Oct 16, 2007

धुलाई आणि कोडकौतुक...


सिनेमा पाहण्याचं आमचं वेड पहिल्यापासूनच.
(दर वेळी हीच सुरुवात करायला हवी का? गेल्या वेळी "चक दे'बाबतही पहिलं वाक्‍य हेच होतं. पेंढारकर, सिंह गवत खायला लागलाय आता!)
अगदी मिथूनपासून सोमी अलीपर्यंत (माहितेय?) कुठलाही सिनेमा वर्ज्य नाही.
परीक्षण लिहिण्याची खुमखुमीही पहिल्यापासूनच.
रत्नागिरीत 1994 साली "रत्नागिरी एक्‍स्प्रेस'मध्ये पहिलं परीक्षण लिहिलं. "हम आपके हैं कौन'चं. त्यानंतर परीक्षणं लिहिण्याचा छंदच लागला. कमलाकर नाडकर्णी, शिरीष कणेकर, अभिजीत देसाई, श्रीकांत बोजेवार, यांचा मी पहिल्यापासूनचा फॅन. आणि नंतर मुकेश माचकरचा. किती लिहिलंय या लोकांनी चित्रपटांबद्दल! त्यांनी परीक्षणं वाचणं म्हणजे तर मेजवानीच!

मग त्यांची नक्कल करता करता स्वतःची शैली (डोंबल!) विकसित झाली.

"जेमतेम दोन-तीन हातरुमालांपासून तयार होतील, एवढेच कपडे "सत्यम शिवम्‌ सुंदरम'मध्ये झीनत अमाननं घातलेत.' किंवा "अमक्‍या तमक्‍याला अभिनेता म्हणण्याची माझी तरी छाती होणार नाही. (माझीच काय, ममता कुलकर्णीचीही होणार नाही!) हे शिरीष कणेकरांनीच लिहावं.
"आपटून धोपटून पीळ पीळ पिळलेली माहेरची साडी' हे खास नाडकर्णी स्टाईल शीर्षक. किंवा "चित्रपटात मरतानाही पूजा बेदी अंगप्रदर्शन करून मरते. (केवढी ही निष्ठा!)' हे त्यांच्याच परीक्षणात शोभणारं.
"रंग' ओला आहे' हे श्रीकांत बोजेवारांचं शीर्षक, किंवा "त्यांचंच आग लागो त्या बस्तीला' हे शीर्षक.
"थोरला आणि धाकटा' हा अभिजीत देसाईंचा लेख...आजही चांगलाच लक्षात आहे.
"अचानक कसला, भयानकच!' हे माचकरचं शीर्षक. किंवा "पहेली'वरचा लेख. खास "मुमा'टच!
--
हे सगळं वाचता वाचता स्वतःही परीक्षणं लिहायची सवय लागली आणि चक्क छंद जडला. पुण्यात आल्यावर पत्रकारितेची पदवी करता करता आमच्या विभागाच्या नियतकालिकातच काही परीक्षणं लिहिली. मग "सकाळ'मध्ये नोकरीला लागल्यानंतर दोन-तीन वर्षांनी परीक्षणं लिहिण्याची संधी मिळाली.

परीक्षणात खूप प्रयोग करण्याची संधी मिळाली. मराठी चित्रपटांबद्दल सहानुभूतीनं लिहिण्याचं धोरण स्वीकारतानाच वाईट चित्रपटांना ठोकण्याची परंपराही राबविली. सगळ्यात गाजलेलं परीक्षण म्हणजे गौतम जोगळेकरच्या "आई नं 1'चं. एवढा भीषण सिनेमा मी आजवर पाहिला नसेल. "माता न तू वैरिणी' असं शीर्षक मी त्याला दिलं होतं. जोगळेकर जाम खवळले होते. भलं मोठं पत्रही लिहिलं. तेही "सकाळ'ने छापलं, माझ्या उत्तरासकट!


एका संथ, वाईट मराठी चित्रपटाचं परीक्षण मी "आपण रांगत आहात' असं दिलं होतं. केदार शिंदेच्या "जत्रा-ह्याला गाड रे त्याला गाड'चं परीक्षण "कथेला गाड रे तंत्राला काढ' या शीर्षकानं दिलं होतं.

"धूम-2' या केवळ तांत्रिक चमचमाटी चित्रपटाचं परीक्षण वेगळ्या शैलीत, "गंमत म्हणजे काय रे भाऊ?' असं दिलं होतं. तेही गाजलं.
चित्रपट बघताना कॅमेऱ्याचे अँगल्स, दिग्दर्शकाची मानसिकता, शेड्‌स, रंगांचा वापर, याला माझ्या लेखी अजिबात महत्त्व नाही. मी मानतो, ते चित्रपटाच्या एकूण परिणामाला. सिनेमा आपल्याला एकूण आवडला, तर असल्या बारीक सारीक गोष्टी लक्षातही येत नाहीत, राहत नाहीत. चित्रपटच परिणामकारक नसेल, तर त्यातल्या त्रुटी, खाचाखोचा आपल्याला दिसायला लागतात. तशी संधीच प्रेक्षकाला देत नाही, तो खरा उत्तम चित्रपट.

विनोदी, गंभीर, सामाजिक, कौटुंबिक...कुठलाही चित्रपट आपल्याला वर्ज्य नाही. मी परीक्षणासाठी चित्रपट पाहताना सर्वसामान्य प्रेक्षकाच्या नजरेतून बघतो. म्हणजे अगदी पिटातल्या नाही, तर सुजाण प्रेक्षकाच्या. एक सामान्य प्रेक्षक म्हणून मला चित्रटपट आनंद देतो ना, भिडतो की नाही, हे महत्त्वाचं. मग बाकीचे निकष दुय्यम.

मराठी चित्रपट म्हणून निष्कारण उदोउदो नाही आणि दुय्यम अभिनेत्यांचा म्हणून अनाठायी टीका पण नाही. पण हेतूच वाईट असेल, तर त्या सिनेमाला, दिग्दर्शकाला सोलून काढण्याला पर्याय नसतो. म्हणायचं उदात्त हेतू आणि दाखवायच्या उघड्या बायका, या धोरणानं आपलं टाळकंच फिरतं.

तुम्हाला जे मांडायचंय ते स्पष्ट मांडा, स्पष्ट सांगा. अमक्‍यातून तमका अर्थ काढा वगैरे नाही जमणार. तुमचा संदेश व्यवस्थित नाही पोचला, तर तुम्ही नापास!नंतर पत्रकं वाटत फिरणारात का गावभर? मग...? तुम्ही त्या त्या प्रसंगातूनच बोललं पाहिजे. नाहीतर हे दिग्दर्शकाचं माध्यम कशाला म्हणायचं?

असो. खूप बोललो. माझी परीक्षणं तुम्ही वाचत असाल, तर तुम्हाला काय वाटतं?
अनाठायी झोडपल्यासारखं वाटतं का?
अकारण स्तुती वाटते का?

तुमचे चित्रपट आवडी-नावडीचे निकष काय आहेत?

मलाही तुमचं रसग्रहण वाचायला आवडेल...

-----------

7 comments:

Prasad said...

hello abhijeet ji...u r very good reviewer and writer..as per u said it is important to convey the message in the cinema regardless its angles, sheds and other technical aspects..rather they are difficult to understand to aam junta.....keep reviwing....

अमित said...

अभिजीत,

भन्नाटच लिहीतोस तू, तुझे "आई नं १" वरचे परीक्षण वाचले होते. पण गौतम जोगळेकरचे पत्र आणि त्यावरचे तुझे उत्तर वाचेपर्यंत ते तु लिहीले आहेस हे पाहीले नव्ह्ते [आपल्याला काय content शी मतलब... :)]. आता काही लोकाना कोकणचं पाणी पचत नाही त्याला आपण काय करणार? असो...
पण तुझे लिखाण खरंच जबरदस्त आहे, एका दगडात दोन पक्षी मारणे तुला सही जमते. तुझ्या पुढच्या post ची वाट पहात आहे.

Surendra said...

मी तुमची जास्त परीक्षणं वाचलेली नाहीयेत, पण तुमच्या चित्रपट आवडण्याच्या निकषांशी सहमत आहे. मी चित्रपट पाहायला जातो ते माझे प्रोब्लेम्स विसरायला. जर पाहताना डोकं लावत बसायचं असेल तर माझं ओफ़ीस काय वाईट आहे?

स्नेहल said...

:) tuzya aai no. 1 chya parixanababat mala mazya vahini ne sangital. te ithe takata ala tar bagh. Comedy warun kahi tari wajal hot na tumach???

Raj said...

तुमची जास्त परीक्षणे वाचण्याचा योग आला नाही पण
चांगल्या चित्रपटाच्या निकषांशी बयाच अंशी सहमत आहे. चांगला चित्रपट असेल तर पहिल्यांदा बघताना क्यामेरा, अभिनय वगैरे गोष्टींकडे लक्ष जात नाही. पण माझ्या बाबतीत असा चित्रपट असेल तर मी आणखी ३-४ वेळेला तरी बघतो आणि मग त्यातल्या गमतीजमती लक्षात यायला लागतात. शिरीष कणेकर माझेही आवडते समीक्षक आहेत.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

Unknown said...

तुमची परीक्षणं मी वाचली आहेत..आणि सगळी मस्त आहेत! आई नं. १ चे देखील परीक्षण,वाद-विवाद आठवत आहेत. तुम्ही जसे लिहीता तसेच लिहीत रहा..! भंगार चित्रपटांचे परीक्षण करताना dissection करायला काहीच हरकत नाही! आम्हाला ते पिक्चर पाहण्यापासून तुम्ही वाचवता, हे खूप उपकार आहेत, तुमचे आमच्यावर! :)

Abhishek said...

छान लिहिता तुम्ही. त्यात वादच नाही. मध्यंतरी तुम्ही चित्रपटासाठी कथा/पटकथा लिहिण्याची ईच्छा बोलून दाखवली होती माझ्याकडे, (संदर्भ : ऑर्कुट वरील पोस्ट, 'मराठी पाऊल कधी पडणार पुढे ?') तर त्याचा नक्की प्रयत्न करा. १००% यश मिळेल.