Jan 28, 2014

`हॅक` तिच्या!

सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात दुःखं तरी किती असावीत! रस्त्यावरचा खड्डा चुकवावा लागला नाही, टीव्हीचे सगळे चॅनेल व्यवस्थित दिसले, बायकोनं एकही दिवस भांडण केलं नाही, बॉसनं फालतू कारणावरून झापलं नाही, असा एकही दिवस उगवत नाही सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात!

गण्या हा असाच एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणूस. कुणाच्या अध्यात-मध्यात नसलेला. (थोडक्यात शक्यतो प्रत्येक बाबतीत मूग गिळून (किंवा शेपूट घालून!) गप्प बसणारा. गण्याची हौस मात्र दांडगी. प्रत्येक गोष्टीत त्याला फार इंटरेस्ट. प्रत्येक विषयात त्याचा जवळपास व्यासंग! अर्थात, अनुभव आणि निरीक्षणांतून आलेला. सीरियावर हल्ला होणार की नाही, याचं उत्तर आंतरराष्ट्रीय संबंधांमधला एखादा प्रकांडपंडित किंवा एखादा होराभूषणही देऊ शकणार नाही, पण गण्याला त्याचं उत्तर माहीत असतं. बराक ओबामांना ते जाणून घ्यावंसं वाटत नाही, हा त्यांचा करंटेपणा.

गण्याची सगळीकडेच फिरस्ती. तसा गण्या लहानपणापासूनच संवेदनशील. मनाचा हळवा. कांदा चिरतानाही त्याच्या डोळ्यातून पाणी यायचं ते कांद्याच्या उग्रपणामुळे नव्हे, तर तो चिरला जातोय, याबद्दल गण्याच्या मनाला होणा-या यातनांमुळे.

अशाच दोन वेगवेगळ्या बातम्यांनी गण्याचा जीव अलिकडेच पुन्हा कासावीस झाला होता. पहिली बातमी होती ती आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या (उद्योगांच्या नव्हे!) आणि भारत-पाकिस्तान परराष्ट्र संबंधांना एक वेगळा आयाम देणा-या थोर अभिनेत्री (?) वीणा मलिक यांची. लग्नानंतर आता त्यांनी चित्रपट क्षेत्रातून संन्यास घेण्याची घोषणा केली होती. खरंतर एकतर लोक संन्यास संपल्यानंतर लग्न करतात किंवा लग्नाचा आणि संसाराचा कंटाळा आल्यानंतर अनेक वर्षांनी संन्यास घेतात. हा संन्यास चित्रपट क्षेत्रातल्या कारकिर्दीचा होता, हे गण्याच्या खूप उशिराने लक्षात आलं. तरी त्याचा जीव हेलावायचा तो हेलावलाच! आपल्या महान चित्रपटसृष्टीचं, टीव्ही चॅनेल्सवरच्या टॉक शोजचं आणि `बिग बॉस`सारख्या रिअलिटी शोजचं काय होणार, या गंभीर प्रश्नानं गण्याची रात्रीचीच काय, दुपारची झोपसुद्धा उडाली!

दुसरी बातमी आणखी गंभीर होती. भारतीय क्रिकेट संघाचं विश्वकरंडक स्पर्धा जिंकण्यासाठीचं प्रेरणास्थान आणि तमाम भारतीय क्रिकेटरसिकांचं आशास्थान असलेल्या मॉडेल-कम-अभिनेत्री मा. पूनमजी पांडे यांची वेबसाईट हॅक झाल्याची खबर होती. ही अफवा नाही, तर साक्षात पूनमजींनी ट्विटरवरून जाहीर केलं होतं. (आता, त्यांचं ट्विटर अकाउंट कुणी हॅक करून पुन्हा ही अफवा कुणीतरी पसरवली होती की काय, कोण जाणे!) गण्याच्या पायाखालची वाळू सरकली. मा. पूनमजींची ही वेबसाईट रात्रंदिवस पाहताना (म्हणजे दिवसा कमी, रात्री जास्त!) गण्यानं इंटरनेटचं बिल भरमसाठ वाढवून घेतलं होतं! `नशा`सारख्या असंख्य चित्रपटांत त्यांनी केलेल्या कायिक अभिनयामागची सामाजिक आणि मनोवैज्ञानिक भूमिका वाचताना गण्याचं काळीज हेलावून गेलं होतं. ही अशी वेबसाईट हॅक झालेय, हा धक्काच गण्याला न झेपणारा होता. स्वतःची सख्खी बायको मित्राबरोबर पळून गेल्यानंतर जेवढा रडणार नाही, तेवढा गण्या त्या दिवशी रडला.

भारतासारख्या देशात कुठलीच गोष्ट सुरक्षित नाही, या भावनेपेक्षाही गण्याच्या मनातली दुसरी भीती जास्त गंभीर होती. भारतीय क्रिकेट संघानं वर्ल्ड कप जिंकला, तर (किमान एकदा तरी!) नैसर्गिक अवस्थेत फिरण्याची प्रेरणादायी घोषणा पूनमताईंनी केली होती. त्यानंतर भारतानं खरंच वर्ल्ड कप जिंकला. (हा योगायोग की खरंच स्फूर्ती, याबद्दल धोनीनं उत्तर देणं टाळलं म्हणे!) पण दुर्दैवानं पोलिसांच्या आणि कायद्याच्या दबावामुळे पूनमताईंना त्यांची (आणि त्यांच्या असंख्य चाहत्यांची) मनोकामना पूर्ण करता आली नाही. मा. पूनमजी कधी ना कधी त्यांचा शब्द पाळतील, या एकमेव आशेवर गण्या जगतोय. पण कालच्या ताज्या बातमीमुळे, त्यावेळची ती घोषणा नक्की पूनमजींनीच केली होती, की त्यांची साईट/ट्विटर अकाउंट हॅक करून आणखी कुणी हा चहाटळपणा केला होता, याबद्दल गण्याचा गोंधळ उडालाय!

....


Jan 6, 2014

रजनी फॅन्स...डोन्ट मिस द चॅन्स...!


सासवडला होणा-या अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी सुपरस्टार रजनीकांतला निमंत्रण धाडण्यात आल्यानंतर समस्त सारस्वत विश्वात अपरिमित आनंद झाला. रजनीकांतने येणार असल्याचे गुपचूप कळवून टाकल्यानंतर त्याच्या स्वागताची जंगी तयारी करण्यात आली. त्यानुसार संमेलनातील काही कार्यक्रमांमध्येही बदल करण्यात आला.

`मराठी साहित्याचे काय होणार` अशा स्वरूपाचा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता, तो बदलून `मराठी साहित्यः तंत्रज्ञानाने मारले, रजनीकांतने तारले` असा करण्यात आला. `मराठी साहित्य साता समुद्रापार` अशा विषयावर एक परिसंवाद होता, त्याचाही विषय बदलून `मराठी साहित्य सात आकाशगंगांपार` असा करण्यात आला. या परिसंवादांना तुफान प्रतिसाद मिळाला. रजनीकांतच्या उपस्थितीमुळे फक्त मराठी, अमराठी आणि परदेशस्थ भारतीयच नव्हे, तर इतर ग्रहांवरील काही वाचकही सहभागी झाल्याचे समजते. स्वागतगीताच्या ऐवजी `लुंगी डान्स`वर अप्रतिम नृत्य सादर करण्यात आले. रजनीकांत यांच्या तेजामुळे डोळे दिपू नयेत, म्हणून साहित्यनगरीला भेट देणा-या सर्वांसाठी मोफत गॉगल्सची व्यवस्थाही करण्यात आली होती.

रजनीकांतच्या धमाकेदार एन्ट्रीसाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. साहित्य महामंडळाने त्यासाठी मुख्य मंचाच्या शेजारीच सुपरसॉनिक रॉकेट उतरण्यासाठीचा तळ बांधला होता. प्रत्यक्षात रजनीकांतने चेन्नई ते सासवड अशा भुयाराची रचना करून घेऊन त्यातून मंचावर एन्ट्री घेतली.

साहित्य संमेलनातील रजनीकांतचे भाषणही खूप गाजले. ``सासवडच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण मला मिळाले, तेव्हा मी माझ्या रोबो-2 या चित्रपटाच्या तयारीत बिझी होतो. हा आधीच्या `रोबो`पेक्षा खूप वेगळा आणि बिगबिगबजेट सिनेमा आहे. याच्यात डॉ. चिट्टी एक रोबो बनवतो आणि नेपच्यूनवर राहणा-या एका मुलीच्या हा रोबो प्रेमात पडतो. आपल्या ग्रहावरची मुलगी पळवली, म्हणून नेपच्यूनवासीय पृथ्वीवर हल्ला करतात आणि मग हा रोबो पृथ्वीला वाचवतो, अशी ही कथा आहे. सासवडबद्दल मी खूप काही ऐकलं आहे. नेपच्यूनवरची वस्ती याच भागात एक सेट लावून दाखवता येईल, असं मला वाटलं. म्हणून मी लगेच होकार कळवून टाकला. आमचा सिनेमा भव्यदिव्य असल्यामुळे शूटिंगसाठी बरंच `साहित्य` लागतं. संमेलन सासवडलाच होणार असल्यामुळे तिथून रेडीमेड `साहित्य` मिळेल, असं माझ्या निर्मात्यानं मला सांगितलं. पण संमेलनातलं साहित्य आणि शूटिंगसाठी लागणारं साहित्य या वेगळ्या गोष्टी आहेत, हे इथे आल्यावर समजलं. असो. काही हरकत नाही. मी महाराष्ट्राचा असलो, तरी चेन्नईशिवाय आता करमत नाही. त्यामुळे शूटिंगच्या काळातही मी रोज चेन्नई-सासवड अपडाऊन करणार आहे. आमची डझनभर हेलिकॉप्टर्स, दहा सुपरसॉनिक विमानं आणि पाच रॉकेटस शूटिंगच्या ठिकाणी रोज साहित्य घेऊन येणार आहेत. त्यामुळे संमेलनात `साहित्य` कमी पडलं, तरी ते पुरवणं आमच्यासाठी अभिमानास्पद असेल.``

संमेलनाच्या व्यासपीठावर सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मध्ये रजनीकांत बसले होते. सिक्कीमला शूटिंगसाठी येण्याचं निमंत्रण पाटीलसाहेबांनी रजनीकांतला दिल्याचं समजतं. तर मुख्यमंत्र्यांनी `आदर्श` प्रकरणाच्या अहवालाचा विषय समस्त भारतीयांच्या मेंदूतून कायमचा पुसून टाकण्यासाठी रजनीकांतना गळ घातल्याचीही खबर आहे. कार्यक्रमादरम्यान मध्येच उठून रजनीकांत हे शरद पवार यांच्याही शेजारी जाऊन बसले होते. त्यावरून येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी रजनीकांत महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ब्रॅंड अम्बॅसिडर बनणार असल्याची जोरदार चर्चाही उपस्थितांमध्ये सुरू झाली. शरद पवार यांनी या चर्चेत काही तथ्य नसल्याचं ती सुरू व्हायच्या आधीच स्पष्ट केलं आहे. ``मी फक्त रजनीकांत यांच्या अभिनयाची (?) प्रशंसा केली आणि त्यांच्या नव्या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या. `परदेशी नको, देशी घ्या` या विषयावर मराठी चित्रपट बनविण्याची कल्पनाही मी रजनीकांत यांना सुचवली,`` असं पवारसाहेबांनी स्पष्ट केलं. या वक्तव्यावरूनही वाद झाल्यानंतर `परदेशी` या शब्दाचा मा. सोनिया गांधी किंवा `वाईन` या दोन्ही गोष्टींशी काहीही संबंध नव्हता, तर ते वक्तव्य नागरिकांचा देशाभिमान जागविण्यासाठी होते, असेही पवारसाहेबांनी स्पष्ट केले आहे.

यापुढेही साहित्य संमेलनाला येण्याचे रजनीकांत यांनी कबूल केल्यामुळे `मराठी साहित्याचे काय होणार` ही चर्चा यापुढील काळात सुरू राहिली, तरी `साहित्य संमेलनाचे काय होणार,` याविषयीच्या शंकांना मात्र पूर्णविराम मिळाला आहे!

Aug 19, 2013

बिनकांद्याचा श्रावण


""निनाद कुठाय? आत्ताच्या आत्ता त्याला इथे यायला सांग!'' बाहेरून आल्या आल्या श्री. किरकिरेंनी खास "वडीलकी'चा स्वर लावला होता.
""बाबा, तो सोसायटीत खेळायला गेलाय. काय झालंय?'' कु. नं विचारलं.
""तो येऊ दे. मग मला तुमच्याशी एकत्रच बोलायचंय! जा, त्याला हाक मार.''
एवढं बोलून श्री. हातपाय धुवायला गेले. एव्हाना आरडाओरडा ऐकून सौ.सुद्धा फोडणीचा गॅस बंद करून बाहेर आल्या होत्या. कु.ची आणि त्यांची खुणवाखुणवी झाली.
""आई, नक्की काय झालंय? बाबा चिडलेत कशानं एवढे?''
""सांगते नंतर.''
""अगं, सांग ना. आमच्यावर रेशन निघायच्या आधी त्याचं कारण तर कळू देत.''
""बोकडाच्या मानेवर सुरी फिरवायच्या आधी त्याला सांगतात का, की बाबा गेल्यावेळी तू एकदा मला ढुशी दिली होतीस, म्हणून तुला कापतोय...?'' सौं.चा युक्तिवाद पटण्यासारखा होता.
""अगं आई, पण...'' कु. काहीतरी बोलणार, एवढ्यात श्री. फ्रेश होऊन हॉलमध्ये आले. त्यामुळे कु.नं तिचे पुढचे शब्द गिळले.
""आला का निनाद?''
""नाही अजून. बोलावते.'' कु. पटकन हाक मारण्यासाठी बाहेर पळाली.
""अहो, जरा शांत राहा. मुलं लहान आहेत, त्यांना जास्त ओरडू नका.''
""काही लहान नाहीयेत. तू त्यांना डोक्‍यावर बसवून ठेवलंयंस.''
""मी? बरं!'' वाद घालण्यात काही अर्थ नाही, हे सौं.च्या लक्षात आलं. (कधी वाद घालायचा आणि कधी वाद घालण्यासाठी एनर्जी राखून ठेवायची, हे बायकांना बरोबर कळतं.)
काही क्षण असेच तणावाचे गेले आणि चि. आणि कु. दारात हजर झाले. घरात स्फोटक परिस्थिती आहे, हे कु.नं चि.ला आधीच सांगितेललं होतं. महायुद्धाचा भडका उडणार होता, पण त्यामागचं तात्कालिक कारण कुणाला कळत नव्हतं.
""आलात का? या!'' श्री.ंच्या आवाजावरूनच चि.चा धीर आणखी खचला.
""काल कुठे गेला होतास?''
""काल...?''
""हो. कालच! कोर्टात साक्षीला उभा राहिल्यासारखा चेहरा करू नकोस. दोन वर्षांपूर्वीच्या घटनेबद्दल विचारत नाहीये तुला. कालचंच विचारतोय!'' चि.चं आज काही खरं नव्हतं.
"" कानतोडेंकडे गेलो होतो...भुर्जी तोडायला...आपलं...भुर्जी खायला.''
""हेच...हेच...हीच शिस्त नाहीये तुम्हाला. महिना कुठला चालू आहे आत्ता?'' श्री. जाम भडकले होते.
""ऑगस्ट!'' कु. नं आता कुणीही न विचारता उत्तर दिलं.
""मराठी महिना कुठला चालू आहे, ते विचारतोय.''
""अं...बहुतेक चैत्र असावा.'' कु.च्या निरागस प्रश्‍नाने श्रीं.चा पारा आणखी चढला.
""श्रावण महिना चालू आहे! तुम्हाला काही आहे का त्याचं?''
""आईशपथ, खरंच हो. लक्षातच नव्हतं माझ्या. श्रावणात एकदा सत्यनारायणाची पूजा घालायची म्हणत होते मी. बरी आठवण केलीत.'' सौं.च्या या विधानाने श्री. आणखी भडकले.
""बाहेर लोक माझी खेटरानं पूजा बांधतायंत आणि तुला सत्यनारायणाची पूजा सुचतेय?'' श्रीं.च्या पट्ट्यातून आज कुणीच सुटणार नव्हतं.
""नक्की काय झालंय, सांगाल का? काल संध्याकाळपासून तुम्ही असे निष्कारण चिडचीड करताय.'' सौ.नी पुन्हा मुलांची बाजू घेतली.
""चातुर्मास चालू आहे आणि भुर्जी पाव खायचं सुचतंय तुम्हाला? तू त्यांच्याकडे जाऊन भुर्जी खाल्लीस, म्हणजे उद्या आपल्याला त्यांच्यासाठी भुर्जी करावी लागेल. मग काय करणार? किरकिरेंच्या सात पिढ्यांमध्ये कुणी श्रावणात कांदा आणि मांसाहार केलेला नाही, माहितेय का? उद्या लोकांनी विचारल्यावर काय उत्तर देऊ मी?''
""बाबा, पण परवाच आईनं घरी भुर्जी केली होती, ती आपण सगळ्यांनीच खाल्ली!'' कु.ला राहवत नव्हतं.
""हो का...? ती चुकून खाल्ली असतील. पण यापुढे कडक श्रावण पाळायचा. कांदाबिंदा सगळं बंद!''
""आणि नॉनव्हेज?''
""तेसुद्धा बंद!''
""चला, मी सकाळीच ताजी मासळी आणलेली पाटीलकाकूंना देऊन टाकते.'' सौ.नी केलेल्या या विधानामुळे श्रीं.ची थोडी चलबिचल झाली, पण तसं न दाखवता ते तडक आत निघून गेले.
आता चि. आणि कु. ने सौ.ना एका कोपऱ्यात घेतलं.
""बाबा एवढे का बिथरलेत?'' दोघांनीही एकदमच विचारलं.
""काय सांगू मुलांनो तुम्हाला? माझीच चूक आहे!'' सौं.नी असं सांगितल्यावर दोघांनीही कान टवकारले.
""काय झालं?''
""अरे, काल चुकून त्यांना बाजारातून भाजी आणायला सांगितलं होतं. यादीत एक किलो कांद्याचाही उल्लेख होता. कांदे घेऊन आले आणि जे बिनसलंय, ते आत्तापर्यंत. प्रत्येक गोष्टीचा हिशोब करत बसलेत! चातुर्मास आणि कांदा-लसूण न खाणं वगैरे सगळ्या संकल्पांचा जन्म त्यातूनच झालाय!!'' सौं.नी खुलासा केला.

सलमानभाऊ, "लई भारी'!


दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या "लई भारी' या आगामी चित्रपटातून सलमान खान मराठीत पदार्पण करणार आहे. सलमानच्या कुठल्याही चित्रपटाप्रमाणे हा चित्रपटही दोनशे कोटींचा गल्ला जमवेल आणि सलमानला चित्रपटात घेण्यासाठी मराठी निर्मात्यांच्या रांगा लागतील, अशी शक्‍यता आहे. सलमानच्याच अनेक हिट हिंदी चित्रपटांवरून मराठीत रिमेक करता येऊ शकतो. काही उदाहरणं ः


-ं पहिलं लफडं (मैंने प्यार किया)
-लव्हरनं मारली टांग! (सनम बेवफा)
-किरण्या-अज्या (करण अर्जुन)
-घ्या मुका ः पार्ट 2 (खामोशी)
-व्यक्ती तितक्‍या प्रकृती (अंदाज अपना अपना)
-लफडी करणाऱ्या सगळ्यांसाठी (हर दिल जो प्यार करेगा)
-तुझा-माझा काय संबंध? (हम आपके है कौन)
-जुळ्याचं दुखणं (जुडवा)
-सख्या सजणा (साजन)
-उशिरा झोपून उठणारा (सूर्यवंशी)
-आईशपथ, अशी बायको पाहिजे यार! (बीवी नं. 1)
-हरवला आहे! (वॉंटेड)
-टग्या (दबंग)
-तुमच्यासाठी काय पण! (रेडी)
-आणखी एक टग्या (दबंग-2)
-अंगाला हात लावायचं काम नाही! (बॉडीगार्ड)
-एक होता वाघोबा (एक था टायगर)
-
-आणि
-आगामी ः
-
-लाथ मारीन तिथं पाणी काढीन! (किक)

कांद्याअभावी वांदा टाळण्यासाठी...



कांद्याच्या भावांनी सध्या (कांदा न चिरताही) अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणलं आहे. पुढचे काही दिवस सहजासहजी कांदादर्शन घडण्याची चिन्हं नाहीत. कांदा हा जीवनातला आणि जेवणातला अविभाज्य भाग आहे. श्रावणातही कांदा खाण्याची इच्छा मारता येत नाही. त्यामुळे या काही कांदाविरहित पाककृती ः

बिनकांद्याची भजी ः
साहित्य ः कांदा, बेसन पीठ, हळद, लाल तिखट, मीठ, पाणी, पातेलं, गॅस, कढई, तेल आणि (मानवी) हात.
कृती ः आधी अख्खा कांदा उभा बारीक चिरून घ्यावा. तुकडे वेगवेगळे करण्याऐवजी कांदा खालच्या किंवा वरच्या बाजूने एकसंध ठेवावा. (फळविक्रेते शोभेसाठी डाळिंब कापून, फुलवून ठेवतात, तसा.) त्यात मीठ, थोडी हळद आणि लाल तिखट घालून तो भिजवून ठेवावा. त्याला पाणी सुटल्यानंतर त्यात बेसन पीठ मिसळावे. हातांनी हे मिश्रण नीट कालवून घ्यावे. थोडा वेळ हे मिश्रण तसेच राहू द्यावे. त्यानंतर अख्खा कांदा तसाच उचलून घ्यावा. त्यावर पाणी ओतून कांद्याच्या फोडींमध्ये अडकलेले सगळे पीठ व्यवस्थित धुवून घ्यावे आणि कांदा नीट बाजूला काढून ठेवावा. आता कांद्यातून बाजूला केलेले पीठ आणि आधीचे पिठाचे मिश्रण एकत्र करून, गरम तेलात त्याची छोटी भजी करून तळावीत. बाजूला काढून ठेवलेला कांदा तसाच फ्रीझमध्ये ठेवून, पुढच्या भज्यांच्या वेळी अशाच प्रकारे वापरावा.
टीप ः पाहुणे आले असल्यास ही भजी शक्‍यतो गार करून वाढावीत. जेणेकरून ते कमी खातील.
....
कांदा-बटाटा रस्सा
साहित्य ः कांदा आणि बेसनपीठ सोडून वरीलप्रमाणेच. फक्त शेंगदाण्याचे कूट किंवा ओले खोबरे अतिरिक्त.
कृतीः कढईत चवीप्रमाणे मसाल्याचे पदार्थ, मसाला, लसूण, जिरे, असे पदार्थ छान खरपूस परतून घ्यावेत. हे मिश्रण (कढई सोडून!) मिक्‍सरमधून काढावे. पुन्हा कढईत तेल घेऊन फोडणी करावी आणि त्यात हे मिश्रण घालावे. दरम्यानच्या काळात नवऱ्याला बटाटे धुवून कांद्याप्रमाणे बारीक चिरून घ्यायला सांगावेत. पेपर वाचण्याचा, फेसबुक, व्हॉटस्‌ ऍप बघण्याचा, मॉर्निंग वॉकचा वेळ वाया गेल्याची कुरकुर त्याने केल्यास त्याकडे दुर्लक्ष करावे. कांद्याप्रमाणे बारीक चिरलेला हा बटाटा फोडणीत घालावा. नंतर पुन्हा नव्याने वेगळे बटाटे धुवून, त्याचे थोडे मोठे काप करावेत आणि ते फोडणीत घालावेत. चवीप्रमाणे (आणि घरातल्यांवर किती राग काढायचा आहे, त्याप्रमाणे) मीठ व तिखट घालावे. गरमागरम कांदाविरहित कांदा-बटाटा रस्सा तयार!
....
मिसळ, पावभाजी.
साहित्य ः नेहमीचेच.
पावभाजी आणि मिसळ,या दोन्ही पदार्थांना वरून घातलेल्या कांद्याशिवाय चव नाही. त्यामुळे या दोन्ही पाककृतींमध्ये कांदा पूर्णपणे टाळता येणार नाही. फक्त वाचवता येईल. त्याची कृती पुढीलप्रमाणे ः
लहानात लहान कांदा बारीक चिरून घ्यावा. तो एका ताटलीत पसरून ठेवावा. त्यावर बारीक छिद्रांची जाळी कायमस्वरूपी चिकटवून टाकावी. मिसळ किंवा पावभाजी घरातल्या मंडळींना डिशमध्ये वाढल्यानंतर ही कांद्याची ताटली त्यांच्या नाकासमोरून फिरवावी. बारीक छिद्रांच्या जाळीमुळे कांद्याचा वास त्यांच्या नाकापर्यंत जाईल आणि कांदा खाल्ल्याचा फील येऊ शकेल. जाळी निघणार नाही किंवा कुणाला काढता येणार नाही, याची काळजी घ्यावी. ही ताटली फ्रीझमध्ये ठेवून महिनाभर सहज वापरता येईल.
....
रामबाण उपाय ः
बिनकांद्याचे हे पदार्थ खाऊन थोड्या दिवसांनी कंटाळा येऊ शकतो. अशा वेळी कर्ज काढून कांदे विकत आणण्याचा पर्याय स्वीकारण्याऐवजी पुढील उपाय करावा ः
""अरे देवा! ह्यांना चक्कर आली! अहो काकू, दोन कांदे द्या पटकन!'' असं म्हणून शेजाऱ्यांच्या घरी विद्युतवेगाने धावत जावे. प्रचंड घाबरेघुबरे झाल्याचा अभिनय करावा. (प्राइम टाइममधली कोणतीही मालिका पाहिल्यास हा अभिनय फारसा अवघड जाणार नाही.) शेजारच्या काकूंनी शेजारधर्माला जागून (यदाकदाचित) कांद्याची परडी पुढे धरल्यास "असू देत अडीनडीला' असं म्हणून चार-पाच कांदे पटकन उचलून घराच्या दिशेने पोबारा करावा.