी काही वेळा मिळते. या वेळी त्याचाही अभाव जावणवला. एकंदरीत पैसे आणि वेळ फुकट गेल्याचा अनुभव मिळाला.
मनस्वी थोडीशी कंटाळली, पण एकंदरीत तिला फार काही दुःख झालेलं वाटलं नाही. ती बऱ्यापैकी आनंद घेत होती या प्रयोगाचा. शिवाय तिचा नेहमीचा खुराकही तिला मिळाला होता. आईवडिलांची संगतही होती. तिचं फारसं काहीच बिघडलं नव्हतं.
अर्थात, मुलांसाठीच्या कार्यक्रमासाठी अतिउत्साहानं जाऊन तोंडघशी पडण्याची ही माझी काही पहिलीच वेळ नव्हती! गेल्या वर्षी मनस्वीला पहिल्यांदाच बालनाट्य दाखवायला याच नाट्यगृहात घेऊन गेलो होतो. नाटक होतं - "हिमगौरी आणि सात बुटके'. अगदीच प्राथमिक दर्जाचे बालकलाकार, त्यांचं नाटकी बोलणं, कोणत्याही आधुनिक साहित्याचा समावेश नसलेला सेट आणि जुनाट, अतिप्राचीन सादरीकरण आणि संवाद यांनी अगदी उबग आणला होता. मनस्वीला त्यातली सर्वाधिक आवडलेली गोष्ट म्हणजे चेटकीण आणि तिचं हसणं! "पैसे वसूल' या संकल्पनेत तिला तेवढं पुरेसं होतं.
यंदा "माकडाचं लग्न' आणि तशाच प्रकारच्या तीन एकांकिकांच्या एकत्रित प्रयोगाला तिला घेऊन गेलो होतो. हे तरी बरे असतील, या अपेक्षेनं. ते "हिमगौरी'पेक्षा वाईट होते. सई परांजपेंच्या "झाली काय गंमत'चा गंभीर शेवट पाहून तर हसावं की रडावं, हेच कळेना. एकतर अनेक वर्षांपूर्वी लिहिलेली ही नाटकं. त्या वेळची सामाजिक, सांस्कृतिक परिस्थिती निराळी. ती नाटकं तशीच्या तशी उचलून सादर करायची अवदसा काय म्हणून या संस्थांना सुचली असावी, असाच प्रश्‍न नाटकाची सुरवात झाल्यापासून मला छळत राहिला.
हल्ली टीव्ही हा मुलांच्या आयुष्याचा एक भाग झाला आहे. "आई, ऐकलंस ना? शुद्ध पाणी ही प्रत्येक आईची जबाबदारी आहे. तू पण मला असंच पाणी दे' असं आमची अंगठ्याएवढी पोरगी स्मृती इराणीची जाहिरात पाहिल्यापासून आम्हाला गेल्या सहा महिन्यांपासून ऐकवत आहे. टॉम अँड जेरी, भीम, हे तिचे रोजचे स्वप्नातले आणि प्रत्यक्षातले सवंगडी झाले आहेत. राक्षस, देव, परी, यांच्याकडे भरपूर ताकद आणि शक्ती असते आणि त्यांचंच आयुष्य हे खरं आयुष्य, असा तिचा ठाम समज आहे. कॉंप्युटर स्वतः सुरू करून ती गेमसुद्धा खेळत बसू शकते. अशा पिढीतल्या या मुलांना जुनाट विचारांची, जुनाट सादरीकरणाची आणि अगदी सामान्य दर्जाची कालबाह्य बालनाट्ये का बरे दाखवतात ही मंडळी? त्यांच्या काळाशी, त्यांच्या विचारांशी आणि बुद्धीच्या एकूण आवाक्‍याशी साधर्म्य राखणारी नवी नाटके का बरे लिहीत नाहीत? त्यांना आपल्याशा वाटणाऱ्या व्यक्तिरेखा का बरे निर्माण करत नाहीत? त्यांना आवडेल आणि आपलेसे वाटेल, असे सादरीकरण का करत नाहीत? सत्तर-ऐंशीच्या दशकातली अतिआदर्शवादी विचारांची बालनाट्यं त्यांनी का पाहावीत? नव्या जमान्याला आणि आयुष्याच्या वेगाला साजेशी नाटकं पाहायला मिळणं, हा त्यांचा हक्क नाही?
असो. दिवाळीची सुटी लवकरच लागेल. पुन्हा बालनाट्यांचं पीक येईल. एका सर्वसामान्य पालकाच्या या विचारांची कुणीतरी दखल घेईल आणि या परिस्थितीत अल्पशी सुधारणा होईल, या अंधुक आशेवर हा विषय इथेच सुफळ संपूर्ण.
----

Sep 22, 2009

वारी नीळकंठेश्वरची







पुण्याच्या आसपासची बरीचशी ठिकाणे आता फिरून झाल्यामुळे दरवेळी ट्रिपचा बेत ठरवताना नवं ठिकाण शोधण्याचं आव्हान असतं. गेल्या रविवारी असाच प्रश्न आला, तेव्हा वेल्हा, भोरगिरी असे पर्याय होते. पण दुपारपर्यंत परत यायचं आणि जास्त प्रवासही नको, या निकषांवर नीळकंठेश्वराची निवड केली. मी आणि हर्षदा एकदा तिथे जाऊन आलो होतो. तेव्हा अलीकडच्या गावातून होडीने जावं लागलं होतं. या वेळी गाडी न्यायची असल्याने थेट पायथ्यापर्यंत जाता येणार होतं. खडकवासल्यापासून पुढे रस्ता बराचसा खराअबच होता. वाटेत एका गावात मस्त मिसळ चाखली. अनपेक्षितरीत्या उत्तम चव होती. मजा आ गया!तिथून पुढे रस्ता शोधत नि खड्ड्यांतून वाट काढतच प्रवास झाला. पायथ्याच्या पार्किंगपर्यंत गाडे नेणं म्हणजे अक्षरश: दिव्य होतं. गेलो कसेबसे.उभा चढ चढून जाताना अर्थातच दमछाक झाली. पण उद्देश तोच होता, नि कल्पनाही होती. आश्चर्य म्हणजे, मनस्वीदेखील बराचसा चढ चढली. काही वेळा तिला डोक्यावर घ्यावं लागलं. वाटेत एकदा पडलीही.नीळकंठेश्वर म्हणजे शंकराचं शांत, निवांत देवस्थान आहे. शंकराच्या देवळांचं हेच वैशिश्ट्य अस्तं. गजबजाटापासून दूर आणि निवांत परिसर. तिथे डाल-भाताचा प्रसाद मिळाला. प्रसादाविषयी वाईट बोलायचं नाही म्हणतात, म्हणून इथेच थांबतो.देवळाबरोबरच तिथलं मुख्य आकर्षण आहे ते म्हणजे तिथे उभारलेल्या मूर्ती आणि देखावे. रामयण, महाभारत आणि अनेक पौरणिक, ऐतिहासिक संदर्भाच्या मूर्ती तिथे उत्तमरीत्या साकारल्या आहेत. मनस्वीला मेजवानीच होती. भरपूर घोष्ती पण ऐकायला मिळण्याची आपसूक सोय झाली! जाम उधळली होती तिथे.उतरताना तसे निवांतच होतो. शेजारच्य दरीत नि पलीकडच्य अडोंगरावर अंधारून आलं होतं. पाऊस पडत असणार, याचा अंदाज येत होता. पण ते लोण आमच्यापर्यंत लगेच यीएल, असं अजिबात वाटलं नव्हतं. पाचच मिनिटांत हलके थेंब पडायला लागले नि नंतर थर धो-धो पाऊस आला. आम्ही शेवटच्या उतारावर होतो, तरी पळापळ झालीच. मनस्वीला कडेअर घेऊन उतरताना त्रेधा उडाली. धावत येऊन गाडेल बसलो, तरी खूप भिजलो होतो. आपण जादा कपडे, टॉवेल नेत नाही, तेव्हाच पासून अशी पंचाइत करतो, याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. गाडीत १५ मिनिटे बसून राहिलो, तरी पाऊस थांबण्याचं लक्षण नव्हतं. चार-पाच फुटांवरचंही दिसत नव्हतं आणि विजा तर काळजात धडकी भरवत होत्या. विजा चमकायला लागल्या, की त्यातली एखादी आपल्याच डोक्याअर पडणार, अशी स्वप्नं पडतात मला लहाणपणापासून! पण सुखरूप आलो. डोंगरावरून गाडी उतरवणं हे जास्तच मोठं आव्हान होतं!येताना सालाबादपरमाणे रस्ता चुकलो. खडकवासल्याकडे येण्याऐवजी शिवणे गवात घुसलो. वेळीच लक्षात आलो, त्यामुळे परत फिरलो. संध्याकाळी घरी येऊन परत नाइट ड्युटीला पण गेलो ऑफिसात!
ट्रेकिंगची आपली खाज अजूनही कायम आहे, यावर शिक्कामोर्तब तरी झालं!

(fr more photos click to )