Sep 3, 2007

माणसापरास गाढवं बरी!


परसदारातील बागेत फिरत असल्याच्या आविर्भावात रस्त्यावर रेंगाळणारे पादचारी, राष्ट्रपतींशीच भेटीला जाण्याजोग्या घाईत असलेल्या रिक्षा, दोन वाहनांमधील चिंचोळी जागाही अमान्य असलेले दुचाकीस्वार आणि यांसारखीच असंख्य चित्रविचित्र वाहनांची भेळ...सिंहगड रस्त्यावरचा हा संध्याकाळचा नेहमीचाच "राडा'! त्यातून वाट काढत, अंग चोरत स्वारगेटच्या दिशेने निघालेली एक पीएमटी...

आधीच धायरीपासून वाहनांच्या "सर्कशी'तून पीएमटीतल्या पन्नास-साठ लोकांच्या आणि रस्त्यावरच्या असंख्य जिवांची काळजी घेत गाडी पुढे हाकताना मेटाकुटीला आलेला तो चालक आपलं सर्व सौजन्य पणाला लावून भाषा वापरत होता. सारसबागेसमोरून नेहरू स्टेडियमच्या दिशेने वळताना गाढवांचा एक मोठा तांडाच पीएमटीला आडवा गेला आणि चालकाला करकचून ब्रेक दाबावा लागला. हॉर्न दिल्यावर गाढवं बाजूला सरली. आता गाढवांची काही खैर नाही, असं प्रवाशांना वाटलं, पण चालकानं तोंडाला लगाम घातला. पीएमटीला वाट करून देण्यासाठी बाजीराव रस्त्याकडून आलेल्या चार चाकी गाड्याही अलीकडेच थांबल्या. पण एक "अतिउत्साही' मोटारसायकलस्वार गाड्यांना ओलांडून, "आधी मीच'च्या अभिनिवेशात पुढे घुसला आणि नेमका पुढे सरकण्याच्या बेतात असलेल्या पीएमटीच्या समोर आला. चालकाकडून एक कचकचीत शिवीच प्रवाशांना अपेक्षित होती, पण त्यानं फक्त करकचून ब्रेक दाबला. मोटारसायकलवाला पीएमटीला अगदी घासूनच पुढे गेला.

जरा पुढे गेल्यावर चालक न राहवून म्हणाला, ""राव, ही गाढवं तरी बरी! हार्न वाजवल्यावर बाजूला तरी झाली...आणि माणसं बघा...!'' चालकाच्या त्या सौम्य पण उत्स्फूर्त प्रतिक्रियेनं प्रवाशांना तशा परिस्थितीतही हसू फुटलं.

No comments: