Mar 9, 2010

चिंचोली ः मोरांची आणि थोरांची!

मोराच्या चिंचोलीबद्दल बऱ्याच वर्षांपासून ऐकत होतो. एखाद्या गावात जाऊन मोर पाहण्याचं प्रचंड आकर्षण वगैरे नव्हतं. पण मुळात भटकायला, नवीनवी गावं नि रस्ते शोधायला आवडत असल्यानं कधीतरी एकदा तिकडे जाण्याचं डोक्‍यात होतं. परवाच्या रविवारी हा योग जुळून आला.

गेल्या महिन्यात एका छोट्या ग्रुपला घेऊन मोराच्या चिंचोलीला एक सहल काढायचा बेत केला होता. तो काही कारणांनी साध्य झाला नाही. म्हटलं, वेळ आहे, तर आपणच जाऊन यावं आधी. कार हाताशी होतीच. आनंदराव थोपटे यांच्या वेबसाइटवर जरा टेहळणी केली होती. त्यांच्याशी संपर्क साधून सर्व आलबेल आहे ना, याची चौकशी केली. सकाळी 6 ते 8 आणि सायं. 5 ते 7 ही मोर दिसण्यासाठी उत्तम वेळ. आम्हाला सकाळी लवकर उठून जाणं शक्‍य नव्हतं, म्हणून दुपारी निघायचं ठरवलं. एक वाजता निघणार होतो, पण सव्वादोनपर्यंत ढकलाढकली सुरू राहिली. मग चिडचीड, वैताग, भांडणांनंतर मनस्वीला काखोटीला मारून कसेबसे पुण्याबाहेर पडलो!

मोराच्या चिंचोलीचा रस्ता शोधायला फारसा अवघड नव्हता. नगर रस्त्यावरून शिक्रापूरपर्यंत जाऊन पुढे पाबळ फाट्याला वळायचं होतं. शिक्रापूरपासून चिंचोली 18 कि.मी. आहे. पुण्यापाहून शिक्रापूर साधारण 48 किमी. पुढचा रस्ता थोडा खराब होता. त्यातून एका अरुंद वळणावर एका टेम्पोमध्ये कोंबून कोंबून भरलेल्या उसाच्या कांड्यांनी आमच्या गाडीच्या अगदी जवळून ठिकठिकाणी पप्प्याही घेतल्या!

दुपारी चारच्या सुमारास मोराच्या चिंचोलीत पोचलो. आनंदराव थोपटेंचा मुलगा आम्हाला न्यायला जरा पुढे आला होता. चिंचोलीत दोन-तीन कृषी पर्यटन केंद्र आहेत. जय मल्हार, माऊली वगैरे नावांची. या थोपटे मंडळींचं कृषी पर्यटन अगदीच घरगुती, पण छान, आकर्षक आणि नीटनेटकं आहे. बाहेर पाटी, बोर्ड वगैरे काही नाही. आम्ही थेट थोपट्यांच्या अंगणातच दाखल झालो. ज्येष्ठ आनंदरावांनी हसतमुखानं स्वागत केलं. नातेवाइकच घरी आल्यासारखी "प्रवासाचा त्रास वगैरे नाही ना झाला,' अशी चौकशी केली. मग चहापान झालं. नंतर आम्ही त्यांच्यासह त्यांचा मळा बघायला निघालो. ज्वारी, वांगी, मका, गवार, गहू, कसली कसली शेती करतात ते! चाळीसेक एकर जमीन नि खाणारी चार माणसं! गावात माणसं मिळत नाहीत म्हणून बरीचशी जमीन तशीच पडीक!

शेतात आम्ही पाऊल टाकलं नि दुसऱ्याच क्षणाला तीन-चार मोर शेतात बागडताना दिसते. आमची चाहूल लागताच पळून गेले. पुढच्याही शेतात कुठेकुठे दडून उभे होते. थोडाफार फेरफटका मारून, चिंचा वगैरे खाऊन आम्ही पुन्हा घराकडे परतलो. तोपर्यंत घराच्या जवळ सत्तरेक फुटांवर झाडांखाली काही मोर दिसत होते. कॅमेरा शक्‍य तितका झूम करून त्यांची छबी टिपली.

नंतर आनंदराव आम्हाला त्यांच्या हिल-स्टेशनवर म्हणजे चिंचिणीखाली घेऊन जायला निघाले. घराच्या आवारातून बाहेर पडलो आणि शेजारच्याच माळावर चार-पाच मोर मस्त बागडताना अगदी जवळून दिसले. एक मोर आणि लांडोरीचा खेळही (!) चालला होता. त्याचा व्हिडिओ टिपता आला. काही फोटो मिळाले. तिथून मग त्या "हिल स्टेशन'वर पोचलो. रस्ता ओलांडून पलीकडे असलेल्या चिंचेच्या झाडांखाली त्यांनी खाटाबिटा टाकून बसायची झकास व्यवस्था केली होती. मोठा ग्रुप असेल तेव्हा ही थोपटे मंडळी तिथे सडारांगोळी वगैरे घालून स्वागताचा कार्यक्रम करतात.
संध्याकाळी कृषी पर्यटनच्या बससेवेच्या माध्यमातून एक महिला मंडळ येणार होतं. आनंदरावांची त्यासाठी लगबग चालली होती. आम्ही घरी परत आलो आणि ते तयारीला लागले. दोन किलो पोहे करून ठेवले होते. पण ती पुणेकर सुसंस्कृत मंडळी आल्यावर काय बिनसलं कुणास ठाऊक! अचानक काही मिनिटांत निघून गेली. अन्न-पाण्यावर बहिष्कार घालून! त्यांना म्हणे घरात, दारात, अंगाखांद्यांवर खेळणारे, बागडणारे मोर अपेक्षित होते. "तुमच्या गावातल्या प्रत्येक घरी पाच-पाच मोर पाळलेत, असं ऐकलंय आम्ही. काढा ते बाहेर!' असं सुद्धा दरडावून विचारायला त्यांनी कमी केलं नाही!!

मंडळी पोहे न खाता निघून गेली, तरी आनंदराव मात्र शांत होते. "दोन किलो पोह्यांचं आता करायचं काय? माझं नुकसान कोण भरून देणार?' असा एखाद्या व्यावसायिकाला साजेसा थयथयाट त्यांनी अजिबात केला नाही. "राहू दे. खातील गावातील पोरं. जाऊ देत त्यांना. माणसाचं समाधान महत्त्वाचं,' असं ते पत्नीला आणि मुलाला समजावत होते. मुलाला राहवलं नाही. शेजारच्या दुसऱ्या व्यावसायिक पर्यटन केंद्रात ही मंडळी गेली. पण तिथली 100 रुपये प्रवेश फी ऐकूनच परत फिरली. पुन्हा थोपट्यांकडेच आली आणि पोह्यांवर तुटून पडली.

त्यांच्या निमित्तानं आम्हीही पोहे खाऊन घेतले. रात्री आम्हाला लवकर निघायचं होतं. मोर पोटभर पाहून झाले होते आणि अंधारतल्या अपरिचित रस्त्यावरून फार उशीरा जायला नको, असंही वाटत होतं. थोपटे मंडळींनी ज्वारीची भाकरी, पिठलं, चटण्या, लोणचं, पापड, आमटीभात, असा फर्मास बेत केला होता. आनंदराव स्वतः भाकरीवर बदाबदा तूपही ओतत होते. (मला पुण्यातल्या खाणावळी नि भोजनालयांतल्या "तुपाच्या वाटीचे पैसे वेगळे पडतील,' अशा पाट्यांची आठवण झाली!) "रात्री कमी जेवावे' वगैरे आरोग्यदायी बोधामृताला बासनात गुंडाळून आम्ही त्या जेवणावर यथेच्छ ताव मारला.

जेवल्यानंतर तर "लक्ष्मीनारायणा'चा जोडा म्हणून आनंदरावांनी आणि त्यांच्या अर्धांगिनीनं आमचं औक्षण वगैरे केलं. रीतसर ओटी भरणं, श्रीफळ देणं वगैरे कार्यक्रम झाले. या भल्या मंडळींनी आमच्याकडून थेट पैसेही घेतले नाहीत. "तुम्हाला काय द्यायचे ते देवापुढे ठेवा' म्हणाले. पावणेआठला गावातून निघालो. मुख्य फाट्यापर्यंत सोडायला स्वतः आनंदराव त्यांच्या मोटरसायकलवरून आले होते. तिथून दीड तासांत घरी पोचलो.
"आनंद कृषी पर्यटन केंद्र' नावाने वेबसाइटही चालविणाऱ्या या थोपट्यांच्या पाहुणचाराचा अनुभव अगदी अनपेक्षित होता. त्यांच्याशी झालेल्या बोलण्यातून त्यांचा साधेपणा दिसत होता, पण प्रत्यक्ष गेल्यावर तो अनुभवायलाही मिळाला.

काही टिप्स ः
अंतर ः
मोराची चिंचोली पुण्यापासून 66 कि.मी. अंतरावर आहे. जाण्यासाठी पुणे-नगर रस्त्यावर शिक्रापूरहून पाबळ फाट्याला वळावं लागतं. शिक्रापूर अंतर 50 कि.मी आणि पुढे चिंचोली 18 कि.मी.
वेळ ः मोर दिसण्याची वेळ सकाळी 6 ते 8 आणि सायं. 5 ते 7. सकाळी जास्त मोर दिसतात आणि भाग्यात असेल, तर नाचतानाही पाहायला मिळतात. जास्त जवळून. संध्याकाळी मोर तुलनेनं कमी दिसतात.
जायचं कधी? ः कुठल्याही मोसमात. एक-दोन पाऊस पडून गेल्यानंतर मोर जास्त खुशीत असतात. त्या वेळी त्यांचा नाच आणि पिसारा पाहण्याची सुवर्णसंधी असते. शिरूर तालुक्‍यात पाऊसही फार नसतो. त्यामुळे त्याचा त्रास होण्याची शक्‍यता कमी.
पथ्यं कोणती पाळाल? ः कुठलाही वन्य प्राणी त्याच्या मर्जीप्रमाणेच वागत असतो. "माणसं आल्येत, चला त्यांच्यासमोर फोटो काढून घेऊ,' म्हणून आपल्या अंगचटीला येण्याची शक्‍यता नसते. मोराचंही तसंच. चिंचोलीत मोर भरपूर असले, तरी ते ठरलेल्या वेळी, ठरलेल्या ठिकाणी आणि जवळून दिसतीलच, असं सांगता येत नाही. शेवटी त्यांची मर्जी आहे! जास्त जवळ गेलं, तर ते पळून जाण्याची शक्‍यताच जास्त. झूमची सुविधा असलेला कॅमेराही फोटोसाठी अधिक चांगला. नाहीतर आपल्या डोळ्यांचा कॅमेरा आहेच! ग्रुपनं जायला हे जास्त चांगलं ठिकाण आहे. रात्रीचा मुक्कामही करता येणं शक्‍य आहे.
आनंद कृषी पर्यटन केंद्र : http://www.chincholi-morachi.com/
छायाचित्रे इथे पाहा ः http://picasaweb.google.com/abhi.pendharkar/uSYPDJ#

3 comments:

शुद्ध मराठी said...

माहितीबद्दल धन्यवाद! या ठिकाणाला भेट द्यायला नक्की आवडेल.

iravatee अरुंधती kulkarni said...

माहिती व फोटो दोन्ही आवडले. निसर्गाच्या सहवासात ग्रामीण आदरातिथ्य आणि ग्रामसंस्कृतीचा अनुभव नक्कीच आनंददायी ठरतो....मात्र आपणही अवाजवी अपेक्षा घेऊन जाता कामा नये. घाई, गडबड बाजूला ठेवली की निवांत वातावरणात खरी मजा येऊ लागते. :-)

sachin kaulgekar said...

Last week we also went there as 1 day picnic. Hospitality shown by Thopate family was one of the best. As mentioned here we also loved food very much. Poha with piping hot tea, and lunch was very good. we saw lots of peacock. 2-3 peacocks were always there around their home. Got following details from there card - http://chincholi-morachi.com/home.html Anandrao Dottaba Thopate. Topate vasti ,Chincholi Morachi, Tal. Shirur. Mob. No. 9689125047 / 9673132497