Feb 22, 2010

अर्धी-कच्ची "बात'

अचकटविचकट हावभाव करणारी- किंचाळणारी पात्रं, आचरटपणा आणि कशीही भटकणारी कथा... हल्लीच्या "कॉमेडी' चित्रपटांची ही व्याख्या. पण हे सगळं टाळलं, म्हणजे चित्रपट "हलकीफुलकी कॉमेडी' ठरत नाही. "टिप्स'निर्मित "तो बात पक्की' फक्त एवढ्याच पूर्वतयारीवर तसा आव आणतो. त्यामुळे बरीचशी "मेरे यार की शादी है' (मूळचा "माय बेस्ट फ्रेंड्‌स वेडिंग') आणि थोडीफार "दिलवाले दुल्हनियॉं ले जाएंगे'ची ही सुधारित (की बिघडलेली?) आवृत्ती. एक हलकाफुलका चित्रपट असला, तरी "कॉमेडी' किंवा मनोरंजक मात्र म्हणता येत नाही!
राजेश्‍वरी (तब्बू) हिला आपल्या मर्जीनुसार जगण्याची सवय लागली आहे. बहिणीच्या ("निशा' - युविका चौधरी) लग्नासाठी ती राहुल (शर्मन जोशी) या मुलाला हेरते. तो इंजिनिअर होणार आहे, आणि सक्‍सेना घराण्यातला आहे, हा मुख्य निकष. त्यासाठी खटपटी लटपटी करून ती त्या दोघांचं सूत जुळवूनही देते. नंतर अचानक युवराज (वत्सल सेठ) हा इंजिनिअर आणि श्रीमंत मुलगा तिच्या पाहण्यात येतो, म्हणून ती राहुलशी लग्न मोडून त्याच्याशी निशाची सोयरीक जुळविण्याच्या तयारीला लागते. फसवणूक झालेला राहुल भांडणतंटा न करता निशाला मिळविण्यासाठी अनेक उद्योग करतो, त्याचीच ही कथा.
हा केदार शिंदेंचा पहिला हिंदी चित्रपट म्हणून न वाटता, पूर्णतः "टिप्स'चा चित्रपट वाटतो. मुळातच प्रमोद शर्मा यांच्या कथेत आणि विभा सिंग यांच्या पटकथा-संवादांमध्ये काहीच जीव नाही. वधूची बहीण स्वतःच तिचं लग्न मोडून दुसऱ्याच्या ताब्यात तिला देऊ पाहते, एवढाच काय तो वेगळेपणा. चित्रपटात या घरातील घडामोडींच्या पलीकडे विशेष काही घडतही नाही. त्यामुळे एका संथ लयीत आणि कोणतीही उत्कंठा न वाढविता सरळ रेषेत चित्रपट सुरू राहतो. "हलक्‍याफुलक्‍या' शैलीतले विनोदही अपुरेच आहेत. त्यामुळे मनोरंजनाच्या पातळीवरही तो अपेक्षा पूर्ण करत नाही.
तब्बू नेहमीप्रमाणेच प्रसन्न, उत्स्फूर्त. शर्मन जोशी व्यक्तिरेखेत जखडल्यामुळे ठीकच. युविका, अयुब खान, शरद सक्‍सेना ठीकठाक. प्रीतमने "जिस दिन मेरा ब्याह होवेगा'सह बहुतेक गाण्यांत गायकांना किरकिऱ्या आवाजात गाणी म्हणायला लावलीत.
केदार शिंदेंनी त्यांना मिळालेल्या मर्यादित संधीत चमक दाखविली आहे. "सूर्यग्रहण' किंवा राजेश्‍वरी-युवराजची पहिली भेट विशेष उल्लेखनीय. त्यांच्या पुढच्या (हिंदी) चित्रपटाला शुभेच्छा!
---

Feb 14, 2010

दहशत आमच्याही दारात!

शनिवार 13 फेब्रुवारीचा दिवस. नेहमीप्रमाणे सगळे व्यवहार सुरू होते. संध्याकाळचीच ड्युटी होती. मीटिंग वगैरे आटोपून बातम्या सोडण्याची नेहमीची कामे सुरू केली होती. तेवढ्यात आमच्याच सहकाऱ्याचा एसएमएस आला. कोरेगाव पार्कमध्ये स्फोट होऊन चार ठार झाल्याचा. जर्मन बेकरीत सिलिंडरचा स्फोट, एवढंच कळलं होतं. त्यानुसार पुढचं नियोजन ठरणार होतं. आठच्या व्हीडिओ कॉन्फरन्समध्ये जाईपर्यंतही सिलिंडर स्फोट, एवढंच त्याचं वर्णन होतं.कॉन्फरन्स सुरू असतानाच स्टोरी डेव्हलप होऊ लागली होती. चाराचा आकडा सहावर केला. त्यानंतर आठवर गेला. मुख्य म्हणजे स्फोट सिलिंडरचा नव्हे, बॉंबचा असल्याचीही कुणकुण लागली. नंतर ती बऱ्याच सोर्समधून पक्कीही झाली. बातमी काही मिनिटांत कसं गंभीर रूप धारण करते, याचं ते मूर्तिमंत उदाहरण होतं. आधी केवळ पुण्यापुरतं मेन फीचर अशा स्वरूपात विचार करताना एकाएकी या घटनेनं अक्राळविक्राळ रूप घेतलं होतं. तातडीने इतर तयारी सुरू झाली. बॉंबस्फोट हे निश्‍चित कळल्यानंतर पुढची पानांची रचना, आधीच्या पानांची फिरवाफिरव, कामाचं नियोजन, इतर तयारीनं वेग घेतला. सुटीवर असलेली माणसं कामाला आली. नकाशे, इतर माहिती जमवणं सुरू झालं. आर्काइव्ह खणण्यात आलं. फोटोंची जमवाजमव झाली. इतर आवृत्त्यांचे, नागरिकांचे फोन खणखणू लागले. रात्री उशीर होणार, हेही नक्की झालं.बॉंबस्फोटाची वार्ता साडेआठला कळली, तरी तशी प्रत्यक्ष घोषणा व्हायला अकरा वाजले. दरम्यानच्या काळात पुण्याची बातमीदार मंडळीही कामाला लागली होती. प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहून यावं, असं मनात येत होतं, पण ऑफिसातली धावपळ बघता ते शक्‍य नव्हतं. मग ऑफिसमधली लढाई व्यवस्थित खेळण्याचा निर्णय घेतला.दहशतवाद आधी पुण्याच्या उंबरठ्यावर होता, आता तो दिवाणखान्यात शिरला असल्याची खात्री पटविणारी ती घटना होती. जर्मन बेकरी या कोरेगाव पार्कमधल्या एका खान-पान सेवा देणाऱ्या ठिकाणी स्फोट झाला होता. 15 दिवसांपूर्वीच आम्ही ऑफिसातले सहकारी हा नवा भाग पाहण्याच्या उद्देशाने गाडीतून फिरलो होतो. तेव्हा याच ठिकाणाहून गेलो होतो. एरव्ही तिथे आमचा फारसा संबंध येत नसला, तरी आपल्या शहरात बॉंबस्फोटासारखी भीषण घटना घडल्याची जाणीव अस्वस्थ करणारी होती.आधी देशातले निरनिराळ्या ठिकाणचे बॉंबस्फोट, मुंबईतला दहशतवादी हल्लाही पाहताना, वाचताना त्याची धग एवढी जाणवली नव्हती. कालच्या बॉंबस्फोटात आपलं जवळचं, ओळखीचं कुणीही असू शकेल, याचीही जाणीव झाली. तरी हा हल्ला पुण्याच्या वेशीवरच्या भागात, उच्चभ्रू आणि विशेषतः अमराठी-अभारतीय वस्तीशी संबंधित ठिकाणी झालेला हल्ला होता. तरीही, त्याची तीव्रता तेवढीच होती. पुण्याचा मध्यवर्ती भागही - कदाचित आपली रोजची उठण्याबसण्याची ठिकाणंही दहशतवाद्यांच्या रडारवर असू शकतील, हेही तितकंच खरं!

Feb 11, 2010

आओ म्हारो जैसलमेर

झी टीव्हीच्या एका सीरियलच्या शूटिंगसाठी जैसलमेरला घेऊन जाण्याचं निमंत्रण आलं होतं. माझी या दौऱ्यासाठी निवड झाल्यानं एक नवं ठिकाण पाहायला मिळण्याचं समाधान मिळालं. राजस्थानात भरतपूर अभयारण्यात मी सात-आठ वर्षांपूर्वी गेलो होतो. तेव्हा जयपूरही फिरून आलो होतो. पण जोधपूर-जैसलमेरची वारी पहिल्यांदाच घडणार असल्यानं जरा अधिक उत्साहित होतो.
प्रवास जरा आडनिडा होता. तीन फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता मुंबईहून विमानाने जोधपूरला जायचं होतं. त्यापूर्वी सकाळी मला पुण्याहून मुंबईला पोचणं आवश्‍यक होतं. कूल कॅबची चौकशी करून सकाळी लवकर निघायचं ठरवलं. साडेपाचची कूल कॅब फोन करकरून शेवटी सहा वाजता अवतीर्ण झाली. घरापासूनच टॅक्‍सी मिळाल्यानं फारसा त्रास झाला नाही. रात्री झोप झाली नव्हती. पहाटे गाडीतच थोडी झोप काढली. साडेनऊलाच आम्ही सांताक्रूझ विमानतळावर पोचलो. झी टीव्हीच्या सुशांतची तिथे भेट झाली. चॅनेल आणि प्रेसची अन्य काही मंडळी तिथे जमली होती. सगळ्यांशी ओळखी झाल्या. अकरा वाजता आमचं विमान उडणार होतं, पण ते दीड तास उशिरा असल्याचं समजलं. तिथेच टमरेलभर कॉफी पिऊन नाश्‍त्याची सोय भागवावी लागली. ब्रेड, केक प्रकारावर माझा बहिष्कार असल्यानं दुसरं काही पोटात ढकलण्यासारखं नव्हतं.
अकराचं फ्लाइट साडेबाराला अखेर निघालं. एअर इंडियाचं विमान असल्यानं आतील सेवा यथातथाच होती. एक जुनाट, रद्दड सॅंडविच माथी मारण्यात आलं. पोटात काहीच ढकललं नसल्यानं नाइलाजानं ते खावं लागलं. मध्ये उदयपूरलाही अर्ध्या तासाची विश्रांती होती. अखेर अडीच वाजता आम्ही जोधपूरच्या छोट्याशा विमानतळावर उतरलो. वाटेत सीटच्या मागच्या स्क्रीनवर "आ देखें जरा' पाहण्याचा आनंद मात्र घेता आला. विमानात बसल्या जागी पाहण्याइतपतच बरा होता.
जोधपूरला गेल्यावर तिथे अन्य कोणी मंडळी येणार असल्याचं कळलं. लखनौ, दिल्ली, इंदूर, अहमदाबाद या ठिकाणांहूनही लोक आले होते. सगळे जमल्यावर आम्ही तिथून जेवायला रवाना झालो. प्रत्येकाला कडकडून भूक लागली होती. सर्वांच्या ऑर्डर घेताना तो हॉटेलमालक मेटाकुटीला आला. चार वाजता सगळे जण जेवणावर तुटून पडले. "घट्टे की सब्जी' नावाचा एक प्रकार खाल्ला. बरा होता.
आमच्या कार्यक्रमात जोधपूर-जैसलमेर प्रवास तीन तासांचा असल्याचं लिहिलं होतं. प्रत्यक्षात तो 280 किलोमीटरचा, म्हणजे किमान पाच तासांचा होता. आम्हाला पोचायला रात्रीचे साडेनऊ वाजले. जाताना वाटेत पोखरण इथे थांबून चहा प्यायला. भारताने दोन अणुस्फोट घडविले, त्या गावात चहा पिण्याचा अनुभव वेगळाच होता.
साडेनऊला जैसलमेरच्या किल्ल्यासमोरच आमची गाडी थांबली. तिथल्याच एका इटालियन हॉटेलात जेवायचं होतं. साडेचारलाच पोट फुटेस्तोवर खाल्ल्यानं कुणाला फारशी भूक नव्हती. तिथे मांडी घालून एका टेबलासमोर बसायचं होतं. इटालियन काहीबाही पदार्थ मागविले, पण ते घशाखाली उतरले नाहीत. कुठलातरी पास्ता होता माझ्या ताटात, पण तो खपला नाही. सगळ्या पास्त्यांची चव सारखीच होती. रात्री तिथे आमच्यासोबत डिनरला त्या मालिकेतल्या दोन प्रमुख नायिकाही आल्या होत्या. तिथे त्यांच्याशी प्राथमिक ओळख आणि गप्पा झाल्या.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून "दो सहेलियॉं'च्या सेटवर जायचा बेत होता. पण सगळ्यांनीच उठायला उशीर केला. प्रत्यक्षात आरामात नाश्‍ता करून आम्ही दुपारी साडेअकराला सेटवर पोचलो. सेट म्हणजे एका जुन्या पडीक देवळाचं ठिकाण होतं. तिथे काही कलाकार शूटिंग करत होते. प्रमुख नायिकांना भेटण्या-बोलण्यासाठी फारसा वेळच नव्हता. त्यांच्या शूटिंगच्या अध्ये-मध्ये आम्ही एक आड एक त्यांच्याशी गप्पा केल्या. इलेक्‍ट्रॉनिक मीडियाच्या लोकांना काहितरी आकर्षक, वेगळे प्रसंग हवे होते. त्याची व्यवस्था रात्री करण्याचं तिथल्या कार्यकारी निर्मात्यानं कबूल केलं. मग आम्ही अडीच वाजता तिथून कटलो. या शूटिंगमध्ये आणि सेटवर बराच वेळ फुकट गेला. आमचा अर्धा दिवस तिथेच गेला.
दुपारी एका राजस्थानी हॉटेलात खास राजस्थानी ढंगाचं जेवण केलं. तिथे दाल-बाटी-चूरमा आणि घट्टे की सब्जी पुन्हा हाणली. चव उत्तम होती. दुपारनंतर आम्ही खरेदीला पुन्हा जैसलमेर गावात आलो. किल्लाही पाहिला. मनस्वीसाठी, बायकोसाठी काहीबाही घ्यायचं होतं. टप्प्याटप्प्यानं ही खरेदी केली.
संध्याकाळी इलेक्‍ट्रॉनिक मीडियाची मंडळी पुन्हा गाडीनं सेटवर रवाना झाली. आम्ही खरेदी आणि किल्ला पाहण्यासाठीच रेंगाळलो होतो. झी टीव्हीच्या अनुजसोबत मग आम्ही एका भांग विक्री दुकानात मैफल रंगवली. हो-नाही करत मीही थोडी सौम्य भांग चाखली. हॉट चॉकलेटमधून ती प्याल्याने फारसा फरक जाणवला नाही. डोकं काही काळ जड झालं होतं, तेवढंच. आधी जरासं टेन्शन आलं होतं. पण प्रत्यक्षात काहीच त्रास जाणवला नाही. सतत एकच कृती करणं वगैरे पण काही घडलं नाही.
तिसऱ्या दिवशी सकाळी साडेसहालाच आम्ही नाश्‍ता उरकला. दोन वाजता जोधपूरहून विमान होतं. सातला जैसलमेरहून निघालो. बारा वाजताच जोधपूरला पोचलो. गाडीत अंताक्षरी वगैरे खेळून दंगा केला. बऱ्याच दिवसांनी घसा साफ करण्याची संधी मिळाली. विमान वेळेत सुटलं. आमच्यासोबत "जेट एअरवेज'च्या विमानात हेमामालिनीही होती. या वेळचं विमान एअर इंडियापेक्षा वाईट होतं. आतली आसनव्यवस्था चांगली होती, पण सेवा काहीच खास नव्हती. खायला-प्यायलाही काही फुकटात मिळणार नव्हतं. शिवाय सीटच्या मागे स्क्रीनचीही सोय नव्हती. मुंबईत विमानतळावर गर्दी असल्यानं आम्हाला अर्धा तास आकाशातच घिरट्या घालाव्या लागल्या. त्यामुळे ढगांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या मात्र कॅमेऱ्यात टिपता आल्या.
मुंबईत पोचल्यावर मला न्यायला टॅक्‍सी तयार होतीच. एकदम राजेशाही वागणूक मिळाल्याचीच भावना होती. टॅक्‍सीचा आरामदायी प्रवास करून रात्री साडेनऊला पुण्यात पोचलो.
तीन दिवस रोजच्या कटकटींपासून दूर, राजस्थानात मस्त सहल झाली. आता आईला आणि मनस्वीला विमानातून सफर घडवायचेय. बघू, कधी जमतंय ते!

Jan 18, 2010

जमला मेळा नेटीझनांचा

मिसळपाव, मनोगत वगैरे साइटींवर वावरताना, इंटरनेटच्या दुनियेची सफर करताना एवढी ज्ञानी, जाणती, अनुभवी, व्यासंगी मंडळी कुठेतरी एकत्र आली पाहिजेत, असा विचार अनेकदा मनात येऊन गेला. काही छोटी मोठी संमेलनंही झाली, पण मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली नव्हती. कधी कामामुळे, तर कधी अंतरामुळे.

दोन आठवड्यांपूर्वी ब्लॉगर्सच्या संमेलनाचं निमंत्रण आलं, तेव्हा आनंदच झाला. आपण ज्यांचे वाचक आहोत आणि जे आपले वाचक आहेत, त्या सगळ्यांची भेट होणार, ही आनंदाचीच बातमी होती. मी लगेच होकार कळवून टाकला.17 जानेवारीला पु. ल. देशपांडे उद्यानात आणि रविवारी संध्याकाळी चारच्या वेळेत हा मेळावा होता. सगळं जमण्यासारखं होतं. अडचण एकच होती. साथ-साथ विवाह अभ्यास मंडळाचंही नेमकं त्याच दिवशी स्नेहसंमेलन होतं. माझ्या दृष्टीनं त्याला जास्त महत्त्व होतं. त्यामुळे तिकडे जायचं की इकडे, असा पेच पडला. शेवटी चारला पु.ल.देशपांडे उद्यानात डोकावून जायचं आणि रागरंग बघून थोड्या वेळानं कटायचं, असं ठरवलं.बरोब्बर चारला उद्यानापाशी पोचलो. भारतीय प्रमाणवेळेनुसार साडेचार-पावणेपाचपर्यंत माणसं येतील, अशीच अपेक्षा होती. पण माझ्या आधीच बरीचशी मंडळी येऊन पोचली होती. सगळ्यांशी ओळख झाली. मेळाव्याचं आयोजन करणारी मंडळी बरीच उत्साही होती. कुठून कुठून ब्लॉगर्स शोधून त्यांनी हा गोतावळा जमवला होता.

वेगवेगळ्या क्षेत्रातले, वेगवेगळ्या वयोगटाचे, ठिकाणचे लोक होतो. काही अमेरिकेत अनेक वर्ष राहिलेले, काही ज्योतिषातले, तर काही अवकाशसंशोधनात काम करणारे. काही संगणकतज्ज्ञ. काही जण नुसतेच विद्यार्थी किंवा वाचक म्हणून आले होते. एकूण साठेक (सुसंवादी) पात्रांचा तो अनोखा मेळा झाला होता.नावनोंदणीत पाऊणेक तास गेला. नंतर संयोजकांनी मेळाव्याचा उद्देश आणि पुढचा कार्यक्रम सांगितला. मुळात, ब्लॉगच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधणाऱ्यांचा एक गट तयार करणं आणि त्यातून सर्वांना उपयुक्त असे काही कार्यक्रम घेणं, हा हेतू होता. सगळ्यांनाच हा विचार पटला. उपक्रम चांगला होता. त्यासाठी फेसबुक किंवा तत्सम ठिकाणी एक कम्युनिटी किंवा ग्रुप तयार करणं आणि त्याद्वारे सर्वांच्या एकत्रितपणे संपर्कात राहणं, हा पुढचा टप्पा होता.प्रसन्न जोशी, नितीन ब्रह्मे, सम्राट फडणीस आदी माध्यम-मित्रही आले होते. त्यांचाही मेळाव्याच्या आयोजनात आणि स्वरूप ठरविण्यात बराच हातभार होता.

मी स्वतः ब्लॉग लिहिण्यापलीकडे ब्लॉगविश्‍वात काहीच करत नव्हतो. अगदी इतरांचे ब्लॉग वाचणंही! ट्विटर वगैरे माध्यमांमधलीही तज्ज्ञ मंडळी भेटली. राजे शिवाजी नावाची साइट चालविणारे, स्वतःची ई-मॅगेझिन वितरित करणारे, असे अनेक उद्योग व उपक्रम करणारी मंडळी भेटल्याने आनंद झाला. त्यांच्याशी झालेल्या ओळखीचा मला व त्यांनाही पुढील काळात फायदा होऊ शकेल.मी दोनेक तास या मेळाव्याला होतो. साथ-साथ कडे पळायचं असल्याने नंतरच्या अनौपचारिक गप्पांत सहभागी होऊ शकलो नाही.

एकूण मेळाव्याला जाण्याचा उद्देश साध्य झाला. जेवढा वेळ ठरविला होता, त्याहून जास्त थांबावंसं वाटलं, याहून अधिक काय हवं?

जमला मेळा नेटीझनांचा

मिसळपाव, मनोगत वगैरे साइटींवर वावरताना, इंटरनेटच्या दुनियेची सफर करताना एवढी ज्ञानी, जाणती, अनुभवी, व्यासंगी मंडळी कुठेतरी एकत्र आली पाहिजेत, असा विचार अनेकदा मनात येऊन गेला. काही छोटी मोठी संमेलनंही झाली, पण मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली नव्हती. कधी कामामुळे, तर कधी अंतरामुळे. दोन आठवड्यांपूर्वी ब्लॉगर्सच्या संमेलनाचं निमंत्रण आलं, तेव्हा आनंदच झाला. आपण ज्यांचे वाचक आहोत आणि जे आपले वाचक आहेत, त्या सगळ्यांची भेट होणार, ही आनंदाचीच बातमी होती. मी लगेच होकार कळवून टाकला.17 जानेवारीला पु. ल. देशपांडे उद्यानात आणि रविवारी संध्याकाळी चारच्या वेळेत हा मेळावा होता. सगळं जमण्यासारखं होतं. अडचण एकच होती. साथ-साथ विवाह अभ्यास मंडळाचंही नेमकं त्याच दिवशी स्नेहसंमेलन होतं. माझ्या दृष्टीनं त्याला जास्त महत्त्व होतं. त्यामुळे तिकडे जायचं की इकडे, असा पेच पडला. शेवटी चारला पु.ल.देशपांडे उद्यानात डोकावून जायचं आणि रागरंग बघून थोड्या वेळानं कटायचं, असं ठरवलं.बरोब्बर चारला उद्यानापाशी पोचलो. भारतीय प्रमाणवेळेनुसार साडेचार-पावणेपाचपर्यंत माणसं येतील, अशीच अपेक्षा होती. पण माझ्या आधीच बरीचशी मंडळी येऊन पोचली होती. सगळ्यांशी ओळख झाली. मेळाव्याचं आयोजन करणारी मंडळी बरीच उत्साही होती. कुठून कुठून ब्लॉगर्स शोधून त्यांनी हा गोतावळा जमवला होता. वेगवेगळ्या क्षेत्रातले, वेगवेगळ्या वयोगटाचे, ठिकाणचे लोक होतो. काही अमेरिकेत अनेक वर्ष राहिलेले, काही ज्योतिषातले, तर काही अवकाशसंशोधनात काम करणारे. काही संगणकतज्ज्ञ. काही जण नुसतेच विद्यार्थी किंवा वाचक म्हणून आले होते. एकूण साठेक (सुसंवादी) पात्रांचा तो अनोखा मेळा झाला होता.नावनोंदणीत पाऊणेक तास गेला. नंतर संयोजकांनी मेळाव्याचा उद्देश आणि पुढचा कार्यक्रम सांगितला. मुळात, ब्लॉगच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधणाऱ्यांचा एक गट तयार करणं आणि त्यातून सर्वांना उपयुक्त असे काही कार्यक्रम घेणं, हा हेतू होता. सगळ्यांनाच हा विचार पटला. उपक्रम चांगला होता. त्यासाठी फेसबुक किंवा तत्सम ठिकाणी एक कम्युनिटी किंवा ग्रुप तयार करणं आणि त्याद्वारे सर्वांच्या एकत्रितपणे संपर्कात राहणं, हा पुढचा टप्पा होता.प्रसन्न जोशी, नितीन ब्रह्मे, सम्राट फडणीस आदी माध्यम-मित्रही आले होते. त्यांचाही मेळाव्याच्या आयोजनात आणि स्वरूप ठरविण्यात बराच हातभार होता. मी स्वतः ब्लॉग लिहिण्यापलीकडे ब्लॉगविश्‍वात काहीच करत नव्हतो. अगदी इतरांचे ब्लॉग वाचणंही! ट्विटर वगैरे माध्यमांमधलीही तज्ज्ञ मंडळी भेटली. राजे शिवाजी नावाची साइट चालविणारे, स्वतःची ई-मॅगेझिन वितरित करणारे, असे अनेक उद्योग व उपक्रम करणारी मंडळी भेटल्याने आनंद झाला. त्यांच्याशी झालेल्या ओळखीचा मला व त्यांनाही पुढील काळात फायदा होऊ शकेल.मी दोनेक तास या मेळाव्याला होतो. साथ-साथ कडे पळायचं असल्याने नंतरच्या अनौपचारिक गप्पांत सहभागी होऊ शकलो नाही. एकूण मेळाव्याला जाण्याचा उद्देश साध्य झाला. जेवढा वेळ ठरविला होता, त्याहून जास्त थांबावंसं वाटलं, याहून अधिक काय हवं?