Sep 4, 2007

"डॉग शो'तला "कॅट वॉक'

सकाळी मस्तपैकी मुरगुशी मारून झोपलो होतो, तर नतद्रष्ट बंट्यानं भुंकून भुंकून उठवलं. खरं तर उठणारच नव्हतो, पण अंगावरच तंगडं वर करीन, म्हणाला. चरफडत उठलो. चार-दोन शिव्या घातल्या. पण लेकाचा ढिम्म होता. काहीही परिणाम नाही. बंट्या पूर्वी कॉंग्रेसवाला असावा. असो.
मला म्हणाला, चल "डॉग शो' बघायला!"
"च्यायला, एवढ्या पहाटे? आत्ताशी नऊ वाजलेत गधड्या!'' मी भडकलो.
तेवढ्यात तिकडून जाणाऱ्या एका गाढवानं पेकाटात एक लाथ घातली. मी बंट्याला गधड्या म्हटलेलं आवडलं नव्हतं त्याला.
गाढवंही माजल्येत लेकाची!"
"अरे, "मॉर्निंग शो' आहे. लवकर आटप आणि चल.''
मला काही ब्रशनं दातबित घासून गुळगुळीत दाढी करायची नव्हती. आटपायचं म्हणजे काय होतं? तंगड्या पसरून मस्तपैकी आळस दिला आणि निघालो बंटीबरोबर. तोंडाला जरा रात्रीच्या मटणाचा वास मारत होता, पण माझ्या तोंडाचा वास घ्यायला कोण जवळ येणार होतं?
मला वाटलं, कुठलातरी पिक्‍चरच दाखवायला नेतोय बंटी. पण तो एका उच्चभ्रू क्‍लबात मला घेऊन आला. सगळीकडे मखमली पडदे, आकर्षक सजावट, झगमगते दिवे, पायाखाली मऊमऊ चादरी...धमाल होती नुसती.
मी म्हटलं, ""बंट्या, पिक्‍चर कुठाय इथे?''"
"तू गप रे! नुसती गंमत बघ तू!''...बंटी माझ्यावरच डाफरला.
मी निमूटपणे (नेहमीप्रमाणे) शेपूट घातलं.
एवढ्यात त्या क्‍लबचे एकेक मेंबर यायला लागले.

क्‍लबच्याही सजावटीला लाजवतील, असे कपडे होते एकेकाचे. भर पावसाळ्यातही पांढरे शुभ्र आणि भरजरी कपडे घालून आले होते. मला वाटलं, कुणाचं लग्नबिग्न दिसतंय. मागे चंपीच्या (आमच्या शेजारच्या गल्लीतली माझी मैत्रीण) आतेभावाच्या मावसबहिणीचं लग्न असंच झोकात झालेलं मी पाहिलं होतं. (आता त्यात चंपीनं लाडानं सगळ्यांचे मुके घेऊन त्यांच्या उंची कपड्यांवर तिचे केस पाडून ठेवले होते आणि चिखलाच्या पायांचे ठसेही उठवून ठेवले होते, ही गोष्ट निराळी!)

क्‍लबचे मेंबर एकटे नव्हते. प्रत्येकाच्या बरोबर वेगवेगळ्या रंगाची, वेगवेगळ्या जातींची आणि मी कधीच न पाहिलेली कुत्री होती. (कुत्री म्हणजे "कुत्रा' या शब्दाचं अनेकवचन. त्यात मेल/फिमेल दोन्ही आले. उगाच "सदाशिव पेठी' शंका काढू नका.) काय तर म्हणजे ऑल्सेशियन, डॉबरमॅन, ...काय नि काय...!

एक धिटुकली मला फारच आवडली. कुणा तरी नटीबरोबर होती म्हणे. मी काही फारसे पिक्‍चर बघत नसल्यानं मला ओळखलं नाही, पण बंट्यानं सांगितलं. पण तिचा सगळा चेहरा केसांनीच झाकला होता. फक्त लुकलुकते डोळे दिसत होते. साधे "आयब्रोज'सुद्धा करत नाही, हे बघून वाईट वाटलं. पण आपला जीव जडला तिच्यावर. एकदम "लव्ह ऍट फर्स्ट साईट!'. "मिनी' तिचं नाव. गळ्यातला पट्टा पण स्टायलिश होता. मध्येमध्ये माझ्याकडे चोरून नेत्रकटाक्ष टाकत होती.

हा सगळा जामानिमा म्हणजे लग्नबिग्न नव्हे, तर त्या कुत्र्यांचंच संमेलन होतं, हे मला खूप उशिरा कळलं. "डॉग शो' म्हणे. म्हणजे "फॅशन शो'सारखं काहितरी बघायला मिळणार होतं, तर! पण माझ्या मनात दोन शंका होत्या. एकतर "डॉग शो'मध्ये कुत्रे "कॅट वॉक' कसा करणार ही.

दुसरी शंका थोडी गंभीर होती. मागे मी शनिवार पेठेत जोश्‍यांच्या घरात राहायला होतो, तेव्हा मुंबईतल्या कुठल्या तरी "फॅशन शो'मध्ये एका मुलीचे कपडे घसरून पडल्याबद्दल त्यांनी (चवीचवीनं) चाळीत केलेलं निषेधाचं भाषण मला आठवत होतं. त्यामुळं इथेही "मिनी'च्या बाबतीत काही "वॉर्डरोब मालफंक्‍शन' झालं तर काय, याची काळजी मला होती. पण (दुर्दैवानं) तसं काही झालं नाही.मिनी "मिनी स्कर्ट' घालून फारच मिरवत होती. बाकीच्या कुत्तरड्यांनीही (खरं तर आपल्याच जातीच्या बांधवांना आणि भगिनींना...सॉरी, मैत्रिणींना अशा शिव्या घालणं बरोबर नाही, पण हेवा वाटतो ना!) असलेच कायकाय भपकेबाज कपडे घातले होते. काही जण तर ढेंग वर करायला चक्क टॉयलेटमध्ये जात होते. किती हे पाश्‍चिमात्त्यांचं अंधानुकरण! डावे (पाय) काय म्हणतील?शेवटी एकदाचा तो "डॉग शो' आटपला.

गळ्यात पट्टे बांधलेल्या आपल्याच बांधवांना आणि मैत्रिणींना अशा प्रकारे माणसांच्या आदेशांच्या आहारी जाताना बघवलं नाही. कुणा एका जोडीला बक्षीस पण मिळालं म्हणे. मला नंतर फार वेळ थांबवलं नाही.

परतताना मिनी मात्र सारखी डोळ्यासमोर दिसत होती. पांढऱ्या शुभ्र पोशाखात भलतीच गोड दिसत होती. तिनं हेअरस्टाईल मात्र बदलली पाहिजे, असं मनोमन वाटलं. असो.

लग्न झाल्यावर बघू.
----

No comments: